Pages

Thursday, October 20, 2016

‘दखलपात्र’ घनश्याम!

'साहित्य चपराक' दिवाळी महाविशेषांकाचे प्रकाशन काल उत्साहात झाले. मान्यवरांची अभ्यासपूर्ण भाषणे हा या कार्यक्रमाचा आत्मा होता. परभणी येथील दैनिक 'समर्थ दिलासा'ने या दिवाळी महाविशेषांकाच्या निमित्ताने कालच्या अंकात माझ्यावर एक सुंदर लेख प्रकाशित केला. त्यांना आणि अत्यंत जिव्हाळ्याने हा लेख लिहिणा-या कवयित्री, लेखिका अर्चनाताई डावरे यांना मन:पूर्वक धन्यवाद!



‘चपराक’ या प्रकाशन संस्थेचे संचालक श्री. घनश्याम पाटील यांच्या 500 पानी दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आज पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून या निमित्ताने हा विशेष लेख...

पाच एक वर्षापूर्वीची गोष्ट. वेगवेगळ्या दिवाळी अंकासाठी मी माझे साहित्य पाठवित होते. इतक्यात दादांचा अर्थात श्री. दिवाकर खोडवे यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘अर्चना, एक पत्ता व फोन नंबर देतो आहे. तिथे तुझे साहित्य नक्की पाठव. संपादक दर्जेदार साहित्यांना स्थान देणारे सामाजिक नि साहित्यिक जाण असणारे आहेत.’’ त्यांनी लगेच मला पत्ता व फोन नंबर दिला. मी तो टिपून घेतला. परंतु मनाशीच ठरवलं, कुरिअरचा लिफाफा तयार करायच्या आधी संपादकांना फोन करायचा. प्रतिसाद योग्य आला तर तत्काळ साहित्य पाठवून द्यायचं नि मी लगेच फोन लावला.
‘‘हॅलो, मी आपल्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवू इच्छिते.’’
समोरून क्षणाचाही विलंब न करता संपादक बोलले, ‘‘होय ताई! लगेच पाठवा. प्रकाशनाची जबाबदारी माझीच. तेव्हा लगेच पाठवा. आमचा पत्ता ठाऊक आहे ना आपल्याला?’’
‘‘हो, सर’’ इति मी.
‘‘मग पाठवा साहित्य. आपलं स्वागत आहे ताई.’’
मी क्षणभर विचारात पडले. प्रकाशक आणि संपादक दोन्ही पदं भूषविणारा, सतत व्यग्र असणारा माणूस तत्काळ फोन उचलतो आणि साधी ओळखही नसणार्‍या समोरच्याचे उत्साहात स्वागतही करतो. नक्कीच कुशलतेने काम करणारे नि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे असले पाहिजेत, हे मनानी नक्की केलं आणि खरोखरच अनेक दिग्गजांकडून सन्मानित झालेले नि कैकवेळा अवघड कसोट्यांतूनही खरे उतरणारे ‘चपराक प्रकाशना’चे हृदयस्थ आणि साहित्यिकांचे लाडके लेखक श्री. घनश्याम पाटील यांची नि माझी ओळख झाली.
या स्पर्धेच्या युगात प्रकाशन विश्‍वात आपले पाऊल अगदी दृढपणे उभे करणे आणि केवळ आप्त स्वकियांनाच नव्हे तर दूरवरच्या राज्यातही आपल्या नम्रतेची छबी उमटवित हितचिंतक माणसांचा मेळा सतत सभोवार टिकविणे हे आजमितिला तरी मोठे जिकिरीचे काम आहे; पण हे अशक्यप्राय वाटणारं अवघड काम ते फार लिलया नि सहज करतात. चेहर्‍यावर कायम शांत स्मीतहास्य नि संयम असतो. उत्तम श्रोत्याचे गुण जणू जन्मत:च घेऊन आले असावेत, असं त्यांच्याशी बोलताना कायम जाणवतं. त्यांच्या तोंडून नकार घंटा कधी वाजणारच नाही. ‘‘हो, बरोबर आहे. अगदी तसंच करू’’ असे समोरच्याच्या वक्तव्यावर पुश्ती जोडणार्‍या वाक्यांचा वर्षाव होतो. साहजिकच समोरचाही तितक्याच उर्मीने, जिद्दीने आणि जीव ओतून मग त्यांच्या साप्ताहिकासाठी, मासिकासाठी, दिवाळी अंकासाठी सातत्याने लिहित राहतो.
नेमकं खरं कौतुक तर वेगळंच ठरावं. अगदी प्रथितयश दिग्गजांपासून नवोदित लेखकांपर्यंत विषय देऊन सगळ्यांनाच लिहितं करतात; परंतु कुठेही गर्वाचा दर्प किंवा अहंकार डोकावत नाही. उलट साहित्यिकांच्या साहित्याच्या शिदोरीमुळे घनश्याम घडला आणि त्यांच्या दर्जेदार लिखाणामुळेच आज हजारो वर्गणीदार ‘चपराक’शी जोडले गेले आहेत, असे मोठ्या अभिमानाने ते सांगतात. श्रेय न लाटणारे संपादक आताशा विरळच!
नवल तर तेव्हा वाटतं, जेव्हा कळतं की, मुळातच पत्रकारितेचा पिंड. जन्मत:च. हा संपादक सुरूवातीला पेपर विक्री करून तद्नंतर पुण्यात कै. वसंतराव काणे यांच्या ‘संध्या’ या सायंदैनिकात नोकरी करून आज स्वबळावर उभा आहे. स्वव्यवसायास आरंभ करणं, साप्ताहिक ते दिवाळी अंक प्रकाशित करणं, इतर पुस्तकांचेही प्रकाशन आणि त्यासोबत अग्रलेख लिहिण्याची जबाबदारी! एकाचवेळी विविध स्तरावर काम करूनही त्यांनी यशाचा आलेख वाढवतच नेला. खरंतर अशा बाबींचं वर्णन करणं अतिशय सोपं आहे; परंतु स्वत:च प्रकाशक आणि संपादक या दोन्ही बाजू सांभाळत आर्थिक डोलाराही मजबूत करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. गॉडफादर नसताना समाजात प्रस्थापित होऊन गरूडझेप घेणं तर त्याहूनही कठीण! पण आज ‘चपराक’ दिवाळी अंकाने महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रथम क्रमांक पटकाविला आणि कैक पुरस्कार ‘चपराक’च्या नावे नोंदविलेले आहेत. ते मानाचे स्थान जनमाणसात रूजविले आहे. पराकोटीची अभ्यासूवृत्ती, प्रगल्भता, स्पष्टता, सामाजिक भान, कष्ट, कौशल्य, प्रयत्न आणि स्वत:वर विश्‍वास असणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्यामुळेच घनश्याम पाटील यशस्वी आहेत. किंबहुना त्यांची दखल केवळ मराठीच नव्हे तर इंग्रजी वृत्तपत्रंही घेत आहेत. ही सत्यता, लोकप्रियता आहे. पाटलांकडे पाहिल्यावर वाटतं स्वप्न पाहणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्नं वास्तवात आणणे हे आपले कर्तव्य आहे आणि कष्ट करण्याची सवय लागलेली असली ना की माणूस कार्यपूर्तीचा ध्यास घेतो नि यशस्वीही होतो. अशा ठिकाणी घनश्याम पाटलांचं नाव अगदी आग्रहाने अग्रभागी येतं. वय वर्षे जेमतेम बत्तीस अन् जणू स्वकर्तृत्वाचा इतिहासच रचलाय त्यांनी! स्वसामर्थ्यावर एकट्यानेच संघर्ष करणे खूप वेदनादायक गोष्ट असते; परंतु त्यातून माणूस घडत जातो ही सत्यता. कदाचित म्हणूनच अगदी लहान वयातच जाणिवांच्या तीव्र संवेदनेने पेटून प्रत्येक विषयावर सखोल व परखडपणे लिहिण्यास त्यांनी सुरूवात केली. ते लेखन म्हणजे केवळ आरडाओरड नव्हती; ते झणझणीत अंजन होतं. म्हणूनच सामान्यांच्या मनात ते सहजपणे उतरलं. त्यांच्या कैक अग्रलेखात तीव्रच नाही तर मानसिक पातळीवर घडणार्‍या अनेक घटनांचे हळवे आंदोलनंही त्यांनी चपखलपणे लिहिली, मांडली. हळव्या विषयांचे कंगोरे तितक्याच साध्या भाषेत रेखाटले. ‘दखलपात्र’ ठरावे असेच ते लिखाण!
असा हा प्रचंड व्याप सांभाळताना माणूस म्हणून जगण्याचा सोपा मंत्र विसरले नाहीत. गिरमे मॅडमविषयी मातृदेवो भव: म्हणणारे घनश्याम पाटील सागर कळसाईत, महेश मांगले, सागर सुरवसे, गिरिश जंगमे, हणमंत कुराडे आणि व्यंकटेश कल्याणकर या नवोदित लेखकांचे, चपराक टीमचे कौतुक करायला, आभार मानायला विसरत नाहीत. म्हणूनच चपराक टीम एखाद्या कुटुंबासारखी गुण्यागोविंदाने व एका विचाराने सुखात नांदते आणि त्यामुळेच एवढ्या अल्पकालावधीत नामवंत लेखकांची व नवोदित लेखकांची मिळून 87 साहित्यिक पुस्तकांचे प्रकाशन चपराकने केले आहे. परंतु अभिमानाची गोष्ट ही की हा प्रवास करताना त्यांनी मुजोरीही केली नाही आणि जीहुजूरीही केली नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस असोत की शरद पवार, जितेंद्र आव्हाड असोत वा सद्य स्थितीतले सरकार, जिथे उणीवा असतील तिथे घनश्याम पाटलांची लेखणी पोचणारच हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. म्हणूनच या हरहुन्नरी अवलियाची प्रस्तावना आपल्या पुस्तकास लाभावी ही नवलेखकांची तीव्र इच्छा असते आणि तशी कैक लेखकांची ही इच्छा त्यांनी पूर्णही केली आहे. बर्‍याचदा वाङ्मयीन व वैचारिक नियतकालिकांमधूनही त्यांनी लेख लिहिलेले आहेत, जे उत्कृष्ट, वाचनीय आहेत.
असं म्हणतात,
उत्तिष्ठत, जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।
क्षुरासन्न धारा निशिता दुरत्यदुर्गम पथ:॥
खरोखरच ध्येयापर्यंत पोचविणारा मार्ग पाटलांनी केव्हाच निवडलाय आणि म्हणूनच अगदी दिग्गजस्थानी असणारे ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे, द. ता. भोसले, सुधीर गाडगीळ, विश्‍वास वसेकर, संजय सोनवणी, सदानंद भणगे, मिलिंद जोशी ते सौ. श्रुती कुलकर्णी, अर्चना माने, प्रशांत चव्हाण, सागर सुरवसे यांच्यापर्यंत  त्यांच्या कर्तृत्वामुळे आपापल्या शब्दात, शब्दवैभवात त्यांना बद्ध करावंसं वाटलं, मनस्वी कौतुक करावंसं वाटलं.
संपादकाला शोभेल अशा ‘दखलपात्र’ नि ‘झुळूक आणि झळा’ या पुस्तकाच्या लेखकाचे, टिळकांचा वारसा जणू परखडपणात जपणार्‍या लेखकाचे, नम्र व सुस्वभावी प्रकाशकाचे खरंच मनस्वी कौतुक.
या पुढच्या देदिप्यमान वाटचालीला, मराठी साहित्याला परप्रांतात पोहचविणार्‍या पांथस्थाला, नवोदितांना आभाळ मुठीत घेऊन लिहितं करणार्‍या संपादकाला आणि सदोदित दर्जेदार लिखाण व साहित्य नव्या पिढीसमोर ठेवून साहित्याचा दर्जा जपणार्‍या प्रकाशकाला भरभरून शुभेच्छा!! शुभं भवतू!!
- अर्चना गिरीश डावरे, परभणी

Sunday, October 9, 2016

विचारांचे कवडसे

एखाद्या राष्ट्राचे मूल्यमापन करायचे झाल्यास त्या राष्ट्रातील तरूणाईच्या मनाचा वेध घ्यायला हवा. तरूण काय वाचतात, काय लिहितात, काय बोलतात, काय खातात, काय घालतात याचे निरिक्षण केले तर राष्ट्राच्या प्रगतीची दशा आणि दिशा कोणाच्याही सहजपणे लक्षात येईल. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपूर येथील स्वप्निल कुलकर्णी हा असाच एक धडपड्या युवक. आपल्या उपजिविकेचे साधन असलेली नोकरी सांभाळत स्वप्निल कुलकर्णी या तरूणाने राज्यातील आणि राष्ट्रातील विविध विषयांचा डोळसपणे धांडोळा घेतला आहे. विचारधारा, जात, पात, धर्म, प्रांत यापुढे जाऊन स्वप्निल यांनी चौफेर लेखन केले. त्यातील प्रासंगिक विषयावरील लेख काही नियतकालिकात प्रकाशित झाले. त्यामुळेच आजचा तरूण कसा व्यक्त होतोय हे पाहण्यासाठी स्वप्निल कुलकर्णी यांचे या पुस्तकातील एकवीस लेख वाचायला हवेत.
स्वप्निल यांच्या मनातील विचारांचे कवडसे या संग्रहात विखुरले आहे. संस्कार आणि संस्कृती जतन करावी यासाठीची त्यांची तळमळ दिसून येते. आजचे तरूण वाहवत चाललेत,  असा अपप्रचार सुरू असतानाच स्वप्निल यांच्यासारखे लेखक धडाडीने अन्याय, असत्यावर तुटून पडतात, लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक बाजू वाचकांसमोर आणतात ही कौतुकाची बाब आहे. स्वप्निल यांना लेखनासाठी स्थानिकपासून आंतरराष्ट्रीय घटनांपर्यंत कोणताही विषय वर्ज्य नाही. संवादी भाषा आणि तळमळ यामुळे हे लेख वाचताना वाचक अंतर्मुख होतो. एखाद्या विषयावर मांडलेली मते वाचताना आपल्या मनातील भावनाच व्यक्त झाल्यात असे वाचकांना वाटणे हीच तर लेखकाची मोठी उपलब्धी असते.
‘आई तू उन्हातली सावली’ या पहिल्याच लेखात स्वप्निल यांनी शब्दांची साखर पेरणी केली आहे. मातृत्वाची महती गाताना लेखक भावव्याकूळ होतो. जुलीया वार्डहो या अमेरिकन कवयित्रीपासून ते मराठमोळ्या फ. मु. शिंदे यांच्यापर्यंतच्या कवींचे ‘मातृत्व’ या विषयावरील दाखले या लेखात आले आहेत. स्वप्निल यांच्या वाचनाचा आवाका आणि त्यांची उपजत समज याची ही साक्ष ठरेल. ‘आई हा परमेश्‍वर, आई माझा गुरू आणि आईच माझा प्राण. त्यापलीकडं कुणी खूप वेगळा, मोठा, श्रेष्ठ असा परमेश्‍वर असलाच तर त्यालासुद्धा माझ्या आईची सर येणार नाही’, हे लेखकाचे विचार वाचताना त्याची मातृभक्ती दिसून येते. आपले सांस्कृतिक संचित जपताना आजच्या तरूणाईची मातृत्वाच्या गौरवाची ही भाषा म्हणूनच प्रत्येकाला प्रेरणादायी वाटावी.
असे म्हणतात की, ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो, तेथील माणसे मरतात. काहीवेळा जनावरेही मरतात; मात्र जिथे संस्कारांचा दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते. त्यामुळे हे संस्कार जिवंत ठेवणे, ते वृद्धिंगत करणे हे काम आजच्या तरूणाईने करायला हवे स्वप्निल कुलकर्णी त्यासाठी लेखणीच्या माध्यमातून पुढाकार घेताना दिसतो. ‘टिळक आणि गणपती उत्सव’, ‘शिवाजी महाराज एक धिरोदत्त राजा’, ‘चेतनाप्रवाह स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ या व्यक्तिचित्रणात्मक लेखांच्या माध्यमातून स्वप्निल कुलकर्णी यांनी तरूणांपुढे मोठा आदर्श ठेवला आहे. ‘करावयास लागा म्हणजे कळून येईल की तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे’ हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य देताना लेखकातील सच्चेपणा दिसून येतो. ‘नवरात्र संकल्पना आणि महत्त्व’ या विषयावरही लेखकाने उत्तम मांडणी केली आहे. आपल्याकडील सण, उत्सव, चालीरिती, रूढी परंपरा यापासून आपण दूर जात असताना स्वप्निल यांनी त्यांच्या नजरेतून याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. उत्सवांना ‘इव्हेंट’ म्हणून बाजारू स्वरूप दिले जात असताना स्वप्निल यांनी त्यामागील संकल्पना नेटकेपणे मांडली आहे. ‘नवरात्र केवळ साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीची गाथाच नाही, येथे साधनाक्रमाचे निर्देशही दिले आहेत. प्रथम मनशुद्धी झाल्याशिवाय कोणीही ज्ञानप्राप्ती करू शकत नाही’ हे लेखकाने नोंदवलेले निरिक्षण खूप काही सांगून जाते.
लेखकाचा जन्म पंढरपूरचा असल्याने त्यात या शहराची गौरवगाथा, वारकरी संप्रदायाचे महात्म्य येणे स्वाभाविकच म्हणायला हवे. आपले पहिलेच पुस्तक वाचकांच्या हाती देताना ‘पंढरपूर आणि वारकरी संप्रदाय’, ‘पंढरीची वारी ः इतिहास, परंपरा व वैशिष्ट्ये’ असे दोन अभ्यासपूर्ण लेख लिहून त्यांचा या पुस्तकात समावेश केला आहे. वाढती अराजकता लक्षात घेऊन लेखक अस्वस्थ होतो आणि ‘कधी होशील रे माणूस?’ असा सवाल करतो. ‘लेक वाचवा, भविष्य वाचवा’ या लेखातूनही स्वप्निल कुलकर्णी सामाजिक प्रश्‍नांबाबत किती गंभीर आहेत याची प्रचिती येते. लेखकाच्या अभ्यासाची कुवत मोठी असल्याने पानिपत युद्धापासून ते ‘आपला देश महासत्ता कधी होईल?’ इथपर्यंत सर्व विषय त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. परदेशातील स्वच्छतेचे तोंड भरून कौतुक करताना आपल्या फलाटावरील पूलावर पानाच्या मारलेल्या पिचकार्‍या पाहून लेखकाला ही विसंगती खटकते आणि ‘हे देशप्रेम आहे का?’ असा रोकडा सवाल तो उद्विग्न होऊन करतो.
सरकारच्या दलालधार्जिण्या धोरणांमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. स्वप्निल कुलकर्णी यांनी या विषयावर जळजळीत भाष्य केले आहे. विकासाची गंगोत्री केवळ पश्‍चिम महाराष्ट्राकडेच वळवल्याचे वास्तव पाहून लेखक पेटून उठतो. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या पाहून त्याचे हृदय द्रवते. त्यांच्याविषयी वाटणार्‍या तळमळीमुळेच तो पेटून उठतो आणि राज्यकर्त्यांविरूद्धचा हा उद्रेक लेखणीतून धाडसाने मांडतो. तत्कालीन सरकारची अनागोंदी पाहून हा लेख लिहिला असला तरी आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे दुःख स्वप्निल कुलकर्णी यांनी नेमकेपणे मांडले आहे. शेतकरी, कष्टकरी यांचा कैवार घेणारी लेखणी कोणत्याही परिस्थितीत गौरवास पात्र ठरते. स्वप्निल यांचे त्यासाठी विशेष अभिनंदन.
‘पर्यावरण संतुलन आणि वृक्षसंवर्धन’, ‘भ्रष्टाचाराचा भस्मासूर’, ‘मोबाईल शाप की वरदान’, ‘दहशतवाद आणि मानसिक आरोग्य’, ‘तरूणाईची दिशा आणि दशा’, अशा वैविध्यपूर्ण विषयांवर स्वप्निल कुलकर्णी यांनी आपली मते मांडली आहेत. मातृभाषा असलेल्या मराठी भाषेचे लेखकाचे चिंतन दखल घेण्याजोगे आहे.
रोजच्या रहाटगाड्यातून वेळ काढून वाचन, लेखन, चिंतन करणार्‍या स्वप्निल कुलकर्णी यांच्यासारख्या युवकांची आज आपल्या राष्ट्राला गरज आहे. स्वप्निल यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे लेखनात काही ठिकाणी नवखेपणाच्या खूणा स्पष्टपणे दिसून येतात. वृत्तपत्रातील लेख, पूरक बातम्या वाचून भाष्य केल्याने काही लेख निबंधाच्या अंगाने गेले आहेत. मात्र तरीही त्याचे संदर्भमूल्य आणि वाचनीयता कमी होत नाही. तरूणांची अभिव्यक्ती ही स्वागतार्हच म्हणायला हवी. भविष्यात स्वप्निल यांच्याकडून आणखी ताकतीचे लेखन व्हावे, स्वतंत्रपणे त्यांनी नवनवीन विषय आणि साहित्य प्रकार हाताळावेत यासाठी त्यांना शुभेच्छा देतो.
पाने - 112
किंमत - 110
प्रकाशक - ‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092)



Saturday, October 1, 2016

‘आपले राष्ट्रसंत’

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे समाजप्रबोधन आणि राष्ट्रभक्तिचे मूर्तिमंत रूप! सध्याच्या काळात काही अपप्रवृत्तीमुळे ‘संत’ हा शब्दच बदनाम झाला आहे. मात्र आपल्याला अनेक देदीप्यमान संतांची परंपरा लाभली असून आपले राष्ट्र टिकवून ठेवण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. भक्तिमार्गाच्या माध्यमातून लोकजीवन घडवण्यात त्यांनी जो वाटा उचलला त्याला तोड नाही. समाज घडविण्यात मोलाचा वाटा असलेल्या अशा संतांपैकी एक आघाडीचे नाव म्हणजे तुकड्यादास!
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे चरित्र आणि चारित्र्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अशा या महापुरूषाची सेवा करण्याची संधी मिळणे म्हणजे अहोभाग्य! नागपूरातील श्रावणजी पंचभाई यांना ते लाभले. राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या पंचभाईंनी श्रद्धाभावाने त्यांची सेवा केली. राष्ट्रसंतांविषयी वाटणार्‍या अतीव आदरापोटी त्यांनी आपली स्वतःची काही जमीन विकली आणि आलेल्या पैशातून ‘ग्रामगीते’च्या भरपूर प्रती छापल्या. लोककल्याणार्थ त्या घरोघरी मोफत वाटल्या. अशा सत्पुरूषाच्या पोटी जन्म घेतलेल्या विनोदजी पंचभाई यांनीही ज्ञानदानाचा हा वारसा जपला आहे. सरकारी खात्यात नोकरीस असूनही त्यांनी आपल्या वडिलांनी घालून दिलेला मार्ग सोडला नाही. ‘शिकावे आणि शिकतच रहावे’ हा मूलमंत्र जपत ते सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवर लिहीत आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे ‘थोडं मनातलं’ आणि ‘मुलांच्या मनातलं’ या पुस्तकांच्या घवघवीत यशानंतर त्यांनी तिसरे पुस्तक त्यांचे ‘कुलसंत’ असलेल्या राष्ट्रसंतांवर लिहिले आहे.
हे पुस्तक म्हणजे पंचभाई यांच्या अंतःकरणातून राष्ट्रसंतांविषयी वाहणार्‍या श्रद्धेचा दीप आहे. यातून इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होईल. राष्ट्रसंतांचे आयुष्य आणि त्यांचे साहित्य याविषयी आजच्या पिढीच्या मनात थोडीसी जरी उत्सुकता चाळवली गेली तरी या पुस्तकाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल. पंचभाई यांच्या रसाळ भाषेमुळे आणि मुद्देसूद, नीटनेटक्या, अर्थपूर्ण मांडणीमुळे हे साध्य होईल. लाघवी भाषा, छोेटेछोटे परिच्छेद, नेमकी उपशीर्षके यामुळे कंटाळवाणे किंवा बोजड न होता हे पुस्तक सहजपणे वाचून होते आणि वाचनानंदाबरोबरच प्रेरणाही जागृत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कर्मकांडं, बुवाबाजी, तंत्र-मंत्र याच्या विरूद्ध होते. निकोप आणि सुदृढ समाजनिर्मितीचे अथांग ध्येय उराशी बाळगणार्‍या या संतांने मानवतेची शिकवण दिली. त्याच्या कितीतरी नोंदी या पुस्तकात आढळतात. बंडोजी आणि मंजुळादेवी ठाकूर यांच्या पोटी जन्मलेल्या माणिक या पुत्राच्या बाललीला भाईंनी थोडक्यात सांगितल्यात. ‘राष्ट्रसंत’ अशी मान्यता मिळण्यापूर्वीचा हा संदर्भ पाहता त्यांच्यातील अफाट सामर्थ्य, व्यापक दृष्टिकोन आणि दिव्यदृष्टिची प्रचिती येते. छोट्या माणिकला आई घरातील देव पूजेसाठी धुण्यास सांगते. माणिक ते देव गोळा करतो आणि शेजारच्या विहिरीजवळ जातो. दोर बांधलेल्या बादलीत ते देव टाकून बादली चक्क विहिरीत सोडतो. तीनदा बादली पाण्यात बुडवून त्यांना आंघोळ घालतो. वर आईने जाब विचारल्यानंतर ‘भाव तिथे देव’ असेही ठासून सांगतो. त्याकाळातले हे वर्तन म्हणजे भविष्याची नांदीच होती.
लहानपणी शिक्षणाअभावी फरफट झाली तरी राष्ट्रसंतांनी स्वतःला घडवण्याची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवली. जगाला मोहवून टाकणारे खंजरी भजन, सुश्राव्य गायन, आईवडिलांची सेवा यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक धुमारे फुटत गेले. आडकोजी महाराजांकडून आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. अंधश्रद्धेच्या विरूद्ध पेटून उठणारे, समाजाला व्यापक दृष्टी देणारे वंदनीय राष्ट्रसंत म्हणजे सद्गुणांची खाण होते. देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी डोळसपणे कार्यरत रहा, अंधश्रद्धांना बळी पडू नका, असे त्यांचे सांगणे असायचे. नेरी या गावातील नादूशहा नावाच्या भोंदू फकिराला त्यांनी त्यामुळेच पळवून लावले होते. भोळ्याभाबड्या लोकाना मूर्ख बनवणे हे त्यांना मोठे पाप वाटायचे.
नेरीजवळ गोंदोडा नावाचे गाव आहे. तेथील घनदाट जंगलात तुकडोजी महाराज कधीकधी ध्यानधारणेसाठी जात. तेथील गुहेत बिनदिक्कत जाऊन बसत. काहीवेळा वाघासारखे हिंस्त्र श्‍वापद त्यांच्या शेजारी येऊन निमुटपणे झोपत असे. सापासारखे प्राणी त्यांच्या अंगावरून जात. अशा सत्य घटना काहीवेळा अंधश्रद्धा वाटतील, मात्र त्यात वस्तुस्थिती होती. आजही आपण प्रकाशजी आमटे आणि त्यांच्या मुला-नातवंडांना वाघासोबत खेळताना पाहतोच की! मात्र एखाद्या संताच्या आयुष्यात असे काही घडले की तिकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करण्याचा आणि त्यांची टर उडवण्याचा रोग काहींना जडलाय. त्याला आपला इलाज नाही. ‘वाघाच्या डोळ्यात आपले डोळे भिडवले की आपल्या डोळ्यात एवढे प्रेम व आपलेपणा येतो की वाघाचेही क्रौर्य आपोआप नाहीसे होते. ताडोबाच्या जंगलात मी हा प्रयोग आणि ही साधना करून पाहिली आहे’ असे राष्ट्रसंत सांगतात.
1930 साली मोझरी या गावी सर्वप्रथम आल्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांच्या खंजरी भजनाला प्रतिसाद मिळाला. अनेकांना त्यांच्या महानतेची साक्ष पटली. मात्र वेदशास्त्रसंपन्न बाळशास्त्री कात्यायन आणि काशीकर शास्त्रींनी त्यांचा अभ्यास तपासून पाहायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी तुकडोजी महाराजांना काही प्रश्‍न विचारले. वंदनीय महाराजांनी त्याची समर्पक उत्तरे दिली आणि ‘हा वेडा अवलिया नाही तर आत्मप्रचिती असलेला परात्पर कोटीतील महात्मा आहे’ यावर त्यांनी डोळसपणे शिक्कामोर्तब केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चैतन्याचा जागृत ज्वालामुखी होते. जातीभेद, धर्मभेद दूर होऊन समाज सांधला जावा यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे होते. इतकेच नाही तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही मोठे योगदान दिले. त्यासंदर्भात आणखी संशोधन करून विस्ताराने लिहिण्याची गरज आहे. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात त्यांची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भेट झाली. गांधीजी राष्ट्रसंतांच्या प्रेमात पडले. त्यांच्या खंजरी भजनाने ते प्रभावीत होत. अनेकवेळी मौन व्रत सुरू असतानाही गांधीजींनी ‘बहुत बढियॉं’ अशी दिलखुलास दाद दिल्याचे संदर्भ खुद्द राष्ट्रसंतांच्याच साहित्यात आले आहेत. राष्ट्रसंत आजारी असताना स्वतः महात्मा गांधी त्यांना आपल्या हाताने जेवायला वाढायचे आणि राष्ट्रसंतांचे जेवण झाल्यानंतर ते जेवायचे, अशी नोंद पंचभाई यांनी या पुस्तकात संदर्भासह साक्षांकित केली आहे.
अध्यात्माबरोबरच राष्ट्रसंतांची भजने राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेली असत. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनावेळी ‘हाक आली क्रांतिची’ असे म्हणत त्यांनी लोकाना भजनातून जागे केले. ‘पत्थर सारे बन बनेंगे, भक्त बनेगी सेना’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले. स्वातंत्र्यचळवळीतील या योगदानामुळे त्यांना तुरूंगवासही झाला. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणि मध्यप्रदेश येथील रायपूर कारागृहात त्यांना बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी इतकी मोठी किंमत मोजणारे, त्याग, सेवा, समर्पण भाव लोकात रूजवणारे तुकडोजी महाराज म्हणूनच खर्‍याअर्थी ‘राष्ट्रसंत’ आहेत.
‘ज्या मंदिरात हरिजनांना प्रवेश नसेल त्या मंदिरात सामुदायिक प्रार्थना घेता कामा नये’ असा आदेश त्यांनी काढला होता. म्हणूनच हरिजन बांधवांना घेऊन ते पंढरपूरला विठ्ठल मंदिरात गेले. पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यावेळी साने गुरूजींनी त्यांना आनंदाने आलिंगन दिले होते.
15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला; मात्र काही संस्थाने स्वतंत्र व्हायची होती. हैद्राबादचे निजाम संस्थान त्यापैकीच एक. सर्वसामान्य लोकावर तिथे क्रूर अत्याचार होऊ लागल्याने त्या लोकांनी विदर्भाचा रस्ता धरला. ही बाब कळताच राष्ट्रसंत अस्वस्थ झाले. या अन्यायाविरूद्ध त्यांनी सशस्त्र बंड पुकारले. बाबुराव धनवटे यांच्याकडून अकरा हजार रूपये घेतले आणि बंदुका खरेदी केल्या. सेवामंडळामार्फत कार्यकर्त्यांची फौज सज्ज केली. ‘दैववादापेक्षा प्रयत्नवाद महत्त्वाचा’ असे सांगत त्यांनी अन्याय, असत्याविरूद्ध कायम युद्ध पुकारले. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्यलढा आणि हैद्राबाद मुक्ती संग्राम यातील त्यांचे योगदान अद्वितीय आणि अविस्मरणीय राहिले.
राष्ट्रसंतांनी भजनासाठी थेट राष्ट्रपती भवनापर्यंत धडक मारली. गुरूकुंज मोझरी येथे 1949 च्या गांधी स्मृतीदिन महोत्सवात राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांचे भावोत्कट भजन ऐकून त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी बहाल केली. 23 जुलै 1955 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान येथील विश्‍वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. तेथील त्यांचे भाषण अजरामर ठरले. ‘माणसांनी माणसाचा विनाश करण्याची प्रवृत्ती जेव्हा नष्ट होईल तेव्हाच जग जवळ आले, धार्मिक झाले असे म्हणता येईल. त्याचे नुसते ठराव घेऊन चालणार नाही, त्यासाठी सर्व धार्मिक नेत्यांनी सतत प्रयत्नशील रहायला पाहिजे’ असे त्यांनी सांगितले आणि विश्‍वधर्म परिषदेत भारताचा लौकिक वाढला.
विनोद श्रावणजी पंचभाई यांनी या सर्व घटना, प्रसंग साध्यासोप्या भाषेत मांडल्याने वाचकांना ते खिळवून ठेवतात. आपल्या राष्ट्राचा, संतांचा, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांचा, संस्कृतीचा परिचय होण्यास हे पुस्तक हातभार लावणारे आहे. पंचभाई यांची राष्ट्रसंतांवरील श्रद्धा आणि बालपणापासून त्यांनी केलेले वाचन यामुळे या पुस्तकात अनेक संदर्भ सापडतात. राष्ट्रसंतांसारख्या महापुरूषाचे शब्द थोडक्यात मांडताना मोठी कसरत करावी लागते; मात्र हे शिवधनुष्य पंचभाई यांनी ताकतीने पेलले आहे.
भारतातील साधू संघटना, राष्ट्रसंतांचे साहित्य वैभव, त्यांची भारत दर्शन यात्रा, ‘जय जवान, जय किसान’ला दिलेला पाठिंबा हे सारेच वाचण्यासारखे आहे. राष्ट्रसंत आणि आचार्य अत्रे यांची भेट झाल्यानंतर अत्र्यांनी त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याप्रमाणे गुगली टाकली की, ‘तुमची ही ओघवती, प्रासादिक काव्यरचना, गद्य लेखन व विचार तुमचे नाहीत. ते दुसरेच कोणीतरी लिहितो आणि तुमच्या नावाने प्रकाशित करतो अशी माहिती आम्हाला मिळाली आहे.’ अत्रे साहेबांचे हे बोलणे शांतपणे ऐकल्यानंतर वंदनीय राष्ट्रसंतांनी अवघ्या दहा मिनिटात दोन भजने तिथल्या तिथे कागदावर लिहून काढली आणि अत्र्यांना गाऊनही दाखवली. ती भजने ऐकताना आचार्य अत्रे डोलू लागले आणि त्यांच्या प्रेमातच पडले. दुसर्‍या दिवशी अत्र्यांनी ‘नवयुग’मध्ये पहिल्या पानावर लिहिले, ‘वंदनीय राष्ट्रसंत हे साक्षात्कारी राष्ट्रसंत आहेत. त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती नाचते आहे. राष्ट्रसंत केवळ कवीच नाहीत तर देदीप्यमान गायकही आहेत. त्यांची वाणी भक्तिरसाने अंतर्बाह्य ओथंबलेली आहे. नवभारताचा नवसमाज निर्माण करणारे ते एक प्रतिभाकारी शिल्पकार आहेत...’
राष्ट्रसंत कवीबाबत म्हणतात, ‘कवी हा प्रसंगाचे वर्णन करण्यापेक्षा आदर्शांची मशाल जगाला दाखवणाराच असावा लागतो. यातच त्याचे श्रेष्ठत्व असते.’
पंचभाई यांनी अशा अनेक बोलक्या साक्षी या पुस्तकात देऊन ह्या घटना जिवंत केल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी, तरूणांनी हे पुस्तक आधी वाचायला हवे. पंचभाईंना राष्ट्रसंत ‘आपले’च वाटत असल्याने ते लेखणीशी एकरूप झाले आहेत. म्हणूनच ‘आपले राष्ट्रसंत’ आपल्याला नवी दिशा देण्यास प्रेरणादायी ठरेल!
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’, पुणे
7057292092