Pages

Saturday, April 30, 2016

माझ्या मराठीची बोलू कौतुके!

हैदराबाद! या शहराविषयी मला बालपणापासूनच प्रचंड कुतूहल. मी मूळचा मराठवाड्याचा. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला; मात्र पुढचे तेरा महिने म्हणजे 17 सप्टेंबर 1948 पर्यंत आम्हाला पारतंत्र्यातच राहवे लागले. (दुष्काळ, नापिकी ही मराठवाड्याच्या पाचवीला पूजलेली. त्यात देश स्वतंत्र्य झाल्यानंतर आम्हाला तेरा महिने उशीरा स्वातंत्र्य मिळाले. त्यातूनच ‘दुष्काळात तेरावा’ अशी म्हण प्रचलीत झाली असावी!) मराठवाड्यावर निजामाचे साम्राज्य होते. त्यामुळे हैदराबाद संस्थान आणि क्रूरकर्म्या निजामाच्या छळकथा शालेय जीवनापासूनच ऐकत, वाचत आलेलो. स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जो यशस्वी लढा दिला तो फार महत्त्वाचा आहे. अशा या हैदराबादला एकदोनदा जाण्याचा योग आला पण तो केवळ काही कामानिमित्त!
मागच्या महिन्यात हैदराबाद मराठी साहित्य परिषदेच्या कार्यवाह डॉ. विद्या देवधर यांचा दूरध्वनी आला आणि त्यांनी हैदराबाद साहित्य परिषदेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. मूळचा ‘मराठवाडी’ असल्याने मुक्ती संग्रामाचा लढा डोळ्यासमोर तरळू लागला. तब्बल 58 वर्षे इथं मराठी साहित्य परिषदेचं असं काय काम सुरू आहे, असंही वाटून गेलं. महाराष्ट्रात मराठीची होणारी गळचेपी आणि दुरवस्था पाहता या लोकांनी त्यांचं ‘मराठीपण’ कसं टिकवलंय हे पाहण्याची इच्छा मनात निर्माण झाली आणि मी त्यांना कार्यक्रमाला येण्यासाठी लगेच होकार दिला.
मी, माझे सहकारी माधव गिर, महेश मांगले आणि तुषार उथळे असे चौघेजण या कार्यक्रमासाठी जायचे ठरले. त्यातच लातूरहून मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष भास्कर बडे त्यांच्या कवी मित्रांसह येणार असल्याचे कळले. म्हणजे हैदराबादेत मराठीचा आवाज दमदारपणे घुमणार हे नक्की होतं. बरं, डॉ. विद्याताई देवधर यांचं कामही सुपरिचित. त्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षा. साहित्यिक चळवळीत कायम सक्रिय. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ‘चपराक’ दिवाळी अंकाच्या लेखिका. मग म्हटले बघूया काय अनुभव येतो ते!
24 एप्रिलला पहाटे आम्ही भावनगर एक्सप्रेसने हैदराबाद गाठले. हैदराबाद मराठी महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद देशमुख स्वागतासाठी आले होते. त्यांनी महाराष्ट्र मंडळात आमच्या निवासाची व्यवस्था केलेली. सकाळी प्राचार्य देशमुखांशी आम्ही चर्चा सुरू केली आणि हैदराबादच्या मराठी माणसांचे एकेक कंगोरे समोर येऊ लागले.
देशमुखही मूळचे लातूरचे. गेल्या काही वर्षापासून हैदराबादेतील मराठी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते काम पाहतात. या महाविद्यालयाची ते माहिती सांगू लागले. तब्बल 58 वर्षापूर्वी हैदराबाद मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि त्याचवेळी या महाविद्यालयाचा जन्म झाला. म्हणजे देशभरात अशी एकमेव मराठी साहित्य परिषद आहे की जी, मराठी महाविद्यालय चालवते! तेही परिषदेच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून! फार मोठी गोष्ट आहे ही! प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून यावा अशी!
देशमुखांनी सांगितलं, ‘हैदराबादेत जवळपास आठ लाख मराठी माणसं आहेत. मराठवाडा, विदर्भ येथून मुलं नोकरीच्या निमित्तानं या महानगरात येतात. त्यांना काहीतरी काम करत, कुटुंबाला हातभार लावत शिक्षण पूर्ण करायचं असतं. त्यामुळं हे सायंमहाविद्यालय सुरू झालं.’
आम्ही शब्दशः भारावून गेलो. पुण्या-मुंबईसारख्या शहरात मराठी शाळा धडाधड बंद पडत असताना हे लोक भाषा, संस्कृती जपण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसत आहेत. मला कधी एकदा हे महाविद्यालय पाहतोय असं झालं होतं. देशमुखांना मी तशी गळ घातली. ते म्हणाले, ‘सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळं आत्ता महाविद्यालयात कोणीही नसेल!’ त्यांना म्हणालो, ‘हरकत नाही. आम्हाला या ज्ञानकेंद्राचं, पवित्र वास्तुचं दर्शन घ्यायला आवडेल.’
त्याचवेळी डॉ. विद्याताई देवधर, माधवराजे चौसाळकर, अर्चना अचलेकर, प्राचार्य गोविंद देशमुख, माजी प्राचार्य सुरेश कुलकर्णी ही सारी मंडळी जमली होती. लातूरहून डॉ. भास्कर बडे, आजच्या मराठवाड्याचा सांस्कृतिक आवाज असलेले अंबेजोगाई येथील कवी दिनकर जोशी, नागेश शेलार, लक्ष्मण खेडकर, शैलजा कारंडे, मेनका धुमाळे, गोविंद कुलकर्णी, पार्वती फड, नभा बडे हे सर्वजण आले होते. कवी माधव गिर, समीक्षक महेश मांगले, तुषार उथळे यांच्यासह आम्ही आमचा मोर्चा मराठी महाविद्यालयाकडे वळवला.
डॉ. विद्या देवधर यांनी या महाविद्यालयाची माहिती दिली. येथून अनेकांनी एम.ए., एम. फिल, पीएचडी केलेली आहे. पूर्वी संध्याकाळी सहा वाजता हे महाविद्यालय सुरू व्हायचे. सध्याचा जमाना मॉल्सचा. त्यामुळं हे मोठमोठे मॉल रात्री उशीरापर्यंत चालू असल्याने कामगार वर्गाची लवकर सुट्टी होत नाही. परिणामी विद्यार्थीसंख्या रोडावली आहे. ज्यांना हैदराबादमध्ये नोकरी करून शिक्षण पूर्ण करायचे आहे त्यांनी या महाविद्यालयाशी आवर्जून संपर्क साधावा. अशा विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी रविवारीही विशेष वर्ग घेतले जातात.
मराठी महाविद्यालयाची टोलेजंग इमारत बघितल्यानंतर आम्ही पोहोचलो हैदराबादच्या मराठी ग्रंथ संग्रहालयात. ही वास्तुही भव्यदिव्य आहे. पुणे मराठी ग्रंथालयाच्या तोडीस तोड पुस्तके. मुख्य शहरात यायची गैरसोय टाळता यावी यासाठी या ग्रंथालयाने हैदराबाद शहरात आणखी चार शाखा चालू केल्या आहेत. सर्वत्र वाचकांची वर्दळ. मराठीविषयीचा जिव्हाळा कुणालाही सहजपणे जाणवेल. सकस वाचनासाठी हे लोक प्रयत्नपूर्वक वेळ काढतात. पुण्यासारख्या सांस्कृतिक महानगरीने शरमेने मान खाली घालावी इतकी यांची उच्च सांस्कृतिक अभिरूची. मराठी महाविद्यालय आणि मराठी ग्रंथसंग्रहालय येथील कर्मचार्‍यांचा अपवाद वगळता कार्यवाहासह सर्वजण विनामानधन येथे काम करतात हे एकच उदाहरण त्यासाठी पुरेसे!
‘चपराक’चा अंक इथं कायम ‘वेटींग’ला असतो. ‘या अंकाचे संपादक आलेत’ असं कळल्यानंतर कर्मचार्‍यांनी आणि पदाधिकार्‍यांनी आमचे जोरदार स्वागत केले. ‘चपराक’च्या काही लेखांवर चर्चा झाली. त्यांनी आमच्यासोबत फोटो काढून घेतले. त्यांचे प्रेम, जिव्हाळा, त्यांच्याकडून मिळणारा आदर यामुळे आम्ही सर्वजणच भारावून गेलो.
आता ज्या कार्यक्रमासाठी गेलो होतो त्याची वेळ झालेली. आम्ही ग्रंथालयाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या काशिनाथराव वैद्य सभागृहात गेलो. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहापेक्षा मोठं सभागृह. उपस्थिती? साधारण दोनशे लोक खुर्च्यांवर विराजमान झालेले! महाराष्ट्र साहित्य परिषदेत तीस-चाळीस लोकांचीही सांस्कृतिक कार्यक्रमाला यायची मारामार. इथं मात्र उत्फूर्तपणे इतकी मंडळी जमलेली.
विद्याताई देवधरांनी मला थेट व्यासपीठावर नेलं. माझा परिचय करून दिला आणि माईक माझ्यासमोर दिला. खरंतर मी पूर्णपणे भारावून गेलेलो. एक क्षण काय बोलावे असे वाटले आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘साधारण साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजांनी या परिसरात येऊन स्वराज्याचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रातल्या महाबळेश्‍वरच्या खोर्‍यातून येणारी कृष्णा नदी थेट श्रीशैल्यम्पर्यंत गेली आहे. त्यामुळे याच मराठी पाण्यावर इथली संस्कृती पोसली गेली आहे. आज आम्ही मोजकीच मंडळी इथं आलो आहोत. मराठी भाषेच्या संवर्धनाचा, जतनाचा विडा उचलून डॉ. विद्याताई देवधर यांच्यासारखी काही मंडळी इथं अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या पाठिशी आम्ही कायम उभे राहू! महाराष्ट्रात मराठी शाळा धडाधड बंद पडत आहेत. इंग्रजीचे थैमान माजलेय आणि तुम्ही इतके चांगले काम करत आहात. मराठी साहित्य परिषद एक महाविद्यालय चालवते हे भारतातील एकमेव उदाहरण असल्याने तुमच्या कार्याला, मराठी प्रेमाला सलाम करतो.’’
हैदराबाद आता तेलंगणात गेले आहे. त्यामुळे तो धागा पकडत मी सांगितले, ‘‘महाराष्ट्रात सध्या विदर्भ, मराठवाडा वेगळा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र ‘अखंड महाराष्ट्र’ हीच ‘चपराक’ची भूमिका आहे. सांस्कृतिक एकता जपताना आम्ही भाषिक ऐक्य साधण्याला मात्र भविष्यात प्राधान्य देणार आहोत. किमान पंधरा भारतीय भाषातील साहित्य मराठीत यावे आणि मराठीतील साहित्य या भाषात जावे यासाठी ‘चपराक प्रकाशन’चे प्रयत्न असणार आहेत. तेलगू भाषेतील साहित्य मराठीत आल्यास आनंदच वाटेल. तसेच आपल्यापैकी जे प्रतिभावंत सातत्याने, निष्ठेने लिहित आहेत मात्र ज्यांना पुरेसे व्यासपीठ मिळाले नाही त्यांनी ‘चपराक’शी हक्काने संपर्क साधावा. आपला आवाज, आपला हुंकार तमाम मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’
त्यानंतर डॉ. भास्कर बडे यांचे कथाकथन झाले. ‘कथा काव्य संध्या’ या कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातील कवींनी रसिकांची मने जिंकली. माधव गिर, दिनकर जोशी, लक्ष्मण खेडकर, नागेश शेलार, शैलजा कारंडे, गोविंद कुलकर्णी यांच्या एकाहून एक सरस कविता! असा कार्यक्रम जर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर झाला तर सांस्कृतिक महाराष्ट्राची विजयी पताका सर्वदूर प्रभावीपणे फडकेल.
सुंदर आणि नेटके नियोजन, शिस्त, दिनकर जोशी यांचे प्रभावी सूत्रसंचालन, अर्चना अचलेकर यांच्या गोड आवाजातील मराठी गीताने झालेली सुरूवात यामुळे कार्यक्रम रंगत गेला. त्यानंतर आम्ही सर्वजण महाराष्ट्र मंडळात आलो. जेवणानंतर लातूरची मंडळी परत जाणार होती. मात्र आम्ही मुक्कामी थांबणार होतो. त्यामुळे त्यांनी त्यांचा बेत बदलला आणि महाराष्ट्र मंडळात आमचे सर्वांचे कवी संमेलन रंगले. रात्री दीडपर्यंत एकाहून एक सरस कवितांचा आस्वाद घेता आला. पहाटे चार वाजता डॉ. भास्कर बडे आणि त्यांचे प्रतिभावंत सहकारी लातूरकडे निघाले.
सोमवार, दि. 25 एप्रिलची सकाळ. आम्ही डॉ. विद्याताई देवधरांच्या घरी पोहोचलो. त्या मूळच्या मुंबईच्या. मात्र मागची साधारण पन्नास वर्षे त्या मराठी भाषेसाठी निर्व्याजपणे कार्य करीत आहेत. त्यांच्या आई सुशीला महाजन. राष्ट्र सेविका समितिच्या संस्थापक सदस्य. वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय. वहिनी सुमित्रा महाजन लोकसभेच्या सभापती. विद्याताईंच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन थेट अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झालेले. वाजपेयी-अडवाणी कुटुंबीयांशी त्यांचे घरोब्याचे संबंध.
मात्र त्यांच्या स्वभावात एक माधुर्य आहे, ममत्त्व आहे. अहंकाराचा लवलेशही नाही. म्हणूनच हैदराबादसारख्या अमराठी शहरात त्यांनी मराठी भाषा जिवंत ठेवली आहे. ‘पंचधारा’सारख्या दर्जेदार वाङमयीन नियतकालिकाचे त्या संपादन करतात. सेतू माधवराव पगडी यांच्यावर त्यांनी ‘पर्वतप्राय’ खंड प्रकाशित केले आहेत. अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचे संपादन करण्याचा मान विद्याताईंना मिळालाय.
हैदराबादची मराठी माणसं, इथल्या सांस्कृतिक, साहित्यिक चळवळी, मराठी माणसांचे या शहराच्या विकासातील योगदान अशा विषयावर आमची सखोल चर्चा झाली. तेथून आम्ही बाहेर पडलो आणि थेट ‘उस्मानिया विद्यापीठ’ गाठले. हे एक जगप्रसिद्ध ज्ञानकेंद्र आहे.
अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे या विद्यापीठात स्वतंत्र मराठी विभाग आहे. डॉ. नम्रता बगाडे या मराठीच्या विभागप्रमुख. नेमक्या आजपासून त्या रजेवर होत्या. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. मात्र आम्हाला इथं भेटले प्रा. अरूण कुलकर्णी. ते उस्मानिया विद्यापीठात मराठीचे अध्यापन करतात. आणखी एका महाविद्यालयातही ते मराठी भाषा शिकवतात. त्यांच्यासोबत चहा घेतला आणि आम्ही थेट ग्रंथालयात गेलो.
इथली ग्रंथसंपदा पाहून कुणाचेही डोळे फिरतील. पाच लाखाहून अधिक पुस्तके या ग्रंथालयात आहेत. प्रत्येक भाषेचा वेगळा विभाग. शब्दशः हजारो तरूण-तरूणी येथे वाचत बसले होते. हे चित्र मी महाराष्ट्रातही कुठं पाहिलं नव्हतं. आम्ही या ग्रंथालयातील मराठी पुस्तकांचा विभाग बघितला. वेद उपनिषदांपासून ते कथा, कविता, कादंबरी अशा ललित साहित्यापर्यंत हजारो पुस्तकं इथं आहेत. अगदी मराठीतील सर्व नामवंत दिवाळी अंकही येथे उपलब्ध आहेत. त्यांच्या वेबसाईटवर सर्व पुस्तकांची सुची उपलब्ध आहे. दुर्मिळात दुर्मीळ पुस्तकेही याठिकाणी उपलब्ध असून संशोधकांना, अभ्यासकांना मोठी पर्वणी आहे. मायमराठीचे हे वैभव पाहून आम्ही थक्क झालो.
आपण विविध उपक्रमांनी ‘महाराष्ट्र दिन’ ‘साजरा’ करतोय! मात्र ही मंडळी मराठीपण ‘जगतात.’ महाराष्ट्राबाहेर अनेक शहरात मोठ्या प्रमाणात मराठी माणसं आहेत. ती आपल्या आणि आपल्या राज्यकर्त्यांच्या खिजगणतीतही नसतात. या सर्वांना आपण बळ द्यायला हवे. त्यांचे हात शक्य तितके मजबूत करणे मराठी भाषेसाठी पोषक ठरणारे आहे. अमराठी भागात राहून मराठीची विजयपताका डौलात फडकत ठेवणार्‍या या सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त वंदन करतो!
- घनश्याम पाटील
संपादक, मासिक ‘साहित्य चपराक’, पुणे
7057292092

5 comments:

  1. खूपच महत्वपूर्ण माहिती व दर्जेदार लेखन!

    ReplyDelete
  2. खूपच महत्वपूर्ण माहिती व दर्जेदार लेखन!

    ReplyDelete
  3. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच असल्यासारखे वाटले..... सहजता.. उत्स्फूर्तता... दाद घेतेच..... अमराठी लोकात मराठीपण तेवत ठेवणारे.... आणि त्यांना उजेडात आणणारे आपण... दोघांनाही मानाचा मुजरा...!

    ReplyDelete
  4. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच असल्यासारखे वाटले..... सहजता.. उत्स्फूर्तता... दाद घेतेच..... अमराठी लोकात मराठीपण तेवत ठेवणारे.... आणि त्यांना उजेडात आणणारे आपण... दोघांनाही मानाचा मुजरा...!

    ReplyDelete