Pages

Monday, March 28, 2016

‘लकवा’मार विकारवंत!

पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना बालगंधर्वला झालेल्या एका कार्यक्रमात राज्य सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले होते, ‘मुख्यमंत्री कोणत्याही फाईलवर सह्या करत नाहीत. त्यांना ‘लकवा‘ झालाय.’
त्यापूर्वी राम मनोहर लोहिया यांनी सांगितले होते की, ‘‘आजच्या काही समाजवाद्यांना ‘लकवा’ झालाय! विचारावर ठाम नसणार्‍या आणि कृतीशुन्य समाजवादी कार्यकर्त्यांना ‘लकवामार समाजवादी’ म्हटले पाहिजे.’’
सध्या पुरोगामित्वाच्
या नावावर मिरवणारे काही तथाकथित समाजवादी याच ‘लकवामार विकारवंता’त मोडतात. कन्हैयाकुमारला छोट्या भावाची उपमा देणारे कुमार तथा सुमार सप्तर्षी याच विकारवंतांपैकी एक! अर्धसत्य माहिती ठासून मांडणे आणि आपणच समाजाला तारण्याचा ठेका घेतलाय अशा आविर्भावात असे ‘विकारवंत’ जगत असतात. सप्तर्षींनी एकेकाळी ‘युक्रांद’च्या माध्यमातून थोडेफार काम हाती घेतले होते; मात्र ज्याच्याकडे किमान सभ्यता आणि मूलभूत ध्येयनिष्ठा नाही तो समाजमनावर कितपत प्रभाव पाडू शकणार? एकीकडे ‘जातीअंताची लढाई’ असे बोजड शब्द वापरायचे आणि दुसरीकडे भेटणार्‍या प्रत्येकाला थेट त्याची जात विचारायची आणि आपण आयुष्यभर किती दिवे लावले याचे पाल्हाळीक चर्वितचर्वण करायचे यातच यांची हयात गेली. एकेकाळी अण्णा हजारे यांना ‘थोरले बंधू’ मानणारे सप्तर्षी आता कन्हैयाला ‘धाकल्या’ भावाची उपमा देत आहेत. त्याला पुण्यात गांधीभवनात आणण्याचा त्यांचा मानस आहे.
एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे असे एकेकाळचे समाजवादी आणि आजच्या काळातील कुमार सप्तर्षीसारखे सुमार लोक पाहिले की समाजवादी चळवळीला खीळ का बसली याचे उत्तर मिळते. समाजवादाच्या नावाने कोकलणार्‍यांनी समाजवादी नेत्यांनी कोणते संघटनात्मक कार्य केले याचे उत्तर द्यावे! राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विरूद्ध बोलणे, लिहिणे इतक्या मर्यादित स्वरूपात यांची पुरोगामित्वाची व्याख्या येऊन ठेपली आहे. ही मंडळी केवळ वयाने वाढली आहेत. त्यांची बौद्धिक उंची मात्र कधीच खुंटली आहे, हे इवलेसे पोरही सांगेल. म्हणूनच त्यांची सातत्याने चर्चेत राहण्याची केविलवाणी धडपड सुरू असते. आचार्य अत्रे यांनी त्या काळात समाजवादी विचारधारेविषयी लिहिले होते की, ‘‘समाजवाद या शब्दातला स कधीच गळून पडलाय आणि केवळ ‘माजवाद’ उरलाय!’’ अत्रेंच्या या निरीक्षणात आजदेखील तसूभरही फरक पडल्याचे दिसत नाही.
सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर विचारतात, ‘‘विचारांची लढाई विचाराने झाली पाहिजे, ही भाषा पुरोगाम्यांना कधी कळली? सोवियत युनियन कोसळल्यानंतरचा हा साक्षात्कार आहे का?’’ भाऊंचा हा सवाल बिनतोड आहे. आजचे समाजवादी या प्रश्‍नाचे उत्तर देण्याएवढे सक्षम नाहीत. त्यांची तेवढी वैचारिक कुवतही नाही. जाती-जातीत, धर्मा-धर्मात, प्रांता-प्रांतात फूट पाडणे, येनकेनप्रकारे स्वत:चा स्वार्थ साधणे आणि आपल्या आडमुठ्या भूमिकेपायी समाजाला वेठीस धरणे हा यांचा उद्योग नवा नाही.
कन्हैयाकुमार पुण्यात आल्याने विशेष असे काय घडेल? कुमार सप्तर्षी यांच्यासारखे अडगळीत पडलेले ‘विकारवंत’ चर्चेत येतील, काही राष्ट्रीय माध्यमांचे लक्ष यांच्याकडे केंद्रीत होईल. आजच्या तथाकथीत पुरोगाम्यांचे, समाजवाद्यांचे ‘बापजादे’ काय करत होते याचेही ज्ञान या भामट्यांना नाही. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कम्युनिष्टांविषयीची मते काय होती, याचा अभ्यास आपण करणार की नाही? प्रकाश आंबेडकर ज्या दिशेने आजच्या समाजाला नेऊ पाहत आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते का? हिंदुंचा, ब्राह्मणांचा द्वेष हा एकमेव अजेंडा घेऊन या लोकांची वाटचाल सुरू आहे. एकीकडे जातीच्या आधारावर मिळणारे ‘सर्वप्रकारचे’ लाभ घ्यायचे, आरक्षणासारख्या विषयावरून रान पेटवायचे आणि दुसरीकडे जातीयवाद संपवण्याची भाषा करायची, ब्राह्मणांना शिव्या घालायच्या अशी दुटप्पी भूमिका हे लोक घेतात.
कन्हैयाकुमार आणि राहुल गांधी या दोघांच्या बौद्धिक पातळीत तसा फारसा फरक दिसत नाही. दुर्दैवाने अशी बिनडोक मंडळी आजच्या तरूणाईचे नेतृत्व करू पाहत आहेत. राष्ट्रभक्ती हे पाप वाटावे अशी परिस्थिती या लोकांनी निर्माण केली आहे. आपल्या नेत्यांनी अशा भामट्यांना पाठिशी घातल्याने समाजात दुफळी निर्माण होत आहे. केजरीवाल, हार्दीक पटेल, रोहित वेमुला, कन्हैयाकुमार अशांनी समाजाला कोणता नवा विचार दिला किंवा ते समाजाचे नेतृत्व करण्याच्या लायकीचे आहेत का? हे तटस्थपणे पडताळून पाहिले पाहिजे. महाराष्ट्रात तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘सुविद्य’ आमदार जितेंद्र आव्हाड कायम नौटंकी करत असतात. ‘फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार’ अशी त्यांची ओळख करून दिली जाते. त्यांचा कोणता ‘वारसा’ आव्हाडांनी चालवला हे मात्र सिद्ध होत नाही. दहीहंडीच्या कार्यक्रमात मुली नाचवणे, अतिक्रमणाच्या प्रश्‍नावरून प्रशासकीय अधिकार्‍याशी अरेरावी करणे, पोलिसांवर हात उगारणे, फर्ग्युसनसारख्या ठिकाणी येऊन महाविद्यालयाच्या स्थापनेविषयीच तारे तोडणे ही व अशी कामे ‘वारसा प्रकारा’त मोडतात का?
‘आम्ही मराठे कुणाला घाबरत नाही. आम्हा सगळ्यांनाच तुरूंगात टाका’ असे बालिश विधान खासदार सुप्रिया सुळे यांनीही नुकतेच केले आहे. (भुजबळ, तटकरे, अजितदादा यांचे भवितव्य त्यांना दिसत असणार!) सुप्रियाताईंच्या ‘बाबां’नी आजवर कायम जातीचे राजकारणच केंद्रस्थानी ठेवले आहे. ‘मराठा लीडर’ अशी प्रतिमा असूनही त्यांनी मराठा समाजासाठी नेमके काय केले याचेही उत्तर कोणी देऊ शकणार नाही. पवारांमुळे किती ‘मराठा’ शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या किंवा पवारांनी किती ‘मराठा’ नेते तयार केले? हा प्रश्‍न उपस्थित केला तर त्याचे उत्तरही नकारात्मकच येते. केवळ गरजेपुरते जातीय अस्मितेचे राजकारण करून या लोकांनी कायम स्वत:ची तुंबडी भरलेली आहे.
कन्हैयाकुमार, कुमार सप्तर्षीपासून ते राजदीप सरदेसाई, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेपर्यंत प्रत्यक्षात ज्यांचा धिक्कार करायला हवा त्यांना काहीजण ‘नेते’ मानून त्यांची पूजा बांधत आहेत.
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हेही सध्या चर्चेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे असलेल्या अणेंनी वेगळ्या विदर्भाबरोबरच स्वतंत्र मराठवाड्याचीही मागणी केली आहे. मुंबईतील 106 हुतात्म्यांनी जे बलिदान दिले त्याचा विदर्भ किंवा मराठवाड्याशी काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद ते करतात. राज्य सरकारचा वकील राहिलेला हा पाखंडी ‘विचारवंत’ कसा असू शकेल? सध्या जिकडे-तिकडे अशा ‘लकवामार विकारवंतां‘चीच संख्या फोफावली आहे.
आचार्य अत्रे यांनी मालोजीबुवा निंबाळकर यांच्याविषयी लिहिताना सांगितले होते की, ‘‘जन्मभर देहविक्रय करणार्‍या वेश्येने म्हातारपणी लग्न लावल्यानंतर ‘माझा नवरा मेला तर मी सती जाईन!’ अशा पातिव्रत्याच्या वल्गना करू नयेत!’’
पुरोगामित्वाच्या नावावर नाचणार्‍या आजच्या ‘विकारवंतां’चीही अशीच अवस्था आहे. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीच तारतम्य नसते. सामान्य माणसापुढे जगण्यामरण्याचे अनेक गंभीर प्रश्‍न असताना अशा पद्धतीचे राजकारण कोणीही करू नये! देशातील सर्व प्रश्‍न संपले अशा आविर्भावातच कन्हैयासारख्या भुलभुलैयाचे उदात्तीकरण सुरू आहे. स्वार्थसंकुचित राजकारण, कुटीलतावाद, सर्व प्रकारचा कट्टरतावाद वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या ‘लकवामार विकारवंतां’कडे दुर्लक्ष करून प्रत्येकाने आता माणुसकीच्या धर्मातून कार्यरत राहिले पाहिजे; तरच येणारे आरिष्ट्य थोपविण्यात आपण यशस्वी ठरू!

-घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

11 comments:

  1. सर
    आजच्या समाजवाद्यांचे बुरखाफाड लिखान..
    आपल्या भाषेत सनसनीत "चपराक"

    ReplyDelete
  2. सर
    आजच्या समाजवाद्यांचे बुरखाफाड लिखान..
    आपल्या भाषेत सनसनीत "चपराक"

    ReplyDelete
  3. घनश्यामजी सुमारांना अशीच सणसणीत चपराक मारायला हवी.....

    ReplyDelete
  4. जबरदस्त, एक नंबर लेख

    ReplyDelete
  5. दादा भन्नाट....

    ReplyDelete
  6. दादा भन्नाट....

    ReplyDelete
  7. अतिशय परखड
    सनसनीत चपराक
    अजून किती लाळघोटेपणा करणार आहेत हे समाजवादी???
    ह्यांनी देशाच्या विकासात आजवर कुठली भर घातली आहे????
    आणि देशात मोठ मोठे प्रश्न उभे असताना ज्याची वैचारिक बैठक हीच मुळात विद्वेषपूर्ण आहे त्याला पुण्यात आणून काय तीर मारणार आहेत हे??

    आपला लेख ह्या मूर्खानी एकदा तरी वाचावा म्हणजे थोड़ा फार प्रकाश ह्यांच्या डोक्यात पडेल.

    संवंग लोकप्रितेसाठी काहीही अफवा पसर्विणे आणि फ़ालतू बोलणे ह्यातून फार फा तर मनोरंजन होते पण प्रबोधन नाही होऊ शकत...
    घनश्यामजी आपण पाटिलकी सिद्ध केलीत आपल्या परखडपणातली....

    शुभेच्छा ।।।

    ReplyDelete
  8. सर जबरदस्त लेख. खरोखर यांचे बुरखे असेच फाडले पाहिजेत.

    ReplyDelete
  9. सर जबरदस्त लेख. खरोखर यांचे बुरखे असेच फाडले पाहिजेत.

    ReplyDelete
  10. निव्वळ द्वेष आणि अकलेची दिवाळखोरी

    ReplyDelete
  11. छान आणि समर्पक.
    बहुतेकांच्या मनातलंच शब्दबद्ध केलंय

    ReplyDelete