Pages

Saturday, February 20, 2016

‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’

महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. लोकमान्य टिळकांच्या कल्पनेतून साकारलेल्या या संस्थेचे नेतृत्व अनेक दिग्गजांनी केले. मात्र गेल्या काही वर्षात या संस्थेची रयाच गेली. वादविवाद आणि वितंडवाद यामुळे साहित्य परिषद चर्चेत येतेय. साहित्य परिषदेतून साहित्यच हरवलेय असे वाटते. आजीव सभासदांचाही परिषदेशी फारसा संबंध राहिलेला नाही. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे परिषदेचे मुखपत्र असलेले त्रैमासिक आणि पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी आलीच तर मतपत्रिका, एवढाच काय तो आजीव सभासदांचा परिषदेशी संबंध येतोय.
मात्र यंदा चित्र बदलतेय. अतिशय परखड बाण्याचे, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय निवडणूक निर्णय अधिकारी लाभल्याने त्यांनी अनेक विधायक, सकारात्मक बदल घडविले आहेत. निवडणूक प्रक्रियेत त्यांनी केलेले आमुलाग्र बदल स्वागतार्ह आहेत. त्यामुळे यापूर्वी मतदान प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत जी उलटसुलट चर्चा व्हायची त्याला चाप बसला. एकतर त्यांनी यावेळी प्रत्येक मतपत्रिकेला सांकेतिक क्रमांक (बारकोड) दिले आहेत. शिवाय मतदारांचे ओळखपत्र अनिवार्य केल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता दिसून येते. त्यामुळे आमच्यासारख्या काहींनी या व्यवस्थेचे आणि प्रक्रियेचे जोरदार स्वागत केले आहे तर काहींच्या पायाखालची वाळू सरकली.
पत्रकार या नात्याने आम्ही आजवर अनेक निवडणुका अनुभवल्या. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. हा अनुभव खूप काही शिकवून जाणारा, समृद्ध करणारा आहे. परिषदेतील अपप्रवृत्तींवर बाहेरून अनेकवेळा मी धाडसाने दगडफेक केली; मात्र त्याचा फारसा काही परिणाम झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे स्वतः परिषदेत उतरून आपण काहीतरी करावे या विचाराने मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो. विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना कायम ‘चपराक’ देताना आम्ही कधीही डगमगलो नाही. त्यामुळेच ‘तुमच्यासारखे साहित्यिक कार्यकर्ते परिषदेत हवेत’ असे अनेक मान्यवर आवर्जुन सांगत आहेत. सभासदांचा मिळणारा हा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. त्यांच्याकडून मिळणारी कौतुकाची थाप ही मोठी पावती होय.
निवडणुकीच्या निमित्ताने अनेक बरेवाईट अनुभव येत असून त्यावर आधारित ‘जावे त्याच्या वंशा’ हे पुस्तक मी लवकरच आपणास वाचावयास देईन! साहित्य परिषद साहित्याभिमुख व्हावी, समाजाभिमुख व्हावी यासाठी आमच्या ‘परिवर्तन आघाडी’चे प्रमुख प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आणि सुनिताराजे पवार प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच त्यांनी साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या उमेदवारांचाच या आघाडीत समावेश केला. समोरच्या पॅनलने एकाही महिलेला स्थान दिले नसताना ‘परिवर्तन’ने मात्र बारा जागांपैकी चार ठिकाणी महिला उमेदवारांना संधी देऊन साहित्य क्षेत्रातील स्त्री शक्तीचा सन्मान केला आहे. ‘पुरूषी मानसिकतेतून मला त्रास दिला जातो आणि माझी कुचंबणा होते’ असे गळे काढणारी विदुशी मात्र खुल्या दिलाने या निर्णयाचे स्वागत करत नाही!
साहित्य परिषदेचे 11300 मतदार आहेत. त्यात पुण्यातील 2865 जणांचा समावेश आहे. परिषदेने उमेदवारांना या सभासदांची जी यादी दिली त्यात कुणाचेही संपर्क क्रमांक किंवा मेल आयडी नाहीत. त्यामुळे संपर्कात अनंत अडचणी येत आहेत. त्यातील कित्येक सभासद हयात नाहीत, काहींची नावे दुबार आहेत तर काहींचे पत्ते बदलले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतोय. शिवाय या यादीत सर्वांची नावे आद्याक्षराप्रमाणे असल्याने त्या त्या भागातील सभासदांची यादी वेगळी करणे हे जिकिरीचे काम आहे. वेळेच्या मर्यादा लक्षात घेता यातील सभासदांपर्यंत थेट पोहोचणे कुणालाही शक्य होत नाही. त्यामुळे पत्रव्यवहाराला पर्याय नाही. त्यातही पत्ते किंवा पिन कोड क्रमांक चुकीचे असतील तर पत्रं त्यांच्यापर्यंत जात नाहीत. या सार्‍या अडचणींवर मात करण्याचे आव्हान दोन्ही पॅनलपुढे आहे.
व्यक्तीशः मला या निवडणुकीत प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मतदारांच्या घरी गेल्यानंतर ते जोरदार स्वागत करतात. साहित्यावर चर्चा होते. त्यांची ग्रंथसंपदा कळते. माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती कळतात. अनेक सभासद गेल्यानंतर आधी ‘चपराक’ची वर्गणी हातात टेकवतात. ते सांगतात, ‘‘आम्ही परिवर्तन आघाडीला मत तर देणार आहोतच, पण आधी ‘चपराक’च्या अंकाची वर्गणी घ्या! तुमचा अंक आमच्यापर्यंत आलाच पाहिजे...’’ हा प्रतिसाद उमेद वाढवणारा आहे. लोकांना परिवर्तन हवेय. साहित्य परिषद साहित्यिक उपक्रमांनी चर्चेत यावी, या मातृसंस्थेची अप्रतिष्ठा होऊ नये असेच अनेकांना वाटते.
अर्थात, काही कटू अनुभवही आहेत पण ते मोजकेच! एका नामवंत लेखकाने विचारले, ‘‘तुम्हाला व्हर्र्च्युअल रिऍलिटी माहिती आहे का?’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘हो, म्हणजे भासात्मक सत्य!’’
त्यांनी सांगितले, ‘‘अगदी बरोबर! आता एक भासात्मक सत्य मनावर बिंबवा की, मागील वर्षभर मी तुमच्याकडे लेखन केले आहे. त्याचे मानधन आणून द्या आणि आमची इतकी मते घेऊन जा!’’
लेखन केलेले नसतानाही असे मानधन मागणे हा केवढा मोठा गैरव्यवहार! राजकारण्यांना लाजवेल असा हा अनुभव! त्यामुळे आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला आणि बाहेर पडलो.
काहीजण घरी बोलवून प्रेमाने पाच-दहा कविता ऐकवतात आणि मत आमच्याच परिवर्तन पॅनलला देणार असल्याचे सांगतात. लेखणी-वाणीवर जबरदस्त प्रभूत्व असलेले प्रा. मिलिंद जोशी हे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. प्रकाश पायगुडे यांनी परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी चांगले कार्य केले आहे. सुनिताराजे पवार या ‘संस्कृती प्रकाशन’च्या माध्यमातून साहित्य शारदेची उपासना करतात. ज्योत्स्ना चांदगुडे या ‘साहित्यदीप प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा आहेत. निलिमा बोरवणकर यांची सकस ग्रंथसंपदा आहे. स्वप्निल पोरे हे ‘केसरी’चे वृत्तसंपादक आहेत, उत्तम कवी आणि कथाकार आहेत. चित्रपटविषयक लेखनात त्यांचा हातखंडा आहे. वि. दा. पिंगळे हे शिक्षक आहेत, कवी आहेत. त्यांची बिनविरोध निवड झाली. मी ‘चपराक’च्या माध्यमातून गेली चौदा वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. नंदा सुर्वे गेली अनेक वर्षे परिषदेवर कार्यरत आहेत. प्रा. क्षितिज पाटुकले हे उत्तम लेखक असून दत्तोपासक आहेत. त्यांच्या ‘कर्दळीवन’ या पुस्तकाने इतिहास रचला. श्रीधर कसबेकर हे विधिज्ञ आहेत. असा हा भक्कम संघ परिषदेच्या विकासासाठी, मराठीच्या संवर्धनासाठी मैदानात उतरलाय. त्यामुळे त्याला बळकटी देणे हे सुजाण मतदारांचे कर्तव्य आहे.
आमच्यासारख्या तरूणांनी या निवडणुकीत भाग घेतल्याने साहित्य परिषदेचे वय कमी झाले आहे. प्रा. मिलिंद जोशी हे सर्वात कमी वयाचे कार्याध्यक्ष होतील. हा विक्रम नोंदविला गेला तर साहजिकच परिषदेशी तरूणांचे नाते अधिक घट्ट होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरूणांची खंबीर साथ या बळावरच हा मराठीचा गाडा हाकावा लागेल. त्यासाठी आता परिवर्तन घडवा. कोणतेही किंतु मनात न ठेवता आमच्या आघाडीचे हात मजबूत करा. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा, संशोधन यासाठी हे पूरक आणि पोषक ठरणार आहे. केवळ मराठी भाषा दिन साजरा करणे, मराठी सप्ताह साजरा करणे यामुळे फारसे काही होणार नाही. ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’ हे सूत्र लक्षात घ्यायला हवे. आम्हाला चांगली कृती करायचीय. त्यासाठी आपणा सर्वांचा पाठिंबा मिळावा, इतकेच या निमित्ताने सांगावेसे वाटते. बाकी या सार्‍या प्रक्रियेविषयी लवकरच एक पुस्तक लिहून साहित्य क्षेत्राचा चेहरा लख्खपणे दाखवतोय. तूर्तास, परिवर्तनाच्या प्रतिक्षेत! 

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

No comments:

Post a Comment