Pages

Saturday, September 5, 2015

पुरोगामी गोंधळ


‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाची ओळख ख्यातनाम लेखक, वक्ते, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी बेळगाव ‘तरूण भारत’च्या ‘अक्षरयात्रा’ पुरवणीतील ‘टेहळणी’ या त्यांच्या वाकचप्रिय सदरातून करून दिली आहे. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी सुहास पळशीकर आणि राजेंद्र व्होरा या पुरोगामी प्राध्यापकांच्या वैचारिक भ्रष्टतेची चिकित्सा या पुस्तकात केली आहे. हा लेख आवर्जून वाचा.
या पुस्तकासाठी आणि ‘चपराक’च्या अन्य दर्जेदार पुस्तकासाठी संपर्क : 020 24460909/7057292092


इतिहासात जाणीवपूर्वक गोंधळ उडवून द्यायचा आणि कोणी पुराव्यानिशी ते मांडू लागला की त्याला अनुल्लेखाने मारायचे ही चाल आजवर पुरोगामी आणि समाजवादी खेळत आले आहेत. मिळेल तिथे अशांचे बुरखे फाडणे हे काम अभ्यासकांचे असते. य. दि. फडकेंना त्यांच्या गांधीबद्दलच्या आकलनासंबंधी ‘शोध महात्मा गांधींचा‘ या द्विखंडात्मक वैचारिक ग्रंथाचे लेखक अरूण सारथी यांनी काही प्रश्‍न विचारले होते. संपूर्ण गांधी साहित्य तुम्ही वाचले असेल तर जिथे म्हणाल तिथे आपण यावर चर्चा करू असे आव्हान त्यांनी दिले होते. त्यावेळी फडकेंचे ‘नथुरामायण’ नामक पुस्तक प्रकाशित झाले होते. त्याला प्रत्युत्तरात्मक पुस्तक सारथींनी लिहिले होते. अनेक पुरावे देऊन फडकेंचा पुरोगामी कावा त्यांनी ‘नथुरामायण की गांधी संमोहन’ या पुस्तकात उघड केला होता. अर्थात चर्चेचे आव्हान यदिफजींनी कधीच स्वीकारले नाही. तसे झाले असते तर मोठी अडचण निर्माण झाली असती ना...!
वृथा वृष्टिःसमुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम्।
वृथा दानम् समर्थस्य वृथा दीपो दिवाऽपिचा॥
(समुद्रात पडलेला पाऊस व्यर्थ, भूक नसलेल्याला जेवण देणे व्यर्थ असते. श्रीमंताला दिलेले दान व्यर्थ आणि दिवसा लावलेला दिवा व्यर्थ असतो.) तसेच पुरोगाम्यांना त्यांच्या चुका दाखवून देणे व्यर्थ असते. अगदी बाबासाहेबांच्या निमित्ताने अखेर न्यायालयाकडून फटकारल्यानंतर अनेकांचे मुखवटे टरटरा फाटले तरीही आमचा वैचारिक विरोध चालूच राहिल असे तुणतुणे वाजविणे चालू होते. मुळात बाबासाहेबांनी स्वतःला इतिहास संशोधक म्हणून मिरविले नसताना सुद्धा तसेच आरोप रेटत लोकांच्या डोेळ्यात धूळ फेकत राहण्याचा कार्यक्रम वेगवेगळ्या वाहिन्यांवर चालू होता. या माध्यमातून सामान्य माणसाची काही काळ दिशाभूल होणे शक्य असते; तथापि पुरोगामी म्हणविणार्‍या लोकांनी गेली सहा दशके भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण करून आपल्याला हवा तसा इतिहास सर्वत्र पसरविला त्याचे काय...? अगदी शाळा आणि महाविद्यालयातून सुद्धा तथाकथित पुरोगाम्यांनी लिहिलेला इतिहासच शिकवला जातो. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात जगातील अनेक तत्त्ववेत्ते त्यांना आठवतात पण श्रीकृष्ण, भीष्म, विदूर, युधिष्ठिर, चाणक्य असे एकाहून एक धुरंदर आठवत नाहीत. त्यामुळे आमची मुले पाश्‍चात्य तत्त्ववेत्ते शिकतात पण भारतात त्याहून हुशार आणि राजनीती, युद्धनीती, समाजनिती, धर्मनिती सांगणार्‍या महान विभूती होऊन गेल्या हे त्यांना कळत नाही. जगाने नाकारलेला आर्य-द्रविड सिद्धांत येथे शिकविला जातो. यातून केवळ विषच पेरले जाते हे या लोकांना कळत नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरावे. जनमानसात खोटे कसे रूजवावे याचे धडे या पुरोगाम्यांकडून घ्यायला हवेत. त्यांनी पुस्तके लिहायची आणि नंतर विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ म्हणून तीच अभ्यासाला लावायची. या मेथडमुळे ही शिकून बाहेर पडलेली मुले कोणत्या प्रकारचे शिक्षण घेऊन बाहेर पडणार ते वेगळे सांगायला नको. अशावेळी या विद्वान लेखकांचे बुरखे फाडणे हे काम जिकीरीचे ठरावे. कारण ते केल्यानंतर उपेक्षाच पदरी पडणार याचे भान असूनही ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी ते काम केले आहे.
वैचारिक भ्रष्टाचार हा फार भयानक असतो. त्यातून बुद्धी मारली जाते. त्यामुळे मुलांचे आणि पुढे पर्यायाने समाजाचे कायमचे नुकसान होऊ शकते. पुणे येथील राज्यशास्त्राचे सुहास पळशीकर आणि राजेंद्र व्होरा या दोन प्राध्यापकांनी ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या नावाचा ग्रंथ (?) लिहिला. भाजप आणि शिवसेना युतीने 1995 मध्ये कॉंग्रेसची सत्ता उलथवली. हा अनपेक्षित धक्का केवळ कॉंग्रेसला नव्हता तर या पुरोगामी विद्वानांनासुद्धा होता कारण त्यांनी आजवर ज्या शिवसेनेला मुंबईतील गुंडापुंडांचा पक्ष आणि भाजपला सतत भटजी-शेठजीचा पक्ष म्हणून हिणवले तेच सत्तेवर आले ना...! मग लगेच या दोन्ही प्राध्यापकांनी आपली बौद्धिक कसोटी लावून तातडीने संधोधन केले आणि लगेच ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या नावाचा एक ग्रंथ लिहिला. आता एवढे परिश्रम या दोघांनी घेतले म्हटल्यावर तो सर्व अभ्यास लोकांसमोर यायला हवा या उदात्त विचाराने लगेच ‘ग्रंथाली’सारखी मान्यवर प्रकाशन संस्था पुढे झाली. तिने समकालिन राजकारणावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण असलेला, अशी जाहिरात करून हा ग्रंथ भरपूर खपवला.
नेमका तो ‘अभ्यासपूर्ण’ ग्रंथ भाऊंच्या हाती पडला आणि घोटाळा झाला. वाचताना भाऊंना या ग्रंथात अभ्यासाचा, सत्याचा, संशोधनाचा आणि कोणत्याही कारणमिमांसेचा लवलेशही नसल्याचे आढळले. नसलेल्या घटनासुद्धा असल्याचा भास निर्माण करून ग्रंथात घुसविल्याचे दिसले. या सर्व कल्पनाविलास ‘थिसीस’ला ग्रंथालीसारखी मात्तबर प्रकाशन संस्था गाजावाजा करीत प्रकाशित करते म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार असे मानून चालणाराही एक वर्ग आहे. त्यामुळे भाऊंनी यावर लिहायचे ठरविले. तत्पूर्वी त्यांनी त्या लेखक महाशयांशी संपर्क साधला. ते भेटायलाही आले. त्यातील प्रा. व्होरा सहजपणे म्हणाले, तपशिलाला फारसा अर्थ नाही. महत्त्व नाही. सत्ता मराठ्यांकडून इतरांकडे गेली. ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे संक्रमित झाली हा आमचा थिसीस आहे. त्याबद्दल मतभेद असतील तर बोला... बाकी तपशील दुय्यम आहे. त्यात चुका, गफलती असतील तर काही बिघडत नाही.
गंमत पहा... तपशील चुकीचा असेल ता थिसीस उभा कसा राहतो, हा प्रश्‍न या लेखकांना पडलाच नाही; कारण मुळात त्यांना केवळ शरद पवारांना जाणता राजा ठरवून त्यांच्या राजकारणाला पुरोगामी वाटचाल असे सांगायचे आणि लोकांसमोर त्याचा प्रचार करायचे इतकेच करायचे होते. पण मग ग्रंथालीने असे पुस्तक प्रकाशित का करावे? फक्त व्यावसायिक उद्दिष्ठ ठेवूनच हे केले गेले यात शंकाच नाही. मग त्यांच्या ‘अभिनव वाचक चळवळ’ या बिरूदावलीचे काय? ती सोयरनुसार बदलली असेल. यामुळे व्यथित होऊन भाऊंनी प्रकाशकाला व लेखकांना पुस्तकातील तपशीलातील चुका दाखवून देणारे सविस्तर सहा पानी टिपण तयार करून पाठवून दिले. त्यावर प्रकाशकाने लेखकांशी बोलून पुढे काय ते कळवतो, असे सांगितले. तथापि पुढे काहीच झाले नाही. कहर म्हणजे आजही विद्यार्थ्यांना तेच फसव्या इतिहासाचे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून वापरावे लागते. या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत लेखकांनी बदल केले नाहीत. पुरोगाम्यांना चुका दाखवून देणे व्यर्थ असते असे आम्ही म्हणतो ते त्याचमुळे होय.
अखेर भाऊंनी अठरा वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकातून त्या ग्रंथाची जाहीर चिरफाड केली. आता पुन्हा सत्तांतर झाले आहे. तीच जुनी समीकरणे पुढे केली जात आहेत. अशावेळी भाऊंच्या त्या मतांचे पुस्तक येणे अत्यंत आवश्यक होते. ते धाडस पुण्याच्या ‘चपराक प्रकाशन’च्या घनश्याम पाटील (संपर्कः 020 24460909/7057292092) नामक युवकाने दाखवले याबद्दल त्याचे अभिनंदन करायला हवे. सहसा अशा प्रस्थापित पुरोगामी लोकांच्या आणि मोठ्या प्रकाशन संस्थेच्या वाट्याला जाण्याचे साहस कोणी करत नाही; पण सत्य आणि तथ्य सामान्य वाचकांपर्यंत पोचावे यासाठी ‘चपराक’ने आपले नाव सार्थ करीत भाऊंचे पुस्तक ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या शीर्षकाने प्रकाशित केले. आम्ही फार वर्षापूर्वी ग्रंथालीचा तो ग्रंथ वाचला होता आणि आता भाऊंनी केलेले पोस्टमार्टम वाचले. मूळ ग्रंथ वाचला नाही तरी चालेल पण हे पुस्तक मात्र वाचायला हवे. भाऊंनी पत्रकारितेमध्ये 46 वर्षे काढली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाचा एन्सायक्लोपीडिया म्हणजे भाऊ तोरसेकर होय. सर्व गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात. त्यांना सहसा संदर्भग्रंथांची आवश्यकता भासत नाही. अशा अधिकारी व्यक्तिने हे पुस्तके लिहिले आहे हे महत्त्वाचे आहे. आता रूढ अर्थाने भाऊ हे इतिहास संशोधक आहेत का, याच्यावर ज्यांना वाद घालायचा असेल त्यांनी तो जरूर घालावा; पण बाबासाहेबांच्या विरोधातील पत्रावर सह्या करणार्‍या एकाही पुरोगामी विद्वानाने भाऊंच्या पुस्तकावर मत व्यक्त केले नाही हे लक्षात ठेवावे. जे पुरोगामी खोट्या इतिहासाला उत्तर देऊ शकत नाहीत ते आता खर्‍या इतिहासाला आणि अभ्यासाला आव्हान देऊ पाहात आहेत हे मुजोरीपणाचे लक्षण नव्हे काय?
- डॉ. सच्चिदानंद शेवडे
80801 21704

(पूर्वप्रसिद्धी : बेळगाव ‘तरूण भारत’, अक्षरयात्रा पुरवणी 6 सप्टेंबर 2015)

No comments:

Post a Comment