Pages

Monday, June 29, 2015

संमेलाध्यक्षपदी 'दादा'च हवेत!

घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची हवा अजून टिकून असताना 89 व्या संमेलनाचे वारे वाहू लागले आहे. त्यासाठी साहित्य परिषदेची धाराशिव शाखा, सातारा मसाप, पिंपरी-चिंचवड येथील कलारंग संस्था आणि कामगार साहित्य संघ अशा अकरा ठिकाणहून निमंत्रणे आली आहेत. त्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बारामती शाखेची भर पडली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अमृतमहोत्सवी वर्षाची भेट म्हणून हे संमेलन बारामतीत व्हावे, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. पवारांचेच स्नेही असलेल्या ना. धों. महानोर यांनी ‘निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सहन करत असताना साहित्य संमेलन घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करू नका’ असा चकटफू सल्ला दिलेला आहे. त्यानंतर आता बारामतीचे नाव पुढे आल्याने त्यांची बोलती बंद झाली आहे.
संमेलन हा मराठी भाषेतील मोठा साहित्योत्सव आहे. हजारो कोटींचे घोटाळे उघड होत असताना त्याविषयी चकार शब्दही न काढणार्‍यांना संमेलनाच्या खर्चाची चिंता असते. अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडत नसल्याने कुणालाही असा पोटशूळ होऊ शकतो. त्यात दुष्काळासारखे वास्तववादी कारण सांगितले की लोकही पेटून उठतात. वर्षानुवर्षे जो स्वतःचे वीजबील भरत नाही आणि त्यासाठी ज्याच्यावर कारवाई करावी लागते त्याने दुष्काळाची चिंता करूच नये! एनकेनप्रकारे चर्चेत राहण्याचा हा अट्टाहास असतो.
त्यातही बारामतीत संमेलन घ्यायचे ठरले तर महानोरांना संमेलनाध्यक्षपदाची भेट दिली जाऊ शकते. त्यामुळे संमेलनास आज विरोध करणारे महानोर बारामतीतून घसा ताणून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाविषयी उपदेशाचे डोस पाजू शकतात. साहित्य संमेलनातील कार्यक्रम कशा पद्धतीचे असावेत हे ठरविण्यासाठी महामंडळाने मार्गदर्शन समिती स्थापन केली आहे. या समितीबरोबरच स्थळ निवड समितीची आणि महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची बैठक येत्या 2 जुलै रोजी होत आहे. त्यामुळे ‘संमेलन घेऊ नका’ हा महानोरांचा सल्ला मोडीत निघाल्यात जमा आहे. असो.
शरद पवार यांनी साहित्य आणि संस्कृतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन आदींना सढळ हाताने मदत करण्याचा त्यांचा गुण सर्वश्रूत आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप झाले असले तरी त्यातील एकही सिद्ध झालेला नाही. प्रत्येक गोष्टीचे खापर त्यांच्यावर फोडले जात असल्याने त्यांनाही त्याचे काही वाटत नाही. देशाच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारे पवार साहेब आरोप सहन करण्यास पुरते निर्ढावलेले आहेत. ‘लोक जोपर्यंत किल्लारीचा भूकंप माझ्यामुळे झालाय, असे म्हणणार नाहीत तोपर्यंत मला त्याचे काहीच वाटणार नाही’ असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याने त्यांच्यावर आता आणखी काही आरोप करण्यात अर्थ नाही.
अजित पवार आणि सुनील तटकर्‍यांचा जलसंपदा खात्यातील गैरव्यवहार उघड होत असताना आणि छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र सदनातील घोटाळा, त्यांची अडीच हजार कोटींची संपत्ती समोर येत असताना ‘आता आमच्या अटकेचीच वाट पाहतोय’ असे हतबल उद्गार काढणारे साहेब ‘कधीतरी’ सामान्य माणसाच्या मनातील भावना ओळखतात. येत्या डिसेंबरमध्ये ते पंचाहत्तरीत प्रवेश करत आहेत. महाराष्ट्राचा आणि देशाचाही पन्नास वर्षाचा हा चालताबोलता इतिहास आहे. साहित्यात वैचारिक भ्रष्टता आलेली असताना साहित्यिक अकारण राजकारण करतात आणि राजकारणी साहित्यात रमतात हे चित्र सध्या सर्रास दिसत आहे. त्यामुळे पवारांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जर बारामतीत संमेलन होणार असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे.
कर दी यहॉं बरबादी, बिछाके अपना जाल
बारामती के संत तुने कर दिया कमाल
अशा काही कविता काही कवींनी तयारच ठेवल्या आहेत. बारामतीत संमेलन म्हटल्यावर साहित्य क्षेत्राबरोबरच प्रसारमाध्यमे, सर्वपक्षीय सामान्य कार्यकर्ते, नेते यांच्या कल्पनाशक्तीला, प्रतिभेला उधाण येईल. साहेबांचे ‘एकेकाळचे’ कार्यकर्ते असलेल्या रामदास आठवलेंना कवी संमेलनाचे अध्यक्षपद मिळू शकते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा दोन शक्तिंचे मनोमिलन झाले तर ते त्या दोघांसाठीही पोषकच ठरणारे आहे.
घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर साहित्यात थोडा प्राण फुंकला गेला आहे. मराठी भाषेचा विजयध्वज कुठेही आणि केव्हाही डौलात फडकू शकतो याची खात्री मराठी बांधवाला झाली आहे. हा विश्‍वास टिकवून ठेवायचा असेल तर बारामती येथे संकल्पीत असलेल्या साहित्य संमेलनास ‘खमक्या’ अध्यक्ष लाभायला हवा. त्यासाठी तूर्तास तरी आमच्या डोळ्यासमोर एकच नाव आहे, ते म्हणजे अजित पवार यांचे! अजित पवार यांच्यासारखा नेताच मराठी साहित्याला आता दिशा देऊ शकतो.
एकतर साहित्य आणि राजकारण यात आता तसा फारसा फरक शिल्लक राहिलेला नाही. जेमतेम हजार लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडतात. त्यातही साहित्यिक शोधून काढावे लागतात. प्रत्येकाला ‘करंगुळी’ दाखवत त्यांच्याकडून पुरेशा मतपत्रिका मिळवणे हे दादांच्या कार्यकर्त्यांना सहज शक्य आहे. तसे झाले तर अजित पवारांना सध्याच्या राजकीय उपेक्षेच्या गर्तेतून बाहेर पडता येईल. त्यांना नवी आणि प्रतिष्ठेची ओळखही प्राप्त होईल. जितेंद्र आव्हाडासारखा नेता मतपत्रिका गोळा करण्यासाठी पाठवला तर त्यासाठीचा मार्ग आणखी सुकर होईल.
जगद्गुरू संत तुकोबारायांच्या भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचे मोलाचे कार्य नामदार अजित पवारांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात तुकाराम महाराज आणि काही प्रमाणात रामदास स्वामी कळण्यास कारणीभूत ठरलेले दादा हेच यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात. याच महिन्यात (म्हणजे 22 जुलै) दादांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन दादांच्या अध्यक्षपदाची तयारी सुरू करायला हवी. घुमानच्या संमेलनातील पंचपक्वान्नाचे कोडकौतुक करणार्‍यांना दादा सणसणीत चपराक देऊ शकतात. बियरपासून ते रेड वाईनपर्यंत आणि कोंबड्या-बकर्‍यापासून ते मराठमोळ्या पुरणपोळ्यापर्यंत ‘जे हवे ते’ उपलब्ध करून देण्याची ‘ताकत’ या नेत्यात आहे.
अजित पवार अध्यक्ष होणार असतील तर महामंडळाला निधीसाठी पायपीट करावी लागणार नाही. ‘घुमानच्या संमेलनात व्यासपीठावर महामंडळाच्या अध्यक्षांची ‘नथ’ दिसली पण संमेलनाचे ‘नाक’ (अध्यक्ष) मागे दडले होते’ अशी टीका झाली होती. अजित पवार अध्यक्ष झाले तर जगबुडी झाली तरी प्रसारमाध्यमे सविस्तर वार्तांकन करतील. महामंडळाच्या अध्यक्षापेक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला मान मिळेल. आतापर्यंत प्रत्येक संमेलनात राजकारणी असतातच आणि ते संमेलनाध्यक्षांचे औपचारिकपणे गोडगोड कौतुक करून निघून जातात. संमेलनाध्यक्षही तेच तेच विचार रेटून नेत असतात. या असल्या थिल्लर प्रकाराची मराठी भाषेला आता गरज नाही. मराठीला आता खमकेपणे बोलणारा, प्रसंगी साहित्यिकांचीही कानउघाडणी करणारा, भाषेचा ठसा उमटवणारा, त्यातील रांगडेपणा सिद्ध करणारा अजित पवार यांच्यासारखा अध्यक्ष हवाय. ‘शिव्या देण्यात माझी पीएचडी आहे’ असे मोठ्या साहेबांनी यापूर्वीच सांगितले आहे. काकणभर त्यांच्या पुढे जाऊन हा वारसा चालवणार्‍या त्यांच्या या शिष्याची कदर मराठी बांधवांनी केलीच पाहिजे.
शरद पवार यांनी घालून दिलेल्या ‘मार्गदर्शक तत्त्वा’नुसार आजवर अनेक संमेलने झाली आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्षही त्यांच्या इशार्‍यावर ‘नेमले’ गेले आहेत. त्यांच्या सल्ल्याशिवाय संमेलनाचे पान हालत नाही. त्यांच्या सहभागाशिवाय संमेलनाचे व्यासपीठ रितेरिते वाटते. मात्र सत्ताबदल होताच रंगबदलूपणा करत महामंडळाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण आजवरच्या प्रथेला फाटा देत, ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या चेल्यांनी वेळीच सावध झाले पाहिजे. पवारांचे अमृतमहोत्सवी वर्ष ही त्यासाठी एक चांगली संधी आहे. या निमित्ताने का होईना पण अजित पवारांना थोडीफार किंमत मिळेल. त्यामुळे यंदाच्या संमेलनाध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांनी दादांच्या नावाचा आग्रह जरूर धरावा!

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

3 comments:

  1. सर .....खूपच छान.....अप्रतिम. खरोखरच दखलपाञ...

    ReplyDelete
  2. सर .....खूपच छान.....अप्रतिम. खरोखरच दखलपाञ...

    ReplyDelete