केंद्रीय पर्यटन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'चपराक'च्या दालनाला आवर्जून भेट दिली. |
सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने 'चपराक'ची पुस्तके पाहताना |
संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. पंजाबी बांधवांकडून झालेले जोरदार स्वागत, उत्तम आदरातिथ्य, चोख व्यवस्था, खाण्यापिण्याची चंगळ यामुळे साहित्य रसिक भारावून गेले. आयोजन आणि नियोजनात कसलीही कमतरता नसल्याने मराठी रसिकांसाठी हे संमेलन संस्मरणीय ठरले; मात्र वशिल्याच्या तट्टूमुळे एकाहून एक सुमार, रद्दड साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम झाल्याने या संमेलनातून मराठी भाषेला नक्की काय मिळाले? हा मात्र प्रश्नच आहे.
घुमानला साहित्य संमेलन झाल्याने संत नामदेवांच्या कार्याला निश्चितपणे उजाळा मिळाला आहे. प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावी असे कार्य त्यांनी उभे केले आहे. आपल्या करंटेपणामुळे आपणास त्यांचा विसर पडत चालला असला तरी पंजाबी बांधव मात्र त्यांना देवाप्रमाणेच श्रेष्ठ मानतात. त्याकाळात संत नामदेवांनी जे काम उभे केले त्या बळावर आता मराठी माणसे मिरवून घेत आहेत. यानिमित्ताने का होईना महाराष्ट्र आणि पंजाब ही दोन राज्ये एकमेकांच्या जवळ आली आहेत. या दोन्ही राज्यात ऐक्य साधण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
पुण्यापासून जवळपास दोन हजार किलोमिटर अंतरावर हे संमेलन होत असल्याने प्रकाशक परिषदेने या संमेलनावर बहिष्कार टाकला होता. ‘चपराक’सारख्या स्वाभिमानी बाण्याच्या आणि कणखर संस्थांनी या बहिष्काराला भीक घातली नाही. ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी साहित्य संमेलन झाले आणि तिकडे मराठी रसिक येणार असतील तर आम्ही आनंदाने आणि अभिमानाने संमेलनाला जाणार! धंद्यापेक्षा धर्म महत्त्वाचा, अशी आमची भूमिका आहे’ असे ‘चपराक’ने जाहीर करताच मराठी रसिकांनी ‘चपराक’ला अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘एकही मराठी प्रकाशक संमेलनाला जाणार नाही’ अशी अडेलतट्टूची भूमिका घेतलेल्या प्रकाशक परिषदेची हवाच निघून गेली आणि त्यांनी त्यांची भूमिका सौम्य केली. या सर्व पाश्वर्र्भूमिवर ‘घुमानसारख्या अमराठी भागात ‘चपराक’ची पुस्तके विकली जाणार नाहीत’ असे भाकीत या क्षेत्रातील डुढ्ढाचार्यांनी केले. मात्र मराठी वाचकांच्या उदंड प्रेमामुळे त्यांचा हा अंदाज सपशेल खोटा ठरला आणि ‘चपराक’च्या सर्व पुस्तकांची तडाखेबंद विक्री झाली.
घुमान येथील ‘चपराक’च्या पुस्तक विक्री दालनाला पंजाब, हिमाचलप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटकातील बेळगावपासून बिदर-भालकीपर्यंत तसेच दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात येथील मराठी बांधवांनी आवर्जून भेट दिली. या राज्यातील लेखकांचे त्यांच्या मातृभाषेतील आणि हिंदीतील साहित्य ‘चपराक’च्या माध्यमातून मराठीत यावे अशी अपेक्षा यावेळी येथील लेखक आणि विचारवंतांनी व्यक्त केली. त्यासाठी आम्ही पुढाकार घ्यायचा ठरविला असून हिंदुस्थानातील भाषिक ऐक्य साधण्यात ‘चपराक’ निश्चितपणे खारीचा वाटा उचलेल.
एक एप्रिलला पहाटे पाच वाजता पुणे रेल्वे स्थानकावर ‘रिपोर्टिंग’ करायचे असल्याने चार-साडेचार पासून राज्यभरातून साहित्य रसिक स्थानकावर जमले होते. पुण्याच्या महापौर-उपमहापौरांसह अनेकजण या साहित्ययात्रींना शुभेच्छा देण्यासाठी तेथे आले होते. मात्र अर्धा तास-तास असे करत रेल्वे तब्बल पाच तास उशीरा आली आणि अनेकांचा संयम सुटला. अनेकांना महामंडळाचे हे ‘एप्रिल फूल’ वाटले. रेल्वेची वेळ आपल्या हातात नसली तरी महामंडळाचा एकही पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता. पुढचे नियोजन काय यासंदर्भात कोणालाही निश्चितपणे काही सांगता येत नव्हते. मात्र एकदाची रेल्वे आली आणि पुढचा प्रवास अत्यंत सुखद झाला. साहित्यिकांसाठी ही विशेष रेल्वे असल्याने अन्य गाड्यांचा वेळ साधत या गाडीला मार्ग काढावा लागत होता; मात्र ‘राजधानी एक्सप्रेस’प्रमाणे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने हा प्रवास कुणालाही कंटाळवाणा वाटला नाही.
सुप्रसिद्ध कथाकार डॉ. भास्कर बडे आणि त्यांचे सहकारी. |
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई प्रकाश आमटे यांच्या भगिनी श्यामा देशपांडे यांची मुलाखत, प्रभाकर तुंगार यांनी सांगितलेल्या विनोदमूर्ती वसंत शिंदे यांच्या आठवणी, ‘दखलपात्र’, ‘झुळूक आणि झळा’, ‘एमरल्ड ग्रीन‘ या पुस्तकांचे अभिवाचन, समीर नेर्लेकर यांनी केलेले ‘मधुशाला’चे वाचन, नामदेव ढसाळांच्या कविता असे अनेक कार्यक्रम झाल्याने पुणे ते घुमान आणि घुमान ते पुणे अशा प्रवासातच आमचे खर्याअर्थी संमेलन रंगले.
पुण्याहून निघालेल्या गाडीला तब्बल पाच तास उशीर झाल्याने पुढील सर्व कार्यक्रम लांबले. बियासपूरला उतरल्यानंतर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी गेले. मात्र आम्ही थेट संमेलन स्थळ गाठून ‘चपराक प्रकाशन‘चे पुस्तक विक्रीचे दालन ताब्यात घेतले. पुस्तकांची मांडणी केली आणि काय आश्चर्य! ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होण्यापूर्वी पहिल्या तासाभरात 18 पुस्तके विकली गेली. नंतर औपचारिक उद्घाटन झाले आणि साहित्य रसिकांची पुस्तके विकत घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. महाराष्ट्रभरातून आलेले रसिक ‘चपराक’च्या दालनाला मुद्दाम भेट देत होते. ‘चपराक’च्या परखड आणि प्रामाणिक भूमिकेबद्दल कौतुक करत होते. पुस्तकांचे संच विकत घेत होते.
ग्रंथ प्रदर्शनात मोजकेच प्रकाशक सहभागी झाल्याने ‘चपराक’ हाच संमेलनातील चर्चेचा विषय होता. प्रसारमाध्यमांनीही एव्हाना ही बातमी सर्वत्र पोहोचवली होती. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, आयोजक भारत देसडला, कवी रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, नामवंत अभिनेते संजय मोने आदींनी ‘चपराक’च्या दालनाला सदिच्छा भेट दिली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांना मात्र नट्टापट्टा करण्यातून आणि मिरवण्याची हौस भागवून घेण्यातून वेळ मिळाला नसल्याने त्या ग्रंथ प्रदर्शनाकडे फिरकल्या नाहीत. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सुद्धा औपचारिकता म्हणून शब्दशः तीस सेकंदात ‘लोकराज्य’च्या एकमेव दालनाला भेट देऊन तावडेंच्या सोबत घाईघाईत पळ काढला.
दुसर्या दिवशी बहुतेक साहित्य रसिकांनी अमृतसर आणि वाघा बॉर्डरला जाणे पसंत केले. त्यादिवशी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर शुकशुकाट होता. एकाहून एक टुकार कविता सादर करण्याची स्पर्धा निमंत्रितांच्या कवीसंमेलनात लागली होती. बळेबळे आणि सगळ्यांची ओरड सुरू झालेल्या कवी कट्ट्याकडेही कुणी फारसे फिरकले नाही. अभिरूप न्यायालयात सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी रंगत आणली. प्रमाण भाषेवरून राजन खान यांनी नेहमीप्रमाणे आक्रस्थाळेपणा केला. डॉ. गणेश देवी यांच्या मुलाखतीत मात्र कहर झाला. ज्यांनी प्रकाशक परिषदेच्या वतीने बहिष्कार टाकून संमेलनाच्या आयोजकांची कोंडी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्या ‘पद्मगंधा’च्या अरूण जाखडे यांनी मुलाखतीचा रसभंग केला. तब्बल सात-सात, आठ आठ मिनिट भाषणबाजीचे त्यांचे प्रश्न होते. गणेश देवी यांनी उत्तर देण्याच्या आधीच जाखडेंचे पुढचे प्रवचन सुरू व्हायचे.
‘पंजाब केसरी’चे संपादक विनोद चोप्रा यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत मात्र बरेच काही देऊन गेली. अध्यक्षीय भाषणही रटाळ, कंटाळवाणे आणि लंबेचौडे झाले. रसिकांना टाळ्या वाजवून मोरेंना ‘आता पुरे‘ असे खास पुणेरी शैलीत सुचवण्याची वेळ आली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावरही चांगलीच हुल्लडबाजी झाली. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असे काही उद्योग करून या लोकानी संमेलनाची अप्रतिष्ठा केली आहे.
'चपराक' तर्फे रेल्वेतील स्वयंसेवकांचा सत्कार घेण्यात आला. |
घुमानच्या संमेलनासाठी पंजाब सरकारने खास व्यवस्था केली होती. सुरक्षा व्यवस्था, निवास व्यवस्था, भोजन यासाठी त्यांनी कुठेही हात आखडता घेतला नाही. यानिमित्ताने घुमानसारख्या खेड्याचा विकास झाला. एका रात्रीत ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपालिका करण्यात आली. मागच्या पन्नास वर्षापासून प्रथमच गावात डांबरी रस्ता झाला. बसेस सुरू करण्यात आल्या. महाविद्यालयाला मान्यता मिळाली. पंजाब आणि महाराष्ट्र यांच्यात सांस्कृतिक एकोपा साधताना घुमानचा झालेला हा विकास ही मराठी माणसाची देण आहे.
घुमानहून परतीच्या प्रवासालाही उशीर झाल्याने काही अडथळे आले. मात्र छोट्याशा गोष्टींचा बागुलबुवा करून त्या रंजक पद्धतीने मांडण्यात आल्या. प्रवासात असतानाच महाराष्ट्रातील माध्यमांनी रेल्वे प्रशासन, आयोजक आणि स्वयंसेवक यांच्यावर जाळ काढल्याच्या बातम्या आम्हाला कळल्या. या सपशेल खोट्या वृत्ताला कोणीही दुजोरा दिला नाही. गाडीतील स्वयंसेवक हे वयाने आणि अनुभवाने लहान असले तरी त्यांना साहित्यिक जाण होती. त्यातील कुणी पुणे विद्यापीठातून एम. ए. करत होते तर कुणाची पीएचडी पूर्ण झालेली होती. आम्ही ‘चपराक’तर्फे मनमाड स्थानकावर रेल्वेतील सहप्रवाशांच्या साक्षीने या स्वयंसेवकांविषयी कृतज्ञता म्हणून त्यांचे सत्कार घेतले. स्वयंसेवक, आचारी, सफाई कामगार यांचे सत्कार केल्यानंतर त्यांच्या चेहर्यावरील समाधान आम्हाला पुढील प्रवासात ऊर्जा देत राहिले.
पंजाबी बांधवांचे आदरातिथ्य आणि मराठी लोकांचा करंटेपणा या निमित्ताने जवळून अनुभवता आला. चहा, नाश्ता, मिष्ठान्नावर यथेच्छ ताव मारूनही काहीजणांनी जेवणाविषयी असमाधान व्यक्त केले. ही निव्वळ विकृती आहे.
घुमानला साहित्य संमेलन झाल्याने दोन्ही राज्यात सांस्कृतिक दुवा साधला जाणार आहे. या संमेलनाच्या यशावरून माधवी वैद्य आणि त्यांचे चेले स्वतःची पाठ थोपटून घेतील, मात्र यात सर्वात मोठे अपयश त्यांचेच आहे आणि ते प्रत्येक मराठी रसिकांनी जवळून पाहिले आहे. त्याचा पुराव्यासह पंचनामा पुढच्या लेखातून आम्ही नक्की करू! मात्र यानिमित्ताने आयोजक भारत देसडला, संजय नहार, पंजाब सरकार आणि सर्व सहभागी साहित्य रसिकांचे अभिनंदन करायलाच हवे!
- घनश्याम पाटील
संपादक, चपराक
७०५७२९२०९२
No comments:
Post a Comment