Pages

Wednesday, March 4, 2015

साहित्याचं घुमान घोंगडं




येत्या एप्रिल महिन्यात पंजाब येथील घुमान या छोट्याशा गावात ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जे साहित्यिक मैदानात उतरले होते त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे यंदाचे संमेलन ‘वादाशिवाय’ पार पडण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी प्रकाशक परिषदेने घुमानच्या संमेलनावर बहिष्कार टाकला आणि नव्या वादाची ठिणगी पडली.
मराठी भाषा, मराठी संस्कृती हाच आत्मा असलेल्या ‘चपराक’ला प्रकाशक परिषदेची ही भूमिका मान्य होणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रकाशक परिषदेने संमेलनावर बहिष्कार टाकताच ‘चपराक’ने आपली अस्मिता दाखवून देत या संमेलनाला पाठिंबा दिला. प्रकाशक परिषदेने सुरूवातीला एल्गार करत ‘एकही मराठी प्रकाशक या संमेलनाला जाणार नाही’ अशी भूमिका घेतली. जे प्रकाशक परिषदेचे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी काही निर्णय झाला तर एकवेळ मान्य करता येईल, मात्र ‘चपराक प्रकाशन’सारखे अनेक प्रकाशक कुणाशीही बांधील न राहता, मिंधे न राहता वेगळ्या वाटेने जात असतील तर त्यांच्यावर आचारसंहिता लादणारे हे कोण? त्यामुळेच ‘चपराक’ने ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आणि तिथे जर मराठी वाचक असतील तर आम्ही आमच्या सर्व सदस्यांसह तिथे आवर्जून जाणार’ अशी भूमिका घेतली.
घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी आहे. त्याकाळी एक मराठी संत पंजाबमध्ये गेला. त्याने आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा तिकडे फडकवला. इतकेच काय तर शीख बांधवांचा धर्मग्रंथ असलेल्या ‘गुरूग्रंथसाहिबात’ही संत नामदेवांना स्थान मिळाले. असे सारे असताना इतक्या शतकांनी जर पुन्हा मराठी माणसाला पंजाबला सन्मानाने जाण्याची संधी मिळत असेल तर यापेक्षा मोठा आनंद तो कोणता? मात्र काही कर्मदरिद्री लोकाना धंद्यापुढे कधीही धर्म दिसत नाही. प्रत्येकवेळी केवळ धंदाच करायचे ठरवले तर मराठी भाषा वृद्धिंगत करण्यात आपण हातभार लावतोय, असा डांगोरा पिटण्याचा अधिकार यांच्याकडे राहतो का? म्हणूनच ‘चपराक’ने कशाचीही पर्वा न करता ही रास्त आणि कर्तव्यदक्ष भूमिका घेतली.

माधवी वैद्यांच्या गळ्यातले ताईत? -


‘चपराक’च्या या भूमिकेनंतर प्रकाशनविश्‍व ढवळून निघाले. मराठी प्रकाशकांनी ‘ज्यांना जाण्याची इच्छा आहे, ज्यांना जाणे परवडते त्यांनी जावे’ अशी भूमिका घेतली असती तर ते रास्त ठरले असते. मात्र ‘एकही मराठी प्रकाशक साहित्य संमेलनाला जाणार नाही’ असे सांगण्याचा नैतिक अधिकार यांच्याकडे उरतो का? त्यामुळेच ‘चपराक’ने प्रवाहाविरूद्ध भूमिका घेत ही कोंडी फोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. समाजमाध्यमाद्वारे ‘चपराक’ने आपली भूमिका जाहीर करताच सर्व प्रसिद्धीमाध्यमांनी त्याची योग्य ती दखल घेतली. त्यावेळी प्रकाशक परिषदेच्या अण्णा कुलकर्णी यांनी ‘माधवी वैद्य यांच्या गळ्यातले ताईत बनायला जाऊ नका’ असा सल्ला दिला.

सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर -


चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष ही आद्याक्षरे घेऊन एक प्रभावी वृत्तसाप्ताहिक, परिपूर्ण मासिक आणि वाचनसंस्कृती वाढीस हातभार लावणारी पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून ‘चपराक’चा लौकीक आहे. ‘सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर’ हे आमच्या संस्थेचे मूलतत्त्व आहे. साहित्य परिषद, साहित्य महामंडळ किंवा अन्य कोणत्याही संस्था, संघटनांना, राजकीय पक्षांना ‘चपराक’ने कधी भीक घातली नाही. ‘संवाद आणि संघर्ष’ ही भूमिका घेऊन कार्यरत असताना जे चांगले ते आम्ही स्वीकारले आणि जे वाईट ते अव्हेरले. डॉ. माधवी वैद्य यांच्यावर आम्ही अनेकवेळा तोफगोळे फेकले आहेत. मात्र घुमानबाबत त्यांची भूमिका योग्य वाटल्याने ‘चपराक’ने त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. येथे त्यांच्या गळ्यातला ताईत बनण्याचा प्रश्‍न येतोच कुठे? ‘चपराक’ साहित्य, संस्कृती, राजकारण अशा सर्व क्षेत्रात नेकीने कार्यरत आहे, पुढेही राहील. अण्णा कुलकर्णी ज्येष्ठ प्रकाशक आहेत. योगायोगाने तेही मराठवाड्यातले आहेत. त्यामुळे मराठवाडी माणसाला आपल्या कर्तव्यापुढे बाकी कशाचीही फिकीर नसते, हे काय आम्ही त्यांना सांगावे?


‘मी मराठी’वर येण्याचे निमंत्रण -

प्रकाशकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकल्याची बातमी येताच मराठीतील काही लोकानी प्रकाशन क्षेत्र बदनाम करण्यास सुरूवात केले. सर्वच प्रकाशक पैशाच्या मागे लागले असून ते आपले तुंबडे भरण्यासाठी दबावतंत्राचा वापर करत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र प्रकाशक परिषदेने बहिष्कार टाकताच ‘चपराक’ने क्षणाचाही विलंब न करता ‘आम्ही संमेलनाला जाणार व तिथे पुस्तकेही विकणार’ अशी भूमिका घेतली. ही भूमिका योग्य वाटल्याने ‘सकाळ’, बेळगाव ‘तरूण भारत’, ‘केसरी’, ‘नवभारत’ अशा मान्यवर वृत्तपत्रांनी ‘चपराक’चा आवाज सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. त्याचवेळी ‘मी मराठी’ या वृत्तवाहिनीने आमचा ‘फोनो’ घेऊन ‘चपराक प्रकाशन घुमानला जाणार, प्रकाशक परिषदेच्या निर्णयाला विरोध’ अशी बातमी चालवली. सर्व माध्यमातून ‘चपराक’ची भूमिका वाचकांपर्यंत पोहोचल्याने प्रकाशक परिषदेत असलेली चार टाळकीभडकली. याचवेळी ‘मी मराठी’ने या विषयावर स्वतंत्र कार्यक्रम ठेवला. घुमानला जाणार, अशी भूमिका तोपर्यंत केवळ ‘चपराक’ने घेतली होती. त्यामुळे त्यांच्या ‘पॉईंट ब्लँक’ या कार्यक्रमातील चर्चासत्रात सहभागी होण्याची विनंती ‘मी मराठी’या वाहिनीने केली. त्यासंदर्भात त्यांनी निमंत्रण देऊन पुण्याच्या स्वारगेट येथील स्टुडिओत रात्री येण्यास सांगितले.

‘मी मराठी’ची दुटप्पी भूमिका -


असे निमंत्रण देऊन पाहुणे ठरल्यानंतर त्यात फारसा बदल होत नाही. दरम्यान ही बातमी इतर पाहुण्यांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात पोहोचल्याने ‘प्रकाशक परिषदेबाबत कठोर भूमिका घेऊ नका’ अशा काही सूचना आमच्याकडे येत होत्या. मात्र आम्ही आमच्या विचारावर ठाम होतो. अचानक संध्याकाळी पाचच्या सुमारास ‘मी मराठी’च्या मुंबई कार्यालयातून दूरध्वनी आला आणि ‘काही तांत्रिक कारणामुळे आजचा हा कार्यक्रम रद्द झाला आहे’ असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात ठरलेल्या वेळी हा कार्यक्रम प्रसारित झाला आणि त्यात सर्वांनीच गुळगुळीत भूमिका घेतली. स्वतःच निमंत्रण देऊन, एखाद्याची भूमिका दाबण्यासाठी असे वागणे हे दृकश्राव्य माध्यमातील संकेतांना धरून नव्हते. मात्र काळ बदललाय म्हणून आम्ही तिकडे दुर्लक्ष केले.

तर निखिल वागळेंची पुस्तके कोण खपवणार? -


या कार्यक्रमानंतर पुण्यातील एका मात्तबर विक्रेत्याने आम्हाला आवर्जून कळवले की, ‘‘तुम्ही प्रकाशक परिषदेविरूद्ध भूमिका घेतल्याने आम्ही ठरवून तुमचे नाव चर्चासत्रातून वगळले. या कार्यक्रमाचे निवेदक असलेले निखिल वागळे हे आमच्या शब्दाबाहेर नाहीत. जर त्यांनी आम्हाला सहकार्य केले नाही तर त्यांची पुस्तके कोण खपवणार? त्यांच्या निर्भिड आणि निःपक्ष पत्रकारितेच्या गप्पा फक्त स्टुडिओत असतात. शेवटी ही यंत्रणा सांभाळणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते, हे ध्यानात ठेवा.’’

साम टीव्ही आणि ‘सकाळ’ने केलेले सहकार्य -


प्रकाशकांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे क्षेत्र बदनाम होऊ नये, अशी आमची आंतरिक ईच्छा होती. त्यामुळे याच दरम्यान  आम्ही समाजमाध्यमाद्वारे ‘घुमानला जाऊ चला’ अशी चळवळ सुरू केली होती. अनेक वाचक, लेखकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. ‘महाराष्ट्राबाहेरील मराठी वाचकांना आपण आणखी कितीकाळ गृहीत धरणार नाही?’ याचा विचार करण्यास आम्ही भाग पाडले. त्याचवेळी मुंबई ‘सकाळ’च्या श्रद्धा पेडणेकर यांनी आमची ही भूमिका ‘सकाळ’च्या माध्यमातून राज्यभर प्रभावीपणे पोहोचवली होती. ती वाचून पुण्यातील ‘साम टीव्ही’ची बातमीदार स्नेहल कांबळे आमच्याकडे आली आणि ‘चपराक’ कार्यालयात येऊन तिने आमची आणि आमच्या सहकार्‍यांची प्रतिक्रिया नेली. त्यावर एक विशेष कार्यक्रमही केला. विविध माध्यमाद्वारे आमचा आवाज एव्हाना मराठी वाचकांपर्यंत पोहोचल्याने प्रकाशक परिषदेचे बुडबुडे फुटले होते.

प्रकाशक परिषदेचा बहिष्कार मागे -


घुमानवरून प्रकाशक परिषदेत फूट पडल्याचे वृत्त आमचा संदर्भ देत काही वृत्तपत्रांनी दिले. मात्र आम्ही इथे नम्रपणे नमूद करू इच्छितो की, ‘चपराक’ची भूमिका ‘एकला चलो रे’ ची आहे. आम्ही कोणत्याही प्रकाशक परिषदेचे अजून तरी सदस्य नाही. (होय, ‘कोणत्याहीच. कारण प्रकाशक परिषदही एकच नाही. प्रत्येकाचे वेगळे कळप.’) असो. आमच्या या भूमिकेनंतर प्रकाशक परिषद आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांत काही चर्चा झाली आणि प्रकाशक परिषदेने सकारात्मक चर्चा करून बहिष्कार मागे घेतला असल्याचे प्रकाशक परिषदेचे पदाधिकारी आणि ‘पद्मगंधा’चे मालक अरूण जाखडे यांनी जाहीर केले. त्यानंतर काही वृत्तपत्रांनी आपणच प्रकाशक परिषद आणि महामंडळात समेट घडवून आणली, अशा बातम्याही दिल्या.

किमान दहा मराठी कुटुंब असलेल्या गावात संमेलन व्हावे -


हा बहिष्कार मागे घेताना ‘किमान दहा मराठी कुटुंबे असलेल्या गावात यापुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे आणि विभागीय साहित्य संमेलने व ग्रंथ प्रदर्शन भरविण्यास महामंडळाने सहकार्य करावे अशी मागणी केली असून ती मंजुर झाल्याने हा बहिष्कार मागे घेत आहोत’, असे जाखडे यांनी पत्रकारांना सांगितले. प्रकाशक परिषदेच्या बहिष्कारानंतरही राज्यभरातील अनेक प्रकाशक संमेलनाला जाणार, असे चित्र तोपर्यंत निर्माण झाले होते आणि त्यामुळेच प्रकाशक परिषदेला अशी नरमाईची भूमिका घ्यावी लागली.

मुंबईत ग्रंथप्रदर्शन -


दरम्यान ‘घुमानला येणार नाही’ असे राणा भीमदेवी थाटात जाहीर केल्यानंतर प्रकाशक परिषदेने घुमानच्या निर्णयाला विरोध म्हणून मुंबईत पुस्तक प्रदर्शन भरवले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्यासारख्या मान्यवर लेखकांचे तिथे कार्यक्रम घेऊन चांगली गर्दी जमवली आणि गल्लाही भरून घेतला. हे प्रदर्शन संपताच आपली भूमिका बदलत प्रकाशक परिषदेने घुमानला ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, आमची त्यांच्यावर बंधने नाहीत, ही सांमजस्याची भूमिका घेतली.

संमेलनाच्या पार्श्‍वभूमिवर बारा पुस्तके -


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान होत असल्याने ‘चपराक’ने पुण्यात साहित्य महोत्सव घेतला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ पत्रकार विनायक लिमये, कादंबरीकार उमेश सणस उपस्थित होते. यात सदानंद भणगे, संजय वाघ, चंद्रलेखा बेलसरे, प्रभाकर तुंगार, सागर सुरवसे, हणमंत कुराडे, विनोद श्रा. पंचभाई, माधव गिर, संदिपान पवार, प्रभाकर चव्हाण, शांताराम हिवराळे यांच्या पुस्तकांसह आमच्या झुळूक आणि झळा या अग्रलेख संग्रहाचेही प्रकाशन केले. मराठी लेखक सातासमुद्रापार पोहोचावेत यासाठी ‘चपराक’ने सुरुवातीपासूनच विशेष प्रयत्न केले आहेत. साने गुरुजी यांची ‘आंतरभारती’ची संकल्पना घुमान येथील 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे, असे आम्हांस वाटते. ‘चपराक’च्या साहित्य महोत्सवात बाबासाहेब पुरंदर यांनी केलेले मार्गदर्शन म्हणजे या सर्व साहित्यिकांसाठी पर्वणीच होती. आपली पुस्तके घुमानला जाणार याचे समाधान या सर्व लेखक आणि कविंच्या चेहर्‍यावर दिसत होते. त्यांचा विश्‍वास सार्थ ठरविणे ही आमची साहित्यिक जबाबदारी आहे.

‘चपराक’ची पुस्तके घुमानलाच विका;

काही विक्रेत्यांची मगु्ररी -

प्रकाशक परिषदेची अरेरावी मोडीत काढल्याने काही विक्रेत्यांनी ‘चपराक’ची पुस्तके विकणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. ‘तुम्ही घुमानला जाणार आहात, तिकडे तुम्हाला वाचक मिळतील. आमच्याकडे आधीचीच कोट्यवधी रूपयांची पुस्तके विक्रीअभावी पडून आहेत, तुम्ही घुमानलाच पुस्तके विका...’ असे काही धंदेवाईक विक्रेत्यांनी आम्हास कळवले. मात्र ‘सामान्य वाचकांची शक्ती हीच सर्वोच्च शक्ती’ यावर आमची श्रद्धा असल्याने आम्ही त्यांना भीक घातली नाही, किंवा किंचितही डगमगलो नाही. उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणे, मराठीतील नवनवे लेखक प्रकाशात आणणे हे आमचे व्रत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यात खंड पडू देणार नाही.

पंजाबमध्ये साहित्यिक वातावरण नाही -


भारतातील विविध शहरात उत्तम सांस्कृतिक वातावरण आहे. मात्र देशाचा विचार करता, पंजाब साहित्याच्या बाबत सर्वात मागासलेले राज्य आहे, असा अपप्रचार काही नतद्रष्ट मंडळी करत आहेत. अमृता प्रीतम यांच्यासारखी ज्ञानपीठ विजेती कवयित्री जिथे होऊन गेली त्यांना ‘साहित्यिक मागासलेपण’ म्हणून कसे हिणवता येईल? संत नामदेवांनी आपल्या विद्वत्तेचा प्रभाव ज्या भूमिवर पाडलाय ती मागासलेली असूच शकत नाही. उलट पंजाब ही शूरांची भूमी आहे. भारतीय सैन्यदलात पंजाबी बांधवाचे प्रमाण मोठे आहे. पंजाबी बांधव हे शूर तर आहेतच पण स्वाभिमानीही आहेत. एकही शीख बांधव तुम्हाला कधी भीक मागताना दिसणार नाही. इतकेच काय, नोेकरी करणारा शीख बांधवही तुम्हाला अभावानेच सापडेल. शौर्य आणि स्वाभिमानाची पंरपरा जपणार्‍या या लोकाकडून उद्यमशीलतेचे हे संस्कार घेण्याऐवजी आपण त्यांची ‘मागासलेले’ म्हणून चेष्टा करत असू तर तो दोष आपला आहे. ‘विद्वत्तेचा ठेका’ हा कुण्या एका जातीकडे, एका धर्माकडे, एका प्रांताकडेच आहे, असा जर कुणाचा ग्रह झाला असेल तर त्या कपाळकरंट्यांचा विचार करण्याची गरज नाही.

संमेलनाध्यक्षांची आणि महामंडळाची भूमिका -


भालचंद्र नेमाडे नावाच्या एका लेखकाने ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग’ अशी दर्पोक्ती केल्यानंतर आम्ही ‘नेमाडेंचा बेेगडी नेम’ या अग्रलेखाद्वारे त्यांचा समाचार घेतला. त्यावेळी अनेकांनी दूरध्वनीद्वारे आमचे कौतुक केले. मात्र वैयक्तिक हितसंबंधामुळे कोणीही आमच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला नाही. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील सर्वच दिग्गज मुगाचे अख्खे पोते गिळून गप्प बसले. किंबहुना ‘चपराक’ने घुमानबाबत धाडसी भूमिका घेऊनही  संमेलनाध्यक्ष, साहित्य परिषद, साहित्य महामंडळ किंवा आयोजक यांच्यापैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही. आमच्या भूमिकेचे राजकारण करणार्‍यांनी प्रकाशक परिषदेचा बहिष्कार मोडून काढला मात्र त्यासंदर्भात साधा दूरध्वनीही आम्हास केला नाही. घुमानसाठी पुस्तक विक्री गाळा आरक्षित करायला गेल्यानंतर मात्र महामंडळाच्या कार्यालयात डॉ. माधवी वैद्य भेटल्या. त्यावेळी निमित्त म्हणून त्यांनी ‘तुमची भूमिका ऍप्रिसिएट केली,’ असे मोघमपणे सांगितले.

आता सगळेच ढोल पिटत आहेत -


‘चपराक’ने घुमानला जाण्यासाठी वातावरण निर्मिती केली. ‘चपराक’परिवाराचे सर्व सदस्य पदरचे पैसे टाकून घुमानला जात आहेत. वाचकांनीही या संमेलनात सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन आम्ही सुरूवातीपासून केले आहे. त्याचा परिणाम घुमानला येणार्‍या साहित्य रसिकांच्या नोंदणीवरून येतच आहे. आयोजक, महामंडळ, संमेलनाध्यक्ष आता मात्र नेमाडेंच्या भूमिकेविरूद्ध बोलत आहेत. घुमानला चला, असे आवाहन करत आहेत. त्याला किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय हेही सांगत आहेत.

घुमानला पायी गेलो असतो -  द. भि. -


घुमानच्या पार्श्‍वभूमिवर माजी संमेलनाध्यक्षांचा एक कार्यक्रम झाला. त्यात पुण्यातील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्यांनी पार पाडले ते ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी म्हणाले की, ‘‘आता मी वयाने ऐंशीच्या घरात आलोय. जर मी अठरा वर्षाचा असतो तर पुण्याहून घुमानपर्यंत साहित्यप्रेमींची दिंडी घेऊन पायी गेलो असतो. संत नामदेवांना वंदन करण्यासाठी ‘नामा आकाशाएवढा’ हे सर्वांना कळण्यासाठी मराठी रसिकांनी, वाचकांनी घुमानला अवश्य जायला हवे.’’ या संमेलनाच्या अध्यक्षपदी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. डॉ. सदानंद मोरे हे असून हा दुग्धशर्करा योग आहे, साहित्यप्रेमींनी या साहित्योत्सवात सहभागी होऊन मराठीची अस्मिता उंचवावी, असेही दभिंनी सांगितले.

‘चपराक’ साहित्यक्षेत्रात नवे मानदंड तयार करणार -


‘चपराक’ने वेळोवेळी स्पष्ट, परखड भूमिका घेत विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना सणसणीत चपराक देण्याचे काम केले आहे. प्रस्थापित प्रकाशक ज्यांना जवळपासही फिरकू देत नाहीत अशा अनेक लेखकांचे दर्जेदार साहित्य ‘चपराक’ने प्रकाशित केले आहे. हा वारसा आम्ही प्राणपणाने जपू! माय मराठीची सेवा करण्यात आम्ही खारीचा वाटा नक्की उचलू! कुणाचीही भिडभाड न बाळगता, कशाचीही तमा न बाळगता ‘चपराक’ अविरत कार्यरत राहील, हेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, न आवरण्याएवढी लेखनाची ऊर्मि आहे, त्यांच्यासाठी ‘चपराक’ हे हक्काचे व्यासपीठ आहे. कसल्याही राजकारणाला बळी न पडता, मनात न्यूनगंड न बाळगता, कसदार लिहिणार्‍यांनी ‘चपराक’शी संपर्क साधावा.


घुमानला जाऊ चला! -


जवळपास सात हजार मराठी बांधव घुमानला येत असल्याचे आयोजकांनी नुकतेच सांगितले आहे. जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे जाणे हे आपले आद्य सांस्कृतिक कर्तव्य आहे. रोजच्या जीवनाचे रहाटगाडे चालूच असते. मात्र आपल्यापासून दुरावत चाललेल्या अन्य प्रांतातील मराठी बांधवांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांना साहित्याच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी सर्वांनी घुमानच्या संमेलनात सहभागी व्हावे. तेथील मराठी बांधवांशी संपर्क साधावा. ज्या पंजाबी बांधवांनी त्याकाळात संत नामदेवांना त्यांच्यात सामावून घेतले, त्यांना देवाचा दर्जा दिला, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यामुळे ‘चपराक’चे सर्व सदस्य या साहित्योत्सवात सहभागी होत आहेत. परप्रांतातील या संमेलनाला प्रारंभी जो विरोध होत होता तो आता मावळला आहे. हे भिजतं घोंगडं आता वाळलं आहे. ‘विचार अन् पुस्तकं घेऊ द्या की रं, मला बी घुमानला येऊ द्या की रं’ असं म्हणतं अनेक साहित्यरसिक संमेलनात सहभागी होत आहेत. आपणही घुमानला नक्की भेटूया! तोपर्यंत जय हरी!!


1 comment:

  1. तुम्ही म्हणालात तसच ( कर्मदरिद्री लोकाना धंद्यापुढे कधीही धर्म दिसत नाही )
    ते कोणताही आव आणोत पैश्या पुढे काही नाही त्यांच्यासाठी ...

    ReplyDelete