Pages

Sunday, March 29, 2015

बासरी अबोल झाली!

नरेंद्र नाईक यांचा 'साहित्य चपराक' मासिकाच्या अंकातील विशेष लेख 


नर्मदे! हर हर...ऽऽ अशा गजरात स्त्री अस्तित्वाची रुजवात झाली अन् पुरुषीचक्राचं कास सहन करण्याचं बळ मिळालं. विश्‍वातील नियतिचं दार करकरलं अन् वसुंधरा प्रकटली. तशी काळी कपिला गायही हंबरली. वासरु थरथरलं अन् विश्‍वमोलाचा माता आविष्कार प्रकटला. इंद्रायणी दुथडी भरुन वाहू लागली. कावेरी, शरयू नद्या नर्तन करु लागल्या तर गंगा, यमुना मातृप्रेमाची आराधना आळवू लागल्या. याच मातृप्रेमाने असेतू हिमालयही आनंदघन बनला. आपलं आरस्पानी सौंदर्य परावर्तित करीत आसमंतात एक गहिरा आशय गुंफू लागला. तसा अर्णवही खडबडून जागा झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तची आरोळी उठली. या आरोळीची जन्मदात्री होती एक माता! अन् तिचा अचाट हुंकार म्हणजे कोकराच्या अंतर्आत्म्यातील आंतरिक गर्जना. खरचं आई हे काय असते? एक अंतस्थ, अतर्क्य, अथांग विश्‍वाला भिजविणारा भिज पाऊस. घमघमणारा आंतरगंध. मग खरंच आई अत्तरदाणी असते काय? ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.’ मग आई कुठे असते? अणुरेणूत का अजून कुठे? अंतर्धान पावलेली पावले शोधण्यासाठी आज मी अधीर झालोय. फिरतोय गल्ली बोळात,अजिंक्य डोंगरकड्यातही. अगदी अनवाणी होवून पण आईची मूस काही हाती लागत नाही. काय ही यातायात.
अनादी काळापासून अनमोल रत्नाच्या शोधात फिरणारा एक अनर्वत पण अनुपम अनुराग काही आकळलाच नाही. आई आत्म्याची निर्लेप अनुभूती म्हणजे आदीअंत. तरीही अलक्ष आलाप का छळतो? तमाम मानवजातीच्या अभ्युत्थानासाठी. आई म्हणजे एक आत्मीय आनंदकंद अनार. आबादानीच आबादानी. साक्षात आबादी आबाद. पण हा आबाद कुठे असतो? आर्यावर्तात, हिमालयापासून विंध्याद्री पर्वतापर्यंत. आई म्हणजे साक्षात ईला-ईलाही. काय हे रहस्य? काय पुरावा? कुणी पाहिला ईलाही? असे असले तरी आई असते एक दिव्याची वात. कधीच टाकत नसते कात. आई असते एक काकडआरती. सांज दिव्यातील सांजवात. मातृगंधाचा कस्तुरी कलश. आई ही कल्पित कथा नव्हे. साक्षात कांचन पण धडाधडा पेटणारा कानण. भगवान महाबुध्दाच्या चेहर्‍यावरील कारुणिक महाप्रसाद! म्हणून ती घरादाराची कमलिनी असते. तिच्याकरता काही और पण आई या दोन शब्दाचं कोडं अंगदेशाच्या कर्णाला तरी खोलता आलं का? का भारतीय वीर असणार्‍या श्रीरामाला खोलता आलं? याचं उत्तर आहे-नाही.
आई समजून घेण्यासाठी समजावी लागते, गोठ्यातील गाय. तेव्हाच चराचरात दिसतील माय. खरचं सीता, द्रौपदी दोषी होत्या का? सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली हा इथला इतिहास आणि द्रोपदीला उघडं नागडं व्हावं लागलं हा इथला नग्न इतिहास. त्यामुळेच कन्याकुमारी ते हिंदुस्तानचे दक्षिण टोक आळविते फक्तनरेन. महात्मा व्हावा तर आईचे महात्म्य जाणणारा. तरचं तिची उतराई करता येईल, पण विवेकानंदा सारख्यांचा अपवाद सोडला तर रामायण, महाभारतापासून धर्मात्म्याची निरस जिगीषा. कुठला आदरभाव व्यक्त करील? उदात्त आदरभाव अभिव्यक्त करण्यासाठी उधाण वार्‍यावर स्वार होणारा उन्मत महत्त्वाकांक्षी पुत्र असावा लागतो. तरच सत्त्वर आईची महती गाणारं उद्यान हाती लागतं आणि निर्झराचा ओलावा खळखळू लागतो! पण सध्याची आई भरल्या ओटीने जात आहे काय? ओली भिक्षा मागता मागता तिचे व्याकूळ ओठ निर्जन स्थळी विसावतात. ओहोळ, नदी, नाले हेही कटबाज होवून रजेवर जातात. तेव्हा माधुकरी आईचा आर्तस्वर कुठला आधारभूत आयाम देत असेल या विश्‍वाला? आदराचं ठिकाण जेव्हा अवहेलना घेतं तेव्हा अर्धपोटी उसासे आमूलाग्र आघातातून बाहेर झेपावतात. तेव्हाच पृथ्वीचं आवरणही कुठल्या उद्गमातून उदय पावलं याचा आतुरतेने विचार करावा लागतो. तरच आई नावाचे उद्यान फुलवता येईल. त्यासाठी बाप नावाचा बगीचाही तपासावाच लागतो. हा टीकाश्‍लोक नव्हे, ना लफंगा विचार नव्हे तर मानवी जीवनमूल्यांतून उफाळणारे कारंजे तपासले तरच कदरदान  नावाचा फानूस उपवनात टिकेल. अन्यथा आई नावाचं झाड कितीही उन्नत, उपकारक, उपदेशात्मक असलं तरी बेफाम दुनियेत उन्मळून पडेल. त्यासाठी बाप अधिक आई बरोबर कुटुंबवत्सलता. यातूनच आई वजा बाप बरोबर आई या सूत्राची क्रमिक बांधणी केली तर आशाळभूत आईची दृष्टी अवलोकन करता येईल कारण आई असते एक आराधना. सृष्टीभराचे आराध्य दैवत. त्यापुढे आरसेमहालही पडतो फिका. अवीट असा अव्यक्त, व्यक्तअलभ्य प्रीतीसोहळा म्हणजे आई. त्यात नसतो मत्सर, नसतो अस्थिरपणा. आई अस्थिपंजर झाली तरी ना खेद, ना आनंद. त्यासाठी कराव लागतं आकलन तरच आई शोधता येईल. आई असते एक आख्यान. नसतो तिच्यात आकस, आकांत. आक्रंदन असतात तिचे सगे सोबती. म्हणूनच तिचा दडपलेला असतो आकांत पुरुषी अहंकाराखाली. याच तत्त्वावर बाप असतो आग्रही, आचार विचार करतो आत्मगत, असतो असंतुष्ट, स्वार्थाची आतुरता आत्मकेंद्रित म्हणूनच सीता असो किंवा द्रौपदी तिच्याही भोवताल आग्यावेताळाची दाटी. जेव्हा भास हे आभास होवून येतात तेव्हा स्त्री होते आश्रित आणि दिला जातो एक इशारा- इशारत, उच्चपदस्थ संस्कृतीकडून. मग होते तिची ससेहोलपट, कालांतराने उच्चाटन अन् घेतात तिचा उचित आस्वाद. मग करतात एक दिवस तिचा लिलाव. निमिषात अलोट गर्दी तरीही तिचे मर्म अबाधित. एखाद्या इंद्रनील हिर्‍यासारखे. तरीही तिच्यावर भिडतात आरक्त नजरा अन् होते अवहेलना. तेव्हा तीही होते अमोघ, अमूर्त. अर्धनारीनटेश्‍वराच्या नावाने सूर्याला अर्घ्य देते. अन् रुदनाचा प्रपात करुन अभिषेक करते. अफीमबाजाचं अभिष्ट चिंतनही करते अबीरबुक्का होवून. तेव्हा तिची प्रभा फाकलेली असते. ‘दे दान सुटे गिरान’ म्हणत अभय देते चराचराला.
मग प्रश्‍न पडतो रावणराज्याचा? राम श्रेष्ठ का रावण श्रेष्ठ? रावणाने सीतेची अग्निपरीक्षा घेतली नाही. घेतली ती रामाने. द्रोपदीचा लिलाव कौरवांनी मांडला नाही. तो मांडला पाची पांडवांनी! मग इन्साफ कसा करायचा? कुणाची आहुती द्यायची? पुरुषप्रधान संस्कृतीची का स्त्रीप्रधान संस्कृतीची? आपल्या कपोलकल्पित कामना पूर्ण करण्यासाठी कामधेनूची कसोटी? हा उ:शाप आहे का उष:काल आहे? याचा उलगडा होणे आवश्यक आहे. तरच उत्कट अशा स्त्री हृदयाची उत्तम गती शोधून उत्तुंग स्त्री पर्वाची उंची मोजता येईल. अन्यथा उत्तरार्ध उद्विग्न असा हाती येईल. सृष्टीभराचे सौंदर्य प्राशन करुन प्रभातकाळी उष:पान करता येईल आणि राष्ट्राप्रती उमदा विचार मांडू शकू. अन्यथा अकस्मात उपरत्या कळेचा उमाळा दाटून येईल. आम्ही ऐटबाज हिंदू, वैभवसंपन्न ऐश्‍वर्यवादी, ऐहिक लोक निळसर डोळ्यावाटे स्त्रीला उपमा देण्यात तरबेज आहोत. स्त्री म्हणजे माता, सीता, गीता, गाथा, प्रथा पण पार्थ कोण? याचा विचार झालाच पाहिजे, तरच अभिनिवेशाची अमानुषता नष्ट होईल. अभावग्रस्तता जाईल आणि आई नावाची अमानत शिल्लक ठेवून आपण निष्णात आमीर होवू. तरच आपला अभ्युदय. अन्यथा आरिष्ट आलेच म्हणून समजा.
अपवाद सोडले तर अफसोस या गोष्टीचा आहे की, कुठलाच अनमान न करता आम्ही लोक आधाशीपणे अप्रतिम अप्सरेच्या मागे लागलो आहोत. आमच्यातला अजाण अंतर्भाव अगतिकता निर्माण करीत आहे. शुद्ध अंतःकरणाशिवाय ग्लानी जात नसते. त्यासाठी आपलाच अदमास घेतला पाहिजे तरच आपली अदालत निष्कलंक ठरेल. त्यासाठी अतुल पराक्रम करण्यासाठी अंतर्मुख व्हावं लागेल. तरच मातृत्वाचं अगाध दिव्य दर्शन घडेल. एवढं सारं असतानाही मातेचे प्रेम आंधळे का? याचे उत्तर आहे प्रसूतिवेदना. जेव्हा माता प्रसूत होते, तेव्हा वेदना ह्या वेणा होतात. साक्षात श्‍वेतकमळाची कुमुदिनी. तिचा कुलदीपक कुलवंत असला तरी, कुबेेर असला तरी तिच्यातील जागती ज्योत सदैव जागता पहारा करते. मग तो कुलदीपक कूपमंडूक वृत्तीचा घरकोंबडा असला तरी त्या खापरतोेंड्याचे रक्षण करण्यासाठी तिचा सारखा गुंजारव  चालू असतो. ‘घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’ याची अनुभूती येते. सुरेख असे गोमटे सुस्वरुप.. हाच तिचा मातृत्वाचा राजमार्ग असतो. यातूनच अनेक चक्रवर्ती राजे निर्माण झाले. ती सृष्टीला चकित करते पण चकवा देत नाही, ना चकार शब्द बोलत नाही, पण तिची चैतन्यचेतना चंद्रमा होवून अखंड सानुल्याचा जयघोष करीत जपमाळ जपते. मग ते जळतोंड्या कोकरु असलं तरी तिचं मातृत्व जाज्वल्य जिवित्वाचा जीर्णोद्धार करते. साक्षात जास्वंद असेल तर ज्योतिष्मान होवून झंकारते. तिच्या हरेक नजरेत मातृत्वाचा जोगवा असतो. तिचे लाघव नेत्रपल्लव झंझावात करुन द्यार्द्र स्वर चराचराला अपूर्ण चिंब करते. म्हणून मातृत्व म्हणजे दिगंतरीचा दर्पण, दिग्वीजय करणारा दिनकर, दीपस्तंभावरील दिवटी का दीपमाळ? पण सारखी फडफडणारी दीपिका. तर कधी  थंडीवार्‍यात दुर्गम दुर्गातील दुर्लभदुलई. देवगिरीच्या यादवांचीही दुवा. देदीप्यमान देवता.
आई म्हणजे साक्षात देवालय. शिवप्रभूचं दैवत. नाही का जिजाऊ मॉंसाहेब गेल्या तेव्हा सार्‍या महाराष्ट्राचं देवस्थान नष्ट झालं? देव्हारा रितारिता पडला. दौलतीचा धनुर्धारी धनंजय निबिड अंध:कारात ढसाढसा रडला. सारं काही आई नावाच्या देहाचा देहांत, ध्वंस. साक्षात धरणीकंप. जेव्हा अशी आई कुठेतरी दूरदूर जाते तेव्हा रुमझुमणारी धूनही मुकी होते. राधा राधा कृष्ण राधा नावाची बासरीही अबोल होते. नंदादीप मालवतो. नभ दाटून येतात. नभोमंडल सैरभैर होतं. आई नावाचं नादब्रह्म लोप पावतं अन् नवकोट नारायण नागवला जातो. फक्त एका आईसाठी. आई असतो साक्षात कमळाचा समूह. म्हणून तर सारं जग म्हणतं, नलिनी नलिनी! निष्कांचन असणारी आई निष्काम सेवा पार पाडून निजधामास जाते तेव्हा आठवायला लागते तिचं अनुपम सौंदर्य. करायला लागते निरुपण, विवेचन पण निर्विकल्प आत्म्याचा निलाम आपणच केलेले असतो ना? आता आई झालीय निशंकनिर्माल्य, निचेष्टनिश्‍चेतन पडलेलं एक नीरज. नीरव शांततेत तिच्या नुपूराचाही नाद निःशब्द झालाय अन् निशाही निभ्रांत. आता कुठली नौबत दणाणेल पंकज पाकळीसाठी? पैंजणही झालेत निस्पंद. खरचं आई एक नगिना होती. अंबरावरती रेखलेली निलीमा. आता सृष्टीचाही नगारा दणाणेल. ध्वांत, श्रांत पडलेली थोरवी आळविण्यासाठी अन् त्यातूनच जन्मेल एक तुळस. उद्याच्या तत्त्वार्थ तीर्थराजासाठी. तपस्वी तपोनिधी तपोवनात गेली आता. निमग्नपणे पाहू तिची तसबीर. तात्त्विक, तेजस्वी, तेजःपुंज तत्त्वज्ञानाची. फक्त तलाश. तिचा कलेजा आता शांतशांत झाला आहे. काळ झोप. कुटुंबवत्सल कुजबूज निवली. कोकीळ खरेच रजेवर गेलाय तरीही धुंदकुंद वातावरणावर कौंमुदीचे चांदणे फेकीत. खरचं क्रौंैचवध झालाय का? कशावर आली होती स्वार होवून? साक्षात खगेंद्रावरती. कशासाठी आली होती? रुक्षपणा नष्ट करुन सार्‍या धरेला प्रदीप्त करण्यासाठी. तिची गजगती चाल अन् केश सांभारात माळलेला गजरा गाभारा श्रांतावून गेला. राउळही गहिरा आशय घेवून घनश्याम सुंदराची भूपाळी गात ग्रस्तास्त गोजिर्‍याचा गौरव करण्यासाठी झगमगू लागेल. गुरुकुलाचा महिमा गुंफत गुलाबदाणी शमलय, अगदी गोरज मुहूर्तावर. अखेरचा श्‍वास चालू असताना तिचा गुलालगोटा गुलाबी थंडीत गुलाबीझोप घेत होता अन् तिकडे आई गेलीय. दारावरचं तोरण काळवंडलंय आणि या तोंडचाट्याची तोंडपाटीलकी चालू झालीय म्हणे, आई गं.... थोतांड्याचा थोटका विचार. विद्वत्ताच ती काय? विचारशील असता तर विलाप करण्याची वेळ आलीच नसती पण बिचारा विहंगम वृंदावनाचे सचिदानंद स्वरुप कसे काय अवलोकन करु शकेल?  कारण मातृहृदय सेवाभाव जाणते. ते नुसते विद्यापीठीय विचारवंत नसते. त्यामुळे व्याख्या करत बसत नाही. व्याख्याता तरी नव्हेच नव्हे.
व्याधी आणि व्याधीग्रस्त लोकांवर शतदा उपाय करुन शालीन सांत्वन करते. त्याचबरोबर शिकस्तही. सेवाभाव हाच संकल्प. शुचिर्भूत आत्म्याचा संकल्प! एक संघर्ष! महा संघर्ष! जीवनमूल्यांचा संघर्ष! त्यासाठीच आई या नावानेच सतीचे वाण घेवून सात्त्विक सतार छेडलेला असतो आणि हाच तो सत्य संकल्प! सत्यनिष्ठा रोमारोमात भिनलेली म्हणूनच सत्त्व, सार हे सत्त्वशील होवून येतात. त्यामुळे मानवी जीवन सदाचारासमीप जाते. समरस होणे हा आईचा गुणधर्म, सोशीक समर्पण हा स्थायीभाव, त्यामुळेच सम्राटही तिच्यासमोर सर्वस्वाची सलामी देतो. कारण आई ही सहस्त्ररश्मी सविता असते. तिचे सर्वस्वाचे समग्र पतन झाले तरी सार्थकता ही सिंधु बनते. कारण तिच्यात असते वाहण्याची स्फूर्ती. नसतो आपपर भाव! म्हणूनच तर एखाद्या स्वाती नक्षत्रासारखी स्वयंभू हालाखी पचविते, पण हवेली मागत नाही ना हवालदिल हरिणी होत नाही. कारण तिचा नजराणाच असतो लोकहितेषी. म्हणूनच तर हिमनगाची हिमांशू ठरते. तिचा हुंकार आणि रुकार असतो हिरकणीसारखा. साक्षात आवेशपूर्ण क्षणप्रभा. तिचा अनाहूत अनुराग अमितमनोहर असतो ओतप्रोत. ती जळते सारखी आतबाहेर! साक्षात अरण्यरुदन. म्हणूनच तर तिचा विरह मागत असतो एक मोहरा. राजमुकुट ल्यालेला. गळ्यात कवडीमाळ अन् हाती परडी घेवून फुलेही उधळते गंधाळलेली. त्यातच तिचे प्राणपाखरु हर्षन्मुख होतं. असा हा तिचा अगाध महिमा अन् अगम्य इच्छाशक्ती. अविरत झगडणारी अबोल  अबोली. तिची स्वप्न अवस्था कुठला अमोद सुस्वर घेवून येत असेल  सुप्रभाते. विरहदु:ख कुंकवासंगे ल्यालेली आई म्हणजेच विराटस्वरुप. विरक्तविमल चारित्र्य विभूषित करुन विभूती ठरते तेव्हा मानवी जीवनात विनयाची विनयशील विपुलता, वात्सल्याची संबळ घेवून दणाणते. तेव्हा हिरवागार विपुल पर्णाचा वसंत प्रज्ञा, शील, करुणेचा विवेक सिंचन करण्याचा वसा घेतो. अशा मातेसमोर वस्त्रहरणाचा आणि वस्त्रलोचन करणार्‍याचे विधान विधिनिषेध ठरते. मग हा जळतोंड्या रडतोच कशासाठी? उत्तर सोपे आहे. प्रौढ प्रतापासाठी. कोण प्रेरित करेल? परागंदा झालेल्या प्रेरक प्रेरणांची हाव करणारा हा फुलमाळी ठरला तरी त्याची फुलारी भरेल काय?  ज्या मातेची निर्भत्सना होते, त्या मातेच्या हृदयातील कोलाहल घायाळ होवून परित्राणाची भिक्षा मागतो हे या पार्थिव गोट्यास, महमुदी मस्तवाल कारट्यास समजले का? आई नावाचं पिनाक असतंच मुळी पिंपळपान. साक्षात पारिजातकाचं झाड अन् हृदय असतो फुललेला प्राजक्त. तर कधी होतो बकुळ. म्हणूनच तर आई नावाचं पीयूष पुण्यश्‍लोक पुण्यक्षेत्र ठरतं. आई या शब्दातच पूर्वा फाकलेली असते. ती करत नसते प्रतारणा, ना प्रमाद. मग कशासाठी करत असेल हा सायास? हाती संसाररुपी बाणाची प्रत्यंचा खेचलेली असते. वाघीण वेळप्रसंगी दोन पावले मागं सरुन झेपावणारी म्हणूनच तर तिचा परिमळ सर्वत्र उधानलेला असतो. तिचा पयोधर असतो परिस अन् याच पयोधराचे स्तनपान केलेला जेव्हा तिच्याशीच पंगा घेतो तेव्हा त्याचा परागंद ठरलेलाच असतो. कारण त्यानं कुणाचे पांग फेडलेले असतात? एका पानस्थ पाचूचे? अरे मातृपारखी व्हा! गाजरपारख्यांनो! तुमच्याही हृदयी घुमू द्या पारवा! तरच प्रगल्भ पुष्कराज व्हाल. माता ही गुढी असते. चराचराला व्यापलेली सुरेख चाफेकळी. तिचा देखणा मुखडा पाहूनच तर तुझी रोतीसूरत रोमहर्ष पावली. रोमरंध्री ललामभूत झालास. तुझ्यासारखेे लाडोबा कुठली चिरंतन लढाई लढेल? वत्सा! वत्सलतेचा वध वरप्रद नसतो रे! तूही तिचा महिमाशाली पुत्र आहेस. अरे माणिकमोती हो! लाल हो! माधुर्य माधुरीच्या मांदीयाळीत मार्गस्थ हो. तरच तुझ्या कीर्तीचा मकरध्वज फडफडेल. ती पहा... मावळतीची किरणे मुक्त कैवल्याचा मुलामा घेवून आलीत. अरे सालसपणाची ग्वाही दे. बालिशपणाची बदसूरत सोडून  बधीरतेला सोडचिठ्ठी दे! अन् कर मातृवत्सल सौदामिनीला प्रणिपात! अन् हो तिचा भक्तवत्सल. बिजली तुझ्यावर मोहित होईल. अरे तुझ्यातला मनोहर भुलोबा काय कामाचा? मलूलता सोड अन् मनोरम समीरन लहर हो! उधळ एकदाचा बेलभंडार अन् घे खांद्यावर  पताका आई नावाची कारण आई पराधीन नव्हे, पणती आहे. एकतरी ओवी गा तिच्यासाठी. कारण आई गहिवर नव्हे तर दहिवर आहे. अरे गा तिच्या प्रीतीचे सोहळे.
आई म्हणजे साक्षात गुलाबपुष्पांनी बहरलेली मधुमालतीची वेल. रंगीबेरंगी पुष्पगंधांनी बहरलेला मनमोर वसंत. हसर्‍या गाली चाफा अन् मोगरीचे वैभव. पौर्णिमेच्या चांदण्याची बरसात. रातराणीची फुलारलेली गंधीत फुले. एकूणच मोहरलेला गुलमोहर. अभ्रपटलावर रेखलेली पहाटलाली अन् थयथयणारे निळे घन. स्वैर भरारणारा वारा, पाचूची नितळ छाया पण संध्यासमयी पारिजातक झडलेला, मात्र शेजार्‍यापाजार्‍याच्या अंगणी बहरलेला. डोळ्यात रेखलेला सुरमा... पण भन्नाटवारा सुटला आहे. ढग पांगताहेत. अशा खुलावटीत रेंगाळलेला सायंतारा. हेमंतात तोंड पसरलेला. आई म्हणजेच उलूपी अन् उर्वशीच्या केस सांभारात माळलेला पुष्पगुच्छ, निव्वळ हिरव्या, पिवळ्या, निळ्या फुलावर लहरणार्‍या लाटा. त्यातून परावर्तित होणारा इंद्रधनु. नाजूक साजूक हातावर चितारलेली मेहंदी. साक्षात शुक्र चांदणी. जीवन संग्रामात यशस्वी होणारी हसरी सकाळ. एक सुंदर विण, त्यात गहिर्‍या पहाटेचं विहंगम दृश्य. गंध फुलावर भिरभिरणारी दुपार... ही सकाळ होते, ब्रह्मांड हर्षफुल्ल होवून डोलू लागते. तेव्हा प्रीत होते, तिच्या पायाची दास अन् महन्मंगल क्षण रुणझुणतो केवड्याच्या रानानं, दर्याद्रभाव झुलतो पिंपळपानात अन् प्रीत उधानते नागेलीच्या बनात. नदीही अवखळपणे वाहत.. एक नयनमनोहर नजराण्यासाठी. हीच तर तिची खरी अदा. दूरच्या रानात उडालेली पाखरं दळदार फुलांनी वेडावतात. टपटपताहेत जास्वंदाची पिवळीधमक फुलं, गंधाळलेल्या रानवार्‍यात. हिमनग झालाय धुुंदफुंद, मधुमालतीच्या जाळ्यात. रंगाचं देखणं रुप अन् तलमसुतीचा मुग्धसोहळा. अवचित हंबरणारी गाय अन् हुंदाडणारं वासरु म्हणजे एक मातृहृदयी अनावर शीळ, मंतरलेला भास. अनोखी लय. यात अजाण पाखरु सैरभैरत. फुलांच्या उत्सवात आणि गात राहतं सुकुमार वसंतगीत.. पण आता या गीतालाही काजळी लागलीय. घनव्याकुळ संध्यासमयी. कारण देव्हारा रिता झालाय. कोण देईल गंधग्वाही मातृप्रीतिची? अद्भूत निसर्ग स्थितप्रज्ञ झालाय. आत्ममग्न काटेरी बाभूळबनात. गहनगूढ सांज उगवतीचं स्वप्न बाळगीत असते पण.. मश्गुल प्रवाहात आई नावाचं झाडच हुरहुरत्या अंत:करणानं थरथरुन, उन्मळून पडत असेल तर नावा चालल्या वाहत असेच म्हणावं लागेल आणि याच नावेवरती स्वार होवून वेदनेचे तलमगीत रेशमी कुंतल्यात गुंफून मोरांना, मेघांना, ढगांना, आळवित अखंड प्रपात करावा लागेल. तरीही भावविभोर मातृप्रीत दुर्लभ. आर्त हुरहुर, व्याकुळ हुंदका, देशोदेशीची दिगंतर मुसाफिरी! तरीही आई नावाचा कवडसा दूरच... दूर...
आभाळ गिरकी - घ्यावी फिरकी
गहन संदर्भ - चुकार टिटवी
बोचरा नाद - होईल बाद
फिर फिर्याद - यहॉं थी कहा गयी।
आई पाहिली का हो! आई...!!


- नरेंद्र नाईक 
कळमनुरी, जि. हिंगोली 
संपर्क : ७३५०६३४७८५

8 comments:

  1. पाटील सर , आपण माझ्या बासरी अबोल झाली या ललित लेखाची दखल घेऊन चपराक मध्ये प्रकाशीत करून दखल पात्र लेख म्हणून दखल ब्लोग मध्ये घेतल्या बद्दल आभार..... नरेंद्र नाईक ९४२१३८४००७

    ReplyDelete
  2. नाईक सर, आपला लेख वाचून मला माझ्याच 'आई' या कवितेचं एक कडवं आठवलं.
    आई, बारमाही वाहणारा
    चैतन्याचा झरा
    रसरसीत पिकलेल्या
    फणसाचा गरा
    आईसाठी आपण लिहिलेल्या या ओळी म्हणजे खरोखरच रसाळ, मधुर शब्दांचा अविरत वाहणारा झराच आहे. खूप सुंदर लेख.

    ReplyDelete
  3. Babarao Musale आपला लेख आवर्जून वाचला. विविध भाषाभगिणींच्या सहबंधातून सायासाप्रयासाने साकारलेला स्नेहपूर्ण सुवर्णकुंभच- साक्षात. वाचताना वेळोवेळी वाङमय विश्व विख्यात, ग्रेटेस्ट, गेय, गजब कविराज माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस च्या लाघवी, लयदार, लौलिकअर्थाने ललित लेखांची उर उचंबळून उगीचच्या उगीच, उत्स्फुर्तपणे उजळणी करतो आहोत की काय, असे वाटले.

    ReplyDelete
  4. Narsing Deshmukh बासूरी अबोल झाली,मी पुर्ण वाचलंय.भावनेचा बांध फुटून आईप्रती असलेल्या चिंतन स्वरुपातील भावना ओसंडून वाहतात.जन्मदात्रीचं ओघवतं दर्शनच वाक्यातून घडतं.आई हा मराठी साहित्यीकांच्या लेखणीचा विषय होतो तेंव्हा वाचकाच्या मनात भावनांचे काहूर तांडव करायला लागते.साने गुरुजी,कवि यशवंत,,माधव जुलियन,फ मु.शिन्दे,कवि वामन निंबाळकर या सारख्या साहित्यीकांच्या कृतीपेक्षा आपली कृती भिन्न आहे.ललीतलेख आपला मी पहिल्यांदाच वाचतो आहे.ओघवतू भाषा आणि भावनेने ओथंबलेले शब्द मनाला मोहून घेतात.एकंदरीत छान भट्टी जमलीय.कांही शब्द ग्रामीण जीवनातील सहज डोकावतात.खोलने...उलगडणे पण याचा वापर ब-याच ठिकाणी होतो,तो टाळायला हवा.हे शब्द व्यक्तीगत अनुभूतीचे आहेत,सामान्य वाचक इथे थोडा चक्रावतो.लेखन प्रवास असाच चालू ठेवा,माझ्या शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. Sujata Belkhede कर्मकठोर जीवनात ओलाव्याची माया म्हणजे आई..!
    आपला लेख वाचला..यापूर्वी न वाचलेली आई अभिव्यक्त झालीय आपल्या या लेखातून....

    ReplyDelete
  6. विजया मारोतकर - फार सुरेख आणि hight च लिहीता सर आपण . आज aashru आवरता नाही आले . सध्या मी पॅरिस ला आहे . इथे सर्वानी मला मोठ्याने वाचायला म्हंटले . सर्वाना आपली आई आठवली. लेख खुप खुप खुप आवडला.

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. सर तुमचे दखलपात्र आणि चपराक मधले लेख वाचले,
    शब्द नाही प्रशंषा करण्यास - साई शेखर पुणे

    ReplyDelete