संवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम चपराक देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरल्याचे वाचक आवर्जून सांगतात. विविध विषयांवर चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भावनेने केलेला लेखनप्रपंच म्हणजे 'दखलपात्र' हा ब्लॉग!!
Pages
▼
Thursday, January 31, 2013
एक पट्टेवाला..!
गरिबी म्हणजे एक मोठा शाप असतो. कुणा एकेकाळी मीही गरिबीने शापित होतो. त्याकाळात कुटुंबाला थोडाफार आर्थिक हातभार लागावा आणि जगणे सुसह्य व्हावे म्हणून मी अनेक उचापत्या केल्या. लोककवी मनमोहन नातू यांच्या रचना मी आकाशवाणीवरून ऎकायचो आणि पाठ करायचो. सोलापुर आणि परिसरातल्या गावात होणा-या लहानमोठ्या जत्रायात्रात ढोलकी पिटत निसर्गाने दिलेल्या सुमार आवाजात त्या गायचो. काही दयावंत मायबाप त्या बदल्यात मला पाचदहा पैसे द्यायचे आणि त्यामुळे मला गगन ठेंगणे वाटायचे.
'दलित असणं हा एकेकाळी मोठा गुन्हा होता'.
अनेकांनी त्याची मोठी किंमत मोजली, मात्र याबाबतीतही मी सुदैवीच ठरलो. जातीचा मला सदैव लाभच झाला. सुरवातीला मी 'पट्टेवाला' म्हणून नोकरी केली ती जातीच्या आधारावरच! पुढे दलितपणाचे घोड़े कायम दामटत राहिलो आणि आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अशी माझी चढती कमान कायम राहिली. माझी ही प्रगती पाहता कुणाही दलित बांधवांना स्वत:च्या जातीची लाज वाटू नये! उलट जातीमुळे मिळणारे लाभ पदरात पाडून घेउन आपली प्रगती साधावी, असे मला नम्रपणे सुचवावेसे वाटते.
एकेकाळी नोकरी सांभाळताना माझा पट्टा चामड़याचा होता. राजकारणात चमचेगिरी करत करत मी मोठा झालो आणि तो पट्टा बघता बघता रत्नजडीत झाला. त्याला हिरे, माणीक, मोती बसवून घेण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली. 'आपले मूळ विसरायचे नाही' या न्यायाने मी माझ्यातला 'पट्टेवाला' सदैव जिवंतच ठेवला. 'साहेबाला खूष ठेवणे' हा पट्टेवाल्याचा धर्म! त्या धर्माला जागतच मी कायम खुषम्हस्क-या म्हणून कार्यरत राहिलो. पट्टेवाला असल्याकारणाने चमचे गिरी ही माझ्या रक्तातच भिनलेली आहे. एकेकाळी मी शरदराव पवारांचा चमचा होतो. जनसंघाच्या लोकांच्या मांडीला मांडी लावूनही मी अनेकवेळा कोंबड्या बक-यांची हाडुके चाखली आहेत. आजही सोनियाबाईसाहेब आणि राहुल महाराज यांची चमचेगीरी करणे मला माझा धर्मच वाटतो.
राजकारणातले लोक हुशार असतात, हे अनुभवांती मला चांगलेच उमजले आहे. ते उगीच कुणाची चमचेगिरी करत नाहीत. ज्याची चमचेगिरी केल्याने मालामाल होता येते, अशाच लोकांची ते चमचेगिरी करतात. मी खुर्चीवरून कधी उठतोय याची वाट पाहणारी असंख्य मंडळी माझ्या अवतीभोवती आहेत. ही रांग भलीमोठी असल्याने मला सदैव श्रेष्टिंची
चमचेगिरी करणे गरजेचे वाटते. जनता जोपर्यंत भोळसट, मूर्ख आहे तोपर्यंत माझ्यासारख्या माणसांची लबाडी कायम चालूच राहणार याचा मला पूर्ण विश्वास आहे.
'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी', या न्यायाने मी खाल्ल्या मिठाला जागत असतो. लोकांना काहीही वाटत असले तरी या म्हणीमुळेच मी त्यांची चिंता करत नाही. 'पांढरे स्वच्छ इस्त्रीचे कपडे आणि माझी स्वत:ची कुठलीही कर्तबगारी नसताना मिळालेला गोरागोमटा चेहरा' याचाही माझ्या विकासाला हातभार लागला आहे, हे मी कृतज्ञतापूर्वक नमूद करतो.
'मनीमेकिंग' ची शिकवण कॉंग्रेसवाल्यांना जन्मजातच दिली जाते. त्यामुळे 'मनीमेकर' ची भूमिका मी कायमस्वरूपी हुबेहुबे वठवत असतो. बरेचजण राहुल महाराजांच्या पुढे येण्याने गांधी कुटुंबीयांवर घराणेशाहीचा आरोप करतात. मला स्वत:ला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. राहुल हा पंतप्रधान व्हायला अयोग्य माणूस आहे, हे काय मला कळत नाही? पण तसे मी म्हटले तर मला लगेच 'डच्चू' मिळेल हे भोळ्याभाबड्या जनतेला कोण सांगणार? माझी प्रणीति राजकारणात पुढे यावी असे बाप म्हणून मलाही वाटतेच ना? मग मी सोनियाबाईसाहेबांना घराणेशाहीवरुन नावे ठेउन स्वत:ची अक्कल का पाजळावी?
आमच्यासारखी नतदृष्ट माणसे सर्वकाळात सर्रासपणे वावरताना दिसून येतात ब्रिटिश आमदानीत देखिल 'ब्रिटिश राज्य म्हणजे ईश्वरी वरदान आहे' असे अकलेचे तारे तोडणारे महाभाग होउन गेलेले असताना जनतेने माझ्याकडे बोट दाखवणे हे मला माझ्याबाबतीत अन्यायकारक वाटते. नतदृष्टांची ही परंपरा जाणकार वाचकांनी इतिहासाची पाने चालून तपासून घेणे अधिक सोयीस्कर!
काहीही करून स्वतःची खुर्ची शाबूत ठेवणे हे राजकारण्यांचे आद्य कर्त्तव्य असते . खुर्चिचे फायदे किमान मी तरी अधिक स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. राजकारण एक व्यसन असते. या नशेची झिंग चढली की खुर्ची हवीहवीशी वाटते . एकदा का ही सत्तासुंदरी आपल्या कह्यात आली की 'हरतर्हेची' मौजमजा करता येते.
माझा राजकीय वाटचालीत माझ्या चेहरयावरील हास्य, कपाळावर येणारी 'बायकी' बट याचे अनेकांना कौतुक वाटते. खुर्ची मिळाली की, 'होयबा' म्हणणारे अनेक उपचमचे आपल्याला लाभतात. जनतेला कसे मुर्ख बनवले म्हणून मी कायम हसत असतो, मात्र या हसण्यामागचे मर्म लोकांना कळत नाही त्याला मी काय करू ?
नुकत्याच घडलेल्या दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणाची माहिती गृहमंत्री या नात्याने सांगतानाही मी हसतच होतो. माझे हे हसे बघूनही लोक शांतच असतात, याला मी जबाबदार नाही !
सत्ता उपभोगताना संपूर्ण जनतेला सोडाच मात्र माझ्या स्वत:च्या समाजालाही मी कोणताही नवीन विचार दिला नाही. त्यासाठी कसलीही किंमत मोजली नाही. दलित, उपेक्षित, वंचितांच्या विकासासाठी, उद्धारासाठी फारसे काहीच केले नाही. समाजात वैचारिक, आर्थिक जागृती केली नाही. कोणत्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही. कुठे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे मी? कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली? लोक असे म्हणत नसले तरीही मी मात्र अकार्यक्षम असूनही त्यांना 'त्यांचा' नेताच वाटतो.
आपली जनमाणसातली प्रतिमा अधिकाधिक उजळ रहावी यासाठी पवार साहेब कायम दक्ष असतात. त्यांचाच आदर्श घेऊन मी त्यांची नक्कल करत असतो. अशी नक्कल करायलाही अक्कल लागते, हे काय वेगळे सांगणे झाले? पवारांप्रमाणेच मीही माझ्यावर गौरवांक काढून घेतले, विशेषांक काढून घेतले, पुरवण्या काढून घेतल्या, लघु चित्रफिती काढून घेतल्या! थोडक्यात काय तर आपली प्रतिमा अधिकाधिक उजळ आणि उज्वल रहावी यासाठी जी काही तंत्र वापरावी लागतात ती वापरण्यात मी वाकबगार आहे. ज्या चार पत्रकारांचे इंग्रजी चांगले आहे आणि जे गुळगुळीत वृत्तपत्रात माझ्यावर सातत्याने स्तुतीसुमने वाहू शकतील त्यांना मी सदैव माझ्या खिशात ठेवतो. माध्यमातले लोक खूष तर मी खूष! 'इतर अनेक राजकारण्याप्रमाणेच' काही पत्रकारांचा 'पोशिंदा' होण्याची ही कलाही मी प्रयत्नपूर्वक अवगत केली आहे. याबाबत मी केवळ पवार साहेबांचेच अनुकरण करतो, असे कुणाला वाटत असेल तर तीही माझी नैतिक जबाबदारी नाही.
देशात संघ आणि भाजप परिवार भक्कमपणे कार्यरत आहे. त्यांना सुरुंग लावणे ही माझ्या किंवा कॉंग्रेसच्या क्षमतेबाहेरची बाब आहे. प्रत्येक आपत्तीच्या वेळी मदत कार्य करण्यासाठी संघ पुढाकार घेतो. त्यांना आवरणे तसे कठीण! मात्र त्यांना दुषणे लावली की सोनियाबाईसाहेब मला चिरीमिरी देतात. माझ्यावर मेहेरबाणी दाखवतात. संघ तर राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून कार्य करतोय; मात्र ज्या ज्या महापुरुषांनी जाती पद्धती, धर्म पद्धती नष्ट व्हाव्यात म्हणून आयुष्य खर्ची घातले त्याच महानेत्यांच्या नावे त्यांच्या त्यांच्या जातीच्या संस्था, संघटना उभ्या करून त्यांना मतांसाठी खतपाणी घालणे हे माझ्या राजकीय आरोग्याच्या दृष्टीने 'पौष्टिक' आहे. म्हणूनच अशा संस्थाना मी कायम पाठीशी घालत असतो आणि संघासारख्या संघटनांना लक्ष्य करीत असतो!
'भगवा दहशतवाद देशासाठी मारक' असे एखादे वाक्य उच्चारले की थोरल्या बाई साहेब आणि राहुल महाराज खूष होतात. मालकांना खूष ठेवण्यासाठी माझ्यातला पट्टेवाला मला टोकून टोकून जागा करत असतो. ही 'जागल्या'ची भूमिका पार पाडतच अतिशय स्वार्थी मनाने मी 'गस्त' घालतो. शब्दश: मूर्ख आणि नालायक जनतेला माझ्यातला धूर्तपणा कधीच कळणार नाही. त्यामुळेच माझे आणि माझ्यासारख्यांचे फावते. तुम्ही निस्वार्थी असाल तर त्यात गैर ते काय? शेवटी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतला एकच शब्द बदलून अतिशय प्रांजळपणे सांगावेशे वाटते, ''एक पट्टेवाला बसला आहे माझ्या मनात खोल दडून...!''
No comments:
Post a Comment