Pages

Tuesday, September 15, 2020

संभाजी बिडी आणि राजकारणाचा धुरळा

पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्य नगरी, मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

आपल्याला जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं. मृत्युला असं बेदरकारपणे सामोरा जाणारा असा दुसरा योद्धा, दुसरा सेनापती, दुसरा राज्यकर्ता जगाच्या इतिहासात दिसत नाही. मात्र आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा उपयोग केवळ आणि केवळ राजकारणासाठी करण्यात आलेला आहे. 


 एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एक बिडी यायची. आचार्य अत्रे यांनी त्याला कडाडून विरोध केल्यावर ती बंद झाली आणि पुढे ‘छत्रपती संभाजी बिडी’ सुरू झाली. त्यातील ‘छत्रपती महाराज’ हा उल्लेखही काढून टाकण्यात आला. मात्र ‘संभाजी’ हे नाव वापरत इतकी वर्षे ही बिडी सुरूच आहे. आता शिवप्रेमींच्या रट्ट्यानंतर या बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय त्यांच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. निलेश राणे, रोहित पवार असे युवा नेते या बदलासाठी आग्रही आहेत. यांच्या वडिलांना, काकांना छत्रपती संभाजी महाराजांचा हा अपमान दिसला नव्हता मात्र या नेत्यांनी या नावाच्या बिडीला विरोध करत राजकारण तापवले आहे.

ज्या राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमा आपल्या हृदयात आहेत त्यांचा इतकी वर्षे अपमान होत असेल आणि आपण गप्पच असू तर ते सगळ्यात वाईट आहे. दरवेळी सिनेमा आला, नाटक आलं, पुस्तक आलं की वाद निर्माण होतात. बाजीराव पेशव्यांवर सिनेमा आला आणि त्यात त्यांना नाचताना दाखवलं तरच आमचा स्वाभिमान दुखावतो. इतर वेळी त्यांच्या विचारांचं, कार्यकर्तृत्वाचं आम्हाला काही देणंघेणं नसतं. त्यासाठी आपल्या राष्ट्रपुरूषांच्या कर्तबगारीचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा राजकीय वापर सुरू केलाय. यामुळं महाराजांच्या मुद्रेची माहिती जनसामान्यांपर्यंत जाणार असेल तर त्याचं फारसं वावगं वाटण्याचं काही कारण नाही. छत्रपतींच्या इतिहासावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाची ती अभिमानाची निशाणी आहे. त्यावर मनसेचा किंवा राजघराण्यातील कुणाचाही खाजगी अधिकार नाही. त्यामुळं ती जास्तीतजास्त शिवप्रेमीपर्यंत पोहोचायलाच हवी.

छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं तर एखाद्या महाविद्यालयाला द्या, हॉस्पिटलला द्या, महाराष्ट्राच्या विधानभवनाला द्या, एखाद्या विमानतळाला द्या, मात्र संभाजी महाराजांच्या नावानं एखादी बिडी, सिगारेट निघत असेल तर ते वाईटच आहे. हे नाव बदलण्याची मागणी त्यांच्या व्यवस्थापनाने मान्य केलीय. त्यासाठी त्यांनी थोडा वेळ मागितलाय. खरंतर सध्याच्या करोनाच्या काळात ‘सर्व व्यसनापासून दूर रहा’ असं सगळेच सांगत असताना या नावाची बिडी असावी की नसावी असा वाद घालणं हे सुद्धा खुळेपणाचं आहे. कोणत्याही महापुरूषांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असं कोणतंही उत्पादन कधीही नसावं. साबळे-वाघिरे या उद्योजकांना संभाजी हे नाव हवंच असेल तर त्यात थोडा बदल करून ‘संभाजी भिडे गुरूजी बिडी’ असं करता येईल. त्यावर फार कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. कदाचित काहीजण अंधभक्तीतून त्याचं मार्केटिंगही करतील. हा असा बदल करावा असं आमचं म्हणणं नाही पण बिडीसाठी संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख प्रत्येकाला खटकणाराच आहे.

जगाच्या इतिहासात स्वदेशासाठी, स्वधर्मासाठी आणि स्वतःच्या तत्त्वासाठी संभाजीराजांनी ज्याप्रमाणे हौतात्म्य पत्करलं तसं हौतात्म्य येशू ख्रिस्ताशिवाय आणखी कोणी पत्करलेलं दिसत नाही. ख्रिश्‍चन जगतातले सगळे विचारवंत, शास्त्रज्ञ, कलाकार, अभिनेते, डॉक्टर, वकील दर रविवारी प्रार्थनेसाठी चर्चमध्ये एकत्र येतात. येशू ख्रिस्ताच्या मूर्तीपुढे नतमस्तक होतात आणि अपार शांतीचा अनुभव त्यांना अनुभवता येतो. तसंच किंवा त्याहून मोठं बलिदान भारतीय समाजात कोणी पत्करलं असेल तर ते केवळ आणि केवळ छत्रपती संभाजी महाराज आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं कुठं मंदीर नाही. त्यांचं मंदीर उभारून त्यांचं दैवतीकरण करण्याची गरजही नाही. मात्र त्यांच्या दुर्दम्य पराक्रमाचा, आशावादाचा विसर आपल्याला पडू नये. त्यांच्या स्मृतीसुद्धा आपल्या विस्मृतीत गेल्याने आपण अशा दुर्दशेला पोहोचलो आहोत.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपल्याकडे अनेक प्रवाद आहेत. त्यावर सातत्यानं चर्चा करून महाराजांचं व्यक्तिमत्त्व कायम वादग्रस्त करण्यात आलं. त्यांच्यावर पुस्तकं लिहिली गेली, मालिका काढण्यात आल्या त्या सुद्धा अशाच संशयास्पद पद्धतीनं करण्यात आल्या. संभाजी महाराज निर्व्यसनी होते हे पुन्हा पुन्हा पुराव्यासह सिद्ध झालेलं असताना त्यावर चर्चा कशासाठी? तरीही संभाजीराजांना कोणती व्यसनं होती याची चर्चा स्वतःच्या हातातल्या पेगकडं बघत करणारी माणसं प्रत्येक पिढीत निर्माण झाली. या लोकानी आणि संभाजी महाराज कसे निर्व्यसनी होते हे सांगणार्‍या व्यसनी कादंबरीकारांनीच महाराजांना अधिक बदनाम केलं. या सगळ्या व्यापात संभाजी बिडीकडं इतकी वर्षे आमचं दुर्लक्ष झालं आणि ती चालूच राहिली.

जो आदर, जो सन्मान, जी प्रतिष्ठा ख्रिस्ती जगतात येशू ख्रिस्तांना प्राप्त झाली ती भारतीय समाजात संभाजी महाराजांना करून देण्याची जबाबदारी आपणा सर्व शिवप्रेमींची आहे. फक्त ‘संभाजी बिडी बंद करा’ अशी मागणी करायची आणि लगेच हात पुढे करत एकगठ्ठा मतं मागायला पुढं यायचं असंच इतकी वर्षे सुरू आहे. मराठा आरक्षणावरून एक झालेल्या मराठा समाजाला ‘संभाजीकार्ड’ वापरून झुलवत ठेवायचं अशीच यातील राजकारण्यांची वृत्ती दिसतेय. छत्रपतींच्या विचारांशी यांची काही बांधिलकी आहे असं कधीच दिसलं नाही. चुकीच्या मालिका निर्माण करून, आरडाओरडा करत भाषणं ठोकून महाराज सामान्य माणसांपर्यंत पोहोचणार नाहीत.
 
आपल्या वडिलांच्या मृत्युनंतर औरंगजेब नावाचं वादळ नऊ वर्षे आपल्या छातीवर झेलणारा हा पराक्रमी राजा होता. आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी इतक्या तरण्याबांड वयात कसलीही तडजोड न करता, कोणताही पराभव न स्वीकारता हा राजा धारातीर्थी पडला. त्याची दखल इतिहासानं घेतली असली तरी वारंवार त्यांच्याविषयी वाद आणि प्रवाद निर्माण करण्यात आले आहेत. औरंगजेबाचा अकबर नावाचा मुलगा होता. तो दक्षिणेत उतरला. या अकबरानं औरंगजेबाच्या विरूद्ध बंड केलं. राजस्थानात ते फसलं. मग त्यानं आपल्या बापाविरूद्ध त्या काळातल्या भारतातल्या सर्व सत्ताधीशांकडे आश्रय मागितला. त्यात आदिलशहा होता, कुतुबशहा होता, डच होते, पोर्तुगिज होते, दक्षिणेतल्या अनेक सत्ता होत्या. मात्र त्याला आश्रय देणं म्हणजे औरंगजेब नावाचं एक आस्मानी आणि सुलतानी संकट अंगावर घेणं हे या सर्वांना माहीत होतं. त्यामुळं कोणीही हे धाडस दाखवलं नाही. मात्र कधीतरी आपल्याला या सत्तांशी संघर्ष करायचाच आहे आणि त्यात औरंगजेबाचा हा अकबर नावाचा मुलगा आपल्या कामाला येईल हे संभाजीराजांना माहीत होतं. त्याची सोबत असेल तर मोगलांविरूद्ध लढताना आपल्याला मदत होईल या विचारातून सतराव्या शतकात त्याला आश्रय देण्याचं धाडस संभाजीराजांनी दाखवलं. वयाच्या बावीसाव्या-तेवीसाव्या वर्षी असं धाडस दाखवणारा हा छावा होता.
 
जर अकबर नावाच्या या मुलाला आश्रय देण्याचं धाडस महाराजांनी दाखवलं असेल तर हा राजा अतिशय निधड्या छातीचा होता, संकटं अंगावर झेलणारा होता, परिणामांची फिकिर न बाळगता काम करणारा होता, या राजाचे राजकीय डावपेच आणि क्षमता चांगल्या होत्या हा सगळा इतिहास वाचकांपर्यंत सातत्यानं मांडण्याची गरज आहे. गोदुबाई, चंपाबाई, कमळाबाई हा महाराजांचा इतिहास नाही. त्याची चर्चा करण्याची आणि त्याचीच बडबड करण्याचीही गरज नाही. अशाच विषयांची चर्चा होईल अशा मालिकांची आणि पुस्तकांचीही गरज नाही.

विश्‍वास पाटील नावाच्या एका लेखकानं राजांच्या जीवनावर ‘संभाजी’ नावाची एक कादंबरी लिहिली. राज्याभिषेकाच्या दिवशी कसल्या तरी शोभेच्या तोफा उडणार होत्या. त्या शोभेच्या तोफा महाराजांच्या दिशेनं वळवायच्या आणि त्यात खरंखुरं बारूद भरायचं असलं काहीतरी कारस्थान होतं. कुणीतरी गोदाबाई नावाची एक बाई होती. तिनं आपल्या नवर्‍यानं कसा काही कट केल्याची माहिती महाराजांना दिली. अशी काहीतरी वर्णनं या कादंबरीत आहेत. अरे चोंग्यांनो, शिवाजीमहाराजांचं व्यवस्थापन आणि त्यांची गुप्तहेर खाती अशी लुळीपांगळी नव्हती. आजही जागतिक स्तरावर त्याचा अभ्यास होतोय. राजधानीतील तोफात वाटेल तशी दारू भरण्याची कुणात हिंमत असेल का? कादंबरीच्या नावावर असं जे काही आजवर खपवलंय ते बंद झालं पाहिजे. महाराजांच्या नावानं बिडी असणं जितकं वाईट आहे तसंच किंबहुना त्याहून घाणेरडं हे असं लेखन आहे. अशा काल्पनिक लेखनावर, त्या आधारे होणार्‍या मालिकांवर बंदी घालण्याची मागणी खर्‍या शिवप्रेमींनी करायला हवी.

महाराष्ट्राला ‘महाराष्ट्र धर्म’ प्राप्त करून देणारा हा दुसरा छत्रपती राजा आहे. विलक्षण प्रतिभासंपन्न असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. एकाचवेळी ते पोर्तुगिज, डच, ब्रिटिश, मोगल, सिद्दी अशा सर्वांशी ते एकहाती लढले. एका तरूण राजानं दिलेली ही झुंज आहे. त्याचा जर आपल्याला यथायोग्य सन्मान ठेवता येत नसेल तर अवघड आहे. स्वाभिमान म्हणजे काय असतं, समर्पण म्हणजे काय असतं हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हा आजच्या राजकारण्यांच्या आवाक्यातला विषय नाही. त्यामुळं त्यांनी त्यांच्यावरून राजकारण करू नये. महाराजांचा विचार, त्यांचा पराक्रम जगभर पोहोचावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. त्यांचा स्वाभिमान, स्वधर्म आणि स्वराज्याच्या पराकोटीच्या त्यागाची, निष्ठेची प्रेरणा लोकाच्या मनात निर्माण व्हायला हवी. संभाजी बिडीच्या निमित्तानं का असेना पण ज्यांच्या जाणीवा सजग आहेत त्यांनी संभाजी महाराजांचा पराक्रम सामान्य माणसांपर्यंत पोहोचवावा. राजकारण्यांच्या तावडीतून त्यांची सुटका करावी.

वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाशी लढताना हा तरूण राजा त्याला शरण गेला नाही, माफी मागितली नाही, तह केले नाहीत. या स्वाभिमानाचं इतकं दाहक दर्शन त्यांनी घडवलं तो संस्कार त्यांना कुठून मिळाला? तो संस्कार 12 मे 1664 ला त्यांना मिळाला. या तरूण राजाच्या वडिलांनी त्याला आग्र्याला नेलं. तिथं ‘‘मी अपमान सहन करणार नाही, माझं डोकं कापलं तरी चालेल पण बादशहाच्या दरबारात मी पुन्हा पाऊल टाकणार नाही’’ असं छत्रपती शिवाजीमहाराजांनी ठणकावलं. असा संतप्त ज्वालामुखी या मुलानं वयाच्या नवव्या वर्षी वडिलांच्या रूपात बघितला, अनुभवला. त्याची धग त्यांच्या हृदयात होती. संस्कार फक्त शब्दांनी किंवा काही सांगून होत नाहीत. संस्कार अनुभवातून येतात. संभाजी महाराजांवर स्वाभिमानाचे आणि आत्मसमर्पणाचे संस्कार त्यांच्या सगळ्या अनुभवातून आले होते. आपल्या वडिलांच्या एका शब्दासाठी तानाजींनी हौतात्म्य पत्करलेलं त्यांनी बघितलं होतं. बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह तीनशे बांदलांनी घोडखिंड अडवलेली आणि आपल्या वडिलांचे प्राण वाचवलेेले त्यांनी बघितलं होतं. हा सगळा आदर्श म्हणजे त्यांचं जगणं आणि वागणं होतं.

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जितकं लिहावं-बोलावं तितकं कमीच आहे. त्यांच्यासारखा स्वाभिमान इथल्या सामान्य माणसाच्या मनात निर्माण व्हावा अशी प्रांजळ अपेक्षा व्यक्त करतो.
- घनश्याम पाटील
7057292092

पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्य नगरी, मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

Tuesday, September 1, 2020

हा तर महाराष्ट्राचा अपमान



14 जून 2020 ला सुशांतसिंह राजपूत नावाच्या एका हिंदी चित्रपट अभिनेत्याने आत्महत्या केल्याची बातमी आली. हिंदी चित्रपटातील घराणेशाही याला जबाबदार असल्याचं सांगत सुरूवातीला त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली. यावरून समाजमाध्यमाद्वारे अनेक घराण्यांवर प्रचंड टीका सुरू झाली. त्यांना ट्रोल करणं, त्यांना टार्गेट करणं हे अनेकांकडून सुरूच होतं. सुशांतसिंहला अनेक चित्रपटांतून काढण्यात आलं होतं, त्याच्या हातात मोजकेच चित्रपट राहिले होते, मोठे बॅनर्स त्याला टाळत होते, त्यांनी त्याच्यावर अघोषित बहिष्कार टाकला होता आणि या व अशा सगळ्याचा परिणाम म्हणून त्यानं आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं.

या मृत्युचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला. मुंबई पोलिसांच्या योग्यतेबद्दल किंवा त्यांच्या क्षमतेबद्दल क्षमता घेण्याचं काहीच कारण नाही. तपासाच्या बाबतीत स्कॉटलंड यार्ड हे पोलीस जगात एक नंबरला आहेत आणि त्यानंतर मुंबई पोलिसांचा दुसरा क्रमांक लागतो असं सातत्यानं सांगितलं जातं आणि ते खरंही आहे.  अनेक कठीण गुन्ह्यांची उकल मुंबई पोलिसांनी केलेली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाची केस, त्याची केलेली उकल, त्यावर दाखल केलेली चार्जशीट आणि आरोपींना झालेली शिक्षा ही जगाच्या कायद्याच्या क्षेत्रातील एक मोठी लढाई आहे की जी मुंबई पोलीस लढलेले आहेत. त्यात त्यांनी यशही मिळवलंय. अशा मुंबई पोलिसांना सुशांतसिंहच्या मृत्युबाबत साठ दिवसात कोणताच निष्कर्ष का काढता आला नाही याबाबत मात्र अनेकांच्या मनात संभ्रम आहे. या साठ दिवसात मुंबई पोलीस काय करत होते याचं उत्तर मुंबई पोलिसांना आणि राज्यातील इतर प्रत्येक घटनेत नाक खुपसणार्‍या गृहमंत्री अनिल देशमुख यांना द्यावं लागेल.
 
मुंबई पोलिसांकडून हा तपास सीबीआयकडे दिला गेला हा मुंबई पोलिसांचा अपमान नाहीये! तो राज्याच्या गृहखात्याचाही अपमान नाही! तर तो राज्यातल्या जनतेचा अपमान आहे!! त्याला जर गृहमंत्री आणि मुंबई पोलीस जबाबदार असतील तर त्यांनी हे सगळं असं का झालं याचं स्पष्ट उत्तर राज्यातील जनतेला द्यायला हवं. सुशांतसिंहच्या मृत्युबाबत अशी नेमकी कोणती गुंतागुंत होती की ज्यामुळं मुंबई पोलिसांना साठ दिवसांपर्यंत त्याचे निष्कर्ष काढता आले नाहीत? अनेक गंभीर प्रकरणात तुम्ही दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी सत्यापर्यंत पोहोचता. अगदी पालघरच्या प्रकरणातही दोन-तीन दिवसात चार्जशीट दाखल करण्यात आली. जे आरोपी टोळक्याने आले होते त्यांची चौकशी करून, त्यांना पोलीस कस्टडी मागून तुम्ही घटनेचा माग घेतला. अतिशय वेगानं तो तपास झाला. मग सुशांतसिंग प्रकरणात नेमकी काय अडचण होती याचा खुलासा महाराष्ट्रातल्या जनतेला देण्यासाठी पोलीस महासंचालकांनी आणि गृहमंत्र्यांनी जनतेसमोर आलं पाहिजे.
 
या प्रकरणात नेमकं काय झालं की हे सगळेच गप्प आहेत? हिंदी चित्रपटसृष्टीतल्या बड्या लोकाना बोलवून तुम्ही कसली चौेकशी केली? यात काहीच निष्कर्ष निघत नसेल तर तुम्ही त्यांच्यासोबत तोडपाणी करत होता का? अशी शंका यायला मोठा वाव आहे. यातून नेमकं काय साध्य होतंय हे कुणालाही का सांगता येत नाही? एकवेळ तर अशी आली की बिहार पोलिसांनी एफआयआर नोंदवली. जिथं गुन्हा घडतो तिथंच एफआयआर नोंदवावी लागते हा साधा नियम आहे. बिहार पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यावर सुद्धा यात कायदेशीर तरतूद अशी आहे की त्यांनी तो नोंदवून तो मुंबई पोलिसांकडे वर्ग करायचा. त्याचा पुढचा तपास मात्र मुंबई पोलिसांनाच करावा लागणार होता. असं असताना बिहार पोलिसांनी एफआयआर नोंदवला. हे सगळं बाजूला ठेवायचं म्हटलं तरी मुंबई पोलीस आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहतात.

या प्रकरणाबाबत महाराष्ट्राच्या गृहखात्याची आणि महाराष्ट्र पोलिसांची भूमिका शंकास्पद आहे. महाराष्ट्र पोलिसांबाबत आमच्या मनात नितांत अभिमानाची भावना आहे. मुंबई पोलिसांविषयी आदर आहे पण या प्रकरणात तुम्ही नेमकं काय करत होता हे जनतेला कळलंच पाहिजे. हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी द्यायचं अशी केंद्राची भूमिका लक्षात आल्यावर महाराष्ट्र सरकार न्यायालयाकडं गेलं. हे प्रकरण सीबीआयकडं द्यावं असं कोर्टानं सांगेपर्यंतचे पाच-सहा दिवसही महाराष्ट्र पोलिसांकडं होते. मुंबई पोलिसांच्या तपासाचे निष्कर्ष जर जनतेसमोर आले असते तर हे प्रकरणा सीबीआयकडंही गेलं नसतं. तुम्ही निष्क्रियपणे वागत आहात की तुम्हाला यातून काही लपवायचंय असा प्रश्‍न कुणालाही पडेल. लोकाच्या मनात अशा शंका याव्यात इतपत तुमच्या भूमिका चुकल्यात.
 
या प्रकरणात अशा सगळ्या घडामोडी घडत असतील आणि  गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काहीच कळत नसेल तर त्यांना चांगल्या सल्लागाराची गरज आहे. ‘तुम्ही लवकर तपास पूर्ण केला नाही तर हे प्रकरण सीबीआयकडं जाऊ शकतं’, हे या दोघांना कुणी सांगायची गरज होती का? जर मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासाचे निष्कर्ष दिले असते तर सीबीआयला फारतर फेरतपासाची मागणी करावी लागली असती. तसं झालं असतं तर किमान आपल्या राज्य सरकारचा आणि मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा दिसला असता. 

रिया चकवर्ती ही सुशांतसिंहची प्रेयसी होती. आठ जूनला ती त्याला सोडून गेली. तिच्या संदर्भातल्या घटनाही आपण लक्षात घ्यायला हव्यात. सुरूवातीपासून ती या प्रकरणात स्वतःला प्रकाशझोतात ठेवायच्या प्रयत्नात होती. राजदीप सरदेसाई यांनी तिची मुलाखत घेतल्यावर सांगितलं की या वर्षातली ही सर्वाधिक प्रक्षोभक आणि गाजलेली मुलाखत आहे. रियाचे वकील सतीश माने शिंदे हे इतरवेळी कुणाच्या केसेस चालवतात? शिवसेनेच्या आणि शिवसैनिकाच्या सर्वाधिक केसेस घेणारे वकील म्हणून त्यांची ख्याती आहे का? कोणत्या केसेस कुणी घ्याव्यात हा ज्यांचा त्यांचा प्रश्‍न असला तरी अशा प्रकरणामुळं अनेकांच्या मनात अनेक शंका उपस्थित होतात. 

रियाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून काही प्रयत्न सुरू होते का? मुख्यमंत्र्यांना या प्रकरणातली कायदेशीर बाजू कळत नाहीये का? या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा असलेले पार्थ पवार अचानक पुढं आले आणि त्यांनी हे प्रकरण सीबीबायकडं देण्याची मागणी केली. या मागणीनंतर पवार कुटुंबातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. आपल्या नातवाला जाहीरपणे फटकारण्याची वेळ पवारांवर आली. त्यांचा हा आक्रस्ताळेपणा काय सिद्ध करतो? स्वतःच्याच नातवावर पवार असे जाहीरपणे का चिडले? हे प्रकरण सीबीबायकडं जाऊ नये असं त्यांना का वाटत होतं? त्यानंतर मात्र त्यांनी अगदी नरेंद्र दाभोलकरांच्याही खुनाची आठवण काढत सीबीआयवर शंका का उपस्थित केली? या सगळ्या प्रकरणात कुणाला वाचवायचा प्रयत्न आहे की फक्त शिवसेनेला ‘टार्गेट’ करायचं आहे?

गृहखातं कसं चालवलं जातं याचा सर्वोत्कृष्ट अनुभव स्वतः शरद पवार यांना आहे. त्यांचं कामकाज कसं चालवलं पाहिजे याचा चांगला अभ्यास असणारे जयंत पाटील यांच्यासारखे कार्यकुशल नेते राष्ट्रवादीसोबत आहेत. इतर अनेक प्रकरणांचा विचार करता अनिल देशमुख यांचीही गृहखात्यावर बर्‍यापैकी पकड आहे असं गेल्या काही महिन्यात दिसून आलंय. असं सगळं असताना गृहखातं बेजबाबदारपणे वागलं की शिवसेनेला ‘एक्सपोज’ करण्याचं भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचं हे कारस्थान आहे? मुख्यमंत्री नेमकं कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते? मुंबई पोलीस नेमकं कुणाला संरक्षण देत होते? यातून कुणाला वाचवायचं होतं?
 
जिथं जिथं निर्णय क्षमतेचा आणि निर्णय प्रक्रियेचा विषय येतोय तिथं तिथं शिवसेना कमी पडतेय असंच चित्र आहे. मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस एकटेच वाटेल तसे निर्णय घेत होते आणि त्याची वाटेल तशी अंमलबजावणीही करत होते. सत्तेत सहभागी असूनही शिवसेना त्यात कुठंच नव्हती. त्यामुळं निर्णय कसे घ्यायचे आणि ते कसे राबवायचे हे अजून त्यांना कळत नाही असंच एकंदरीत चित्र आहे. प्रत्येक विषय हा शिवसेना विरोधकांच्या हातात देतेय. कॉंग्रेसचाही सध्याच्या सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत कुठंच सहभाग दिसत नाही. आपापली खाती सांभाळत ते गपगुमान बसलेत. उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांची प्रशासनावरची पकड जबरदस्त आहे. मात्र या मंत्रीमंडळात त्यांचा चेहरा कुठंच दिसत नाही. मंत्रीपद उपभोगताना शांत राहून शक्य तिथं देवेंद्र फडणवीसांना मदत करण्याचा त्यांचा उद्देश तर नाही ना? अशी शंका घ्यायलाही मोठा वाव आहे.
 
हे सगळे पैलू सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याच्या हत्या किंवा आत्महत्येमुळं लोकासमोर आलेत. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला अजूनही वाटतं की मुंबई पोलीस हे जगातलं सर्वाधिक कार्यक्षम पोलीस खातं आहे. बिहारमधल्या पाटण्यात एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) दाखल झाली तरी तो तपास मुंबई पोलिसांकडं न देता तो सीबीआयकडं देणं हा इथल्या सामान्य माणसाला स्वतःचा अपमान वाटतो. जर सामान्य माणसाच्या मनात अशी अपमानाची भावना असेल तर याला जबाबदार घटक कोण आणि त्यांची जबाबदारी काय याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलीय. पक्षातला एखादा कार्यकर्ता चुकीचा वागला असता तर शरद पवारांनी एव्हाना त्याची हाकालपट्टी केली असती. ‘माझा नातु अपरिपक्व आहे, मी त्याला काडीचीही किंमत देत नाही’ असं म्हणत हा विषय गुंडाळणं, तो संपवणं हे काही खरं नाही. उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यावर पार्थ पवार ट्विट करतो की, ‘सत्यमेव जयते!’ म्हणजे यात नेमकं काय दडलंय? सुशांतसिंह प्रकरण बाजूला ठेवलं तरी यातून आघाडी सरकारमधील तिघाडीचे आणि पवार कुटुंबातलेही मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
 
मुख्यमंत्र्यांचा स्वतःच्या पक्षातील नेत्यांशी आणि त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी संवाद किती आहे हे कळायला मार्ग नाही. प्रशासनावर मात्र त्यांची अजिबातच पकड दिसत नाही. संजय राऊत हे काय महाराष्ट्र सरकारचे ‘प्रवक्ते’ आहेत काय? अनेक प्रकरणात तेच भूमिका मांडत असतात आणि चर्चेत असतात. संजय राऊत यांचं तोंड आधी बंद करायला हवं हे सुशांतसिंह प्रकरणामुळं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येत नाही का? या माणसानं सुशांतसिंह रजपूत आणि त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नाहीत हे जाहीरपणे सांगितलं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करू म्हटलं की ते लगेच माफी मागायला तयार झाले. सुशांतसिंहचे आणि त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नाहीत हे सातत्यानं कोण सांगत होतं? रिया चक्रवर्ती हे सतत सांगत होती! म्हणजे रियाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरूवातीपासून चालू होता का? याचं उत्तर शिवसनेनं दिलं पाहिजे.

रिया चक्रवर्तीचा कॉंग्रेसशी संबंध दिसत नाही. तिचा राष्ट्रवादीशी आणि राष्ट्रवादीतल्या कुठल्या व्यक्तिशीही संबंध दिसत नाही. ती शिवसेनेशी आणि सेनेतील नेत्याशी मात्र संबंधित दिसतेय. ती जी माहिती सांगतेय नेमकं तेच आणि तसंच संजय राऊत बोलतात. तिची बाजू घेणारे जे वकील आहेत ते शिवसेनेच्या केसेस चालवणारे वकील आहेत. या सगळ्या गोष्टी काय सांगतात? तुम्हाला काही लपवायचंय का? जर तुमचा या प्रकरणात काही संबंध नाही तर या अशा संशयास्पद भूमिका का घेतल्या जाताहेत? आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून जाहीर केलं की ‘माझा या प्रकरणात काही संबंध नाही आणि माझ्या घराण्याला काळीमा फासला जाईल असं कुठलंही कृत्य मी करणार नाही...’ 

या प्रकरणात आदित्य ठाकरेंना असं जाहीर करावं लागणं इतका संशयास्पद तपास केलाच कशासाठी? एवढा संशय निर्माण होईल अशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा यांच्याकडून का हाताळली गेली? एवढी चर्चा व्हावी, कुजबूज मोहिमेनं जोर धरावा अशी संधी विरोधकांना कोणी आणि का दिली? आपण आता मुंबई महानगरपालिका चालवत नाही याचंही भान उद्धव ठाकरे यांना राहिलेलं दिसत नाही. अधूनमधून ‘मराठी माणसावर अन्याय होतोय’ असं ओरडलं की बाकी सगळे नेहमी गप्प बसतात. मग पालिकेचं प्रशासन हवं तसं हाकता येतं. महाराष्ट्रासारखं राज्य चालवताना अशा भूमिका चालत नाहीत. सरकार चालवताना योग्य ती निर्णयक्षमता दाखवावीच लागते. राष्ट्रवादीच्या ताब्यातलं गृहखातं शिवसेनेची ही गंमत बघत राहतं का? ही गंमत बघत बसण्यात अजित पवार यांचाही हात होता की थोरल्या साहेबांचीच ही भूमिका आहे? गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणात इतके निष्क्रिय कोणामुळं राहिले? 

शेवटी महाभारत होतं. शेवटी यादवी होते. मराठेशाहीला तो  खूप मोठा शापच आहे. ‘माझा नातू अपरिपक्व आहे आणि त्याला काडीचीही किंमत देत नाही’ हे शरद पवारांनी जाहीर करणं ही या यादवीची नांदी आहे. घराण्यातलं युद्ध, घराण्यातले वाद, घराण्यातले संघर्ष कधीही संपत नाहीत. ठाकरे कुटुंबाप्रमाणेच पवार कुटुंबही त्याला अपवाद नाही हे यातून दिसून आलं. व्यंकोजींचा त्रासही छत्रपती शिवाजीराजांना सहन करावा लागला आणि ‘काका मला वाचवा’ म्हणत पळत येणार्‍या नारायणरावांना सुद्धा राघोबादादांनी मारलं.
 
सुशांतसिंहच्या मृत्युमुळं महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं गेलं हे दिसून आलं. कॉंग्रेसला सध्या कशाशीस काही देणंघेणं नाही. सगळीकडून हद्दपार होत असताना नशिबानं मिळालेली सत्ता त्यांना उपभोगायची आहे. एका बाजूला राष्ट्रवादीची संशयास्पद भूमिका आणि दुसरीकडं शिवसेनेची चाललेली केविलवाणी धडपड असा हा प्रकार आहे. सुशांतसिंहच्या मृत्युनंतर सुरूवातीला कोणीही शंका उपस्थित केल्या नाहीत. शिवसेनेला किंवा आदित्य ठाकरे यांना दोषारोपही कोणी दिले नाहीत. मात्र मुंबई पोलिसांचा तपासच संपेना आणि त्यातून काहीच निष्कर्ष पुढे येईनात त्यावेळी मात्र अनेकांनी शंका घेणं सुरू केलं. या प्रकरणात नेमकं काय घडलं हे मुंबई पोलिसांनी अजूनही पुढं येऊन सांगायला हवं असं महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या, वाडी-वस्तीवरच्या तरूणांना वाटतं. नियमित समाजमाध्यमावर वावर असलेल्या या तरूणाईनं सर्वांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलंय. जे मुंबई पोलिसांची बाजू घेऊन सीबीआयला विरोध करतात त्यांनी मुंबई पोलीस या प्रकरणाबाबत किती कार्यक्षम आणि गंभीर होते याचा जाब विचारण्याची वेळ आलीय.

या प्रकरणात कोणाकोणाचे जबाब घेतले? त्यांनी काय माहिती दिली? त्याचे कोणते निष्कर्ष आले? सुशांतसिंहच्या शवविच्छेदनाच्या अहवालातून नेमक्या कोणत्या गोष्टी पुढं आल्या? जर सुशांतसिंहचं प्रेत शवविच्छेदनासाठी नेलं होतं तर तिथपर्यंत रिया चक्रवर्ती नेमकी पोहोचली कशी? मृत्युपूर्वी तीन दिवस आधी सुशांतसिंह गांजा ओढत होता तर त्याला गांजा कोणी उपलब्ध करून दिला? मुंबईत जर कायद्याचं राज्य आहे तर हा गांजा कुणामार्फत त्याच्यापर्यंत गेला? राम कदम यांच्यासारखा भाजपचा आमदार सांगतो की, ‘फिल्म इंड्रस्टित सररासपणे सगळ्यांना गांजा मिळतो...’ मग या विधानाच्या आधारे राम कदम यांची काही चौकशी झालीय का? ही माहिती त्यांना कोणत्या सूत्राकडून मिळाली हे कळणं गरजेचं आहे. मुंबईत अधिकृत गांजा मिळतो म्हणजे काय? 

अनेकांसाठी या प्रकरणात सुशांतसिंह राजपूतचं चारित्र्य महत्त्वाचं नाही. त्यानं आत्महत्या केली की त्याचा खून झाला हेही कित्येकांना महत्त्वाचं वाटत नाही. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी सुरूवातीपासून या प्रकरणाबाबत आदित्य ठाकरे यांच्याकडं बोट दाखवलं. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असलेल्या अमृताजींनी या प्रकरणात ट्विट केलं. फडणवीस असं म्हणतात की ‘आम्ही शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचं नाव या प्रकरणात घेतलं नाही.’ तुम्ही भले कुणाचंही नाव घेतलं नाही पण तुम्ही तुमच्या वक्तव्यातून काय सुचित करत होतात? या सगळ्यांना असं बोलण्याची, शंका उपस्थित करण्याची संधी कोणी दिली? ती संधी अर्थातच शिवसेनेनं दिली.
 
उद्धवजी, विदर्भातून-मराठवाड्यातून, खान्देशातून आलेल्या लोकाना दिवसभर मातोश्रीवर बसवून ठेवणं म्हणजे राज्याचं सुप्रशासन चालवणं नव्हे. कोणत्या मतदारसंघातून कोणाला तिकिट द्यायचं हे जाहीर करण्यात वेळ घालवणं ही शिवसेनेची परंपरा असेल. राज्याचा कारभार चालवताना मात्र निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी प्रसंगी किंमतही मोजावी लागते. सुशांतसिंह प्रकरणात संशयाची सुई शिवसेनेकडं गेल्यानं पक्षाचं किती नुकसान झालंय? कोण कोण वाटेल तशा टपल्या मारून जातंय? याचा विचार मुख्यमंत्र्यांनी कान आणि डोळे उघडे ठेवून केला पाहिजे. संजय राऊत हे राज्याचे प्रवक्ते असल्याप्रमाणं बडबडत राहिले तर अवघड आहे. सत्तास्थापनेच्या वेळी राऊत तिन्ही पक्षांशी बोलत होते आणि म्हणून ते आपल्यासाठी खूप शुभशकुनी आहेत म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी पुढं करण्याची गरज नाही.

प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जर संजय राऊत किंवा शिवसेना रिया चक्रवर्तीला पाठिशी घालत असतील तर ते नेमके कशासाठी? हेही इथल्या सामान्य जनतेना कळलं पाहिजे. नारायण राणे किंवा त्यांचे पुत्र जर नावं घेऊन सांगत असतील की सुशांतसिंह राजपूतची हत्या झालीय तर राणेंना चौकशीला बोलावलं का? ही माहिती त्यांना कुठून मिळाली हे जाणून घ्या. तसं झालं तर राजकीय नेतेही सवंग लोकप्रियतेसाठी असे वाटेल ते आरोप करणार नाहीत, चुकीची विधानं करणार नाहीत

प्रशासन कसं राबवायचं? विरोधकांच्या फायली कशा तयार करायच्या? आणि त्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं? हे या देशात दोनच नेत्यांनी आजवर दाखवून दिलंय. पहिल्या इंदिरा गांधी आणि दुसरे अमित शहा! त्यांच्याकडून उद्धव ठाकरे यांनी काही बोध घेतल्यास असे प्रसंग उद्भवणार नाहीत. 
-घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक,’ पुणे
7057292092

Saturday, July 18, 2020

कृतघ्न नव्हे कृतज्ञच!

प्रसन्न जोशी यांच्यासारखा निवेदक आपल्या ब्लॉगवरील लेख वाचून प्रतिक्रिया देतो, त्या विषयावरील ‘एबीपी माझा’सारख्या वाहिनीवर चर्चेला निमंत्रण देतो, चर्चेतही आपल्या लेखाचा गौरवानं उल्लेख करतो, आपल्या काही फेसबुक पोस्ट लाईक करतो, काहीवर मतेही मांडतो हे सगळंच सुखावणारं. त्याचं कारण म्हणजे रोज विविध विषयांवर चर्चा घेणार्‍या निवेदकाचा त्या त्या विषयातला गरजेपुरता अभ्यास असेल, नवनवीन लोकाशी वेगवेगळ्या विषयावर बोलून थोडं फार ज्ञान आलेलं असेल, स्वतःला ‘अपडेट’ ठेवण्यासाठी त्याचं अवांतर वाचन, चिंतन आणि मनन असेल असं मला वाटतं. खरंतर वाहिन्यांवरील झळकणारे असे अनेक निवेदक याला अपवादही ठरतात. 

त्यांची भाषा, शब्दांचे उच्चार, त्यांचा उद्धटपणा, त्यांचं अघोर अज्ञान हेही वेळोवेळी उघडं पडत असतं. तरीही प्रसन्न जोशी यांच्यासारखे निवेदक जाणीवपूर्वक स्वतःचं वेगळेपण जपतात. काहीवेळा ‘आपण कसे खरे पुरोगामी आहोत?’ हे दाखवण्यासाठी विदेशात जाऊन गोमांस भक्षण करतानाचे फोटोही समाजमाध्यमांवर अभिमानानं टाकतात. ‘हे त्यांचं वैयक्तिक आयुष्य’ म्हणून आमच्यासारखे मित्र तिकडं दुर्लक्ष करतात मात्र त्यातून त्यांच्याविषयीचं ‘समाजमत’ बनत जातं.

तर या प्रसन्न जोशी यांचे आज मी आभार मानतो. आजच्या विषयावर त्यांनी मला लिहायला प्रवृत्त केलं. खरंतर हा विषय अनेकांच्या मनात असेल मात्र त्यावर यथायोग्य चर्चा होत नाही.

औरंगाबाद येथील माझे मित्र सुशील कुलकर्णी यांनी त्यांच्या यू ट्यूब चॅनलवर आज माझ्या आणि अर्थातच ‘चपराक’च्या कामगिरीविषयी एक व्हिडिओ पोस्ट केला. ‘पाटील, लई भारी करूलालाव’ अशा मराठवाडी शीर्षकाच्या या व्हिडिओत ‘चपराक’च्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कामाविषयी आणि माझ्या पुस्तकाविषयी सुशील कुलकर्णी यांनी त्यांच्या खास शैलीत दखल घेतली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी आणि स्वामी गोविंददेव गिरीमहाराज यांचीही मतं त्यात त्यांनी प्रसारित केलीत. जेमतेम पाच मिनिटाच्या या व्हिडिओत माझा स्वतःचा एकही शब्द नाही. मराठवाड्यातला एक मुलगा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुण्यात येतो, आपली वेगळी ओळख निर्माण करतो म्हणून सुशील कुलकर्णी यांनी अभिमान व्यक्त केलाय. पुण्याच्या पत्रकारितेत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल वीस वर्षे काम करत असताना आजोळच्या माणसांनी माझी घेतलेली ही पहिलीच दखल आहे. त्यामुळं माझ्यासाठी हा अभिमानाचा विषय आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर सामायिक केला.

त्याखाली प्रसन्न जोशी यांनी जे मत माडलं ते असं - 

‘‘पुण्या-मुंबईचं एक दुःख आहे. इथे बाहेरून आलेले आणि मोठे झालेले स्वतःला पुणेकर मानत नाहीत. ज्या शहरांमध्ये स्थान मिळवलं, मोठे झालो त्यावर दुगाण्या झाडायच्या, आपली मुलं-मुली इथंच मोठी होणार मात्र तरीही नाळ वगैरे (मूर्खपणा) आमचे आम्ही सोडून आलेल्या गावाशीच राहणार, याला मी तरी कृतघ्नपणा म्हणतो.’’

मगाशी निवेदकाचे जे दोन प्रकार सांगितले त्यात प्रसन्न जोशी ‘अभ्यासू’ या कॅटेगिरीतले असावेत असा निदान माझा समज आहे. त्यामुळं त्यांना वैयक्तिकरित्या मी सभ्यपणे उत्तर दिलं. या सभ्यपणावरही त्यांनी ‘असभ्यपणे’ काही प्रश्न उपस्थित केले. जोशी म्हणतात, 

‘‘तुम्ही पुण्याबद्दल एका शब्दाने कृतज्ञता व्यक्त करावी, तुम्ही उलट तुमचे कसे हाल झाले, लातूरचे पाटील वगैरे म्हणवून घेताय... पुण्याने असा काय अन्याय केला? असं काय पुण्यात वाईट घडतं? मी बाहेरून आलो, तुम्ही बाहेरून आलात, तुम्हाला त्या पोस्टवाल्यांना असं का सांगावं वाटलं नाही की बाबा रे, पुण्याने मला मोठे केले, संजय सोनवणीसारखे मित्र दिले...’’

प्रसन्न जोशी मद्यपान करत नसावेत. केले तरी मद्यपान केल्यावर माझ्यासारख्या प्रकाशकांवर असे बेताल आरोप करत नसावेत. 

ते म्हणतात त्याप्रमाणं मी पुणे शहराविषयी काहीही चुकीचं वक्तव्य कधीही केलं नाही. माझे कसे हाल झाले हेही सांगितलं नाही. उलट पुण्याविषयी कायम कृतज्ञताच व्यक्त केलीय. जोशींनी निवेदकाबरोबरच आपण ‘पत्रकार’ही आहोत याचं भान ठेवलं तर त्यांना त्याबाबतचे माझे अनेक लेख, व्हिडिओ, बातम्या सापडतील. ते म्हणतात त्याप्रमाणे मी या शहराला कधीही दुगाण्या झाडल्या नाहीत. स्वप्नातही तसा विचार कधी आला नाही. किंबहुना तितकं  धाडस कुणातच नाही आणि ते असूही नये. ‘आपली मुलं-मुली इथंच मोठी होणार’ या वाक्याशीही माझ्यासारख्या ब्रह्मचार्‍याला काही देणंघेणं नाही. गावाविषयी नाळ असणं हा त्यांना कृतघ्नपणा वाटतोय. ही मात्र गंभीर बाब आहे.

आपल्या कर्मभूमीविषयी प्रत्येकाच्या मनात अभिमान असतो. तो असायलाच हवा. मात्र जन्मभूमीशी जोडून असलेली नाळ म्हणजे ‘कृतघ्नपणा’ वाटत असेल तर प्रसन्न जोशी यांच्यासारख्या लोकामुळे आजची पत्रकारिता तिरडीवर झोपलीय असे म्हणायला हरकत नाही. आजही ‘गांधींचा गुजरात’ हे सांगताना गुजरात्यांना अभिमान वाटतो. रत्नागिरीकरांना टिळकांचा तर भगूर-नाशिकवासीयांना सावरकरांचा अभिमान वाटतो. विदेशात कोणी भारतीय भेटला तरी किती कौतुक वाटतं. त्यातही तो ‘महाराष्ट्रीयन’ असेल तर आणखीनच अभिमान वाटतो. त्यात त्या देशाला, प्रदेशाला, शहराला, गावाला कमी लेखण्याची भावना नसते. जिथं आपला जन्म झालाय त्या प्रदेशाविषयी नाळ जोडलेली असते. काही भावनिक ऋणानुबंध असतात. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखा नेता सिंध प्रांताविषयी, लाहोरविषयी बोलताना अजूनही भावूक होतो कारण त्यामागे त्यांच्या असंख्य आठवणी असतात. आपल्या आजोळच्या आठवणी निघाल्या की अजूनही आपण शहारतो. काही सुखद प्रसंग आठवले की रोमांच उभे राहतात. आपलं जन्मगाव असेल, आपल्या कुलदैवतेचं ठिकाण असेल, आपली शाळा असेल त्याविषयी बहुतेकांच्या मनात श्रद्धा असते, जिव्हाळा असतो, आपलेपणा असतो. माणूस कितीही लहान किंवा कितीही मोठा असला तरी त्याच्या मनात हे हळवे कप्पे असतात. त्यात गैर ते काय? तो ‘कृतघ्नपणा’ कसा बरं ठरेल?
  
प्रसन्न जोशी म्हणतात, कुलकर्णींनी माझ्यावर व्हिडिओ करताना पुण्याला दूषणं दिलीत. असं काय म्हणतात बरं सुशील कुलकर्णी की प्रसन्न यांच्या तळपायाची आग मस्तकात जावी. कुलकर्णी म्हणतात, 

‘पुण्यात मराठवाड्यातली माणसं टिकत नाहीत, त्यांच्या ‘काय करलालाव, आल्ताव का, गेल्ताव का’ अशा भाषेमुळं त्यांना स्वीकारलं जात नाही. असं सगळं असताना घनश्याम पाटील यांच्यासारखा एक तरूण या शहरात येतो आणि साहित्याच्या प्रांतात आपली मोहोर उमटवतो हे आम्हा मराठवाड्यातील लोकासाठी अभिमानास्पद आहे.’

यात गैर वाटण्यासारखं काय? पुण्यात वावरताना आम्हाला भाषेची अडचण येतेच. ती प्रयत्नपूर्वक आत्मसात करणं आणि टिकून राहणं हे खरंच जिकिरीचं काम आहे. सुशील कुलकर्णी यांनी यात कुठंही पुणेकरांना दोष दिला नाही. उलट या सांस्कृतिक नगरीत वावरताना ‘समृद्ध’ता जपावी लागते अन्यथा निभाव लागत नाही हेच तर सुचित केलंय.

मी ‘लातुरचा पाटील’ वगैरे म्हणवून घेतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. माझा जन्म कुठे व्हावा हे माझ्या हातात तर नक्कीच नाही. मी जर लातूरमध्ये जन्मलोय तर सुशील कुलकर्णी यांनी मला ‘इराकमधला बगदादचा पाटील’ म्हणावं काय? ‘पुण्यात वाईटच घडतं’ असं मी म्हणाल्याचा शोध जोशींनी कसा आणि कुठं लावला? 

पुण्यात राहणार्‍या पंढरपूरच्या माणसाला आषाढीच्या दिवशी तिथलं वातावरण आठवतं. तापी नदी भरून वाहतेय म्हटलं की पुण्यातला खान्देशी माणूस खूश होतो. उन्हाळ्याच्या दिवसात पुण्यातील वैदर्भीय माणूस ‘आमच्याकडं हे उन काहीच नाही’ असं सहजपणे सांगून जातो. पुण्यातला माणूस मुंबईत असेल तर ‘आमच्या पुण्यात लोकलची अशी गर्दी नाही’ हे कितीदा तरी सांगतो. हे असं सांगताना तो ज्या शहरात राहतोय त्याला कमीपणा आणण्याचा त्याचा उद्देश नक्कीच नसतो.

प्रसन्न जोशी यांना ‘आजोेळ’चं प्रेम मिळालं नाही की संजय सोनवणी यांच्यासारख्या विचारवंताशी असलेली माझी मैत्री खुपतेय हे कळायला मार्ग नाही. प्रसन्नजी, पुण्यानं मला फक्त सोनवणी यांच्यासारखेच मित्र दिले नाहीत तर तुमचे संपादक राजीवजी खांडेकर यांच्यासारखे वाचकही दिलेत. परवाच खांडेकर सरांनी मला फोन करून सांगितलं की, ‘‘गेल्या कित्येक वर्षात मी तुमच्या ‘दरवळ’सारखं सुंदर पुस्तक वाचलं नाही. आजवर तुमच्याविषयी कौतुक वाटत होतं पण आता आदर वाटतोय. माझ्या महाविद्यालयीन जीवनानंतर आज मी तुम्हाला चक्क पत्र लिहून माझ्या भावना कळवल्यात. त्यातूनही रहावलं नाही म्हणून समक्ष फोनवर कळवतोय.’’ 

राजीव खांडेकर यांच्यासारख्या ‘इलेक्ट्रॉनिक’ माध्यमातील दिग्गजाच्या या प्रतिक्रिया माझ्यासारख्या ‘प्रिंट’मधील पत्रकाराच्या ‘मुद्रित’ माध्यमांवरील श्रद्धा वाढवणार्‍या आहेत. हे सगळं मला माझ्या पुण्यानंच दिलंय प्रसन्नजी. 

घरकोंडीच्या या काळात तुमच्यासारख्या पत्रकारांवर लोक जो राग व्यक्त करतात तो उघड्या डोळ्यानं बघा. ‘आजची महत्त्वाची ब्रेकिंग’ म्हणत तुमचे लोक भाषेचा जो खून पाडतात ते बघा. भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांचे व्हिडिओ पाहणारे प्रेक्षक कोटीच्या घरात जातात, माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराचे व्हिडिओ पाहणारे, लेख वाचणारे लाखोंच्या घरात जातात आणि दुसरीकडे अनेकजण घरातील वृत्तवाहिन्या बंद करत आहेत इकडं लक्ष द्या. एखाद्यानं एखाद्याची प्रेमानं दखल घेताना काय विधानं केलीत यावरून मतं मांडायला अभ्यास लागत नाही. त्यामुळं तुम्ही उपाशीही मरणार नाही पण ‘सावरकर खलनायक की नायक?’ अशी उथळ चर्चा घेतल्यावर तुमच्या जाहिरातीही थांबू शकतात, त्यावरून माफीही मागावी लागते आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षकही दुरावू शकतात. 

या निमित्तानं प्रत्येकानं आपल्या गावाविषयीचा अभिमान जरूर व्यक्त करावा, जिथं जिथं सद्गुणांचा स्फोट आहे तिथं तिथं उपस्थिती लावून त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि माध्यमातल्या उपटसुंभांनी थोडंसं आत्मचिंतन करावं इतकंच सांगावंसं वाटतं.
- घनश्याम पाटील
7057292092  

Monday, May 25, 2020

‘दरवळ’च्या निमित्ताने...

माझं ‘दरवळ’ हे चौथं पुस्तक घरकोंडीनंतर लगेचच प्रकाशित होतंय. मागच्या तीन दिवसात जवळपास दोन हजार प्रतींची पूर्वनोंदणी करून वाचकांनी माझ्यावर जो विश्‍वास दाखवलाय त्याबद्दल त्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. या पुस्तकाची आपण अजून पूर्वनोंदणी केली नसेल तर नक्की करा. त्यासाठी लिंक देतो -  https://shop.chaprak.com/product/darval/
माझ्या 7057292092 या क्रमांकावर फोन पे किंवा भीम ऍपनेही आपण पूर्वनोंदणी करू शकाल. या पुस्तकाचं मनोगत खास आपल्यासाठी देतोय. अवश्य वाचा. प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.

हे पुस्तक खरं तर मागच्याच वर्षी प्रकाशित करायचं होतं. त्यासाठीची सगळी तयारी केली. सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले सर म्हणाले होते, ‘‘मी सध्या कुणाच्याही पुस्तकाला प्रस्तावना लिहीत नाही. मात्र आजच्या काळात तुम्ही विविध विषयांवर धाडसी भूमिका घेऊन जे काम करता ते पाहता मला तुमच्या एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना लिहायची इच्छा आहे...’’

त्यांचे हे प्रोत्साहनाचे शब्द हाच माझ्यासाठी मोठा सन्मान होता. त्यामुळं मी माझे काही लेख एकत्र केले आणि त्यांच्याकडं पाठवून दिले.

त्यांना मी पाठवलेली संहिता मिळाली आणि चारच दिवसांनी त्यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘मी तुमचे सगळे लेख वाचले. हे सगळं वेगळ्याच धाटणीचं झालंय. त्यावर मी टिपण काढलंय. गंमत म्हणजे प्रकृती अस्वास्थ्यामुळं मला सलाईन लावलं होतं. माझा मुलगाच डॉक्टर असल्यानं त्यानं सांगितलं होतं की लेखन-वाचन पूर्ण बंद! पण मी त्याला सांगितलं की या पुस्तकाची प्रस्तावना मला लिहायचीच आहे. त्यामुळं हा एक अपवाद! मग माझ्या एका हाताला सलाईन होतं आणि दुसर्‍या हातात तुमचे हे लेख. हे सगळं वाचताना मला माझ्या वेदनांचाही विसर पडला. तुमचं हे पुस्तक मराठी साहित्यात इतिहास घडवणार!’’

सरांचे हे शब्द म्हणजे मोठा पुरस्कारच! त्यावर मी कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय काय बोलणार? एखादा प्रचंड संदर्भमूल्य असणारा शोधनिबंध सादर करावा त्याप्रमाणं सरांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिलीय. ही प्रस्तावना वाचून मलाच मी नव्यानं कळलो.

योगायोगानं त्या वेळी ‘चपराक’च्या दिवाळी अंकाचं काम सुरू होतं. मग ही प्रस्तावना दिवाळी अंकात प्रकाशित केली. त्यानंतर या पुस्तकाची मागणी करणारे असंख्य फोन सुरू झाले. दिवाळी अंकासोबत आम्ही काही लेखकांची दर्जेदार पुस्तकं प्रकाशित केली. त्या पुस्तकांचं वितरण आणि नवे काही प्रकल्प यात दोन-अडीच महिने गेले. दरम्यान आमच्या परिवाराचे सदस्य, सुप्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांनी ‘दरवळ’चं मनोहारी मुखपृष्ठ साकारलं होतं. आता पुस्तक छपाईला द्यावं असा विचार करत होतो तर राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाच्या एका पदाधिकार्‍यानं मी आणि भाऊ तोरसेकर अशा दोघांविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्यात ‘ठाकरे सरकार उलथवून लावण्याचा प्रयत्न’ आणि ‘शरद पवार यांच्या हत्येचा कट’ असे गंभीर आणि धादांत खोटे आरोप करण्यात आले होते. 

मी आणि भाऊ विविध वृत्तपत्रांतून सातत्यानं जे लेखन करतोय, भाषणं करतोय, व्याख्यानं देतोय, वृत्तवाहिन्यांवरून, यूट्युब चॅनेलवरून बोलतोय त्यामुळं ठाकरे आणि पवार यांच्याविरूद्ध जनमत तयार होत असून त्यातले काहीजण त्यांच्या हत्येचा कट करतील, असा त्यांचा अंदाज होता. त्यावरून आमच्याविरूद्ध तक्रारी देण्यात आल्या. 

या हास्यास्पद प्रकारातून बाहेर पडून पुन्हा पुस्तकाची तयारी केली. मांडणीसह सगळं छपाईसाठी सज्ज होतं आणि करोनामुळं घरकोंडी सुरू झाली. मग मात्र सगळंच बंद! घराच्या बाहेर पडणंही कठीण होतं. मी ‘चपराक’च्या कोथरूड येथील मुख्य कार्यालयात स्वतःला बंदी करून घेतलं आणि इतर पुस्तकांची कामं उरकण्याचा धुमधडाका सुरू केला. किमान पुस्तकं तयार ठेवावीत, म्हणजे घरकोंडी नंतर ती छपाईला देता येतील असा मानस होता. 

त्याचवेळी दिवाळी अंकातील भोसले सरांची प्रस्तावना वाचून एका वाचकाचा फोन आला. त्यांनी सांगितलं, ‘‘तुमचं ‘दरवळ’ मला हवंय म्हणजे हवंय!’’ 

मी त्यांना सांगत होतो की ‘‘त्याची अजून छपाई पूर्ण झाली नाही. घरकोंडीनंतर होईल, मी तुम्हाला कळवतो.’’ 

...पण ते काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. ते म्हणाले, ‘‘हे पुस्तक वाचल्याशिवाय मी मरणार नाही. त्यामुळं माझी किमान पूर्वनोंदणी घ्या...’’ 

त्यांच्या सल्ल्यानुसार गंमत म्हणून ‘चपराक’च्या संकेतस्थळावरून ‘दरवळ’ची पूर्वनोंदणी सुरू केली आणि चमत्कारच घडला. पहिल्या दिवशी या पुस्तकाच्या 489 प्रतींची नोंदणी झाली. घरकोंडीमुळं सगळीच अनिश्चितता असताना आणि हे पुस्तक कधी प्रकाशित होईल हे माहीत नसूनही वाचकांनी दाखवेला हा विश्वास अनमोल होता. त्यामुळं दुसर्‍या दिवशी मी भोसले सरांची प्रस्तावना आणि सुप्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांची पाठराखण माझ्या ब्लॉगवर प्रसारित केली. ते वाचून इतकी नोंदणी सुरू झाली की मी आश्चर्यचकितच झालो. तीन दिवसात या पुस्तकाच्या जवळपास दोन हजार प्रतींची पूर्वनोंदणी झाली. मराठी साहित्यातला कदाचित हा एक विक्रमच असेल. ‘हे पुस्तक कुणा म्हणजे कुणाला भेट मिळणार नाही, नंतर ग्रंथ विक्रेत्यांकडंही मिळेल याची खात्री नाही. या पुस्तकात तुम्हाला घनश्याम पाटील हसताना, नाचताना, गाताना आणि ओरडतानासुद्धा दिसेल’ असं मी जाहीर केलं होतं आणि माझ्यावर, माझ्या लेखनावर प्रेम करणार्‍या सर्वांनीच अक्षरशः झुंबड उडवली. आमच्या संकेतस्थळाचं ‘ट्रॅफिक’सुद्धा अक्षरशः ‘जाम’ झालं होतं. वाचकांचा हा प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो.

अनेक दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करत असतानाच मी सातत्यानं विविध वृत्तपत्रांसाठी, दिवाळी अंकासाठी लेखन करतोय. त्यामुळं थोडाथोडका का असेना पण मी माझा स्वतंत्र वाचकवर्ग तयार करण्यात यशस्वी ठरलोय. सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रावर सातत्यानं स्पष्ट आणि परखड भूमिका घेतल्यामुळं विविध घडामोडीनंतर असंख्य वाचकांचे सलग फोन येतात की ‘या विषयावरील तुमच्या भूमिकेची उत्सुकता आहे.’ 

मी लिहिल्यानंतर किंवा बोलल्यानंतर यातील बहुसंख्यजण प्रतिक्रियाही कळवतात. म्हणूनच माझ्या या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व दोन हजार प्रतींची नोंदणी करून घेण्यात मी यशस्वी ठरलो. त्या सर्वांच्या मी कायम ऋणात आहे. 

यापूर्वी माझी ‘दखलपात्र’ व ‘झुळूक आणि झळा’ ही अग्रलेखांची दोन पुस्तकं प्रकाशित झालीत. ‘अक्षर ऐवज’ हे समीक्षा लेखांचं पुस्तक झालं. या तीनही पुस्तकांना उत्तम वाचकप्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन्ही अग्रलेखसंग्रहांची भाषा आक्रमक होती. ‘दरवळ’मधील हे लेख मात्र अन्य ठिकाणी प्रकाशित झाले आहेत. स्वतः संपादक असताना इतरत्र दिलेलं लेखन दर्जेदारच असावं असा एक नैतिक धाक असतो. त्यामुळं शक्य तितक्या साध्या-सोप्या भाषेत हे सारं मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. वैचारिक भूमिका घेताना ती किचकट शैलीत मांडली तर ठराविक वाचकवर्ग सोडून ते फारसं कोणी वाचत नाही आणि गंभीरपणेही घेत नाही असा माझा प्रकाशक म्हणून अनुभव आहे. त्यामुळं क्लिष्टता टाळणं हा माझ्या लेखणीचा सवयीचा भागच झालाय. 

या पुस्तकातील पंचवीस लेख म्हणजे माझ्या मनाचा आरसा आहे. त्यातून उमटलेलं बरं-वाईट प्रतिबिंब वाचकांना कितपत भावतं हे नंतर येणार्‍या तुमच्या प्रतिसादावरून कळेल. ‘राजकीय भाष्यकार’ अशी माझी ओळख असली तरी या पुस्तकात वैविध्यपूर्ण विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय. तो करताना कुठंही शब्दांची जुळवाजुळव केली नाही किंवा कुणाला काय वाटेल याचाही मुलाहिजा राखला नाही. सामान्य माणूस म्हणून विविध प्रश्‍नांकडं पाहताना जे काही मनात येईल ते प्रांजळपणे मांडलं आहे. त्यातले विचार कुणाला पटतील, कुणाला पटणार नाहीत. कुणाला ‘पटवण्या’साठी लेखणीचा वापर करण्याऐवजी माणूस म्हणून आतला जो काही हुंकार असेल तो व्यक्त करणं मला नेहमीच महत्त्वाचं वाटत आलंय. 

माझ्या प्रत्येक लेखाच्या पहिल्या वाचक या आमच्या समूहाच्या सदस्य शुभांगीताई गिरमे आहेत. साडेतीनशे लेखांतून या पंचवीस लेखांची निवड त्यांनीच केलीय. ‘चपराक’ परिवाराचे ज्येष्ठ सदस्य मोरेश्वर ब्रह्मेकाका आणि माझ्यावर निर्व्याज प्रेम करणारे अरूण कमळापूरकर यांनी या पुस्तकाचं मुद्रितशोधन केलंय. ‘योगीराज नागरी पतसंस्थे’चे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे सल्लागार ज्ञानेश्वरभाऊ तापकीर, सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री चंद्रलेखा बेलसरे, दिलीप कस्तुरेकाका अशा सर्वांचं वेळोवेळी मला मिळणारं प्रोत्साहन महत्त्वाचं आहे.

रविंद्र कामठे, माझा वर्गमित्र प्रमोद येवले, विनोद श्रावणजी पंचभाई, माधव गिर, दिनकर जोशी, प्रशांत आर्वे, सागर कळसाईत, सुनील जवंजाळ ही सगळी टीम माझ्यासोबत कायम भक्कमपणे उभी असते. साप्ताहिक आणि मासिकाचं काम, नवनवीन पुस्तकांचं सातत्यानं प्रकाशन, विविध कार्यक्रमांचं आयोजन, सततचा प्रवास या सगळ्यात या सर्वांची मिळणारी मोलाची साथ महत्त्वाची आहे. मुख्य म्हणजे माझ्या काही आक्रमक भूमिकांमुळं काही वादाचे प्रसंग उद्भवले तरी हे सर्वजण ठामपणे कायम माझ्या पाठिशी उभे असतात. म्हणूनच कोणतीही भूमिका घेताना मनात कसलाच किंतु-परंतु नसतो.

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे
माय बापाहुनी बहु मायावंत, करूं घातपात शत्रुहूनि

हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अभंग हीच माझी प्रेरणा आहे. त्यामुळं हा दरवळ प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं घ्यायचाय. चंदन झिजत राहतं तेव्हा त्याचा दरवळ सर्वत्र पसरतो. त्यामुळं मनाला जी प्रसन्नता लाभते ती विलोभनीय असते. तीच अनुभूती शब्दातून द्यायचा माझा प्रयत्न आहे.

जाताजाता माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी कवी दुष्यंत कुमार यांच्या एका गझलेचा आधार घेतो आणि थांबतो. 

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।
आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी,
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए। 
हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गॉंव में,
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए।
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

या पुस्तकाविषयी आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वांचे आभार.

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक आणि लेखक
7057292092

Friday, May 22, 2020

दरवळ वाचकांना सुगंधित करणारा


माझ्या ‘दरवळ’ या नव्या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी प्रस्तावना लिहिलीय. अवश्य वाचा. घरकोंडी संपल्यानंतर हे पुस्तक लगेचच हातात येत आहे. या पुस्तकाची पूर्वनोंदणी नक्की करा. या प्रस्तावनेसोबतच सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांनी केलेली पाठराखणही जोडतो आहे. 
- घनश्याम पाटील 

संवाद म्हणजे माणसाच्या रंगहीन व्यक्तिमत्त्वाला सुगंध देणारी सामाजिक देणगी आहे किंवा दुसर्‍या शब्दात बोलायचे झाले तर साद नसलेल्या माणसाच्या जीवनाला मिळालेला तो दागिना आहे, नव्हे ती देणगी आहे. ही देणगीही पुन्हा सप्तसुरांची असते. तृप्त करणारी असते. माणसाचं अस्तित्व, माणसाचं व्यक्तित्व, माणसाचं कर्तृत्व आणि माणसाचं वक्तृत्व संवादातून सिद्ध होते. संवादामध्ये समाजाच्या हृदयाला स्पर्श करता येतो. माणसं जोडणं किंवा माणसं ‘तोडणं’ हे केवळ संवादच करू शकतात. मग तो संवाद पुस्तकाच्या माध्यमातून झालेला असो किंवा दुसर्‍या एखाद्या कलेच्या द्वारे झालेला असो. त्यातही लेखक आणि वाचक हे एकाच पातळीवर येणे रसास्वादाच्या दृष्टिने आवश्यक असते. आपण त्या लेखकाचा ग्रंथ वाचत नसून त्याच्याशी आपण संवाद साधतो आहोत याचा एक अनामिक आनंद वाचकाला त्यातून लाभत असतो. त्यातही एखादा लेखक एकाचवेळी पत्रकार, संपादक, प्रकाशक असेल तर त्या दोहोंच्या संवादात अंतराय निर्माण होण्याची शक्यता असते. या दोघांमध्ये एक अदृश्य स्वरुपाची भिंत निर्माण झालेली असते. जागतिक राजकारणाचा सखोल आणि सर्वांगीण अभ्यास असलेल्या एखाद्या संपादकाने लिहिलेला व्यासंगपूर्ण लेख सर्वसामान्य वाचकांशी संवाद साधेलच असे नाही आणि तो संवाद त्याच्या रक्तामध्ये एकरूप होईल याविषयी देखील शंका वाटते. या पार्श्वभूमीवर श्री. घनश्याम पाटील यांचा ‘दरवळ’ हा ग्रंथ वाचकाच्या डोक्यावरून न जाता अंत:करणात झिरपतो आणि झिरपता झिरपता तो वाचकांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक बनतो हे विशेष म्हणावे लागेल. संवाद हा घटक वाचक आणि लेखक यांना जोडणारा, फुलांनी माखलेला आनंदमार्ग आहे असे मला मनापासून वाटते.

हा संवाद साधणारा ग्रंथ आणखी एका कारणाने वाचकांशी मैत्री करतो. ते कारण म्हणजे वाचकांबरोबर लेखकाने केलेला संवाद हा खाजगी स्वरूपाचा नाही अथवा कौटुंबिक अडीअडचणी सांगणारा नाही. ‘साहेबानं आज माझी चांगलीच खरडपट्टी केली’, ‘अंगणात वाळत घातलेला माझा टॉवेल कोणीतरी चोरून नेला’, ‘नव्या सेवेमुळे मिळणारे पैसे बायकोला मंगळसूत्रासाठी द्यावे लागतील’,  ‘नव्या फॅशनचे मंगळसूत्र मला द्या’ असा तिचा रोज धोशा असतो, ‘आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी काल तिने मला गार चहाच दिला’, ‘एका विवाहसोहळ्यामध्ये वेड्यासारखं जेवल्यामुळे दोन दिवस झाले पोटदुखीचा त्रास सुरु झाला’ अशाप्रकारचे तात्कालिक, निरर्थक संवाद या संग्रहात नाहीत. असले संवाद म्हणजे ईश्वराने दिलेल्या आयुष्यातील एक दिवस वाया घालवण्यासारखा असतो. याउलट या ग्रंथात समाजजीवनाला शुद्ध आणि श्रीमंत करणार्‍या गोष्टींवर विवेचन आहे. इथे सामाजिक दोषांवर भाष्य आहे. मूल्यांच्या झालेल्या पडझडीवर विवेचन आहे. चंगळवादाची शिकार बनलेल्या दिशाहीन समाजजीवनाचे दर्शन घडविले आहे. समाजात परंपरेने चालत आलेल्या आणि नव्याने निर्माण झालेल्या प्रथापरंपरांवर भाष्य आहे. 

समाजजीवनावर होणारे अत्याचार आणि तिची गुलामगिरी येथे लेखकाने पोटतिडकीने सांगितली आहे. आजच्या साहित्य व्यवहारातील गुण-अवगुण यांचा स्वानुभव त्यांनी सांगितला आहे. जाती-पातीचा राजकीय सत्तेसाठी केला जाणारा गैरवापर आणि आजच्या राजकारणाला आलेले स्वार्थी आणि विकृत स्वरूप आणि महापुरुषांकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन अशा जिव्हाळ्याच्या सार्वत्रिक बाबींबर लेखकाने संवाद साधलेला आहे. त्यामुळे हा संवाद एकाचवेळी तीन गोष्टी सांगतो. तो तुम्हाला माहिती सांगतो. तो तुमच्या ज्ञानात भर घालतो आणि तो तुम्हाला जगण्यासाठी लागणारे शहाणपणही देतो.  शहाणपण तुम्हाला जीवनातल्या अनुभवातून मिळते. रक्ताळलेल्या पावलांनी काटेरी वाटेवरून केलेल्या प्रवासातूनही मिळते.  संवादातून साधलेला हा आणखी एक फायदा म्हणावा लागेल.

या लेखकाने वाचकांशी केलेला हा संवाद आणखी एका गोष्टीतून अधिक प्रभावी नि परिणामकारक वाटला. ती गोष्ट म्हणजे लेखकाने स्वत:ची सांगितलेली जीवन-कहाणी. ज्याच्या घरात दारिद्य्राची श्रीमंती ओसंडून वाहते आहे,  ज्याच्याकडे पोट भरायला उपयोगी नसलेली जिराईत जमीन आहे, ज्यांचा भूतकाळ काळोखात लपलेला, ज्यांचा वर्तमान हा वंचना, विवेचना आणि भडकलेल्या भुकेने धगधगणारा आणि ज्याच्या माथ्यावर जन्मापासून मृत्युपर्यंत कर्जाने सोबत केलेली अशा घरातील मुलगा शाळा नावाच्या नक्षत्राकडे झेपावतो  ही खरोखर तशी अपवादात्मक गोष्ट आहे. हे शिक्षण घेतानासुद्धा त्याने म्हणजे घनश्याम पाटलांनी कष्ट केले; तेही अपवादात्मक म्हणावे लागतील. शाळेला जाता-येता त्यांनी आठ-दहा किलोमीटरची पायपीट केलेली आहे. पुढे शिक्षणासाठी त्यांनी वृत्तपत्रे वाटपाचे काम केले आहे. पुण्यात येऊन ‘संध्या’ दैनिकात अग्रलेख लिहिले. पडेल ती कामे केली. त्यांनी लिहिलेल्या लेखामुळे वाद-विवादही झाले आणि अशा अवस्थेत पायांना भूमीचा आधार आणि वरती आभाळाचे छत्र एवढ्या दोनच गोष्टी हक्काच्या असताना वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी संपादक, मालक, मुद्रक नि प्रकाशक म्हणून पुण्यामध्ये प्रारंभ केला, हे क्षणभर अतिशयोक्तीपूर्ण वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

जिद्द, ध्यास आणि परिश्रम या तीन गोष्टींचा सुरेख आविष्कार म्हणजे त्यांचे ‘चपराक’ म्हणावे लागेल. संकटे माणसाला मोठी करतात. दारिद्य्र माणसाला लढण्याची प्रेरणा देते आणि परिश्रम माणसासमोर यशोमंदिर उभे करते याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. खेड्यातील मुलांना ऊर्जा देणारे हे आत्मकथन आहे. या आत्मकथनातील संवादामुळे या ग्रंथाला अधिकच गोडी निर्माण झालेली आहे. या त्यांच्या लेखांमध्ये चिंतन आहे. अनुभवकथन आहे. समाज-निरीक्षण आहे. समाजाच्या विकृतीकरणाचे चित्रण आहे आणि समाजशिक्षणाची भूमिकाही एकरूप झालेली आहे. आजच्या दिशाहीन आणि गोंधळलेल्या समाजाचे समग्र दर्शन या ग्रंथातील अनेक लेखांतून आपणाला घडते. त्यातील काही बाबींचा थोडासा विस्ताराने परिचय व्हावा असे वाटते, म्हणून हे विवेचन.

काही अपवाद सोडले तर जवळजवळ सार्‍याच लेखांचा प्राणभूत घटक आहे परिपूर्ण आणि कृतार्थ जीवनाचा ध्यास! ही कृतार्थता व परिपूर्णता कशी प्राप्त होते त्याचेही लेखकाने विवेचन केलेले आहे. पाश्चात्य जीवनशैलीचे आंधळे अनुकरण आणि शरीरालाच सर्वस्व मानणारी चंगळवादी मनोवृत्ती यांचा समाजाने केलेला तृप्त अनुभव म्हणजे परिपूर्ण जीवन अशी धारणा झालेली आहे. पाश्चात्य जीवनशैली भौतिक सुखाला सर्वसुख मानते. आपली जीवनशैली या भौतिक सुखाला सात्त्विक वा आध्यात्मिक अधिष्ठान द्यायला सांगते. पाश्चात्य जीवनशैली शरीरसुखाला सर्वस्व मानते तर आपली जीवनशैली इंद्रियावर अंकुश ठेवायला सांगते. पाश्‍चात्य जीवनशैली देहसमाधानावर उभी आहे तर आपली जीवनशैली आत्मिक आनंदावर उभी आहे. पाश्चात्य जीवनशैली फक्त उद्याचा विचार करते तर आपली जीवनशैली युगाचा विचार करते. आपली जीवनपद्धती निसर्गाला चैतन्याचे प्रतीक मानते, तिची पूजा करते तर पाश्चात्य संस्कृती निसर्गाला स्वसुखाचे साधन मानते. पैसा टाकला की ती गोष्ट मिळते यावर पाश्चात्य जीवनशैली उभी आहे. आपली जीवनशैली नात्यांच्या रेशमी धाग्यांनी बांधलेली आहे. चौदा-सोळा वर्षे वयाच्या मुली, ज्यांचा ओठ पिळल्यावर दूध निघेल अशा मुली 50 हजारापासून विकल्या गेल्या अशी गेल्याच आठवड्यात बातमी आलेली होती. आंधळेपणा आणि प्रगतीची खोटी धारणा यामुळे इथला आमचा समाज, भौतिक सुखाने ‘सजला’ असला तरी आतून तो कुजत चालला आहे. 

जगणे म्हणजे सोन्याच्या ताटात अमृताचा घास खाणे नव्हे. अंगावर दहा पंधरा किलो सोने घालणे म्हणजे कृतार्थ जीवन नव्हे किंवा दोन कोटींच्या गाडीतून भटकणे म्हणजे कृतार्थ जीवन नव्हे. किंवा चार-सहा बेडरूमचा महाल असणे म्हणजे परिपूर्ण नि कृतार्थ जीवन नव्हे. ज्याचा श्वास दुसर्‍या गरिबांसाठी अस्वस्थ होतो, ज्याचा घास भुकेल्या जिवाच्या मुखात जातो, ज्याचे वस्त्र, वस्त्र नसलेल्या अनाथाच्या शरीरावर पांघरले जाते, ज्याचा ध्यास सत्तेपेक्षा सेवेकडे अधिक झुकलेला आहे अशा उपेक्षितांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणारा माणूस हा परिपूर्ण जीवन जगतो, कृतार्थ जीवन जगत असतो. यासाठीच श्रीमान पु. ल. देशपांडे यांनी एक मार्मिक विधान केलेलं आहे. ते म्हणतात, ‘‘फ्रेंच संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे, तर आपली संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती आहे.’’

स्वत: घनश्याम पाटलांनासुद्धा चिरंतन मूल्यांची होणारी उपेक्षा, जगण्याची हरवलेली दिशा, जीवनध्येयाचा एक असणारा निश्चित दृष्टिकोन, स्त्रीविषयक असणारी पारंपरिक जुनाट कल्पना, देशभक्तीचे बदललेले स्वरूप, समाजात जातीयतेचा केला जाणारा स्वार्थी वापर अशा बर्‍याच जिव्हाळ्याच्या विषयांवर त्यांनी वाचकांशी संवाद साधलेला आहे. राजकारणामधील तर सारी ‘आधुनिक’ सामर्थ्ये त्यांनी सोदाहरण सांगितली आहेत. आजचा राजकारणी पूर्वीच्या तत्त्वनिष्ठ राष्ट्रभक्ताच्या सावलीजवळही उभा राहू शकणार नाही असे मला वाटते. या अशा लहान-मोठ्या जीवनाला गिळून टाकणार्‍या किंवा नासवून टाकणार्‍या गोष्टींचा नि:पात कसा करायचा हा आजचा खरा प्रश्न आहे.

या निमित्ताने वरून ‘सुरूप’ असलेल्या पण आतून ‘कुरूप’ असणार्‍या समाजाच्या काही अपप्रवृत्ती मला सांगाव्याशा वाटतात. आपला समाज कितीही शिकला आणि सुधारला तरी त्याच्या अस्तित्वाला दंश करणार्‍या पाच गोष्टी आजही कमी झालेल्या नाहीत. या पाच गोष्टी म्हणजे 1) अहंकार, 2) अनाचार, 3) अत्याचार, 4) भ्रष्टाचार आणि पाचवी गोष्ट म्हणजे स्वार्थाचार! भ्रष्टाचार आणि स्वार्थाचार यात मी फरक करतो. एखाद्या शेतकर्‍याकडून सातबाराचा उतारा घेण्यासाठी जेव्हा एखादा तलाठी पाच-पन्नास रुपये घेतो तो स्वार्थाचार झाला पण एखाद्या बँकेला खोट्या कागदपत्रांधारे अधिकारी आणि राजकारणी-व्यापारी-उद्योजक चार-दोन हजार कोटींना फसवितात त्याला भ्रष्टाचार म्हणावा लागेल. हा भ्रष्टाचार अगदी महाभारतापासून चालत आलेला आहे. या पाच अवगुणांपोटी अहंकार सज्जन माणसालाही शूद्र समजतो. स्वत:ला समाजाचा नायक समजतो. अनाचार मानवी मूल्यांचे अपहरण करतो. अत्याचार शरीराला तृप्त करण्यासाठी धडपडतो. भ्रष्टाचार सुखोपभोगाला स्वामी बनण्यासाठी धडपडतो आणि स्वार्थाचार कष्टाविना पैसा मिळविण्यासाठी वापरला जातो. या पाच गोष्टी माणसाला तृप्त आणि मनपसंत आयुष्य जगण्यासाठी गरजेच्या आहेत अशी सामान्य माणसाची धारणा झालेली आहे आणि चंगळवादामुळे ती जगण्याचा अपरिहार्य घटक झालेली आहे. आजकाल आत्मप्रेमामुळे स्वत:विषयीच्या कल्पनाही पार बदलून गेल्या आहेत. आश्रितांचे चार नमस्कार, लाचारांचे चार हार आणि देशाचे नेतृत्व करणारा कर्तबगार नेता असे मजकूर असलेले चार फोटो लावले की हा देशाचा नेता म्हणून मोकळा होतो. तुंबलेली गटारे याला स्वच्छ करून घेता येत नाहीत तरीही त्याला (ओठावर शिवी ठेवून) नमस्कार घालावा लागतो. सारांश असा की समाजाचा सर्वांगीण विकास करणारी कोणतीही गोष्ट न करता नेत्याला नमस्कार आणि कार्यकर्त्यांना नाश्ता दिला की याचे समाजकार्य पुरे होते.

वरती उल्लेख केलेले जे चार-पाच अवगुण (खरे तर त्या विकृतीच आहेत) त्यांचे व्यवहारातले दर्शन कसे घडते त्या सार्‍यांचा सोदाहरण आणि विस्तृत परिचय करून देण्याऐवजी या सार्‍या अवगुणांना एकच शब्द वापरतो तो म्हणजे ‘गुलाम’ हा! आपण सारे पैशाचे गुलाम झालो आहोत. आपण सत्ताधीशांचे गुलाम झालेलो आहोत. त्यांचे खोटे-नाटे व्यवहार करणार्‍या कार्यकर्त्यांचे गुलाम झालो आहोत. आपणाला आपले मतदान करताना गुलाम रहावे लागते. आपण रक्ताला चटावलेल्या इंद्रियांचे गुलाम झालो आहोत. दुष्काळ आणि महापूर यांच्या गुलामीचा तर अंदाजच येत नाही. सावकाराची गुलामगिरी तर संसार उद्ध्वस्त करणारी असते. आपण वेगाचे गुलाम झालो आहोत आणि ‘आपण गुलाम झालो आहोत’ ही भावनाही शेवटी आपल्याला गुलाम करीत असते. स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिकांची आजची ही स्थिती आहे. घटनेने आपणाला स्वातंत्र्य दिलेले आहे. भोगासक्त वृत्तीने ते आपण टाकून दिलेले आहे.

श्री. घनश्याम पाटील यांनी काही लेखात जाती आणि धर्माविषयी अतिशय मर्मभेदक आणि तितकेच मार्मिक लेखन केलेले आहे. ते मला विशेष महत्त्वाचे वाटले. आजकाल तर धर्माने सत्तेला सल्ला देणे सुरु केले आहे. माणसाने काय खावे आणि काय खाऊ नये यावर निर्बंध घातले आहेत. परधर्मियांचा द्वेष हे राष्ट्रभक्तीचे लक्षण मानले जाते आहे. पारंपरिक, वर्णश्रेष्ठ समाजविघातक बाबींना प्रतिष्ठा मिळू लागली आहे. चारित्र्य आणि सद्गुणांवरून माणूस ओळखण्याऐवजी तो धर्मावरून ओळखला जातो आहे. वैदिक आचार-धर्माला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली आहे. आपापल्या जातीच्या संघटना करून राजकारण खेळले जात आहे. त्यातून जातीजातींमध्ये द्वेष निर्माण होऊ लागला आहे. धर्माचे हे विषद्ग्ध रूप विशद करताना स्वत: लेखकानेही एक-दोन ठिकाणी फार चांगली व्याख्या केलेली आहे. एका लेखात ते लिहितात, ‘दुर्बलांना निरपेक्ष भावनेने जो सबळ करतो, म्हणजे मदत करतो तो खरा धार्मिक होय’. दुसर्‍या एका लेखात ते विवेकानंदांचा दाखला देतात, ‘आत्मानुभूती व आत्मसाक्षात्कार म्हणजे धर्म!’ त्यापुढे ते लिहितात, ‘स्वत:च्या क्षमतांची ओळख होणे म्हणजे धर्म!’ पण ही गोष्ट आज दुर्मीळ झाली आहे. उलट अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या आणि अर्थशून्य असलेल्या कर्मकांडालाच आपला समाज धर्म मानतो आहे. खेड्यातील निरक्षर माणसांना धर्माचे हे ठेकेदार ‘हाच धर्म’ म्हणून या कर्मकांडातून श्रमाविना विलासी जीवन जगत आहेत. कर्मकांड वगळून जो शाश्वत विचार करतो तो खरा धर्म होय! पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की धर्मग्रंथांची अर्थशून्य पोपटपंची करणे म्हणजे धर्म नव्हे. मनामध्ये स्वार्थ, वासना आणि भोगलालसा ठेवून तीर्थस्थानी स्नान करून प्रदक्षिणा करणे म्हणजे धर्म नव्हे. ओठावर नामस्मरण आणि पोटामध्ये स्त्री-चिंतन असे दुटप्पी आचरण म्हणजे धर्म नव्हे. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशातून हजार-पाचशे रुपयांची देणगी म्हणजे धर्म नव्हे. अंगावर भगवी वस्त्रे परिधान करून पंचेन्द्रीयांचे गुलाम होणे म्हणजे धर्म नव्हे. मठ-मंदिरांची संस्थाने करून त्यावर अधिसत्ता गाजवणे म्हणजे धर्म नव्हे. अर्धा तास देवपूजा करून नंतरच्या वेळात दिलेल्या कर्जासाठी गरिबाचे घर लुटणे म्हणजे धर्म नव्हे. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालायच्या आणि तरुण वयातील भक्त स्त्रीच्या गळ्याला मिठी मारणे म्हणजे धर्म नव्हे. देवदर्शनासाठी आलेल्या भक्ताला देणगी म्हणून मोठी रक्कम मागायची आणि देवाचा प्रसाद म्हणून भक्तानेच दिलेला बिनपाण्याचा नारळ प्रसाद म्हणून द्यायचा याला ‘भक्ती धर्म’ म्हणत नाहीत. खरा धर्म माणसातले चैतन्य बघायला शिकवतो. माणसाला माणसाशी जोडतो. खरा धर्म प्रपंच आणि परमार्थ ह्यांचा संगम साधतो. तो चिरंतन मूल्यांची उपासना करण्याची प्रेरणा देतो. माणसाचा विशुद्ध आणि उन्नत करणारा, शाश्‍वत स्वरूपाचा, कायम प्रवाही नि काळाबरोबर चालणारा विचार म्हणजे खरा धर्म! खरा धर्म भोगाचे त्यागात रुपांतर करतो. विकृतीचे संस्कृतीत रुपांतर करतो. आसक्तीचे विरक्तीत रुपांतर करतो आणि माणसामध्ये असलेल्या पशुत्वाला देवत्वाचे रूप देतो. चराचरात चैतन्य व्यापून उरलेले आहे याचा साक्षात्कार याच खर्‍या धार्मिकाला होत असतो आणि मुख्य म्हणजे धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही याचे विस्मरण होता कामा नये. हे विस्मरण पुन्हा कर्मकांडाने गढूळ झालेल्या धार्मिक आचरणाकडे नेते. याच स्वरूपाचे एक वचन गौतम बुद्धांनी ‘धम्मपद’मध्ये नोंदविले आहे. ते म्हणतात, ‘‘ज्याचे अंत:करण स्वच्छ नाही, जो मनाने निर्मळ नाही, राग-द्वेषादी विकारापासून जो मुक्त नाही अशा माणसाने जरी भगवी वस्त्रे अंगावर घातली तरी तो ती घालण्यास लायक नाही.’’  

सारांश म्हणून मी असे म्हणेन की आजच्या गोंधळलेल्या काळात धर्म आणि अधर्म यातला फरक स्पष्ट करण्यासाठी श्री. घनश्याम पाटील यांनी जे लेखन केले आहे ते तरुण पिढीने वाचले पाहिजे; नव्हे ते आचरणात आणले पाहिजे असे मला वाटते.

या ग्रंथात श्री. घनश्याम पाटलांनी स्त्री जीवनाशी निगडित तीन-चार लेख समाविष्ट केले आहेत. त्या लेखांतून काही नव्या समस्या उपस्थित केल्या आहेत. काही वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा त्याच मांडलेल्या आहेत. त्यांनी नोंदविलेले एक मत असे की, स्त्री आणि पुरुष यात समानता असली पाहिजे. दोघांमध्ये कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणी कनिष्ठ नाही. तिलाही सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. तिच्या इच्छेनुसार तिला शिक्षण घेता आले पाहिजे आणि तिच्या इच्छेप्रमाणे प्रेमविवाह करता आला पाहिजे. त्यांच्या मते घरात अनेक पुरुष आपल्या पत्नीवर हुकमत गाजवीत असतात. बाहेर मात्र स्वातंत्र्य आणि समतेवर बोलत असतात.  त्यांनी सांगितलेली एक महत्त्वाची सूचना अशी की, शहरामध्ये अनेक संघटना असतात. त्या सर्वांची एकच संघटना झाली तर प्रश्न सुटायला मदत होईल.  शासनालाही दडपण येईल. त्यांनी सांगितलेली तिसरी क्रांतिकारी सूचना अशी की समाजात सर्रास प्रेमविवाह झाले पाहिजेत. त्याशिवाय जातीपातीची काटेरी झुडपे नष्ट होणार नाहीत! तसेच जाहिरातीमध्ये स्त्री शरीराचा वापर उचित वाटत नाही. आपली चैन, मौज भागवण्यासाठी महानगरात प्रौढ वा वृद्धाबरोबर बायकोप्रमाणे राहतात हेही त्यांना खटकते. एखाद्या हरामखोराने त्या बाईला म्हणजे तात्पुरत्या पत्नीला वेश्यागृहात विकले तर या बाईचे कसे हाल होतील? कसले आयुष्य जगावे लागेल? याचा विचार या तरुण मुलींनी करायला हवा. तसेच प्रेम आणि लग्न याच्या संकल्पना अलीकडे बदलत जाणार्‍या आहेत.  नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने त्यांची मैत्री होते, प्रेमाच्या दिशेने वाटचाल होते पण विविध कारणांनी वासना आणि प्रेम यातला फरक त्यांना कळत नाही.  त्याचा फटका त्यांनाही बसतो आणि त्यांच्या कुटुंबांनाही बसतो, याचाही विचार समाजाने करावा असे श्री. पाटील यांना वाटते. शेवटी त्यांनी ‘आई ही देवी आहे, तिला देवीचा दर्जा दिला पाहिजे’ असा एक शाश्‍वत विचार सांगितला आहे. माझ्या मते तर ईश्वरी शक्तीचे सगुण रूप म्हणजे आई. नाहीतरी आपल्या संस्कृतीने मानवी जीवनाला पूर्णत्व देणारी शक्ती मानलेलीच आहे. आदिशक्तीचे निकोप, निष्कलंक, निरामय, शुभदाई सगुण रूप म्हणजे स्त्री होय. ती मानवी जीवनाला आकार देते, मूल्यांना साकार करते, संस्कृतीला श्रीमंत करते, श्रमाला प्रतिष्ठा देते आणि माणसाला माणूसपण देते. सर्जन, संगोपन, संरक्षण आणि जगण्यासाठी लागणारी डोळस जाणीव स्त्रीशिवाय पूर्णच होत नाही. मग ती व्यक्तीची असो अथवा समाजाची असो. म्हणून आपण तिला सृजनाची देवता मानतो. संस्कृतीची आदिशक्ती मानतो. कर्तृत्वाची प्रेरक शक्ती मानतो आणि सेवेचे प्रतीक मानतो. येशू ख्रिस्ताचे एक वचन आहे. तो म्हणतो, ‘‘परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली.’’ स्वामी विवेकानंदांनी आणि साने गुरुजींनी दिला देवता मानले आहे. विवेकानंदांनी म्हटले आहे की, ‘‘जिथे तिचा सन्मान होत नाही तो देश कधीच मोठा होऊ शकत नाही.’’

आता अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याचा वेगळा विचार, शरीरसुखाला आलेले प्राधान्य, चिरंतन मूल्यांची होणारी उपेक्षा, तात्कालिक सुखाची चटक आणि जीवनातील श्रेयस-प्रेयसाचा बदलेला क्रम या बाबी ज्यांना मोलाच्या वाटतात त्यांनी मुक्त कामाचार करायला हरकत नाही. मात्र ज्ञानेश्वरांच्या भाषेत डोळे दिपविणारे तुमचे सौंदर्य कालातंराने सुकेलेल्या पडवळासारखे होईल तेव्हा तुमच्याकडे बघणार कोण आणि खायला देणार कोण? गौतम बुद्धाने एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘‘कामसुख हे एखाद्या चिखलासारखे आहे. त्यातून बाहेर पडणे शक्य नाही.’’ म्हणून स्त्रीच्या कर्तृत्वाला सारे आकाश मोकळे करून देणे आणि त्यासाठी तिला आपण ते पुरविणे यातूनच समाजात समता नांदेल. स्त्री कर्तृत्वाला बहर येईल.      
    
या ग्रंथात काही राजकीय स्थितीची चर्चा केलेली आहे. आजचे राजकारण देशहिताचा दीर्घकालीन विचार करून सचोटीने अंमलबजावणी करणारे नाही.  आज प्रत्येक जातीचे राजकीय पक्ष निर्माण झाले आहेत. त्या जातीच्या उद्धारापेक्षाही यांना स्वत:ची प्रगती हवी आहे. पूर्वी सचोटी, त्याग, देशप्रेम, रयतप्रेम, प्रबोधन विचार, साधी राहणी याला महत्त्व दिले जात होते. आता ज्याच्याकडे उदंड स्वरुपाची ‘मनीपॉवर’ आहे, विरोधकांना यमसदनाला पाठविणारी ‘मॅनपॉवर’ आहे आणि आपल्या विरोधात काम करणार्‍या कार्यकर्त्यांची हाडे मोडणारी ‘मसलपॉवर’ आहे तोच राजकारणात येऊ शकतो, टिकाव धरू शकतो. त्यात पुन्हा कार्यकर्त्यांना मानधन, कार्यकर्त्यांना पार्ट्या, मतदारांना पैसे, प्रसिद्धीसाठी येणारा अफाट खर्च या गोष्टी आजच्या राजकारणाचे अध:पतन करणार्‍या आहेत.  जॉर्ज बर्नाड शॉने एक विधान केले होते. तो म्हणतो, ‘‘समाजातली बदमाशगिरी करण्याची सारी क्षेत्रे संपली की माणसे राजकारणात येतात.’’ हे विधान आजच्या राजकारणाला लागू पडते. अशा या नासलेल्या राजकारणावर लेखन करण्यात अर्थ काय आणि केले तरी ते कोणी वाचणार नाही.

समारोप म्हणून मी असे म्हणेन, घनश्याम पाटलांचा हा ग्रंथ शाश्वत मूल्यांचा आग्रह धरणारा, शाश्वत समतेचा पुरस्कार करणारा, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा, वाचकांचे वाचन वाढविणारा आणि मातीत राबणार्‍या शेतकर्‍यांपासून ते मातीमोल आयुष्य जगणार्‍या माणसांची नोंद करणारा, सदाचार, सद्भाव, मैत्र, प्रेम, पुस्तकप्रेम, कारुण्य, उदारता, जिव्हाळा आणि अभिजात साहित्यप्रेम यांचा उत्कृष्ट नमुना आहे. तो या एकाच ग्रंथात एकजीव झाला आहे. म्हणून तो प्रत्येकाने जिवाभावाने वाचला पाहिजे.
- डॉ. द. ता. भोसले 

या पुस्तकाची पूर्वनोंदणी करण्यासाठीची लिंक - 
https://shop.chaprak.com/product/darval/

आपण ७०५७२९२०९२ या क्रमांकावर भीम अँप द्वारेही आपली नोंदणी करू शकाल. 


Friday, April 17, 2020

चोर सोडून संन्याशाला फाशी



'अफवा पसरवू नका' असं सातत्यानं सांगणाऱ्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अफवा पसरविण्याच्याच आरोपावरून अटक झाली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली असली तरी 'सगळ्यात मोठी बातमी,' 'ब्रेकिंग न्यूज,' 'सर्वप्रथम आम्ही,' 'सबसे तेज' अशा टॅगलाईन देत स्वतःची विश्वासार्हता धोक्यात आणणाऱ्या दृकश्राव्य माध्यमांना ही सणसणीत चपराक आहे. 

राहुल कुलकर्णी यांना उस्मानाबाद येथून अंगावरच्या कपड्यावर उचलण्यात आलं. त्यावेळी त्यांना त्यांची औषधंही सोबत घेऊ देण्यात आली नाहीत असा दावा त्यांच्या पत्नीनं केलाय. कोरोनासारख्या आजाराच्या विळख्यातून बाहेर पडण्याचे आपले सर्वांचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच राहुल यांना उस्मानाबाद येथून मुंबईत आणण्यात आलं. त्यांनी दिलेली बातमी चूक की बरोबर? त्याचा कितपत परिणाम झाला याची  चर्चा होऊ शकते. मात्र एखाद्या पत्रकाराला अशाप्रकारे जेव्हा अटक केली जाते तेव्हा संपूर्ण यंत्रणाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहते. कायद्याच्या कामात अडथळे न आणणं हे प्रत्येक सुशिक्षित माणसाचं कर्तव्य असतं. त्यामुळं राहुल हे स्वतःदेखील तपासयंत्रणांना सहकार्यच करतील पण यानिमित्त कुण्याही विचारी माणसाला काही प्रश्न स्वाभाविकपणे पडतात आणि त्याची चर्चाही व्हायलाच हवी. 

रेल्वेच्या एका अंतर्गत पत्राचा हवाला देत राहुल यांनी गाड्या सुरू होण्याबाबतची बातमी दिली होती. त्यानंतर दोनच तासांनी अशा कोणत्याही गाड्या सुरू होणार नसल्याची दुसरी बातमी त्यांनी दिली आणि ती दिवसभर  चालवली. एका मराठी वाहिनीवरील ही बातमी पाहून जवळपास तीन हजार अमराठी परप्रांतीय बांद्रा स्टेशनवर आल्याचं सांगण्यात आलं. संचारबंदीच्या काळात हे तीन हजार लोक बाहेर पडले कसे आणि एकत्र जमले कसे हेही पाहावं लागेल. राहुल यांना तातडीनं अटक करणारे त्यांच्यावर कोणती कारवाई करतील हेही स्पष्ट होईलच. मुख्य म्हणजे 'राहुल यांची बातमी काहीही चुकीची नव्हती' असा निर्वाळा संजय राऊत यांनी त्यांच्या अग्रलेखातून दिलाय. ज्या वृत्तपत्रासाठी ते अग्रलेख लिहितात त्या 'सामना'च्या संपादक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे आहेत. 'इतकी वर्षे पत्रकारितेत उगीच झक मारली असे वाटू लागले आहे' इतक्या स्पष्ट शब्दात राऊत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळं या प्रकरणात 'चोर सोडून संन्याशाला फाशी' अशातला प्रकार असल्याचं सांगितलं जातं.

'बाहेर गर्दी करू नका, जसे आहात तसेच घरात रहा' असं आवाहन सातत्यानं करण्यात येतंय. कोरोनाविरुद्धच्या लढाईतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. मात्र तरीही अनेकजण 'मला काय होतंय?' या अहंकारात बाहेर गर्दी करत आहेत. पोलिसांनी त्यांना प्रसाद देऊनही अनेकांत सुधारणा होत नाही. त्यामुळं सामाजिक आरोग्याचा विचार करून काही कठोर पावलं उचलावी लागतात. या सगळ्यात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. खरा कळीचा मुद्दा इथूनच सुरू झाला. मुद्रित माध्यमं आणि दृकश्राव्य माध्यमं यांच्यातली धुसफूस नवी नाही. निखिल वागळे यांच्यासारख्या काहींनी अत्यंत आक्रस्ताळेपणा करत, आरडाओरडा करत, अगदी समोरच्या व्यक्तीच्या तावातावानं अंगावर जात कार्यक्रम करण्याची कुप्रथा पाडली. त्यातून अल्पावधीतच या माध्यमाची विश्वासार्हता संपुष्टात आली. अनेकांनी अशा चर्चा पाहणं बंद केलं. काहींच्या तो फक्त मनोरंजनाचा विषय राहिला. दुसरीकडं मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता यांच्या तुलनेत टिकून आहे. या परिस्थितीत राहुल कुलकर्णी यांनी सर्वप्रथम 'वृत्तपत्राच्या कागदातून कोरोना पसरतो' अशी अफवा पसरविल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं अनेक वृत्तपत्रं बंद करावी लागली. विक्रेत्यांच्या मनात भीती निर्माण झाल्यानं त्यांनी ती विकण्यास नकार दिला आणि अनेक वृत्तपत्र बंद ठेवावी लागली. यात कित्येकांच्या पोटावर पाय पडला. बंद पडलेले छापखाने पुन्हा सुरू करताना ती यंत्रंही मोठा खर्च काढणार आहेत आणि हा सगळा एका 'फेक न्यूज'चा प्रताप आहे.

काही गोष्टी खटकत असूनही खरंतर राहुल कुलकर्णी यांच्याविषयी मला नेहमी अभिमान वाटतो. पुण्या-मुंबईचा पत्रकारितेचा केंद्रबिंदू त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राकडं, प्रामुख्यानं मराठवाड्याकडं वळवला. पूर्वी व्यंकटेश चपळगावकर हेही याच वाहिनीसाठी अशीच मेहनत घ्यायचे. शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांच्या वार्तांकनाला जाताना चपळगावकर यांचा अपघात झाला आणि दुर्देवानं ते त्यातच गेले. त्यांच्यानंतरचा आश्वासक चेहरा म्हणून राहुल यांच्याकडं पाहता येईल. अतिशय मोकळ्याढाकळ्या शैलीत पण अभ्यासूपणे ते ज्याप्रमाणं प्रत्येकाला भिडतात ते पाहता त्यांचं कौतुकच वाटतं. एबीपी माझाला 'बीजेपी माझा' म्हणणं किंवा राजीव खांडेकरांना 'पवारांचे हस्तक' ठरवणं म्हणूनच हे या वाहिनीसाठी अन्यायकारक होईल. राहुल यांच्यासारखे अनेकजण दिवसरात्र एक करत प्रचंड कष्ट उपसत असतात म्हणून ढिम्म व्यवस्था हलत असते. मग राहूल यांना नेमकी अटक का झाली याचाही विचार करायला हवा. 

'गंगाधर ही शक्तिमान था' हे आत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगण्याची वेळ नाही. तरीही त्यांच्यासोबतचे नेते त्यांच्या पाठीत कधीही खंजीर खुपसू शकतात. 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' असं उद्धव ठाकरे यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. मात्र याच गाण्यातली 'गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा' ही पुढची ओळ त्यांनी लक्षात ठेवायला हवी. मुळातच कलावंत असल्यानं कसलेही छक्केपंजे ते करत नाहीत, खोटेपणा त्यांना चालत नाही, मात्र आजचं राजकारण याच्याच पायावर उभं आहे. त्यामुळं राहुल कुलकर्णी हे फक्त निमित्त असलं तरी या प्रकरणाच्या मुळाशी त्यांनी जायलाच हवं. 

वाधवान कुटुंबीयांचा भंडाफोड राहुल यांनी केला आणि गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले. गृहनिर्माण मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसे या तरुणाला आपल्या बंगल्यावर बोलवून घेऊन त्यांच्या टग्याकरवी त्याला मारहाण केली. सत्तेची नशा चढल्यानंतर नेते कसे रंग बदलतात हे अशा प्रकरणातून दिसून येतं. राहुल यांच्यासारखे पत्रकार हे सगळं आक्रमकपणे मांडत होते आणि या सगळ्या प्रकारांकडून लक्ष वळवण्यासाठी त्यांना अटक करण्यात आल्याचं बोललं जातं. सरकार किती कडक भूमिका घेते हेही यातून दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो.

प्रसारमाध्यमं अनेक गोष्टीत आततायीपणा करतात हे तर खरंच. अगदी छोट्या गोष्टीही ते 'आत्ताची सर्वात मोठी बातमी' असं किंचाळत परत परत सांगत असतात. या बातम्या ज्यांच्याकडून मिळतात ती साधनंही अनेकदा दुय्यम असतात. त्यातून भलेभले आयुष्यातून उठल्याची उदाहरणंही आहेत. कसलीच खातरजमा न करता अशा ज्या बातम्या दिल्या जातात त्यामुळं अनेकांचं मोठं नुकसान होतं. 

या अनुषंगानं माझ्याबाबत नुकताच घडलेला एक अनुभव नोंदवावासा वाटतो. 8 फेब्रुवारी 2020 रोजी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मी आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं एक तक्रार दिली. तक्रारकर्त्यानं त्या तक्रार अर्जावर 'तातडीचे आणि गोपनीय' असं स्पष्ट लिहिलं होतं. मात्र काही मिनिटातच सर्व वाहिन्यांवर याची ब्रेकिंग न्यूज झाली. 'पुण्यात पत्रकाराविरुद्ध गुन्हा' म्हणून त्याचा विपर्यास केला गेला. 

त्यावेळी मी माझ्या सहकाऱ्यासोबत एका प्रकल्पावर काम करत बसलो होतो आणि ही बातमी येऊन धडकली. सगळ्यांचे अचानक फोन सुरू झाल्यानं आम्ही बातमी बघितली आणि हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. 'ठाकरे सरकार उलथवून लावायचा प्रयत्न आणि शरद पवार यांच्या हत्येचा कट' असा गंभीर आरोप आमच्याविरुद्ध होता. गंमत म्हणजे एकाही वाहिनीनं याबाबत आमची प्रतिक्रिया न घेता हल्लाबोल केला. त्यानंतर माझ्या आणि भाऊंच्या मागं पोलिसांचा ससेमिरा लागला. आम्ही दोघंही त्याला धाडसानं सामोरे गेलो. या प्रकरणात काहीच दम नाही, हे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यापासून अनेकांनी आम्हाला सांगितलं. खूप चौकशी करून पोलीस अधिकारी थकले आणि त्यांनीही सांगितलं की, "केवळ व्यवस्थेचा रेटा म्हणून आम्हाला तपास करावा लागतोय. यात तुमची काहीच चूक दिसत नाही मात्र लोकशाहीत पोलीस सत्ताधाऱ्यांचा गुलाम असतो..."

त्यांच्या गुलामीमुळं आमचा वेळ गेला, मनस्ताप झाला आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे यंत्रणा वेठीस धरली गेली. हे सगळं त्या एका तक्रारीमुळं झालं नाही तर एका फडतूस तक्रार अर्जावरून दृकश्राव्य माध्यमांनी ज्या बातम्या चालवल्या त्यामुळं झालं. या प्रकरणात आम्ही निर्दोष आहोत असा अहवाल पोलिसांनी देऊनही याची बातमी मात्र कोणीच केली नाही. उलट मला आणि भाऊंना जीवे मारण्याच्या जाहीर धमक्या आल्या. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल कुलकर्णी यांना अटक हा फक्त राजकारणाचा फार्स बनून राहतो. 

राहुल चूक की बरोबर हे आपली न्यायव्यवस्था ठरवेल. त्यांची बरी-वाईट शैली लक्षात घेतली तरी एका पत्रकारावर अन्याय होऊ नये असंच मला वाटतं. दिल्लीत उत्तरप्रदेशचे लाखो कामगार रस्त्यावर आले होते. त्यावेळी अरविंद केजरीवाल आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारखे विळ्याभोपळ्याचे सख्य असलेले दोन मुख्यमंत्री एकत्र आले. योगी यांनी युपीवरून एक हजार बस दिल्लीला पाठवल्या आणि या लोकाना परत आणले. केजरीवाल यांच्या मदतीनं उरलेल्यांची व्यवस्था तिथंच केली. हे आपल्या सत्ताधाऱ्यांना जमलं नाही. त्यामुळं असं सगळं नैराश्य बाहेर पडत आहे. 

जे झालं ते झालं. राहुल यांच्या बातमीचा परिणाम कितपत झाला, बांद्रा येथून युपीला गाडी नसताना सगळे तिथं का जमले? नेमके एका मस्जिदीपुढं ते एकत्र आले असं सांगितलं जातंय ते खरं आहे का? असल्यास त्याची कारणं कोणती? एकत्र येण्याचे संकेत कोणते? उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे कुणी गद्दार सहकारी यात आहेत का? हे प्रशासनाचं अपयश आहे का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येतीलच पण यापुढं तरी दृकश्राव्य माध्यमांनी सावध होणं गरजेचं आहे. 'हातात बुम आला म्हणून आपण न्यायाधीश होत नाही' इतकं जरी या पत्रकारांना कळलं तरी सध्या पुरेसं आहे.
-घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Thursday, April 16, 2020

कोरोनाच्या लढाईतील देवाचं काम


आपल्या देशाची अखंडता टिकून राहण्यात सगळ्यात मोठा वाटा कशाचा असेल तर तो आहे आपल्या संस्कृतीत आणि माणूस म्हणून असलेल्या चांगुलपणात. आपल्याकडे गरीब-श्रीमंतीची दरी आहे, जात-धर्मातील संघर्ष आहे, प्रथापरंपरांचं जोखड आहे, विविध समूहांच्या टोकदार अस्मिता आहेत, विविध विचारधारांचा झापडबंदपणा आहे. हे सगळं खरं असलं तरी आपल्या श्रद्धा प्रबळ आहेत, आपल्या भावभावना सच्च्या आहेत, इतरांच्या व्यथा-वेदना समजून घेण्याची उपजत वृत्ती आहे. म्हणूनच आपलं चांगुलपण टिकून आहे, देश टिकून आहे, त्यातून मानवता टिकून आहे. आपल्या राष्ट्रावर अनेक आक्रमणे झाली, संघर्ष झाले, नैसर्गिक आपत्ती आल्या, आजारांच्या साथी आल्या. तरीही आपण टिकून आहोत, ठाम आहोत, जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता बाळगून आहोत. सध्या कोरोनामुळं जगातील प्रत्येकाचा जगण्याचा संघर्ष सुरू असताना माणसामाणसातील अंतर कमी होतंय. 'सोशल डिस्टन्स' राखताना आपण मनानं जवळ येतोय आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जगभर मोठ्या प्रमाणात जे सकारात्मक प्रयोग सुरू आहेत त्याची सर्वत्र दखल घेतली जात आहेच. भविष्यातही घेतली जाईल. आज आपण आपल्या आजूबाजूला छोट्या स्वरूपात सुरू असलेल्या काही चांगल्या प्रयोगाकडे बघूया. अर्थात हे सगळे विधायक उपक्रम मांडायचे तर एक जाडजूड ग्रंथ होईल पण आपण काही प्रातिनिधिक उदाहरणं बघूया. मानवता जिवंत ठेवणाऱ्या या सगळ्या घटना आपलं मनोधैर्य वाढवायला मदत करतील. 

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर सर्वतोपरी मदत करत आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अव्याहतपणे कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' असं म्हणत प्रत्येकाला धीर दिला आहे. शिवथाळीच्या माध्यमातून कोणीही उपाशी राहू नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत. इतर राज्यातील आपल्याकडं अडकलेल्या कर्मचाऱ्यांची त्यांनी सगळी व्यवस्था केलीय. सातत्यानं जनतेशी संपर्क साधून ते करत असलेल्या कार्याची माहिती देत आहेत. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मंत्रीमंडळातील सर्वच नेते उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करत आहेत. उद्धवसाहेबांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्त अधिकारी, सैनिक, डॉक्टर, नर्स आदींनी या सेवा कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत डोंबिवलीच्या महापौर विनिता माने यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विनिताताई पूर्वी नर्स होत्या. सध्या महापौर आहेत. हे पद फक्त मिरवण्यासाठी नसतं तर जनतेची सेवा करण्यासाठी असतं याचं भान त्यांना आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी महापौरपदाची झुल, सगळा दिखाऊपणा बाजूला सारत डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून कोरोनाग्रस्तांची सेवा सुरू केली आहे. त्यांच्या या मातृहृदयी सेवाकार्याची भविष्यात योग्य ती नोंद नक्की घेतली जाईल.

अशा आपत्तीच्या काळात आपला दातृत्वभाव दाखवत अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. रतन टाटा यांच्यासारख्या माणसातल्या देवानं थोडेथोडके नव्हे तर तब्बल पंधराशे कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिले. आपल्या विविध देवस्थानांच्या विरुद्ध अनेकांकडून कायम राळ उडवली जात असली तरी यावेळी बहुतेक तीर्थक्षेत्रांनी यथायोग्य मदतीचा हात पुढं केला. सोलापुरातील आराध्या अजय कडू या दुसरीतील विद्यार्थीनीनं आपला जन्मदिवस साजरा करणं रद्द करून ती मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली. उद्धव ठाकरे यांनी आराध्याचं जाहीर कौतुक करत तिला आशीर्वाद दिले. बीड येथील पाच वर्षाच्या पार्थ पाटील आणि जयदत्त पाटील यांनीही त्यांच्या वाढदिवसाठी जमवलेली रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडं सुपूर्त केली. या बालचमुंची ही सजगता अनेकांचे डोळे उघडणारी आहे. पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांचा नुकताच 56 वा वाढदिवस झाला. 56 वर्षाच्या आयुष्यातील रोजचा एक रुपया याप्रमाणं त्यांनी 20464 रुपयांचा धनादेश आयुक्तांकडं मदत म्हणून दिला. प्रशांत दामले यांच्यासारख्या कलावंतानं कला क्षेत्रातील अनेक गरजूंना सढळ हातांनी मदत केली. आजूबाजूची अशी असंख्य उदाहरणं पाहता माणुसकीवरील विश्वास दृढ होतो.

घरकोंडीमुळं बाहेर पडणं अवघड झालं आहे. ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना एकवेळचं जेवण मिळणंही कठीण झालंय. अशावेळी मदतीसाठी कोणी पुढं सरकलं नाही तरच नवल.  अनेकांनी अक्षरशः अन्नछत्र उघडल्याप्रमाणं यात योगदान दिलंय. पुण्यातील वंदे मातरम संघटना, सरहद काश्मीरी संघटना आणि गुरू गौतमी मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीनं गरजूंना भोजनाची व्यवस्था केली जातेय. श्रमिक वर्गासह परगावातील विद्यार्थ्यांची त्यामुळं मोठी सोय झाली. बुधवार पेठेतील देवदासी भगिनींना अन्नदान करून त्यांनी जो आदर्श निर्माण केला त्याला तोड नाही. सरहद संस्थेच्या संजय नहार यांनी पडद्याआड राहत जे निर्माण केलंय ते पाहता महाराष्ट्रानं त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञ रहायला हवं.

सोलापूरच्या बाळे भागातील अनेक गरजूंना अन्नधान्याची गरज होती. त्यांच्या चुली बंद पडल्या होत्या. अशावेळी लोणार गल्ली येथील शिवशक्ती बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या बिज्जू प्रधाने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी 'एक घास तुम्हालाही' हा उपक्रम राबवत एक हजारहुन अधिक लोकाना मदतीचा हात दिला. भीम नगर, साठे नगर, खडक गल्ली, राहुल नगर, लक्ष्मी नगर, पाटील नगर, चांभार गल्ली येथील कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रधाने कुटुंबीय पुढं सरसावलं. नाशिक जिल्ह्यातील एका शेतकरी बांधवानं तर त्याचा एक एकर गहू आसपासच्या गरजू कामगार स्त्रियांना वाटून टाकला. 

हा लेख लिहीत असतानाच साप्ताहिक 'विवेक'च्या रवींद्र गोळे यांची एक पोस्ट वाचण्यात आली. रवीदादांनी रेशनचं धान्य आणलं. इतकं धान्य घरात लागणार नसल्यानं ते गरजूंना द्यायचा त्यांचा विचार होता. 'घाई करू नका' असा सल्ला पत्नीनं दिला. थोड्या वेळात एक परप्रांतीय संडास साफ करण्याचे पैसे न्यायला आला. गोळे वहिनींनी त्याची विचारपूस केली. त्यानं सांगितलं कामही बंद आहे आणि चुलही. ते चार-पाच कर्मचारी एका खोलीत बंद होते. वहिनींनी ते धान्य त्याला देऊन टाकलं. 'भीक आणि भूक यांना धर्म नसतो' असंही त्यांनी सांगितलं. आपण कोणी फार मोठे दाते नाही मात्र माणूस आहोत, अशी भावना त्या व्यक्त करतात. या भावनेवरच तर आपला समाज तग धरून आहे. सरकारी पातळीवर जी मदत केली जातेय, दिली जातेय त्याची नोंद होईल पण सामान्य माणूस अशा पद्धतीनं त्याच्या घासातला घास इतरांना देतोय हे चित्र फार सुखद आहे.

प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचा 'मराठी संस्कृती' हा व्हाट्सऍपचा एक समूह आहे. त्यावर सुधाकर शेलार यांनी सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करायची संकल्पना मांडली. सुधाकर शेलार, राहुल पाटील, तुषार चांदवडकर, आनंद काटीकर, विजय केसकर अशा सर्वांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि बघताबघता 75 हजार रुपये जमा झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधत हा मदतनिधी कोरोनाच्या लढाईसाठी देण्यात आला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते अनेक संस्था संघटनापर्यंत सर्वजण यावेळीही नेटानं कामाला लागलेत. आपली सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस, अन्य सरकारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, प्रसारमाध्यमं हे सर्वजण यावेळी जे काम करत आहेत त्यालाच तर 'देवाचं काम' म्हणतात. कोरोनाच्या काळात चांगुलपणावरील श्रद्धा वृद्धिंगत करणारी असंख्य उदाहरणं दिसून आली. त्यातल्या कित्येक घटना काळाच्या ओघात पुढे यायच्या नाहीत पण म्हणून त्यांचं महत्त्वही कमी होणार नाही. या घरकोंडीत माणूस किती हतबल असतो हे जसं दिसून आलं तसंच तो एकमेकांची किती काळजी घेतो हेही दिसून आलं. आपण एकटे नाही, आपल्यासोबत आपला समाज आहे, आपलं सरकार आहे, आपल्यावर प्रेम करणारी, आपली काळजी करणारी माणसं आहेत, इथली भक्कम यंत्रणा आपल्यासोबत आहे हे ठळकपणे अधोरेखित झालं. ही जागतिक समस्या आपल्याला अगतिक करू शकली नाही हे आपल्या राष्ट्राचं यश आहे. भविष्यात आपापल्या क्षेत्रात नव्या जोशात उभं राहण्याचं बळ यातूनच आपल्याला मिळणार आहे. हा एकोपा, हे सामंजस्य टिकून रहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी रमेश गोविंद वैद्य यांच्या चार ओळी सांगून आपला निरोप घेतो.

पाप आणि पुण्य यांचा दूर ठेवा ताजवा
किर्रर अंधारी प्रकाश देण्या पुरेसा एक काजवा
अंतराळी उंच जावो प्रीतीची ही आरती
माणसाने माणसाला ओळखावे आणखी!

-घनश्याम पाटील, पुणे
7057292092