काळाच्या ओघात आपल्याकडची ‘वाडा संस्कृती’ लयास गेली. बघताबघता तिथं मोठमोठ्या इमारती उभारल्या. या गगनचुंबी इमारतींनी सगळीकडं सिमेंटचं जंगल वाढलं. विकासाच्या नावावर हे परिवर्तन झपाट्यानं झालं असली तरी आपल्या संस्कृतीची पाळंमुळं मात्र घट्ट रोवलेली आहेत. म्हणूनच जगभर मराठी माणसाचा वरचष्मा आहे. संस्कार आणि संस्कृतीचा, आपल्या आदर्श परंपरांचा वारसा जपणार्या अशाच यशस्वी मराठी उद्योजकांपैकी एक आहेत ‘ढेपे वाड्या’चे प्रमुख नितीन ढेपे.
त्यांनी बांधकाम विकसक म्हणून मोठं योगदान दिलं. अनेक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. ‘वाडा पाडण्यासाठी रिकामा झाल्यावर, वाड्याच्या त्या मोकळ्या वास्तूत मला प्रचंड अपराधी वाटायचं! आपण एका जिंदादिल वास्तूचा इतिहास पुसतोय अशी खंत वाटायची! आपल्या नव्या पिढीला आपली पारंपरिक वास्तुशैली दाखविण्याऐवजी आपण ती उद्ध्वस्त करतोय याची सल मनात असायची!’ अशी प्रांजळ कबुली देणारे आणि या कबुलीजबाबावरच न थांबता ‘ढेपे वाडा’च्या माध्यमातून भरीव असं काहीतरी उभं करणारे नितीन ढेपे म्हणूनच या बजबजपुरीत वेगळे ठरतात.
आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यात गैरही काही नाही. मात्र ते पुरं करता करता अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. सदनिकेची खरेदी हा एक मोठा उद्योग होऊन बसतो. प्रत्येक घर, सोसायटी, अपार्टमेंट आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी आदर्श ठरावं अशा माहितीचं विश्वासार्ह पुस्तक असणं गरजेचं होतं. खरंतर बाजारात अशा स्वरूपाची असंख्य पुस्तकं असली तरी याच क्षेत्रात ध्येयनिष्ठपणे काम करणार्या आणि संवेदनशील माणसानं याविषयी लिहिणं जास्त गरजेचं होतं. अतिशय नियमबद्ध व योग्य कार्यपद्धतीवर विस्तृत भर देत नितीन ढेपे यांनी ‘कशासाठी? घरासाठी!’ हे पुस्तक लिहिलं. ‘राजहंस प्रकाशन’ने ते आकर्षकरित्या प्रकाशित करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिलंय.
या पुस्तकाद्वारे बांधकाम व्यावसायिक व घर खरेदीदार, सोसायटी, अपार्टमेंटचे कार्यकारी मंडळ व सभासद यांच्यातील सुसंवाद वाढावा, बांधकाम व्यावसायिकांची जनमानसातील प्रतिमा सुधारावी, घर खरेदीदारांची देखील फरफट थांबून त्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागावा अशी इच्छा नितीन ढेपे यांनी व्यक्त केलीय. किचकट भाषा टाळून अतिशय साध्या-सोप्या भाषेत घराबाबत इतकी इत्यंभूत माहिती दिल्यानं त्यांची ही इच्छा पूर्णत्वास आली आहे. म्हणूनच या पुस्तकाचं उपयोगितामूल्य मोठं आहे.
घर विकत घेणं, त्याची पुनर्विक्री करणं, जमीन घेऊन स्वतःच्या घराचं बांधकाम करणं, स्वमालकीच्या सदनिका, गाळे, बैठी घरं, बंगले, रो हाऊसेस यांच्या विक्रीची प्रक्रिया, पुनर्विकासाची प्रक्रिया, देखभाल आणि इतर खर्चात कपात कशी करावी, सदनिका खरेदी करतानाचे सहज, सोपे टप्पे अशा सर्वांविषयी त्यांनी या पुस्तकात विस्तृतपणे आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलंय. मुख्य म्हणजे सध्या एकेक सोसायटी म्हणजे एकेक गावच असतं. त्यामुळं बांधकाम व्यावसायिकांकडून सोसायटी, अपार्टमेंटची स्थापना, त्याची पूर्तता, कार्यकारी मंडळाकडे हस्तांतरण, सामाईक सुखसोयी वापराबाबतचे निमय, सोसायटी, अपार्टमेंटचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक असणारे नियम, उपविधी (बायलॉज), आदर्श व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे हे सारं समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणारं आहे. या क्षेत्रातील ‘भगवतगीता’ म्हणून प्रत्येक सभासदानं, सोसायटींच्या पदाधिकार्यानं हे पुस्तक संग्रही ठेवायला हवं.
आपल्या घराचं व आपल्या कुटुंबाचं चोर, लुटारूंपासून संरक्षण करण्यासाठी काय व्यवस्था करायची याबाबतचंही एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे. या क्षेत्रात रौप्यमहोत्सवाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या नितीन ढेपे यांना या व्यवसायाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी अनेक व्यावसायिक संकुलं, गृहसंकुलांपासून ते हॉस्पिटल-रिसॉटपर्यंतचे व्यावसायिक प्रकल्प पूर्ण केलेत. नवीन बांधणीपासून ते पुनर्विकासापर्यंत अनेक क्षेत्रात त्यांचा सहभाग असल्यानं काहीही हातचं राखून न ठेवता त्यांनी त्यांचं या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान वाचकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. ज्या घरात आपण राहतो त्या वास्तुशास्त्राविषयीची सजगता मात्र आपल्याकडे दिसत नाही. त्यामुळंच अनेकदा अनेकांकडून फसवणूक झाल्यानं मनस्ताप होतो. कायदेशीर सल्लागार, वास्तुविशारद, सरकारी अधिकार्यांकडून घरबांधणीच्या कार्यपद्धतीविषयी ठोस आणि समाधानकारक माहिती मिळेलच असं नाही. अनेकदा तर आपल्याला नेमकी कोणत्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे हेच अनेकांना उमगत नाही. त्या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक आहे.
‘असावे अपुले सुंदर घर’ किंवा ‘घर पाहावे बांधून’ असं आपण म्हणतो. मात्र असं स्वप्नातलं घर बांधताना, विकत घेताना त्याचे नियम, त्याची तंदुरूस्ती, पुनर्विकी, संरक्षण, देखभाल, सोसायटी-अपार्टमेंटची स्थापना आणि पुढं त्यांचा कारभार हे सर्व आपल्याला ठाऊक असणं अत्यावश्यक आहे.
मराठा वास्तुशैली आणि जुनी वाडा संस्कृती पुनरूज्जीवित करण्याच्या ध्येयानं झपाटलेल्या नितीन ढेपे यांनी या क्षेत्रात दखलपात्र काम उभं केलंय. ‘जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळ जण’ अशा उदात्त हेतूनं त्यांनी हे पुस्तक लिहिलंय. हे अवश्य विकत घ्या, वाचा, आपल्या संग्रहात ठेवा आणि योग्य ती माहिती वापरात आणा इतकंच. नितीन ढेपे आपली उद्यमशीलता जपतानाच आपल्यास संस्कृतीचं संचित जपण्यासाठीही अहोरात्र धडपडत असतात. त्यांच्या या सर्व उपक्रमांना माझ्या शुभेच्छा!
कशासाठी? घरासाठी!
लेखक - नितीन ढेपे, प्रकाशक - राजहंस
पाने - 148, मूल्य - 200
- घनश्याम पाटील
७०५७२९२०९२
प्रसिद्धी : दैनिक 'पुण्य नगरी'
२३ सप्टेंबर २०१९