Pages

Friday, July 5, 2019

फक्त लढ म्हणा!


‘चपराक’चा ज्ञानयज्ञ सुरू!

विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीन प्रमुख पातळ्या आहेत. त्यामुळं मराठी साहित्यात थोडफार योगदान द्यावं असा विचार आम्ही केला. त्यानंतर एक वृत्तसाप्ताहिक, प्रभावी मासिक, दिवाळी महाविशेषांक आणि पुस्तक प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ते कृतीतही आणले. हे सर्व करताना शब्दांच्या सामर्थ्याची जाणीव झाली आणि स्वतःचाच हेवा वाटू लागला.

जेव्हा आम्ही एक दर्जेदार वाङमयीन मासिक सुरू केलं तेव्हा काही समदुःखी लोकानी ‘मासिक ही संकल्पनाच मृतावस्थेत गेल्याची’ आवई उठवली. साप्ताहिक सुरू केल्यावर ते म्हणू लागले, ‘क्षणाक्षणाला जगातल्या सगळ्या बातम्या कळतात, त्यात काही साप्ताहिकवाल्यांनी  इतकी दुकानदारी सुरू केलीय की, सर्व साप्ताहिकं बदनाम झालीत.’ 

‘चपराक’चा दिवाळी महाविशेषांक वाचकप्रिय ठरत असतानाच ‘बाजारात सात-आठशे दिवाळी अंक येतात आणि त्यातील बहुतेक पावसाळी छत्र्यांप्रमाणं फक्त जाहिराती मिळवण्यासाठीच प्रकाशित होतात; त्यामुळं दिवाळी अंकाचे वाचक घटलेत’ असंही त्यांनी सांगितलं. 

‘नव्या लेखकांची पुस्तकं सध्या कोणीही प्रकाशित करत नाही, वाचनसंस्कृती राहिलीयच कुठं?’ असंही काहींनी विचारलं.

या सर्वांच्या नकारात्मक मानसिकतेचा अभ्यास केल्यावर आमच्या लक्षात आलं की या क्षेत्रातील अंधश्रद्धा मोठ्या आहेत. महाराष्ट्रात, भारतात आणि जगात हजारो वृत्तपत्रं रोज प्रकाशित होतात. प्रत्येकाचा वाचकवर्गही मोठा आहे. अर्थकारण मोठं आहे. त्यावर अवलंबून असणारे लोकही अनेक आहेत. अनेक उत्तमोत्तम मासिकांची वाचक आतुरतेनं वाट बघत असतात. आपल्या आवडीचे दिवाळी अंक आधी नोंदवून ठेवतात. एखादा हवा असणारा अंक वेळेत उपलब्ध झाला नाही तर ते अस्वस्थ होतात. पुस्तकांसाठी तर अनेकजण ‘वेटिंग’ला असतात. 

राज्याचं, देशाचं, जगाचं सोडून द्या; फक्त पुणे शहरातूनच रोज किमान पाच-पन्नास पुस्तकं प्रकाशित होतात. ही पुस्तकं प्रकाशित करणारे बहुतांश प्रकाशक सांगतात की, सुरूवातीला आम्ही रस्त्यावर बसून पुस्तकं विकायचो, घरोघर जाऊन पुस्तकं विकायचो, शिपाई म्हणून काम करत असताना पुस्तकं पोचवू लागलो आणि त्यातून या क्षेत्रात आलो... शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून काम करताना पुस्तकांचं जग खुणावू लागलं आणि प्रकाशक झालो... 

गंमत म्हणजे आपल्या गरिबीचा, दुःखांचा, परिश्रमांचा बाजार मांडणारे बहुतेक प्रकाशक गब्बर आहेत. त्यांच्या पुण्या-मुंबईत स्वतःच्या मोठमोठ्या इमारती आहेत. सातत्यानं विदेश वार्‍या होतात. आलिशान गाड्या आहेत. मुलांचं शिक्षण देश-विदेशातील चांगल्या संस्थांत सुरू आहे. असं सारं असूनही त्यांची एक सार्वत्रिक ओरड असते; ती म्हणजे ‘पुस्तकं खपत नाहीत! सध्या वाचतं कोण?’ इतक्यावर न थांबता ते सरकारला आणि व्यवस्थेलाही कायम दूषणं देत असतात.

आचार्य अत्रे म्हणायचे की, ‘‘कृतज्ञता हे मानवाला मिळालेलं मोठं वरदान आहे आणि कृतघ्नता हा मोठा शाप...’’ मग ही सगळी मंडळी कृतघ्न नाहीत का? ज्या वाचकांच्या जिवावर त्यांनी त्यांची सगळी स्वप्नं पूर्ण केली त्यांना दोष देणं, जाणिवपूर्वक गैरसमज निर्माण करणं आणि त्यातून साहित्याचं, भाषेचं, ग्रंथ व्यवहाराचं नुकसान करणं कितपत योग्य आहे?

म्हणूनच आम्ही जरा वेगळा विचार केला. आपल्याकडील ज्ञानोपासकांची भूक भागविण्यासाठी या वर्षात 365 पुस्तकं प्रकाशित करायची. साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक हे सर्व प्रयोग यशस्वी झाले असताना केवळ आणि केवळ वाचकांच्या विश्‍वासाच्या बळावर हे धाडसी पाऊल उचलायचं. त्यासाठीचं आमचं नियोजन सुरू झालं आणि आता त्याला मूर्त स्वरूपही मिळत आहे. 

महाराष्ट्राची मराठी माती शौर्य आणि पराक्रमाची परंपरा जपणारी आहे. इथल्या अनेकांनी आदर्शांचे मनोरे उभे केले आणि जगभरातील अनेकांसाठी ते दिशादर्शक ठरले. असं असतानाही सध्या अनेक क्षेत्रात एक मोठी नकारात्मकता निर्माण झाली आहे. ती नेमकी का झाली याचाही अनेकांनी आपापल्या परीनं उहापोह केला आहेच! मात्र या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गंभीरपणे जे काही प्रयत्न करावे लागतात त्याबाबत मोठी उदासीनता दिसून येते.

 सध्या एक करंटी मानसिकता जोपासत आपली वाटचाल सुरू आहे. इथली सामाजिक, राजकीय व्यवस्था पाहता भव्यदिव्यतेची स्वप्नं पाहणं हाही गुन्हा ठरतोय की काय असं एकंदरीत वातावरण आहे. पराभूत मानसिकतेतून बाहेर पडण्याचं त्राण आपल्यात नाही म्हणूनच उद्यमशीलतेकडं अक्षम्य दुर्लक्ष होतं. 

इतरांवर टीका करणं, त्यांच्या चांगल्या योजनांना, परिश्रमांना नावं ठेवणं, कुत्सित स्वरूपात टिंगलटवाळी करणं थांबवायला हवं. पुण्यासारख्या नगरीत कधीकाळी रिक्षा चालवणारे एखादे अविनाश भोसले कोेट्यवधींची मिळकत कमावतात तेव्हा त्यांच्यावर शंका उपस्थित करण्याऐवजी जर त्यांच्या परिश्रमाचा, जिद्दीचा अभ्यास केला, त्यातून काही बोध घेतला तर अनेक उद्योजक निर्माण होऊ शकतील. आपल्या आजूबाजूला शून्यातून विश्‍व निर्माण करणारे असे असंख्य लोक असूनही आपण परिस्थितीला दूषणं देतो, आणखी कुणावर आपल्या अपयशाचं खापर फोडतो तेव्हा आत्मपरीक्षणाची वेळ आलेली असते. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे अगदी खरं आहे. अनेकांनी आपल्या कृतीतून ते दाखवूनही दिलं आहे.

साहित्य आणि ग्रंथ प्रकाशनविश्‍वाला तर कधीचीच घरघर लागल्याचं सांगण्यात येतं. वाचनसंस्कृती कमी होत चाललीय असं सांगणारी, ऐकणारी ही नेमकी कितवी पिढी आहे हे सांगता येणार नाही. साधारण 1909 साली वि. का. राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी भाषा मृतावस्थेला गेली आहे काय?’ या विषयावर परिसंवाद झाल्याचं वाचनात आलं. आजही ही व अशी चर्चा सुरूच असते हे आपल्या मायबोलीचं दुर्दैवच!

हे सगळं पाहून व्यक्तिशः मी अस्वस्थ झालो. स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेला, अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत साकारायचा तर आपण आपल्या क्षेत्रात खारीचा वाटा उचलावा असं अनेक दिवस मनात घोळत होतं. सध्या पुस्तकं कोणी वाचत नाही, नवीन लेखकांना व्यासपीठ मिळत नाही असं सातत्यानं ऐकून ही नकारात्मकता मोडीत काढण्याचा चंग आम्ही बांधला. त्यासाठी मागची दोन-अडीच वर्षे आमचे अव्याहत प्रयत्न सुरू होते. अजूनही ते थांबलेले नाहीत.

मराठी साहित्यात पुढची किमान काही वर्षे टिकून राहील असं काम उभं करण्याचा संकल्प आम्ही केला. त्यातून एक योजना सुचली. रोज एक याप्रमाणं वर्षभरात साधारण 365 पुस्तकं प्रकाशित करायची! ही योजना या क्षेत्रातील दिग्गजांना सांगितल्यावर अनेकांनी आम्हाला वेड्यात काढलं. त्यांच्या या नकारात्मक प्रतिक्रिया आमचा संकल्प आणखी दृढ करत गेल्या. एका ज्येष्ठ प्रकाशकांनी सांगितलं, ‘‘घनश्यामजी, जरा सबुरीनं घ्या... आत्महत्या करावी लागेल...’’ 

मग त्यांना मी बजावलं, ‘‘तशी वेळ आलीच तर घुशीचं औषध खाऊन मरणार नाही! मी परिश्रमानं, कष्टानं इतकं वैभव मिळवेन की हिरा चाटून मरेन!’’

‘चपराक’च्या माध्यमातून अनेक ग्रंथालयांशी, महाविद्यालयांशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. इतकंच नाही तर आमच्या असंख्य वाचकांपैकी कित्येकजण असे आहेत की ‘चपराक’चं कोणतंही पुस्तक प्रकाशित झालं तरी ते आवर्जून विकत घेतात. 

आम्ही ही 365 पुस्तकांची योजना जाहीर करताच अनेक वाचकांनी सांगितलं की, ‘त्या-त्या महिन्यात प्रकाशित होणारी पुस्तकं आमच्याकडं पाठवून द्या! आम्ही त्याची वेगळी ऑर्डर द्यायची गरज नाही. ही सर्व पुस्तकं आमच्या संग्रहात हवीतच!’ इतक्या उदारपणे प्रेम करणारे मराठी वाचक असताना ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ असं म्हणणं केवळ कृतघ्नपणाचं ठरेल.

एक मोठा वर्ग असाही तयार झालाय की त्यांना आमची ‘बुके ऐवजी बुक’ ही कल्पना आवडलीय. अनेक संस्थांचे विविध कार्यक्रम ‘चपराक’च्या दर्जेदार पुस्तकांसह साजरे होतात. लग्न, मुुंज, वाढदिवस, निवड, नियुक्ती अशा कोणत्याही प्रसंगी भेट आणि प्रतीभेट (रिटर्न गिफ्ट) म्हणूनही आमची पुस्तकं दिली जातात. त्यामुळं अनेक लेखकांच्या पुस्तकांची आवृत्ती अवघ्या चार-दोन दिवसात संपवण्याचे विक्रमही आम्ही केले आहेत. 

या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही कोणतीही शासकीय मदत आजवर घेतली नाही, भविष्यात घेणार नाही. काही लेखक त्यांच्या पुस्तकांच्या प्रती विकत घेतात. आमच्या नियतकालिकांना मिळणार्‍या जाहिराती, त्यांच्या विक्रीतून-वर्गणीतून मिळणारा नफा आणि या सर्व पुस्तकांची तडाखेबंद विक्री यामुळंच नवनवीन पुस्तकं प्रकाशित करणं आम्हाला शक्य होतं. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकरांचं पुस्तक प्रकाशित केल्यावर तीन दिवसात जवळपास अकराशे प्रतींची नोंदणी होणं, राजेंद्र थोरात यांच्या पुस्तकाची आवृत्ती केवळ आठवड्याभरात संपणं किंवा सुनील जवंजाळ यांच्या कादंबरीच्या प्रती भेट देण्यासाठी एखाद्या पोलीस अधिकार्‍यानं, आमदारानं मागवणं हे सगळंच आमच्यासाठी सुखद आहे. म्हणूनच मराठीत कोणीही लेखक उपेक्षित राहणार नाही, याची आम्हाला खात्री वाटते. हे करतानाच मराठी लेखक जागतिक स्तरावर जावेत या उद्देशाने आम्ही त्यांची पुस्तकं इंग्रजीत अनुवादीत करण्याचा शुभारंभही केला आहे. भाऊ तोरसेकरांचे ‘व्हाय मोदी अगेन’ हे पुस्तक भारतातल्या आणि जगातल्या वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले आहे. ‘चपराक’च्या अन्य काही पुस्तकांचे इंग्रजी आणि अन्य काही भाषांतील अनुवाद लवकरच आपल्या भेटीस आणत आहोत.

मराठीत पूर्णवेळ लेखन हे उपजिविकेचं साधन होऊ शकत नाही असाही आक्षेप घेतला जातो. काही सन्माननीय अपवाद वगळता हे खरंही आहे. मात्र इतर असंख्य संकल्पाप्रमाणेच आमचा हाही संकल्प आहे की, गुणवत्तापूर्ण, कसदार लेखन करणारा लेखक सन्मानानं जगू शकेल इतपत काम आम्हाला उभं करायचं आहे. या सर्वात वाचकांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. 

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं तर, वाचकमित्रांनो, तुम्ही फक्त लढ म्हणा! नवा जिज्ञासू वाचकवर्ग तयार करणं आणि काही कारणांनी वाचनापासून दूरावत चाललेला वर्ग पुन्हा पुस्तकांकडं वळवणं हे आमचं, माझं जीवनध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छेनं त्यात यश मिळेल याची पूर्ण खात्री आहे.

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक'
७०५७२९२०९२