Pages

Saturday, September 24, 2016

प्रेरणादायी व्यक्तिंचे सुरम्य दर्शन

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणजे लेखणी आणि वाणीवर प्रभुत्व असणारे जबरदस्त व्यक्तिमत्त्व. ते जसे बोलतात, लिहितात तसेच माणसांची मनेही तितक्याच संवेदनशीलपणे टिपतात. मराठी साहित्य विश्‍वात अल्पावधितच आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या प्रा. जोशी यांनी असंख्य माणसे जोडली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा ठरावित अशा अनेक दिग्गजांनी मिलिंद जोशी यांच्यावर आपला जीव ओवाळून टाकला. अंतरिक कळवळ्यातून जडलेले हे नाते त्यांनी कायम जपले. त्यातल्या सतरा व्यक्तींची चरित्रे, त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये, उत्तुंग मनोर्‍यासारखे त्यांचे भावविश्‍व जिवंतपणे साकारण्यात प्रा. जोशी यशस्वी ठरले आहेत. एखादी कथा उलगडून दाखवावी त्याप्रमाणे संवादी शैलीत त्यांनी या लेखांची मांडणी केली. अनेक प्रस्थापित मासिकातून, दिवाळी अंकातून प्रकाशित झालेेले हे लेख पुण्यातील ‘कॉन्टिनेन्टल’ या मान्यवर प्रकाशन संस्थेने ‘ऐसी कळवळ्याची जाती’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणले आहेत.
‘माझे तुटले माहेर’ या पहिल्याच लेखात त्यांनी त्यांच्या मातोश्री सौ. वासंती जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. उस्मानाबाद जिल्ह्याचे पहिले खासदार कै. व्यंकटराव नळदूर्गकर यांच्या त्या कन्या. त्यांचे शिक्षण पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयात झालेले. अभिनय, गायन, वादन या कला अंगी असल्याने त्यांनी सातत्याने संकटावर स्वार होण्याचा धिरोदात्तपणा दाखविला. आईच्या अंतरीचा कलेचा झरा माझ्यात आपोआप आला, असे प्रा. जोशी या लेखात सांगतात. कराडला अभियांत्रिकीचे शिक्षण घेतानाच मिलिंद जोशी त्यांच्या वहिनीच्या सख्ख्या बहिणीच्या प्रेमात पडले. ही प्रेमकथा यशस्वीही झाली. लग्नानंतर त्यांच्या पत्नी मनिषाताईंनी बार्शीत रहावे व त्यांनी पुण्यात रहावे अशी त्यांची इच्छा होती. थोडे स्थिरस्थावर झाल्यावर पुण्यात घर करावे, अशी इच्छा त्यांनी आईला बोलून दाखविली; मात्र आईने ‘सेटलमेंट शब्दाला अंत नाही’ असे म्हणत त्या दोघांनाही पुण्यात पाठविले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. 10 ऑक्टोबर 2010 ला त्यांच्या आईंना देवाज्ञा झाली. तेव्हा त्या नवरात्रीच्या निमित्ताने होणार्‍या भजनाला जाण्याच्या तयारीत होत्या. त्या दु:खद घटनेनंतर लेखक पं. ना. कुलकर्णींनी जोशी यांना लिहिलेल्या सांत्वनपर पत्रात म्हटले आहे, ‘‘शारदीय नवरात्रात तुमच्या आईने जगदंबेच्या चरणी जीवनमाळ अर्पण केली. जगदंबेच्या कुंकवात सौभाग्याचे कुंकू मिसळले.’’
त्यांचे वडील श्री. गोविंदराव जोशी यांच्यावरील ‘मुळीचा झरा’ हा लेखही हेलावून टाकणारा, वाचकांना अंतर्मुख करणारा आहे. एसपी कॉलेजचे विद्यार्थी असलेल्या गोविंदराव तथा अप्पांनी आयुष्यभर अनेक खस्ता खाल्ल्या. शेतीपासून केटरिंगपर्यंत अनेक उद्योग केले. प्रतिकुल परिस्थितीत न डगमगता त्यांनी मुलांना शिक्षण दिलं. साहित्याची तर त्यांना उपजतच आवड. संपूर्ण हयातीत त्यांनी एकही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चुकवले नाही. साहित्यिक वारकर्‍याची हीच पताका प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या खांद्यावर घेतली. वडिलांच्या संस्काराच्या मुळीच्या झर्‍यातून प्रेरणा घेऊनच आज मी काम करतो, असे ते गौरवाने सांगतात.
त्यांच्या कमळा आजी म्हणजेच कमळाबाई व्यंकटराव नळदूर्गकर यांचे शब्दचित्रही त्यांनी दमदारपणे साकारले आहे. या सगळ्या लेखातून मिलिंद जोशी यांची झालेली जडण-घडण, त्यांच्यावरील संस्कार, तेव्हाचे वातावरण, चालीरिती, रूढी-परंपरा हे सारे काही समर्थपणे वाचकांसमोर येते.
मिलिंद जोशी यांच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव पडलाय तो तीन शिवाजींचा. प्राचार्य शिवाजीराव भोसले, ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत आणि भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम हे ते तीन शिवाजी. या तीनही शिवाजींची त्यांनी करून दिलेली ओळख अत्यंत प्रेरणादायी आहे. या तिघांनीही जोशी यांच्यावर भरभरून प्रेम केले. महाराष्ट्राच्या समाजमनाची मशागत करणारे हे शिवाजी त्यांच्या जीवनात आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. आजचे मिलिंद जोशी या तीन शिवाजींच्या परिसस्पर्शामुळे आपल्या पुढे आहेत, असे वारंवार वाटते. प्राचार्यांची नक्कल मिलिंद जोशी त्यांच्या बालपणापासून करत. अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बेस्ट कल्चरल ऍन्ड सोशल आऊट गोईंग स्टुडंट’ म्हणून मिलिंद जोशी यांना सुवर्णपदक मिळाले. त्यावेळी त्यांचे प्राध्यापक बी. ए. पाटील यांनी अचानकपणे जोशी यांना भोसले सरांची नक्कल करायला लावली. ती पाहून आणि ऐकून टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेेले भोसले सर त्यावेळी बोलताना म्हणाले, ‘‘मिलिंदचा मला हेवा वाटतो. कारण तो वक्ता आहे आणि अभियंताही आहे. मी वक्ता आहे पण अभियंता नाही. मला एक प्रश्‍न पडतो मिलिंद जर बोलत राहिला तर त्याच्या बांधकामाचं काय? त्यामुळे त्याने बांधकाम करता करता बोलावं आणि बोलता बोलता बांधकाम करावं किंवा ज्यामुळे समाजाचं बांधकाम होईल असं काहीतरी करावं.’’ प्राचार्यांचा हा आशावाद आणि अपेक्षा मिलिंद जोशी यांनी सत्यात आणला. हे काळाच्या ओघात दिसून आलेच. ‘मसाप’चे सर्वात तरूण कार्याध्यक्ष म्हणून त्यांचा लौकिक आहे. ‘सोबत’कार ग. वा. बेहेरे, सरसंघचालक गोळवलकर गुरूजी, प्रा. सोनोपंत दांडेकर, आचार्य अत्रे यांच्यासोबतचे भोसले सरांचे संबंधही या लेखातून सुस्पष्ट होतात. एका कार्यक्रमात सरसंघचालक आल्याचे त्यांना कळले तेव्हा ते गुरूजींजवळ जातात आणि ‘आपण इथे आहात हे कळले असते तर इथे येण्याचे धाडस मी केले नसते. मी पळून गेलो असतो.’ असे भोसले सर गुरूजींना सांगतात. त्यावर गुरूजी म्हणतात, ‘‘नागपुरकरांचा वेढा उठविणे भोसल्यांना शक्य झाले आहे का?’’ आचार्य अत्र्यांनी घरी बोलावून भोसले सरांचा सत्कार केला आणि ’’मला माझा वारसदार मिळाला’’ अशा शब्दात कौतुक केले. असे कितीतरी किस्से, संबंधित ज्ञानकेंद्रांची नाना रूपे, त्यांचे अनुभव मिलिंद जोशी यांनी या पुस्तकात इतके ताकतीने मांडले आहेत की वाचक निश्‍चितपणे मंत्रमुग्ध होतील. पर्वतप्राय व्यक्तिमत्त्वांच्या चिंतनशील जीवनाचा सारच मिलिंद जोशी यांनी अतिशय प्रगल्भपणे काढला आहे. नैतिकतेचे, संस्काराचे आदर्श रूजवतानाच वाचकांना माणूस म्हणून सशक्त बनविण्यासाठी हे लेख बाळगुटीचे काम करतील.
‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचाही त्यांना दीर्घकाळ सहवास लाभला. मिलिंद जोशी यांच्या शालेय जीवनात बार्शीत एका व्याख्यानमालेत ‘मृत्युंजय’कारांनी ‘कर्ण’ मांडला. त्यांचे व्याख्यान संपल्यावर जोशी त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या पाया पडून त्यांनी सावंत सरांना विचारले, ‘‘कृष्ण इतका पराक्रमी, कालियाला मारून टाकणारा, कंसाला मारून टाकणारा आणि तो एका पारध्याच्या बाणाने कसा मरतो?’’ त्यावर सावंत सरांनी जोशींचा एक हात धरून त्यांच्याकडे पाठ करायला लावली आणि एक जोराचा धपाटा देत म्हणाले, ‘‘प्रश्‍न छान विचारलास; पण थोडा मोठा झालास की उत्तर देईन.’’ पुढे जोशींचे आणि सावंत सरांचेही घरोब्याचे संबंध निर्माण झाले. सावंत सरांवरील ‘राजा माणूस’ हा या पुस्तकातील लेख पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा आहे. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात गेल्यानंतर सावंत सरांनी देह सोडला. त्यांच्या अखेरच्या काळातही मिलिंद जोशीच त्यांच्यासोबत होते.
‘साहित्य मंदिरातील नंदादीप’ या प्राचार्य राम शेवाळकरांवरील लेखात त्यांनी एक आठवण सांगितली. जोशी यांच्या कॉलेजमध्ये शेवाळकर सरांचे व्याख्यान होते; मात्र त्याला विद्यार्थ्यांची उपस्थिती बेताची होती. जोशींनी त्यांच्या प्रास्ताविकात ही खंत बोलून दाखविल्यानंतर शेवाळकर सर म्हणतात, ‘‘दारूच्या अड्ड्यावरती माणसं स्वत:हून जातात आणि दुधाचा रतीब मात्र घरोघरी जाऊन घालावा लागतो. या जगात ज्या ज्या वेळी चांगल्या घटना घडल्या त्या त्या वेळी फार कमी माणसं उपस्थित होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हा किती मावळे उपस्थित होते? कमी माणसं म्हणजे विचारमंथनाला पोषक वातावरण असं मी मानतो.’’
‘वाईटपणा विकत घेणारा माणूस’ या डॉ. ग. ना. जोगळेकर यांच्यावरील लेखात ते म्हणतात, ‘माणूस पराक्रमी असला तरी नियती क्रूर असते.’ ‘अंतर्नाद’ या मासिकात प्रा. जोशी यांनी डॉ. जोगळेकरांच्या विरूद्ध प्रतिक्रिया दिली. त्यावेळी जोगळेकरांनी ‘साहित्य संस्थांवर टीका करणं सोपं असतं. इथं या काम करा, अनुभव घ्या, मगच आपली मतं बनवा’ असं सांगितलं. तो सल्ला शिरसावंद्य मानत जोशी परिषदेत सक्रिय झाले. जोगळेकर सरांच्या विरूद्ध पॅनलमधून निवडून आले आणि त्यांचा विश्‍वास संपादन करत स्वत:ला सिद्धही केले. परिषदेत मोठे परिवर्तन घडवत आज तर ते परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.
डॉ. निर्मलकुमार फडकुले, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. द. भि. कुलकर्णी, कवी ग्रेस, भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम, ‘पोलीस चातुर्यकथा’कार व. कृ. जोशी, कवी जगदीश खेबुडकर, ज्योत्स्ना देवधर, सुनिता देशपांडे यांच्यावरील लेखही वाचकांना समृद्ध करणारे आहेत. ही सर्व माणसे प्रा. जोशी यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची असल्याने त्यांनी अंत:करणापासून त्यांच्याविषयी लिहिले आहे. त्यात भावनेचा ओलावा आहे. या सर्वांच्या सानिध्यात जशी मिलिंद जोशी यांची जडण-घडण झाली तशीच हे लेख वाचून वाचकांचीही होईल.
रा. चिं. ढेरे सरांनी या पुस्तकाची केलेली पाठराखण, रविमुकुल यांचे बहारदार मुखपृष्ठ, अशोक बोकील यांनी साकारलेली चित्रे यामुळे हे पुस्तक परिपूर्ण झाले आहे. यातील प्रत्येक लेख म्हणजे त्या त्या महापुरूषांचा जीवनपट उलगडून दाखविणारी कादंबरीच! फक्त शब्दांचे खेळ न करता वाचकांचे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची प्रा. मिलिंद जोशी यांची हातोटी या पुस्तकातून दिसून येते. प्रत्येकाने वाचावे, संग्राह्य ठेवावे, इतरांना आवर्जून भेट द्यावे असे हे आदर्शांचे बेट आहे. प्रा. मिलिंद जोशी यांच्या भावी लेखन प्रवासास आमच्या शुभेच्छा!

पाने - 210, मूल्य - 150
कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे (020-24337982)


घनश्याम पाटील, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Monday, September 19, 2016

कविता काही करा चला तर...!

मानवी स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्याला महत्त्वाच्या गोष्टींची किंमतच कळत नाही. अनेक अनमोल गोष्टी आपल्या जवळच असूनही आपण त्यांची कदर न करता ‘आणखी हवे’ चा हव्यास धरतो. उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्या शरीराच्या विविध अवयवांचे देता येईल. शरीराच्या कोणत्याही अवयवात बिघाड झाली तर आपण पुरते त्रासून जातो; मात्र याच अवयवांची निगा राखणे आपल्या गावीही नसते. आपण क्षणाक्षणाला श्‍वासोच्छ्वास घेतो पण या श्‍वासाचे महत्त्व आपल्या ध्यानात येत नाही. जेव्हा आपण शेवटचा श्‍वास घेतो तेव्हा आप्तेष्ट, मित्रमंडळी हळहळतात; मात्र आपल्याला त्याची पुसटशीही जाणीव नसते. शेवटचा श्‍वास घेईपर्यंत श्‍वासाचे महत्त्व कळू नये, हे दुर्दैवच खरे! 

हे वैश्‍विक सत्य अधोरेखित करण्याचे कारण म्हणजे कविता! माणसाच्या बारशापासून बाराव्यापर्यंत साथ देणारी कविता आपल्या खिजगणतीतही नसते. जन्मापासून मृत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर कविता आपल्याला साथ देते. ती अंगाईच्या माध्यमातून असेल, व्रतबंधाच्या श्‍लोकातून असेल, मंगलाष्टकाच्या माध्यमातून असेल किंवा अंत्येष्टीच्या मंत्राच्या माध्यमातून असेल! कविता आपली साथ सोडत नाही. देशभक्तीच्या गीतातून, पोवाड्यातून जसे क्रांतीचे अंगार फुलतात तशीच अनेक प्रेमगीतातून प्रीतही फुलून येते. प्रेमाचा आविष्कार व्यक्त करायचा असले किंवा विरहाच्या वेदना थोड्याशा हलक्या करायच्या असतील; प्रत्येक ठिकाणी कविताच गीत आणि संगीताची साथ घेऊन आपल्या मदतीसाठी धावून येते. 

ज्यांनी समाजाची मानसिक, बौद्धिक जडणघडण केली त्यातील बहुतांश काव्यग्रंथ आहेत. महाराष्ट्रातील कवितेचा मागोवा घेतला तर आपल्याकडे काव्याचे प्रमुख तीन टप्पे आढळून येतात. संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य हे ते तीन प्रकार आहेत. संत काव्यात संत ज्ञानेश्‍वर, जगद्गुरू तुकोबा, रामदास स्वामी अशा असंख्य विभुतींचा समावेश होतो. वामन पंडित, कवी मोरोपंत अशा महान कवींचा पंत काव्यात समावेश होतो; तर शाहीर राम जोशी, होनाजी बाळा अशांच्या कविता तंतकाव्यात मोडतात. यानंतर आपला ज्याच्याशी सर्वाधिक संपर्क येतो त्या आधुनिक मराठी काव्याचा टप्पा सुरू होतो. आधुनिक मराठी कवितेने कवितेला अध्यात्म, ईश्‍वरचिंतन अशा विषयांतून बाहेर काढले आणि निसर्ग, सामाजिक सुधारणा, संसारातील वैयक्तिक सुखदुःखे या व अशा विषयांचा अचूक वेध आधुनिक कविता घेऊ लागली. यासंदर्भात आधुनिक मराठी कवितेत काही ठिकाणी बदल झालेला दिसतो. काही कवींनी छंद, वृत्त, मात्रा यांच्या बेड्या तोडून अधिक मोकळ्या शैलीत म्हणजे मुक्तछंदात आपल्या मानसिक, बौद्धिक गोष्टींच प्रगटीकरण केलं. यात केशवसूत, राम गणेश गडकरी, बा. सी. मर्ढेकर आदींची कारकिर्द पाहता येईल. 

गेल्या तीस चाळीस वर्षापूर्वीपर्यंत कविता हा दुर्लक्षित आणि उपेक्षित प्रकार होता. अधूनमधून कवी संमेलने होत; पण गर्दी रोडावलेली! ‘कवितेला मानधन द्यायच असतं’ ही संकल्पनाच त्यावेळी रूजलेली नव्हती. अशा प्रतिकूल काळातही लोककवी मनमोहन नातू, रॉय किणीकर अशा कविंनी असंख्य हालअपेष्टा सहन करत कवितेचा झेंडा डौलात फडकावला. लोककवी मनमोहनांचा एक किस्सा याठिकाणी आवर्जून नमूद करावासा वाटतो. अफाट प्रतिभेचे किमयागार असलेले मनमोहन समाजाकडून आणि राज्यकर्त्यांकडून कायम उपेक्षित राहिले. ‘उद्याचा कालीदास अनवाणी जात असेल तर त्यात अब्रु त्याची नाही, राजा भोजाची जाते’ असे ठणकावून सांगणारे मनमोहन कधीही धनप्राप्तीच्या मागे लागले नाहीत. एकेदिवशी सकाळी ते त्यांच्या घराबाहेर आंघोळीसाठी पाणी तापवत बसले होते. त्यांच्या अंगावर त्यावेळी मोजकेच कपडे होते. त्यांच्या घरासमोरून तेथील स्थानिक नगरसेवक त्यांच्या बगलबच्यासह चालले होते. उघडेबंब बसलेल्या मनमोहनांना पाहून त्यांची चेष्टा करायची लहर नगरसेवकाला आली. ते म्हणाले, ‘‘काय कवीराज? अंगावर कपडे का घातले नाहीत?’’ मनमोहन म्हणाले, ‘‘घालावेसे वाटले नाहीत, म्हणून घातले नाहीत.’’ नगरसेवकाने चेष्टेने विचारले, ‘‘घालावेसे वाटले नाहीत, की घालण्यासाठी कपडेच नाहीत?’’ त्याचा अहंकाराचा सूर ध्यानात आलेल्या मनमोहनांनी तिथल्या तिथे चार ओळी ऐकवल्या. ते म्हणाले, ‘‘राजकीय पुरूषांची कीर्ती 
मुळीच मजला मत्सर नाही 
आज हुमायू बाबरपेक्षा 
गालिब हृदय वेधित राही’’ 
याला म्हणतात प्रतिभेचा स्फोट! हुमायू आणि बाबराचे दाखले आदर्श 
म्हणून कोणीही देत नाही मात्र कलावंत असलेले गालिबमियॉं त्यांच्या काव्यातून अजरामर झाले, ही वस्तुस्थिती आहे. 

प्रतिभेलाच आपले सामर्थ्य मानणार्‍या या कवींनी मराठी कविता जगवली; मात्र व्यवहाराच्या पातळीवर ते सपशेल अपयशी ठरले. आर्थिक चणचण असल्याने आलेला दिवस कसाबसा ढकलत कुटुंबाचा गाडा ओढणे त्यांच्यासाठी कष्टप्रद आणि प्रचंड आव्हानात्मक होते. मात्र आधुनिक मराठी कवितेने हे दिवस बदलले. आता कविंनाही सुगीचे दिवस आले आहेत. अनेक कवींच्या कवितासंग्रहाची गावपातळीवरही चांगली विक्री होऊ लागली आहे. या विक्रमी विक्रीतून आणि शहराबरोबरच खेड्यापाड्यातही होणार्‍या विविध काव्यविषयक उपक्रमातून चांगली अर्थप्राप्ती होऊ लागली आहे. प्रवीण दवणे, आमचे मराठवाड्यातील प्रा. इंद्रजित भालेराव, अशोक नायगावकर, विसुभाऊ बापट, संदीप खरे यांच्यासारखे अनेक कवी, गीतकार हजारो रूपये मानधन घेतात आणि लोकही त्यांना सन्मानाने काव्यविषयक उपक्रमांना सातत्याने बोलावतात. इंद्रजित भालेरावांनी कवितेच्या मानधनातून परभणीत हक्काचे घर बांधल्याचे आदर्श उदाहरण आम्हास ठाऊक आहे. 

ही चांगली परिस्थिती अधिक चांगली होण्यासाठी मात्र काही गोष्टी अधिकाराने मांडाव्याशा वाटतात. डार्विनने सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे ‘जो लायक आहे तोच जगतो.’ त्यामुळे या स्पर्धेच्या युगात कवींनी आपल्या कवितेचा कस आणि सादरीकरणाचा दर्जा उत्तम असावा याची काळजी घ्यावी. लेखन आणि सादरीकरण या दोन्ही निकषांवर अव्वल उतरणार्‍या कविता मोजक्याच असतात. काही कविता वृत्तपत्रातून, मासिकातून, दिवाळी अंकातून किंवा संग्रहातून वाचायलाच चांगल्या वाटतात; तर काही कविता प्रभावी सादरीकरणाने रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवता येतात. मात्र या कविता छापील स्वरूपात वाचताना त्या अगदीच सामान्य वाटतात. असे का होते आणि अशा परिस्थितीत काय करावे, हे ज्याने त्याने आपापल्या बुद्धिप्रमाणे ठरवावे. कवींचे विविध विषयांवर भरपूर वाचन असणे हे तर आवश्यकच आहे. आपले शब्दसामर्थ्य वाढविण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. सध्या अनेक छोटीमोठी काव्यसंमेलने, कवितांचे एकपात्री आणि समूह कार्यक्रमही मोठ्या संख्येने होतात. अशा संमेलनांना हजेरी लावून अन्य कवींच्या कविता ऐकणे, त्यांना दाद देणे, त्यांच्या कवितेचे आणि सादरीकरणाचे बारकावे समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. कवींनी इतरांच्या काव्यवाचनाला हजेरी न लावणे ही व्यक्तिशः आम्हाला मोठी नैतिक विकृती वाटते. 

गटबाजी आणि तटबाजीला थारा न देता जिथे जिथे सद्गुणांचा स्फोट आहे तिथे तिथे हजर राहून अन्य कवींना मोठ्या मनाने दाद ही दिलीच पाहिजे. ‘चपराक’च्या वतीने आम्ही गेल्या दहाबारा वर्षात अनेक काव्यविषयक उपक्रम राबवले. त्यात प्रामुख्याने अनेक कवी संमेलनांचे आयोजन, राज्यस्तरीय काव्यस्पर्धा, नवोदित कवींचे काव्यसंग्रह प्रकाशित करणे आणि त्यांचे समारंभपूर्वक प्रकाशन सोहळे घेणे, कवीवर, कवितेवर चर्चा घडवणे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कवींनाही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सांस्कृतिक वातावरण सुदृढ, पोषक ठेवणे आदींचा समावेश आहे. आम्हाला तर असेही वाटते की, सध्या नवोदित कवींनी स्वतःचे व्यासपीठ स्वतःच निर्माण करावे. शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, बाजार आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी पथनाट्याच्या धर्तीवर कविता वाचनाचे कार्यक्रम व्हावेत. या कवितांचे एखादे कडवे कानावर पडल्यानंतर संपूर्ण कविता ऐकल्याशिवाय ऐकणार्‍याचे पाऊल पुढे पडणार नाही, इतक्या ताकतीच्या त्या ओळी असाव्यात. ब्लॉग, वदनपुस्तिका (फेसबूक), ट्विटर अशा माध्यमातून उगीच काहीतरी रतीब टाकून लोकांचे कवितेविषयीचे मत आणखी कलुषित करण्याऐवजी दर्जेदार कविता द्याव्यात. लोकांना कविता या साहित्याच्या सर्वोत्कृष्ट प्रकाराविषयी आणखी जिव्हाळा वाटायला हवा. कवी आणि कवितांविषयी आदराची भावना निर्माण व्हावी, यासाठी सर्व कवींनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. 

आपल्या रचना विविध नियतकालिकांना आणि वृत्तपत्रांना पाठवूनही प्रकाशित न झाल्याने उदास असलेले अनेकजण आम्हास भेटतात. मात्र गुणात्मक दर्जा उत्तम असूनही जागेची मर्यादा असल्याने अनेक संपादकांना इच्छा असूनही अनेकवेळा काही चांगले साहित्य देता येत नाही. त्यामुळे कविता छापून आली नाही, याचे शल्य उराशी न कवटाळता आणखी चांगले काव्यलेखन करावे. गुणवत्ता आणि दर्जा असेल तर कुणाचाही बळी जाणार नाही, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. प्रकाशमार्गावरच्या सर्व शब्दयात्रींकडून भविष्यात आणखी चांगल्या, आशयसंपन्न, अर्थपूर्ण कविता ऐकायला, वाचायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो! 

-घनश्याम पाटील
संपादक 'चपराक', पुणे 
 ७०५७२९२०९२

Saturday, September 17, 2016

मृत्युंजयी शोकांतिका!

छत्रपती संभाजीराजे म्हणजे शौर्याचं प्रतीक! शिवाजी सावंत, विश्‍वास पाटील अशा काही लेखकांनी मांडलेला संभाजी आपण वाचला, अनुभवला. 1 फेबु्रवारी 1689 ला संभाजीराजांना संगमेश्‍वरात कैद करण्यात आले. 11 मार्च 1689 ला त्यांची व कवी कलशाची हत्या करण्यात आली. या दोघांच्याही अटकेपासून हत्येपर्यंतचा प्रवास चिरवेदनांचा आहे. अनंत यातना देऊन त्यांचा शिरच्छेद केला गेला. या 39 दिवसातील संभाजीराजांच्या भावनांची दखल आजपर्यंत कोणीही घेतली नव्हती. ‘ते 39 दिवस’ धावत्या आणि प्रभावी शैलीत, इतिहासाशी प्रामाणिक राहत वाचकांसमोर आणण्याचे काम केले आहे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक संजय सोनवणी यांनी. सोनवणी यांची ‘मी मृत्युंजय मी संभाजी’ ही कादंबरी पुण्यातील ‘प्राजक्त प्रकाशन’च्या जालिंदर चांदगुडे यांनी प्रकाशित केली आहे. अवघ्या 125 पानात संभाजीराजांच्या भावभावना जिवंतपणे साकारण्यात सोनवणी यांना यश आले आहे. या कादंबरीत एका सशक्त चित्रपटाची कथाबिजे आहेत. या विषयावर नाटक आल्यास तेही रंगभूमीवर विक्रमी ठरेल. संभाजीराजे म्हणजे साक्षात मृत्युवरही मात करणारे वीरपुरूष! घनघोर जंगलात असलेल्या, दर्‍याखोर्‍यांनी वेढलेल्या संगमेश्‍वर या सुरक्षित ठिकाणी त्यांना अटक झाली आणि त्यांचा मृत्युकडचा प्रवास सुरू झाला. मोगलांची अचानक पडलेली धाड, राजांना व कवी कलशाला झालेली अटक आणि पुढील 39 दिवसातील प्रवास वाचताना वाचक भारावून जातात. ‘झपाटलेपण’ हे तर लेखक संजय सोनवणी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग. वाचकही ही कादंबरी वाचताना झपाटून जातात. शिर्क्यांची खोड मोडून राजे संगमेश्‍वरला आले होते. संगमेश्‍वर दुर्गम आहे, दर्‍याखोर्‍यात आणि अरण्यात वेढलेले आहे, म्हणूनच नव्हे तर येथे येणारे मार्ग पूर्ण सुरक्षित केले गेलेले आहेत म्हणून सारेजण निगुतीत होते. मात्र स्वराज्याच्या शत्रुंनी, रायगडावरील मुत्सद्यांनी, काही घरभेद्यांनी कटकारस्थाने केली आणि कवी कलशासह संभाजीराजांना अटक झाली. सोनवणी लिहितात, ‘मानवी विश्‍वासाला सीमा असतात. स्वप्नातही कल्पना येणार नाही अशी आकस्मित संकटे माणसावर येतात. क्षणार्धात होत्याचे नव्हते होते. संभाजीराजे म्हणजे आजवर अनवरत संघर्षांच्या तांडवांना छाताडावर झेलत स्थिरचित्त राहणारा साक्षात सह्याद्रीचा पहाड! पण दुष्टबुद्धीचे लोक विरोधात एकत्र आले की पहाडांनाही गलितगात्र व्हावे लागते हा मानवी जगाचा नियम! तो चिरकालिक नियम बनावा हे मानवजातीचे दुर्भाग्यच नव्हे काय?’ संभाजीराजांना अटक झाल्यानंतरही त्यांना सुटकेची आशा वाटत असते. त्यांच्या सहकार्‍यांवर त्यांचा विश्‍वास होता. कात्रज, शिरवळ, सातारा कुठूनतरी आपले शूरवीर मराठे चाल करून येतील, शत्रुचा नायनाट करून आपल्या बेड्या काढून टाकतील असे त्यांना वाटत राहते. मराठ्याच्या राजाला अत्यंत अपमानास्पदरित्या फरफटत नेले जाते; मात्र कुणीही मराठे त्यांना सोडवायला येत नाहीत. हातापायात बेड्या, चेहर्‍यावर पट्टी बांधलेली... संभाजीराजांना कुठे नेत आहेत हेही त्यांना ठाऊक नसते! या मानसिकतेतही त्यांची असहाय्यता, अगतिकता, उफाळून येणारा संताप, ठणकणार्‍या वेदना, आप्तस्वकियांकडून झालेली फसगत, त्यातूनच आलेली बेफिकीरी, मृत्युला दिलेले आव्हान असा सारा आशावादाकडून हतबलतेकडचा झालेला प्रवास वाचताना वाचकांच्या अंगावरही शहारे येतात. त्यांचे रक्त तापू लागते. मराठ्यांनीच ‘मराठा’ राजाची केलेली फसवणूक मांडणारा ‘काळाकुट्ट इतिहास’ आजच्या मराठ्यांनी जरूर वाचला पाहिजे. आपण मृत्युंजयी संभाजीराजांचे वारसदार आहोत की तेव्हाच्या गद्दार आणि ‘घरबुडव्या’ मराठ्यांचे वारस आहोत हे आता तपासून पाहिले पाहिजे. कटकारस्थाने रचत संभाजीराजांना मृत्युच्या दरीत ढकलणारे ब्राह्मण नव्हे तर तत्कालीन मराठेच होते हे सत्य या कादंबरीद्वारे अधोरेखित होते. संगमेश्‍वरातून बाहेर पडल्यानंतर संभाजीराजे कवी कलशाला उद्देशून वाचकांशी संवाद साधतात. ओघवती भाषाशैली आणि जेधे शकावली, साकी मुस्तैदखान (मासिरे आलमगिरी), ईश्‍वरदास नागर (फुतहाते आलमगिरी) असे अस्सल संदर्भ देत संजय सोनवणी यांनी ही कलाकृती फुलवली आहे. त्यासाठी त्यांनी आत्मनिवेदनात्मक शैली वापरल्याने संभाजीराजे त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उलगडून दाखवतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे स्वराज्य, संभाजीराजांच्या बालपणीच्या आठवणी, महाराजांची आग्रा भेट, महाराजांच्या सुचनेनुसारच त्यांच्या विरोधातही केलेल्या लढाया, सत्तालोलूपांनी आखलेली आणि दुर्दैवाने तडीस गेलेले डावपेच, औरंगजेब, मोगल यांना दिलेल्या झुंजी, संभाजीराजांच्या अटकेनंतर राजारामाचा झालेला राज्याभिषेक, येसूबाईंच्या आठवणी हे सारे मुळातून वाचण्यासारखे आहे. खुद्द संभाजीराजे असहाय्यपणे ही सारी परिस्थिती वाचकांसमोर मांडतात असेच ही कादंबरी वाचताना वाटते. संभाजीराजांचे भावविश्‍व साकारण्यात संजय सोनवणी पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत. संवादी भाषा, विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, संतोष घोंगडे या तितक्याच मनस्वी कलाकाराच्या कुंचल्यातून साकारलेले जबरदस्त मुखपृष्ठ, सुबक आणि आकर्षक छपाई हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. संभाजीराजे मावळ्यांना उद्देशून म्हणतात, ‘‘अरे या... लढा मर्दाप्रमाणे! आमची पर्वा नका करू! पर्वा करा आबासाहेबांनी तुम्हाला मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याची! आम्ही मेलो तर राजारामाला गादीवर बसवा... औरंग्याला नष्ट करा... दिल्लीवर सत्ता गाजवा! या आभाळातून आम्ही कवतुकाने तुमचे सोहळे पाहू! अरे देह नश्‍वर आहे! गडबडून जाऊ नका. एक संभा पडला तर या मातीतून लाखो संभा पैदा होतील. होय... ही आमची महाराष्ट्रभूमी आहे!’’ मात्र महाराजांचा हा आशावाद सपशेल खोटा ठरतो. वेदनांच्या काळडोहात लोटणारे क्षण त्यांना अस्वस्थ करतात. वाचकही ते वाचून सुन्न होतात. संभाजीराजे जिवंत असताना राजारामांचा झालेला राज्याभिषेक त्यांच्या भावनांना साद घालतो. ‘आम्ही मुक्त असू, स्वराज्याचे पाईक असू’ हा आशावाद संपवतो. राजांना साखळदंडात बांधून बळजबरीने ओढत नेले जाते. त्यांच्या काळजाच्या चिंध्या होतात. वेदनांचा कल्लोळ उसळतो. त्यांच्या अंगावर विदुषकी कपडे घातले जातात. त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यांना उंटावर बसवून, नगारे वाजवत धिंड काढली जाते. बघ्यांची गर्दी जमते. लोक हसतात, चित्कारतात. एका राजाला गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाते. मृत्यू अटळ आहे हे समोर दिसू लागते. तरीही त्यांना सोडवण्याचे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त अंधारच असतो. ‘‘संभा, उद्या सकाळी तुझे हात-पाय तोडून मग मस्तक छाटायची आज्ञा आलमगिरांनी दिली आहे. तुझा मित्र कलशालाही हीच सजा फर्मावण्यात आली आहे’’ असे त्यांना सांगण्यात येते. तेव्हा उद्विग्नपणे संभाजीराजे म्हणतात, ‘‘मरणा... ये लवकर. स्वागत आहे तुझे! पण लक्षात ठेव... आम्ही मृत्युंजय आहोत. जिवंतपणे कैकदा मेलो आम्ही. कधी आप्तांच्या हातून, कधी घरभेद्यांच्या हातून. आताचा हा मृत्यू म्हणजे आमच्या मृत्युवृक्षाला आलेले अंतिम फळ. आम्ही आनंदी आहोत कारण आम्ही तुझ्यावरही जीत मिळवणार आहोत.’’ संजय सोनवणी हे इतिहास संशोधक आहेत. त्यांची जवळपास 85 पुस्तके प्रकाशित आहेत. अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘रेफरन्स बुक’ म्हणून ज्यांची पुस्तके ठेवलीत असे ते एकमेव मराठी लेखक आहे. त्यांच्या कादंबर्‍यानी इतिहास घडवला. भल्याभल्या इतिहासकारांना हजारो पानात जे मांडता आले नाही ते ‘मी मृत्युंजय मी संभाजी’ या कादंबरीत त्यांनी केवळ सव्वाशे पानात मांडले आहे. एका जाज्ज्वलनतेजस राजाची शोकांतिका त्यांनी अत्यंत प्रभावी शैलीत मांडली आहे. भाषेच्या पातळीवर हे पुस्तक सामान्यात सामान्य वाचकालाही वाचावेसे वाटेल. इतिहासापासून प्रेरणा घेतानाच संभाजीराजांसारख्या महापुरूषाची झालेली उपेक्षा, अवहेलना, फितुरी हे सारे समजून घेतले पाहिजे. केवळ संभाजीराजांचे नाव घेऊन ‘बी’च काय कोणत्याही ‘ग्रेड’चे राजकारण करणे म्हणजे मराठ्यांची फसवणुकच आहे. इतिहासापासून काही बोध घेण्याऐवजी आजही तोच प्रकार खुल्लमखुल्ला सुरू आहे. कृतघ्नतेची परिसिमा ओलांडणार्‍यांचे बुरखे सोनवणी यांनी या कादंबरीत टरटरा फाडले आहेत. मृत्युला आव्हान देऊन पराक्रमाची परंपरा तेवत ठेवणारी आणि प्रत्येक मराठी माणसात नवचैतन्याचे स्फूल्लिंग पेटवणारी संजय सोनवणी यांची ही कादंबरी प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. पाने - 125, मूल्य - 140 
प्रकाशन - प्राजक्त प्रकाशन, पुणे (9890956695) 

- घनश्याम पाटील, 
संपादक, 'चपराक', पुणे ७०५७२९२०९२ 

Thursday, September 8, 2016

राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवाच!



कोण लेकाचा कोणाची देशसेवा पाहतो?
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो!
लोककवी म. भा. चव्हाण यांच्या या ओळी. समाजमाध्यमांच्या लाटेमुळे स्वयंघोषित देशभक्तांची आपल्याकडे मुळीच वानवा राहिली नाही. एकमेकांची आरती ओवाळणारे हे महाभाग ‘देशभक्त’ ठरवले जात आहेत. खरेतर एकेकाळी महाराष्ट्र ही संतांची भूमी होती. आता ती चोर, लफंग्यांची, लुच्च्यांची झालीय! यात सत्ताधारी आणि विरोधक ‘आपण सारे भाऊ, अर्धे अर्धे खाऊ’ याप्रमाणे वागतात. महाराष्ट्र सध्या दोलायमान परिस्थितीतून जात आहे. अर्थात देशातच ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे चित्र सार्वत्रिक झालेय असे म्हणायला मोठा वाव आहे.
साधारण दोन वर्षापूर्वी देशात आणि नंतर राज्यातही सत्तांतर झाले आणि लोकांच्या लोकशाहीविषयीच्या आशा पल्लवीत झाल्या; मात्र ‘आगीतून उठून फुफाट्यात’ यापेक्षा काही वेगळे चित्र दिसत नाही. ‘इंग्रज गेले आणि कॉंग्रेसवाले आले’ अशी परिस्थिती होती. आता ‘कॉंग्रेसवाले गेले आणि भाजपवाले आले’ असेच म्हणावे लागेल. गेल्या काही काळात बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, आर. आर. पाटील यांच्यासारखे राजकारणातले हिरे गेले आणि उरलेल्या कोळश्यांनी त्यांचा रंग दाखवायला सुरूवात केलीय.
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख असे काही कर्तबगार मुख्यमंत्री यापूर्वी आपल्याला लाभले. नंतरच्या काळात ‘हसमुखराय’ अशी ओळख असलेले सुशीलकुमार शिंदे आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा आवाका माहीत असलेले, पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी ताकतीने पेलणारे पृथ्वीबाबाही मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाणांची ‘आदर्श’ कामगिरी आपण बघितली. पुढे सत्ता गेल्यावरही त्यांना त्याबद्दल प्रदेशाध्यक्षपदाची ‘बक्षिसी’ मिळाली. शरद पवार यांनीही महाराष्ट्राचे नेतृत्व करून देशभरात आपली छाप उमटवली. या सगळ्यात देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या प्रतिमेचे मुख्यमंत्री आपल्याला मिळाले.
खरेतर यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवार यांच्यापर्यंत जो कोणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्याचे नाव देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असते. हा इतिहास लक्षात घेता यावेळी नितीन गडकरी यांच्यासारखा बलाढ्य नेता राज्याचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा होती. मात्र गडकरी ‘स्वयंप्रभावित’ नेते असल्याने तुलनेने नवख्या देवेंद्र यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली गेली. सत्तेवर आल्यानंतर हा माणूस काहीतरी भरीव, विधायक करेल असे वाटत होते; मात्र अपेक्षांना फाट्यावर मारत फडणवीसांनी श्रीहरी अणेंसारख्या लोकांना पुढे करत वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरू केली. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे अशा पक्षांतर्गत तगड्या लोकांचे खच्चीकरण करण्यातच त्यांची कारकीर्द जातेय.
सध्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. गृहमंत्रीपदही त्यांच्याकडेच आहे. सत्तेचा हव्यास असेल किंवा आत्मकेंद्री वृत्ती असेल; त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण ते करत नाहीत. त्यांच्या खात्याला ते न्याय देऊ शकत नाहीत. देवेंद्र यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हे आपल्या पोलीस यंत्रणेचे जेवढे अपयश आहे तेवढेच किंबहुना काकणभर अधिक अपयश देवेंद्र फडणवीसांचे आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले असताना यांना फक्त स्वतःची प्रतिमा जपण्याचे पडले आहे. त्यातून ते बाहेर पडतच नाहीत.
सोलापूरमधील ज्योती खेडकर या तेवीस वर्षीय तरूणीचे तुकडे करून तिला जाळण्यात आले. चार महिने उलटूनही या प्रकरणातील आरोपींवर काहींच कारवाई झाली नाही. ज्योती खेडकरच्या आईवडिलांनी आत्महत्येचा इशारा दिला; मात्र आरोपींची नावे घेत तक्रार दाखल करून घेण्याचे सौजन्यही पोलिसांनी दाखवले नाही. याबाबतची माहिती मिळताच माझे सहकारी सागर सुरवसे यांनी वस्तुस्थिती पुढे आणणारी बातमी ‘चपराक’च्या माध्यमातून वाचकांसमोर आणली. आम्ही ‘मुख्यमंत्री महोदय, ढेरीबरोबरच गुन्हेगारीही कमी करा’ हा तिखटजाळ अग्रलेख लिहिला. परिणामी गृहराज्यमंत्र्यांनी सोलापूरच्या पोलीस अधिक्षकांना या प्रकरणातील आरोपींना अटक करून तपासाच्या सूचना दिल्या. सुदर्शन गायकवाड, बंडू गायकवाड आणि सुहास गायकवाड या तीन आरोपींना सोलापूर पोलिसांनी तब्बल तीन महिन्यांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत सोलापूरचे पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी सांगितले की, मृत ज्योतीचा आणि खेडकर कुटुंबीयांचा ‘डीएनए’चा अहवाल अजून आला नसल्याने यातील आरोपींना अटक केली नव्हती. नावात ‘वीर’ आणि आडनावात ‘प्रभू’ असूनही हा माणूस इतका कमकुवत आहे. अत्याचार आणि खुनासारखी गंभीर घटना घडूनही हे लोक कोणत्या तंद्रीत असतात हे देवेंद्र फडणवीस यांनाच ठाऊक! राज्यात ‘डीएनए’ तपासणीची केवळ एकच लॅब असणे हेही आपल्या यंत्रणेचे मोठे अपयश आहे.
राज्यातील अनेक पोलीस स्थानकांच्या गाड्या बंद आहेत. ज्यांच्या चालू आहेत त्यातीलही अनेकजण ठरवून त्यांचा वापर करत नाहीत. म्हणजे गाड्यांसाठी लागणार्‍या पेट्रोलचा खर्च सरकारकडून उकळला जातो. गाड्यांचा ‘मेंटेनन्स’ वसूल केला जातो; मात्र या गाड्यांचा वापर तपास यंत्रणेसाठी केला जात नाही. जो आरोपी आहे किंवा फिर्यादी आहे त्यांच्याकडून गाड्या मागवणे, पेट्रोलचा खर्च घेणे असे प्रकार अनेक ठिकाणी सर्रासपणे सुरू आहेत. ग्रामीण महाराष्ट्र तर सोडाच पण पुण्यासारख्या महानगरातही अनेक आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी कोठड्याच नाहीत. एकाच इवल्याशा कोठडीत पाच-पंचवीस आरोपींना एकत्र ठेवले जाते. तेथील शौचालये म्हणजे तर साक्षात नरकच! तिथेच पिण्याच्या पाण्याचा नळ असतो. विशेषतः महिला आरोपींना अटक केली तर फार विचित्र परिस्थिती असते. एखाद्या बाईला एखाद्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतले आणि तिला कोठडी झाली तर तिला आणि त्या परिसरातील पकडलेल्या वेश्यांना, छापा मारून पकडलेल्या ‘कॉल गर्ल्स’नाही एकत्रच ठेवले जाते. मानवी हक्क आयोगवाले या सगळ्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत.
नुकतेच मुंबईतील एक घटना वाचनात आली. एका बाईने एका सावकाराकडून दहा हजार रूपये व्याजाने घेतले. सतत तगादा लावूनही पैसे परत न मिळाल्याने त्या सावकाराने त्या आईच्या मदतीनेच तिच्या मुलीवर पाच महिने वेळोवेळी बलात्कार केला. या प्रकरणात ती आई स्वतःच्या मुलीला आणि त्या सावकाराला एका खोलीत डांबून बाहेरून कुलूप लावायची. 
दुधावरी आला बुरा, तिले साय कधी म्हणू नये
जिची ममता आटली, तिले माय कधी म्हणू नये!
या बहिणाबाईंच्या ओळी या ठिकाणी आठवतात; मात्र यापेक्षा मोठे क्रौर्य जगात खरेच असू शकते का?
सध्या मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. काय तर म्हणे मूक मोर्चा. कशासाठी? तर कोपर्डीतील अत्याचारित बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी! यांची मागणी काय? तर ‘मराठ्यांना आरक्षण द्या आणि ऍट्रॉसिटी रद्द करा...’ म्हणजे अत्याचार, आरक्षण आणि ऍट्रॉसिटी याचा काय संबंध? (कोपर्डी प्रकरणातील गुन्हेगार ‘दलित’ होते यासाठीचा हा कांगावा.) समाजमाध्यमात तर याविषयी अनेक संदेश फिरत आहेत. ‘पहिल्यांदा आणि शेवटचेच मराठा मूकपणे रस्त्यावर उतरलाय.. यानंतर मराठा रस्त्यावर आला तर शस्त्र घेऊनच येईल...’ अशा आशयाचे अनेक संदेश समाजमाध्यमात सातत्याने दिसत आहेत. त्यात शरद पवार यांच्यासारखे ‘जाणते’ नेते आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. हे सारेच चिंताजनक आहे. मुख्यमंत्री मात्र सगळेच मूकपणे पाहत आहेत. ‘ऍट्रॉसिटी’चा अनेक ठिकाणी गैरवापर करण्यात येतोय, हे सत्य लक्षात घेऊन त्याविरूद्ध कायदेशिर लढाई लढायला हवी. अशा एखाद्या घटनेचे ‘भांडवल’ कोणीही करू नये.
धुळ्यात तर भांडणे सोडवायला गेलेल्या पीएसआयला लोकांनी जाम चोप दिला. त्यांना अक्षरशः पळवू पळवू मारला. खाकीतील एका कर्तव्यदक्ष पोलिसाला मारल्याबद्दल 135 जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे. मुंबईत विलास शिंदे या वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 24 ऑगस्ट 2016 रोजी असाच प्रकार बारामतीतही घडला. तेथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सागर देवकाते-पाटील आणि त्याच्या साधारण 15-20 सहकार्‍यांनी अर्जुन व्यवहारे, राजेश गायकवाड आणि व्ही. एस. वाघमोडे या पोलीस कर्मचार्‍यांना  बेदम मारहाण केली. हातात तलवार घेऊन ते त्याठिकाणी वाढदिवस साजरा करत होते. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत त्यांना त्यासाठी अडवले असता त्यांनी ‘यांना मारून टाका, कॉलेजशी यांचे काय देणे-घेणे’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली, शिवीगाळ केली व तेथील सिमेंटच्या ब्लॉकने त्यांना मारहाण केली. या जमावाने पोलिसांच्या गाडीचीही मोडतोड केली. यात सदर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहेत. ठाण्यात एका पोलीस निरीक्षकांना पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. जालण्यात एका भाजप आमदारांच्या त्रासाला कंटाळून कुटुंबियांसह आत्महत्या करण्याचा इशारा एका पोलीस उपनिरिक्षकांनी दिलाय... राज्यात खुद्द पोलिसही सुरक्षित नसल्याने मुख्यमंत्र्यांकडे असलेले गृहखाते चव्हाट्यावर आले आहे. वाईत डॉ. संतोष पोळ या विकृताने अनेक खून करून ते मृतदेह चक्क आपल्या फार्महाऊसमध्येच गाडले. हे निकोप लोकशाहीचे लक्षण आहे का? इथे सामान्य माणूस सुरक्षित नाही, समाजातील विचारवंत सुरक्षित नाहीत, लेखकांवर हल्ले होतात, पोलिसांना बदडले जाते; तरी मुख्यमंत्री ढिम्मच! देवेंद्र फडणवीस, जरा लाज बाळगा!! तुमच्या अकार्यक्षमतेसाठी, तुमच्या प्रतिमेसाठी, तुमच्या महत्त्वाकांक्षेसाठी, तुमच्या सत्तास्पर्धेसाठी सामान्य माणसाला आणि पर्यायाने राज्याला वेठीस धरू नका!
सगळीकडे अंधाधुंदी माजली असताना त्रस्त जनता जर खर्‍याअर्थी रस्त्यावर उतरली तर सगळ्यांनाच पळता भुई थोडी होईल. अजूनही इथल्या न्याय यंत्रणेवर, प्रशासनावर, माध्यमांवर आणि मुख्यत्त्वे सत्ताधार्‍यांवर लोकांचा विश्‍वास आहे. तो गमावला तर धुळ्यात जी अवस्था पोलिसांची झाली तीच या सर्व घटकांची होईल. मुख्यमंत्री म्हणजे ‘औट घटकेचा राजा’ असतो. कायदा आणि न्याय व्यवस्था अजून आपल्याकडे मजबूत आहे; मात्र लोकशाहीचे असे धिंडवडे खुलेआमपणे निघत असतील तर येणारा काळ भयंकर असेल.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाची मागणी केली आहे. जर शिवसेनेला गृहखाते दिले तर ते निश्‍चितपणे गुन्हेगारी आटोक्यात आणू शकतील. आपल्या सहकार्‍यांपैकी एकहीजण लायकीचा वाटत नसेल किंवा त्यांच्यावर तुमचा विश्‍वास नसेल तर देवेंद्रजी शिवसेनेकडे गृहखाते द्याच! त्याचा तुमच्या सरकारलाच फायदा होईल. तुमची विश्‍वासार्हता नक्की वाढेल! आणि जाता जाता मराठा समाजातील फुरफुरत्या घोड्यांना सांगावेसे वाटते, बाबांनो, सोलापूरात ज्या मुलीचे तुकडे करून तिला जिवंत जाळण्यात आले तिही ‘मराठा’च होती आणि तिच्यावर अत्याचार करणारेही ‘मराठा’च होते. त्याची साधी दखलही कुणाला घ्यावीशी वाटली नाही. ‘जातीसाठी खावी माती’ या ध्येयाने तुमच्या ‘स्वार्था’चे राजकारण करताना किमान थोडीफार नैतिकता ठेवा. ही ‘स्टंटबाजी’ फक्त तुमच्या ‘पुढार्‍यांचे’ कल्याण करेल. यात सामान्य मराठा माणसाचे काहीच हित नाही. भांडारकर इन्स्टिट्यूटची मोडतोड करणारे, तिथला दुर्मीळ ठेवा जाळून टाकणारे आज भीकेला लागलेत. मराठवाड्यातून पुण्यात कोर्टाच्या चकरा मारण्यातच त्यांचे तारूण्य वाया जातेय. कर्जाने पैसे काढून ती पोरे पुण्यात तारखांना येतात. ज्यांनी त्यांना चिथावणी दिली त्यापैकी कुणी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. एकदा त्यांची भेट अवश्य घ्या. त्यांच्या वेदना ऐका आणि मग खुशाल तुमच्या नेत्यांची पाठराखण करा, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरा... वेळीच सावध व्हा राजांनो, नाहीतर ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्हणायची वेळ येईल! तशी वेळ कुणावरही येऊ नये, इतकंच! बाकी तुमची मर्जी!!

आरोपींना फाशी व्हावी!
गेल्या चार महिन्यापासून आम्ही पोलिसांकडे न्याय मागत होतो; मात्र पोलिसांनी आमची कोणतीही तक्रार ऐकून घेतली नाही. आमच्या डोळ्यादेखत आरोपी मोकाट फिरत असताना आम्ही रोज मरत होतो; मात्र केवळ ‘साप्ताहिक चपराक’ने दिलेल्या वृत्तामुळे आमची न्याय मिळण्याची आशा जिवंत राहिली. आता आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, तरच आम्हाला न्याय मिळेल.
 रत्नमाला खेडकर
(मृत ज्योती खेडकरची आई)

घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२
 


Sunday, September 4, 2016

जित्याजागत्या आदर्शांचे मनोरे



सामान्य माणसाच्या असामान्यत्वावरील श्रद्धा बळकट करणारे संजय वाघ यांचे
गंध माणसांचा’ हे पुस्तक जित्याजागत्या आदर्शांचे मनोरे उभारणारे आहे. हे पुस्तक चपराक’च्या परंपरेत मानाचा तुरा ठरावे.
माणसाची अनंत रूपे आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतात. प्रत्येकाच्या नाना तर्‍हा.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ असे आपण म्हणतो ते त्यामुळेच. मात्र यांच्यातील चांगुलपण हेरणे, ते समाजासमोर आणणे यासाठी निकोप दृष्टी लागते. मित्रवर्य संजय वाघ हे पंचवीस वर्षाहून अधिककाळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्यांच्याकडे अशी व्यापक दृष्टी आहे. गुणग्राहकता आहे. त्यामुळेच त्यांनी स्वत:च्या खिशाला झळ देऊन समाजातील काही रत्नं शोधली. त्यांच्यातील तेज जगाला दाखवून दिले. ‘स्वत:साठी जगलास तर मेलास, इतरांसाठी जगलास तरच जगलास’, असे म्हणतात. अशा इतरांसाठी जगणार्‍या माणसांचा गंध वाघां’ना येतो. मात्र हे वाघ त्यांची शिकार करण्याऐवजी त्यांच्यातील ‘दिव्यत्वाचे प्रकटीकरण’ घडवतात.
यातील प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे एक स्वतंत्र कादंबरी; मात्र ती नेमकेपणाने मांडण्याचे वाघ यांचे कसब थक्क करायला लावणारे आहे. महाभारतातील संजय जसे युद्धभूमिवरील वर्णन जिवंत करायचा अगदी त्याचप्रमाणे हा आधुनिक संजय सामान्य माणसाचा अलौकिक संघर्ष अलवारपणे उलगडून दाखवतो. जणू आपण त्या व्यक्तिला भेटतोय आणि त्याच्या आयुष्याचे सार जाणून घेतोय, असेच यातील व्यक्तिचित्रणात्मक लेख वाचताना शब्दाशब्दाला जाणवते. चांगुलपणावरील विश्‍वास घट्ट करणारे, बेचिराख झाल्यावरही पुन्हा जोमाने मुसंडी मारण्यासाठी प्रेरणा देणारे, प्रामाणिकपणा, जिद्द, सेवाभाव, दानत याचे जवळून दर्शन घडवणारे हे पुस्तक मराठी साहित्यातील एक जबरदस्त क्षमतेचे ‘टॉनिक’ ठरणारे आहे.
देवभूमी नाशिक हे संजय वाघ यांचे कार्यक्षेत्र. त्यामुळे हाच परीघ डोळ्यासमोर ठेवून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील या कस्तुरीमृगांचा शोध घेतला. प्रतिकूलतेवर मात करत आपल्या अचाट कर्तृत्वाचा सुगंध दरवळत ठेवणार्‍यांना अचूकपण हेरत त्यांनी पत्रकारिता धर्माचे पालन केले आहे. इतकेच नाही तर
ध्येयाकडे वाटचाल करणारी माणसे मला माझ्या जातकुळीतली वाटली, त्यांचा आणि माझा रक्तगट एक वाटला’, असे ते आत्मीयतेने सांगतात. त्यांच्यातील मुळातच असलेले चांगुलपण त्यांना अशा ध्येयनिष्ठ माणसांकडे खेचून नेत असावे. त्याशिवाय अशी एकरूपता साधणे शक्य नाही.
मातीत पुरलेल्या एका निष्पाप
जाई’ला वाचवताना डॉक्टर देवीप्रसाद शिवदे या धन्वंतरी’ने आरोग्यसेवेचा धर्म निभावला व परिचारिकारूपी सिंधूताईंच्या लेकीं’नी खरोखर मातृधर्म पार पाडला. या ग्रंथातील हा पहिलाच लेख वाचताना डॉक्टरांना देवाची उपाधी का दिली जाते याचे भान येते. विधायक वृत्ती वाढवण्याबरोबरच समाजातील भयाण वास्तव वाघ यांनी प्रभावीपणे मांडले आहे. यातील लेख वाचताना अंगावर शहारे येतात, डोळे पाणावतात, अभिमानाने उर भरून येतो, काहीवेळा कुप्रवृत्तीविषयी रागही उफाळून येतो. म्हणजे एकंदर काय तर आपल्यातील माणूसपण जिवंत असल्याची खात्री पटते. ‘इगतपुरीतील शिवसेनेच्या पहिल्या तालुकाप्रमुखावर गाव त्यागण्याची वेळ का आली?’ असा बनतोड सवाल करताना भिका राजू बोडके या निष्ठावंताच्या नशिबी जे संन्याशाचे जिणे आले त्याची हेलावून टाकणारी कथा संजय वाघ यांनी मांडली आहे.
सत्प्रवृत्तींचा वारसा नेकीने जपणारे नेरकर दाम्पत्य,
अंजुमन’द्वारे बेवारस प्रेतांचे वारसदार होणारे हुसेनभाई शेख, जवळपास पंचेचाळीस लाख रूपये खर्च करून शिवरायांचे अश्‍वारूढ शिल्प साकारणारे भाऊसाहेब अहिरे, सरकारी दवाखान्यातील गरजूंना मोफत अन्नसेवा पुरवणारे गंगाराम पांडे, जलदान करून जीवन’ जनास वाटणारे विलास सावंत, निर्मलग्रामसाठी चपलांचा त्याग करणारे आगळे वेगळे असे सिद्धार्थ आगळेे, वृद्धाश्रमात जीवन कंठणार्‍या असहाय्य पक्षिणीची आर्त हाक देणार्‍या कुसुमताई भडक, गजानन महाराजांचे परमभक्त असणारे वृत्तपत्र विक्रेते प्रल्हाद भांड यांची नाशिक ते शेगाव अशी सायकलवारीची दशकपूर्ती, गोदामात ग्रंथसंसार थाटून विनाअनुदानित वाचनालय चालवणारे जयंतराव कुलकर्णी, सर्पमित्र मनीष गोडबोले आणि 28 टाक्यांच्या वेदना सहन करून चोवीस तासात चौदा अंडी घालणार्‍या धामणीला जीवदान देणारे डॉ. संजय गायकवाड, सेवाभावी पुस्तक विक्रेते प्रा. मच्छिंद्र मुळे अशा अद्भूत आणि अफाट क्षमतेच्या लोकाविषयी वाचताना भारावून गेल्यासारखे होते.
संजय वाघ यांनी यापूर्वी 26/11 च्या हल्ल्यातील हुताम्यांवर पुस्तक लिहिले होते. देशभक्त, समाजभक्त यांच्या कीर्तीचे पोवाडे गाताना ते हरखून जातात. समाज इतकाही रसातळाला गेला नाही, अजून चांगुलपण टिकून आहे याची साक्ष पटवणारे त्यांचे लेखन आहे. सध्याच्या बजबजपुरीत असे लिखाण करणे, ते वाचले जाणे हे समाजाच्या सदृढ मानसिकतेचे लक्षण आहे. पैशाची, वेळेची, आरोग्याची पर्वा न करता गुणवंतांच्या आदर्शांचे पोवाडे गाणारे संजय वाघ सद्गुणांची पेरणी करत आहेत. आपले कर्तव्य पार पाडत सुट्टीच्या दिवशी कुशल कर्मवीरांना शोधून काढणारे वाघ समाजात सकस आणि निकोप विचार भक्कमपणे रूजवत आहेत. एका जागरूक पत्रकाराचे हे कार्य आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद आहे.
ही यशोगाथा सदर स्वरूपात प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे शब्दांची मर्यादा सांभाळत त्यांनी मोजक्या शब्दात जो संदेश दिलाय त्याला तोड नाही. त्यांच्या लेखणीचा हा आविष्कार नवोदित पत्रकारांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. यातील कर्तृत्ववान व्यक्तिंचा गौरव करताना त्यांनी जो फॉर्म हाताळलाय तो भाषेच्या पातळीवर दखलपात्र ठरला आहे. उगीच शब्दांचे फुलोरे फुलवण्याऐवजी आणि आलंकारीक भाषेतून क्लिष्टता वाढवण्याऐवजी सामान्यातील सामान्य व्यक्तिला कळेल अशी शब्दयोजना त्यांनी केली आहे. त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालेला प्रबोधनाचा, जनजागृतीचा वारसा ते समर्थपणे चालवित आहेत. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि सामान्यातील सामान्य माणसाच्या जीवनाची विजयपताका सातत्याने डौलात फडकेल यात शंका नाही.
संजय वाघ यांनी या पुस्तकाच्या रूपाने मराठी साहित्यात मोठी भर घातली आहे. फक्त नाशिक जिल्ह्यात इतक्या ताकतीच्या व्यक्ती असतील तर आपल्या आजूबाजूला असे भरीव कार्य करणारे कितीजण आहेत, याचा शोध वाचकांनी घेतला पाहिजे. आपापल्या पातळीवर त्यांना शक्य ते सहकार्य केले पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे. इतकी दृष्टी जरी या पुस्तकातून मिळाली तरी वाघ यांच्या लेखनाचे सार्थक होईल. भविष्यात त्यांनी असेच उत्तमोत्तम लेखन करावे यासाठी त्यांना हृदयापासून शुभेच्छा देेतो.

पाने - 128, मूल्य 130
‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092)