Tuesday, February 11, 2020

हे तर प्रचंड क्रौर्य!



शरद पवार हे देशातले एक बलाढ्य नेते आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील त्यांचं स्थान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. त्यामुळंच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, कामकाजाविषयी, निर्णयाविषयी, त्यांच्या विविध भूमिकांविषयी सातत्यानं चर्चा होत असते. तशी चर्चा मराठीतला एक लेखक आणि पत्रकार म्हणून मीही सातत्यानं केली आहे. त्यांच्या चांगल्या कामकाजावर जसे आम्ही गौरवांक काढले, विविध नियतकालिकातून कौतुक केलं तसंच चुकीच्या धोरणांवर आम्ही सातत्यानं तुटून पडलोय.

गेल्या काही काळापासून समाजमाध्यमांचा वापर वाढला आणि आम्ही आमची भूमिका दृकश्राव्य माध्यमाद्वारे मांडू लागलो. आमच्या व्हिडिओंना शब्दशः लाखो दर्शक मिळू लागले. घराघरात हे विचार पोहोचल्यानं अनेकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. शरद पवार तरी याला कसे अपवाद राहतील? 

काँग्रेसमधून फुटून त्यांनी आपली एक वेगळी टोळी निर्माण केली आणि त्याला ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष’ असं व्यापक नाव दिलं. हा पक्ष देशपातळीवर काम करतो, तो राष्ट्रीय पक्ष आहे असा त्यांचा समज आहे. मात्र आजवर एकदाही या पक्षानं स्वतःच्या हिमतीवर राज्यात सत्ता आणली नाही ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना केंद्रीय कृषी मंत्री असतानाही शरद पवार पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला यायचे आणि ‘पुण्याचा कारभारी बदला’ असं आवाहन पोटतिडिकेनं करायचे हा इतिहास आहे. 

समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कृषी, सहकार, क्रीडा, नाट्य, साहित्य अशा कोणत्याही क्षेत्राचा विचार केला तरी त्यात पवारांचा सहभाग आहेच. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर प्रकरण असेल किंवा स्त्रियांचा राजकारणातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय असतील ते सर्व गौरवास्पदच आहे. हे सारं करतानाच त्यांनी मात्र सातत्यानं स्वतःविषयी अविश्वासाचं वातावरण निर्माण केलं. 

दिल्लीश्वरापुढं कायम लोटांगण घालत त्यांनी महाराष्ट्रात स्वतःचं साम्राज्य उभं केलं. ‘दिल्लीचं तख्त’ ही त्यांची महत्त्वाकांक्षा आजच्या दिवसापर्यंत अपूर्ण राहिली कारण अजूनही दिल्लीत आणि इतर राज्यात त्यांच्याविषयी ‘धोकेबाज’ म्हणूनच बोललं जातं. 

विशेषतः ब्राह्मण, मराठा, दलित, आदिवासी अशा जातीजातीत कायम संघर्ष निर्माण होईल असंच वातावरण त्यांनी निर्माण केलं. राजू शेट्टी राजकीय अपरिहार्यतेतून त्यांच्या सोबत असले तरी त्यांची जात काढणं असेल, पुणेरी पगडी आणि कोल्हापुरी पागोट्याविषयीचं त्यांचं विधान असेल, पेशवे आणि शाहू अशी तुलना असेल किंवा मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख जाणीवपूर्वक ‘पंत’  असाच करणं असेल यातून त्यांची मनोवृत्ती दिसून येते. फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा सोयीस्कर वापर करतानाच त्यांनी छत्रपती शिवाजीमहाराज हा विषयही राजकारणासाठीच वापरला. 

त्यांचा उल्लेख गेल्या अनेक वर्षांपासून ‘जाणता राजा’ असाच केला जातो. ज्या श्रीसमर्थ रामदास स्वामींचा द्वेष करण्यात शरद पवार नेहमी धन्यता मानतात त्याच समर्थांनी ‘जाणता राजा’ हे विशेषण छत्रपती शिवाजीमहाराजांसाठी वापरलं होतं. त्यामुळं इतिहासात छत्रपती शिवाजीराजे हे एकमेव जाणते राजे आहेत. आजच्या काळात तर राजा आणि प्रजा ही पद्धतही लोप पावलीय. त्यामुळं लोकशाहीत कुणालाही जाणता राजा म्हणणं निव्वळ हास्यास्पद आहे. शरद पवारांनी कधीही याला विरोध केला नाही. याविरूद्ध मी काही आघाडीच्या वृत्तवाहिन्यांवरून आणि विविध लेखांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. हे सगळं सुरू असतानाच ‘रामदास स्वामी शिवरायांना समकालीन नव्हते किंबहुना असं कोणतं पात्रही नव्हतं. केवळ ब्राह्मणांनी त्यांचं वर्चस्व वाढविण्यासाठी ते निर्माण केलं आहे’ अशा आशयाची भूमिका त्यांनी घेतली.\

एकेकाळी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरणार्‍या शालिनीताई पाटील यांच्यासोबत त्यांनी सुडाचं राजकारण केलं. वसंतदादा पाटलांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसल्याची चर्चाही महाराष्ट्रात सातत्यानं होते. इतकंच काय तर केवळ सत्तेच्या हव्यासापोटी ते ज्यांना गुरू मानतात त्या यशवंतराव चव्हाण यांनाही त्यांनी ‘परतीचे दोर कापून टाकलेत’ इतक्या स्पष्ट शब्दात सुनावलं होतं. 

हा सगळा इतिहास माझी पिढी सातत्यानं ऐकत, वाचत आलीय. त्याविषयी जाब विचारणं, त्यांचं म्हणणं जाणून घेणं हा आमचा अधिकार आहे. त्यामुळं आम्ही काही प्रश्‍न उपस्थित केले तर ते शरद पवार यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना झोंबण्याचं काहीच कारण नाही. ‘शरद पवार तुम्ही आमच्या आणखी किती पिढ्या बरबाद करणार?’ असा सवाल मी ‘द पोस्टमन’ या यू ट्यूब चॅनेलवरील व्हिडिओत उपस्थित केला आणि दिल्लीचं तख्त काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले हे ‘स्वयंघोषित जाणते’ राजे बिथरले. आमच्या त्या वक्तव्यावर शब्दशः हजारो प्रतिक्रिया आल्या. त्यातील काही प्रतिक्रिया निश्चितपणे आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहेत. त्या थांबवायला हव्यात. मात्र तशी कोणतीही यंत्रणा आमच्याकडे नाही. ‘चुकीच्या प्रतिक्रिया देऊन प्रतिक्रियावादी बनू नका’ हे आम्ही सातत्यानं सांगत असतो पण शरद पवार यांच्यावर लोकांचं इतकं ‘विलक्षण प्रेम’ आहे की लोक त्यांना शिव्या घातल्याशिवाय शांत राहूच शकत नाहीत. 

या सर्व लोकभावना समजून घेऊन स्वतःच्या आचारविचारात बदल करण्याऐवजी त्यांच्या एका निकटवर्तीयानं मी आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्याविरूद्ध व ‘पोस्टमन’ विरूद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. बरं, जर यांना हे इतकंच अवमानकारक वाटत असेल तर त्यांनी किमान आमच्याविरूद्ध लोकशाही मार्गानं रीतसर गुन्हा नोंद करावा. तसं न करता ज्यात कसलाच दम नाही अशी अर्थहीन तक्रार देऊन त्यांनी यंत्रणेतही स्वतःचं हसं करून घेतलं आहे. इतक्यावरच न थांबता हे महाभाग राज्यातील विविध शहरात पत्रकार परिषदा घेऊन याबाबतची माहिती देत फिरत आहेत.

कोरेगाव भीमा येेथे उपस्थित न राहताही त्यांना त्याविषयीची सगळी माहिती असते. इथं त्यांच्याच एका निकटवर्तीय पदाधिकार्‍यानं मी आणि भाऊ तोरसेकर यांच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही त्यांना त्याचा पत्ता नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही. या तक्रारीनंतर राज्यातील राष्ट्रवादीच्या काही पंटरांकडून आम्हाला धमक्या येत आहेत. त्यात जीवे मारण्यापासून ते आम्हाला कापा, तोडा असा उल्लेख करत आमच्या आई-बहिणींचा उद्धार केला जातोय. 

शरद पवार यांच्या समर्थकांची बौद्धिक उंची, त्यांची झेप, रक्तातली गुंडगिरी याविषयी माझ्या आणि भाऊंच्या मनात कसलीही शंका नाही. त्यामुळंच जर उद्या यात आमचा देह पडला किंवा आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला तर त्याचे सूत्रधार शरद पवार हेच असतील हे वेगळे सांगायला नको.

एकीकडं नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं गळे काढायचे आणि दुसरीकडं कुणी काही प्रश्न उपस्थित केला की त्याचा प्रतिवाद करण्याऐवजी असं सूडाचं राजकारण करायचं हे फक्त आणि फक्त शरद पवार यांनाच शोभू शकतं. राजकीय विश्‍लेषक या नात्यानं मी जेव्हा पवारांच्या कारकिर्दीकडं पाहतो तेव्हा त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा मला मनस्वी अभिमान वाटतो. या नेत्याची आपण कदर केली नाही, महाराष्ट्र याबाबत करंटा ठरला असंही मला वाटतं. त्याचवेळी त्यांनी सातत्यानं चालवलेलं सूडाचं राजकारण, त्यांनी निर्माण केलेला द्वेष, अविश्वास हे सर्व पाहिलं की चीडही येते.

आपल्याकडं माणसापेक्षा माणसाच्या राखेचा इतिहास पूजण्याचा रिवाज तसा नवा नाही. त्यामुळं पवारांवर नंतर पोवाडे रचले जातील पण आमच्या पिढीनं काही प्रश्न उपस्थित केले तर आम्हाला संपवण्याचं पातक त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी करू नये. यात माझं किंवा भाऊंचं काही बरंवाईट झालं तरी त्यांच्या काळ्याकुट्ट मनोवृत्तीचं आणि क्रौर्याचंच दर्शन समाजाला घडणार आहे एवढं मात्र नक्की.
- घनश्याम पाटील
संपादक, 'चपराक', पुणे
7057292092