Tuesday, January 14, 2020

जाणते राजे आणि अजाणते नेते!


कुण्यातरी जय भगवान गोयल नावाच्या एका भाजप नेत्यानं ‘आज के शिवाजी - नरेंद्र मोदी’ या शीर्षकाचं पुस्तक लिहिलंय. दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत भाजपच्याच दिल्ली कार्यालयात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकाच्या शीर्षकावरून वादळ निर्माण झालं आहे.
आजवर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांसोबत झाली. उदा. नेपोलियनसोबत महाराजांची तुलना झाली. ती तुलना अत्यंत अयोग्य होती कारण नेपोलियन हा चारित्र्यहीन, लंपट माणूस होता. हिटलरसोबत महाराजांची तुलना झाली पण तो हुकूमशाही वृत्तीचा होता. फ्रेडरिक द ग्रेट, अलेक्झांडर, विस्टन चर्चिल अशा अनेकांसोबत महाराजांची तुलना झाली पण ती अयोग्य होती हे इतिहासाची पानं चाळताना कुणाच्याही लक्षात येईल. अलेक्झांडर जग जिंकत आल्यावर भारतात आला. त्यावेळी त्याचं सैन्य परत गेलं. ‘‘इतक्या वर्षाच्या लढाईत आम्ही घर सोडून बाहेर आहोत. आमच्या बायका कशा आहेत आम्हाला माहीत नाही. मुलं काय करतात, कशी दिसतात हे माहीत नाही. त्यामुळं आम्ही परत चाललो’’ असं त्याच्या सैन्यानं त्याला सांगितलं. महाराज चर्चिलसारखे व्यसनी आणि अहंकारी नव्हते. त्यांचं चारित्र्य धवल होतं. ते आदर्श मुलगा, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श राज्यकर्ते होते.
आपल्याकडील विक्रमादित्य, शालिवाहन अशा महापुरूषांसोबतही महाराजांची तुलना करण्यात आली. यांनी स्वतःच्या नावे शके सुरू केली. महाराजांनी कुठंही स्वतःचं नाव न वापरता ‘राज्याभिषेक शक’ सुरू केलं. त्यामुळं त्यांच्यासोबतही महाराजांची तुलना होऊ शकत नाही. तुलनात्मक अभ्यास केला तर महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. ते एकमेवाद्वितीय होते. आहेत.
आपण काही वर्षे मागे गेलो तर यशवंतराव चव्हाण यांनाही ‘प्रतिशिवाजी’ म्हटलं जायचं. ती तुलनाही अयोग्य होती कारण मृत्यू समोर दिसत असतानाही महाराजांचे मावळे त्यांना सोडून गेले नव्हते. यशवंतराव चव्हाण यांच्याकडं शेवटी फक्त चार आमदार उरले होते. त्यानंतर त्यांनी स्वाभिमान बाजूला ठेवून परत इंदिरा गांधी यांच्याशी जुळवून घेतलं. अत्यंत गरीब घरातून पुढं आलेल्या या मुलानं देशस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली पण ते ‘प्रतिशिवाजी’ होऊ शकत नाहीत. सध्याच्या काळाचा विचार केला तर नाना पटोले यांच्यासारखा खासदार मोदींना उघड शिव्या देऊन सोडून गेला. अशांची तुलना महाराजांसोबत कशी बरं होऊ शकेल? 
समोर मृत्यू दिसत असतानाही तीनशे बांदलांना सोबत घेऊन  बाजीप्रभू देशपांडे सार्वजनिक हौतात्म्य पत्करायला आणि प्राणार्पण करायला धाडसानं गेले. त्यांचं हे बलिदान लक्षात घेतल्यावर तुलना करणार्‍यांना त्याची जाणीव होईल. मुरारबाजीसारख्या मर्द मावळ्यानं मृत्यू समोर दिसत असतानाही दिलेरखानाच्या बक्षीसावर थुंकण्याची हिंमत दाखवली. त्यामुळं महाराजांच्या अद्भूत गुणांची तुलना कुणासोबतही होणार नाही. 12 मे 1666 ला आग्य्राच्या किल्ल्याबाहेर महाराजांनी ठणकावून सांगितलं, ‘‘माझं शीर कापून दिलं तरी चालेल पण या माणसाच्या दरबारात मी जाणार नाही.’’
इतिहासात महाराजांची तुलना झाली ती फक्त नेताजी पालकर यांच्यासोबत. नेताजी आदिलशहाला जाऊन मिळाले. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. ते मुहम्मद कुली खान झाले. मात्र ‘शिवाजी’ नावाचा परिसस्पर्श झाल्यानं तेे पुन्हा माणसात आले.
मावळे ज्याला देव मानत होते तो राजा किती मोठा हे समजून घेतलं पाहिजे. मूल्यमापनाच्या कोणत्याही कसोट्या शिवचरित्राचा अभ्यास करताना टिकत नाहीत. शिवाजी हा जगाच्या इतिहासातला एक चमत्कार आहे.
5 सप्टेंबर 1659 ला सईबाईंसाहेबांचा मृत्यू झाला. त्यावेळी रजा न घेता महाराज अफजलखानाच्या भेटीस गेले. त्यांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. ‘स्वराज्य’ महत्त्वाचं ही त्यांची त्यामागची भूमिका होती. सामान्य माणसाच्या मनात निष्ठा आणि ध्येय निर्माण करायचं आणि त्याच्याकडून असामान्य पराक्रम करून घ्यायचा हे काम राजांनी केलं. ते जगात कुणालाच जमलं नाही. त्यामुळं महाराजांवर दैवीपणाची पुटं चिकटवू नका.
मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेल्या तानाजी मालुसरे यांनी ‘आधी लगीन कोंडाण्याचं’ म्हणत मोहीम हाती घेतली. आपल्या पत्नीच्या मृत्युचा वियोग बाजूला ठेवून लढणारा राजा त्यांचा आदर्श होता. आज असं काही दिसतंय का? 
6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळीच संभाजीराजे ‘युवराज’ झाले. महाराजांनी रयतेवर राज्याभिषेक कर लावला नाही. आज अजितदादा मुद्रांक शुल्क वाढवत आहेत.
महाराजांनी राजव्यवहार कोेश सुरू केला. रघुनाथ पंडितांची त्यासाठी निवड केली होती. आज मोदी किंवा ठाकरे त्यासाठी काय करत आहेत? किती भाषांना त्यांनी अभय दिलंय? आपल्या मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जाचं घोंगडं सरकार दरबारी किती काळ भिजत पडलंय? मग हे ‘आजचे शिवाजी’ कसे होऊ शकतात?
महाराजांचं न्यायदानाचं खातं अतिशय निष्कलंक होतं. असा निस्पृहपणे वागणारा आज एक नेता दाखवा. त्याविषयी महाराजांचे एक उदाहरण बघितले पाहिजे.
पिलाजीराव शिर्के हे संभाजीराजांचे सासरे. त्यावेळी चिंचवडला मोरया गोसावी यांचं प्रस्थ मोठं होतं. मोरया गोसावी यांनी पिलाजी शिर्के यांना ‘देवाच्या वार्षिक उत्सवासाठी काहीतरी मदत करा’ अशी गळ घातली. शिर्के यांनी हा विषय संभाजीराजांच्या कानावर घातला आणि ‘परिसरातल्या शेतकर्‍यांकडून भात आणि मीठ गोळा करण्याची’ सनद त्यांना मिळवून दिली.
शेतकर्‍यांनी तीन-चार वर्षे कर दिला. त्यानंतर मात्र दुष्काळी परिस्थिती होती. भात आणि मीठ देणं शक्य नव्हतं. त्यामुळं देवस्थानचा वार्षिक उत्सव अडचणीत आला. ते पाहून मोरया गोसावी यांनी सिंहगडच्या किल्लेदाराला सांगितलं की ‘यांना अंधारकोठडीत डांबा.’
 राजघराण्याशी संबंधित आध्यात्मातला मोठा माणूस असल्यानं त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली. त्या निष्पाप शेतकर्‍यांना अंधारकोठडीत डांबण्यात आलं.
या अन्यायाच्या विरूद्ध दाद मागण्यासाठी या शेतकर्‍यांचे नातेवाईक  रायगडावर गेले. महाराजांना भेटण्यासाठी मध्यस्थांची गरज नसायची. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्यावर त्या शेतकर्‍याला त्याच्या मुलीसकट बाहेर हाकलतात.  नरेंद्र मोदी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. शरद पवार यांच्यासोबत कायम बंदुकधारी खासगी सुरक्षारक्षक असतात. त्या महाराजांतला आणि आजच्या नेत्यांतला हा मूलभूत फरक आहे.
तर ते शेतकरी राजांकडं गेले. त्यांनी सांगितलं, ‘‘कोणत्याही चौकशीशिवाय आमच्या नातेवाईकांना अटक केलीय. तुम्ही उलटतपासणी करून पहा.’’
महाराजांनी चौकशी केली. हे अन्यायकारक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी सिंहगडच्या किल्लेदाराला पहिला आदेश दिला, ‘‘तुला किल्लेदार म्हणून आम्ही नेमलंय. त्यामुळं आमचं ऐक. अन्य कुणाच्याही आदेशाचं पालन करणं तुला गरजचेचं नाही. आता त्या सर्व शेतकर्‍यांना सन्मानानं घरी नेऊन सोड. त्यांना थोडाही त्रास झाला तर त्या अंधारकोठडीत तू असशील!’’
संभाजीराजांनी युवराज या नात्यानं मोरया गोसावी यांना भात आणि मीठ वसुलीचा परवाना दिला होता. युवराजांच्या आदेशाचं पालन म्हणून त्यांनी सांगितलं, ‘‘यापुढं या वार्षिक उत्सवाचा सगळा खर्च शिवाजीराजांच्या खासगी तिजोरीतून, वैयक्तिक उत्पन्नातून केला जाईल. त्यासाठी कुणाला काहीही मागायची गरज नाही.’’
यानंतर त्यांनी मोरया गोसावी यांना पत्र लिहिलं. त्यात ते म्हणतात, ‘‘तुम्ही तर गोसावी! राज्यकारभाराची इतकीं हाव तुम्हास कशासाठी? राज्यकारभाराची इतकीं हाव असेल तर आपली वस्त्रे आम्हास द्या आणि आमची वस्त्रे तुम्ही घ्या. याउपर राज्यकारभारात हस्तक्षेप केलात तर ब्राह्मण म्हणून, साधू म्हणून मुलाहिजा राखला जाणार नाहीं हे खूब ध्यानात ठेंवा.’’
ही वागणूक मोदींनी, पवारांनी शेतकर्‍यांना देऊन दाखवावी. महाराज मोरया गोसावी यांना आध्यात्मिक गुरू मानायचे. तरी त्यांनी न्यायदान करताना त्याचा विचार केला नाही. 
महाराजांच्या रूपानं परमेश्‍वरापेक्षा मोठी ताकद पृथ्वीवर अवतरली होती. नरेंद्र मोदी आणि महाराजांची तुलना करायची असेल तर त्यावर चर्चासत्र ठेवा. अशी तुलना करायची आमची तयारी आहे. 
त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ते जात्यांध नव्हते. महाराजांनी कधीही गोध्रा घडवलं नाही. महाराजांच्या मागं महाराष्ट्र होता. त्यांच्या राज्यात शेतकर्‍यानं आत्महत्या केल्या नव्हत्या. चुकून कोणी आत्महत्या केलीच असती तर त्यांनी दारू पिऊन, लफडे करून आत्महत्या केल्या असं शरद पवार यांच्यासारखं  सांगितलं नसतं. इब्राहिम सिद्धी हा त्यांचा सहकारी अफजलखान भेटीचा सोबती होता. मदारी मेहतर या मुस्लिम युवकानं त्यांच्यावर स्वप्राणाहून अधिक प्रेम केलं. महाराजांनी शहा मदर शहा, याकूत बाबा अशा त्यांच्या मुस्लिम गुरूंचे दर्गे बांधून दिले, तिथल्या खर्चाची सोय केली. असा पराक्रम पुन्हा मानवता घडवेल, इतिहास घडवेल असं वाटत नाही.
शरद पवार यांनाही ‘जाणता राजा’ हे विशेषण गेल्या कित्येक वर्षांपासून वापरलं जातं. तेही अतिशय चुकीचं आहे. 
निश्‍चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी
यशवंत कीर्तीवंत सामर्थ्यवंत
वरदवंत पुण्यवंत नीतीवंत, जाणता राजा।
असं श्री समर्थ रामदास स्वामींनी त्यांचं वर्णन केलंय. त्यामुळं जाणते राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. बाकी कुणालाही ती सर येणार नाही. शरद पवार यांना ‘जाणता राजा’ हे विशेषण प्रथम वसंत बापटांनी वापरल्याचं सांगितलं जातंय. मात्र हे धादांत खोटं आहे. आज भाजपवाले शरद पवारांच्या ‘जाणता राजा’ या विशेषणावरून रान पेटवत असले तरी त्यांचा तसा प्रथम उल्लेख भाजपा नेते प्रमोद महाजन यांनी केला होता हा इतिहास आहे. 
बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे किंवा अन्य कोणत्याही स्वकियानं कधीही सांगितलं नाही की शिवाजीराजांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. पवारांचे सहकारी हे उघडपणे सांगतात. त्यांनी जवळच्या अनेक लोकांना त्रास दिला. त्यांचं राजकारण पाहून जवळचे अनेक लोक दूर गेले. त्यामुळं त्यांनीच सगळ्यांना सांगायला हवं की ‘‘बाबांनो मला जाणता राजा म्हणू नका. ती माझी योग्यता नाही. किंबहुना महाराजांचा ‘मावळा’ होण्याचीही क्षमता माझ्यात नाही.’’
त्यामुळं यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नरेंद्र मोदी किंवा आणखी कोणीही ‘शिवाजी महाराज’ होऊ शकणार नाहीत. तेवढं सामर्थ्य, तेवढी कुवत कुणाच्याही जवळ नाही. 
जाता जाता एक उदाहरण देतो आणि थांबतो.
रामायणातलं राम आणि रावणाचं युद्ध 85 दिवस चाललं. त्यातले पहिले 84 दिवस राम जमिनीवर होते आणि रावण रथात. सगळ्या देव-देवता स्वर्गातून हे युद्ध बघायच्या. आयपीएलचा ट्वेन्टी ट्वेन्टीचा सामना असावा असं वातावरण होतं. जर आपण प्रभू श्रीरामचंद्राला मदत केली आणि यात दुर्र्दैवानं रावण जिंकला तर आपलं काही खरं नाही हे त्यांना ठाऊक होतं. 84 दिवस प्रभू रामचंद्रांनी नेटानं लढा दिल्यावर देव मदतीला आले. त्यांनी त्यांना रथ दिला. 85 व्या दिवशी राम रथात आरूढ झाले आणि ही विषम लढाई सम झाली. त्या दिवशी रामांनी रावणाचा वध केला. तेव्हा देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली.
देवही इतके सोयीस्कर वागू शकतात तर माणसाचं काय? मात्र महाराजांसोबतच्या सगळ्या मावळ्यांना पावला पावलावर मृत्यू दिसत असूनही त्यांनी कधी त्यांची साथ सोडली नाही. त्यांच्याशी प्रतारणा केली नाही. गद्दारी करून ते शत्रू पक्षात सामील झाले नाहीत. शिवाजीराजांचं श्रेष्ठत्व अधोरेखित होतं ते अशा घटनांतून. त्यामुळं त्यांच्याशी कुणाचीही तुलना करू नये.
मध्यंतरी ‘अण्णा हजारे आंधी है, देश के दुसरे गांधी है’ असा एक घोष कानावर पडायचा. अमित शहांना भाजपचे ‘चाणक्य’ म्हटलं जायचं. आता आता संजय राऊत यांच्यासारखा विदुषकही माध्यमांना ‘चाणक्य’ वाटू लागलाय. अशी कुणाचीही, कुणासोबतही तुलना करण्याचा जमाना आलाय. मात्र या सगळ्यात छत्रपती शिवाजीराजांच्या नावाचा वापर सातत्यानं स्वतःच्या फायद्यासाठी करून घेणार्‍या कोणत्याही राजकारण्यानं, पक्षानं, माध्यमांनी अशी अनाठायी तुलना करू नये. छत्रपती शिवाजी महाराज ही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही याचं भान सुटू नये. ते सुटलं तर मग आम्हालाही महाराजांसोबत तुमची तुलना करावी लागेल आणि महाराजांनी कधीही स्वतःच्या पत्नीचा त्याग केला नाही हे अधोरेखित करावे लागेल.
- घनश्याम पाटील
संपादक ‘चपराक’
7057292092