Monday, August 20, 2018

कॉलेज गेट



पुण्यातलं मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय; म्हणजेच आपलं एमएमसीसी! इथं व्यवस्थापन शास्त्र पदवीचं शिक्षण घेणारे काही तरूण-तरूणी! त्यातील बहुतेक ग्रामीण भागातून आलेले. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न रंगवताना वर्तमानात मात्र ते वेगळ्याच विश्‍वात रमत होते. साधारणतः महाविद्यालयीन जीवनात जी हुल्लडबाजी करणं अपेक्षित असतं ते सगळं या पोरा-पोरींनी केलं. वाद घातले, मारामार्‍या केल्या, मैत्री निभावली, लफडी केली, खरंखुरं प्रेम केलं, हौसमौज केली आणि जमलाच तर थोडाफार अभ्यासही केला. हे सगळं करताना स्वतःचा प्रामाणिकपणा आणि माणुसकी मात्र सोडली नाही.

एखाद्या चित्रपटात दाखवतात तसे इथेही दोन ग्रुप होते. दोन्हीही ग्रुप एकमेकांना पाण्यात पाहत. त्यातल्या एका ग्रुपनं ट्रॅडिशनल डेला चक्क महाभारतातलं पात्र साकारलं. ते पाहून दुसरा ग्रुप बेचैन झाला. यापेक्षा भारी आपल्याला काय करता येईल यावर डोकेफोड झाली. मग महाभारताला आव्हान देऊ शकेल असं काही करायचं असेल तर त्यांच्यापुढं अर्थातच एक आणि एकच पर्याय होता. तो कोणता हे वेगळं सांगावं लागेल का? भीम, अर्जुन, कृष्ण या कुणाहीपेक्षा मराठी माणसाला ज्याची भुरळ पडते असं एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे युगपुरूष छत्रपती शिवाजीराजांचं! 

ठरलं तर मग! त्यातल्याच एका राजबिंड्या तरूणानं शिवाजी महाराज साकारावेत यासाठी सगळ्यांनी लकडा लावला. त्याचा दबाव आल्यानं तो पठ्ठ्या काही तयार होईना. मग अशावेळी एक नायक लागतो. तो तत्परतेनं पुढं आला. त्या नायकाचं खरंखुरं नाव सागर कळसाईत! या उमद्या तरूणानं त्याच्या दोस्ताला शिवाजीमहाराजांची भूमिका करण्यासाठी पटवलं. आता कुणालाही पटवायचं तर काही आश्‍वासनं द्यावी लागतात. काही आमिषं दाखवावी लागतात. सागरनं सांगितलं, ‘‘मित्रा, तुझं व्यक्तिमत्त्व भारदस्त आहे. समोरच्या ग्रुपवाल्यांची जिरवायची तर तुच महाराजांची भूमिका केली पाहिजे. माझ्या शब्दासाठी हे कर! त्याबदल्यात भविष्यात तू सांगशील ते एक काम मी करेन. तो शब्द माझ्याकडं उधार राहिला.’’

आता इतक्या मिनतवार्‍या केल्यावर तोही तयार झाला. 

त्यानं राजांची भूमिका केली. सगळ्या कॉलेजमध्ये हवाच हवा. मग काय? सगळे खूश! 

काळाच्या रेट्यात सगळ्यांचं शिक्षण पूर्ण झालं. आता सगळे जगरहाटीला सामोरे जाणार! आपापल्या नोकर्‍या, व्यवसाय, कुटुंबकबीला यात गुरफटणार! हे कॉलेजचं गेट आपल्या सगळ्यांसाठी बंद होणार... सगळेच भावविभोर झाले. या दरम्यान केलेली दंगामस्ती, एकमेकांची काढलेली खोड, जीवापाड केलेलं प्रेम, वसतीगृहातील साहचर्य, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातील सर्वांशी निर्माण झालेले संबंध, रेक्टरपासून पहारेकर्‍यांपर्यंत आणि वर्गशिक्षकांपासून प्राचार्यापर्यंत सर्वांशीस निर्माण झालेले ऋणानुबंध...! कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून सर्वजण या दरम्यानच्या आठवणी जागवू लागले. भविष्यातही ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असं सांगू लागले.

हे सर्व चालू असतानाच ज्यानं सागरच्या आग्रहावरून शिवाजीराजांची भूमिका केली होती तो पुढं आला. त्यानं सांगितलं, ‘‘साग्या, माझा शब्द तुझ्याकडे उधार आहे. आता कर्जफेड कर...’’ कुणालाच काही कळेना. तो काय मागणार?

मग त्यानं व्याकूळ होत सांगितलं, ‘‘कॉलेज लाईफनंतरही आपण सर्वजण एकत्र राहू असं काहीतरी कर...’’
आता आली का पंचाईत? हे कसं करता येईल? सागरनं तर शब्द दिला होता. तो विचारात पडला.

विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीन प्रमुख पातळ्या असतात. सागरनं विचार केला. कष्टपूर्वक, प्रयत्नपूर्वक आणि प्रामाणिकपणे तो विचार अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आणि तशी कृतीही केली. ही कृती महाराष्ट्रातल्या तरूणांना वेड लावून गेली. मरगळलेल्या मराठी साहित्याला या कृतीनं ऊर्जा दिली. 

या सगळ्यांना एकत्र बांधुन ठेवायचं तर कॉलेज लाईफचे हे दिवस शब्दबद्ध करणं गरजेचं होतं. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी सागरनं हे आव्हान स्वीकारलं आणि सगळे अनुभव जशास तसे उतरवले. प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक कादंबरी असते. इथं तर अनुभवाचा खजिनाच होता. त्यानं तो कादंबरीद्वारे शब्दांकित केला. त्याला शीर्षक दिलं, ‘कॉलेज गेट-नाण्याची तिसरी बाजू.’

या कादंबरीनं अनेक विक्रम केले. प्रत्येकाला ही आपलीच कथा वाटते. बघता-बघता या कादंबरीच्या पाच आवृत्या झाल्या. आज नाशिकच्या आयएमए सभागृहात या कादंबरीची सहावी आवृत्ती सन्मानपूर्वक प्रकाशित होतेय. बाबुराव भोर यांच्याच्यासारख्या रत्नपारखी चित्रपट निर्मात्यानं या कादंबरीवर चित्रपट निर्मितीचं काम सुरू केलंय. सागरच्या या प्रयत्नाला दाद देत बाबुराव भोर यांनी ही कलाकृती जिवंत केलीय. आता या कादंबरीवर चित्रपट येतोय.

मध्यंतरी महाराष्ट्रातल्या एका सर्वात मोठ्या दैनिकानं एक सर्वेक्षण केलं होतं. वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन त्यांनी तरूणांच्या आवडत्या पुस्तकांसंबंधी विचारणा केली. ती यादी त्यांच्या सर्व आवृत्त्यांना पहिल्या पानांवर प्रकाशित केली. त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘टॉप टेन’ पुस्तकात पहिल्या क्रमांकावर शिरवळकरांची ‘दुनियादारी’ होती. दुसर्‍या क्रमांकावर ‘शाळा’  तर तिसर्‍या क्रमांकावर आमच्या सागरची ‘कॉलेज गेट.’ महाराष्ट्रातील बहुतेक वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी या कादंबरीची प्रचंड दखल घेतली. साहित्य संमेलनात, पुस्तक विक्रेत्यांकडे या कादंबरीची मागणी वाढली. राज्यभरातून ‘कॉलेज गेट’चा चाहता वर्ग निर्माण झाला. 
प्रकाशक असूनही सागरच्या आग्रहाखातर या कादंबरीला मीच प्रस्तावना लिहिली होती. त्यात मी म्हटलं होतं, ‘‘एखाद्या रसिकप्रिय चित्रपटाला शोभेल असे सशक्त कथानक या कलाकृतीला निश्‍चितपणे लाभले आहे. महाविद्यालयीन जीवनातील विविध वृत्ती आणि प्रवृत्तींचा चिकित्सक उलगडा करणारी, शब्दाशब्दाला उत्सुकता वाढवणारी आणि मैत्रीच्या नात्याचे चिरंतन मूल्य ताकदीने सिद्ध करणारी ही कलाकृती आहे.’’
सुदैवानं आज हे सारं काही खरं ठरलंय. आजचे तरूण लिहित नाहीत, वाचत नाहीत अशा सगळ्या अंधश्रद्धा या कादंबरीनं खोडून काढल्यात. सागरच्या कसदार लेखणीचं हे यश आहे. ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी ही एक कादंबरी आहे. किंबहुना तमाम युवकांच्या मनात आणि हृदयात ‘चपराक’चं नाव पोहोचवण्यात या कादंबरीचं योगदान मोठं आहे. सागरचं संवादी लेखन, स्वभावातील नम्रता आणि मृदुता यामुळं तसाही तो सगळ्यांच्या हृदयावर राज्य करतो. दोन व्यक्तींची तुलना अनाठायी असते असं माझं मत असलं तरी आज सांगावंसं वाटतं की, सागर कळसाईत हा मराठीतला चेतन भगत आहे. 

लेखनातही भवितव्य घडवता येतं हे सिद्ध करणार्‍या सागरची ‘लायब्ररी फे्रंड’ ही दुसरी कादंबरीही ‘चपराक’ने प्रकाशित केली. आता एक मोठा राजकीय पट उलगडून दाखविणारी ‘काशिनाथ-विश्‍वनाथ’ ही कादंबरी लिहिण्यात सागर व्यग्र आहे. बाबुराव भोर यांच्यासारखे समर्थ हात त्याच्या पाठीशी आहेत. ‘चपराक’ परिवाराचा ‘आयडॉल’ म्हणून सागरचं मला नेहमीच कौतुक वाटतं. भविष्यात तो नवनवीन विक्रम नोंदवेल हे वेगळं सांगायला नकोच. त्याच्या लेखनप्रवासाला मित्र म्हणून, प्रकाशक म्हणून माझ्या ‘जी जान से’ शुभेच्छा! 
- घनश्याम पाटील
7057292092

Sunday, August 5, 2018

भरकटलेलं आंदोलन



महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमांची परंपरा जपणारी भूमी आहे. इथल्या मराठ्यांनी मराठी माणसाचं अस्तित्व टिकवून ठेवलंय. ‘जो मराठी बोलतो तो मराठा’ हे चित्र गेल्या काही काळात संपुष्टात आलं आणि कमालीच्या टोकदार अस्मिता निर्माण झाल्या. अनेकजण जातीपातीच्या जळमटातून बाहेर पडायला तयार नाहीत. ‘कोणताही कट्टरतावाद वाईटच’ ही शिकवण विसरल्यानं माणसामाणसात फूट पाडण्याचे उद्योग सध्या भरात आलेत. 

असं म्हणतात की वाफ फार काळ कोंडून ठेवता येत नाही. ती तशी ठेवली तर स्फोट अटळ असतो. मराठ्यांचंही तसंच झालं. त्यांच्या अनेक न्याय मागण्या गेल्या कित्येक वर्षात प्रलंबित आहेत. त्यामुळं त्यांच्या भावना उफाळून आल्या. सुरूवातीला जे मूक मोर्चे निघाले त्याची दखल न घेतल्यानं आता ठोक मोर्चे सुरू झाले आहेत. त्यातूनच आत्महत्यांसारखं दुर्दैवी सत्रही सुरू झालंय. हे सर्वच अत्यंत क्लेशकारक आणि अनेकांच्या मुळावर उठणारं आहे. राजकारणी या सर्वांचा फायदा घेत आहेत. समाजासमाजात फूट पाडण्याचं त्यांचं कारस्थान सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघंही याचा पुरेपूर लाभ घेत आहेत. मात्र या सर्वात हे आंदोलन त्यांच्या उद्दिष्ठापासून भरकटत चाललंय हे वास्तव आपण समजून घ्यायला हवं. भावनेच्या भरात घेतलेले कोणतेही निर्णय दीर्घकालिक यश मिळवू शकत नाहीत. त्यातून काही तात्पुरते फायदे दिसून येतात पण ते फार काळ टिकत नाहीत. हे न कळण्याइतका आपला समाज दूधखुळा नसला तरी एक मोठा वर्ग याचं राजकारण करण्यात यशस्वी ठरतोय. आपल्या भावनांचा बाजार मांडून त्याला आंदोलनाचं रूप दिलं जात असेल तर त्यातील डाव वेळीच ओळखायला हवेत. ज्या आंदोलनात प्रारंभी राजकारण्यांना कटाक्षानं दूर ठेवण्यात आलं होतं तिथं आज सगळेच राजकारणी दिसत आहेत. इतकंच नाही तर या सर्वांचं नेतृत्व करण्याचं श्रेय घेण्याच्या त्यांच्या खटपटी-लटपटी सुरू आहेत. 

काकासाहेब शिंदे या तरूणानं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतली. निरपराध तरूणांचे असे बळी जाऊन आरक्षण मिळणार नाही. त्यानंतर हे सत्रच सुरू झालंय. आपली व्यवस्था मात्र ढिम्मच आहे. उलटपक्षी यांच्या बलिदानाचं राजकारणच करण्यात येत आहे. आजवर असंख्य शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबियांचं पुढं काय झालं? शेतकर्‍यांच्या समस्या सुटल्या का? शेतकर्‍यांच्या आत्महत्येमुळं व्यथित होणारे राजकारणी एकेकाळी होते. आता कुणालाच त्याचं सोयरसुतक नाही. काकासाहेब शिंदेंच्या बलिदानाच्या बातम्या झाल्या. त्यांच्यावर अग्रलेख झाले. वृत्तवाहिन्यांनी कार्यक्रम केले. आणखी काही दिवसांनी या बातत्या एखाद्या कॉलमच्या होतील. कुणावरही काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत जगायला हवं. आपण संपून प्रश्न संपणारे नाहीत. खरंतर हे सत्य मांडणंही जीवावर आलंय, मात्र यावर बोलायला हवं. आपल्याकडील पोपटपंची करणारे सर्व तथाकथित विद्वान हजार किलो मूग गिळून गप्प आहेत. हरी नरके यांच्यासारखा विचारवंत ‘मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळू शकणार नाही, त्यांच्या आर्थिक विकासाच्या योजना राबवायला हव्यात’ हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय. मुख्यमंत्री तर ‘काही संघटना वारीत साप सोडणार होत्या’ असे विधान करत आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासारखी मंडळी आजवर मराठ्यांना आरक्षण मिळू शकणार नाही असे मत मांडत होत्या. आता तेही या विषयावरून राजकारण करत आहेत. मुख्यमंत्री न्यायव्यवस्थेकडं बोट दाखवत आहेत. 

‘आजवर बहुसंख्य ‘मराठा’ मुख्यमंत्रीच होते. त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही?’ असाही सवाल केला जातोय. ‘त्यांनी प्रश्न सोडवला नाही म्हणून तर तुम्हाला निवडून दिले’ असा प्रतिवादही केला जातोय. या सर्वात मूळ प्रश्न मागे पडतो. दलित, अन्य अल्पसंख्यांक यांच्या मनात भीतिचे वातावरण आहे. मराठेही अस्वस्थ आहेत. पुरोगामी टोळके फक्त ब्राह्मणांना झोडपण्यात व्यग्र आहे. या सर्वात समाजाविषयीचा कळवळा कुणाच्याच मनात दिसून येत नाही. तवा तापलाय तर भाकरी भाजून घ्या इतकीच अनेकांची भावना! त्यामुळं प्रश्‍न सुटण्याऐवजी फक्त चिघळत चाललाय.

सध्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलनं सुरू आहेत. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. त्यांनी मराठा बांधवांचं निवेदन स्वतः स्वीकारलं. त्याच धर्तीवर पुण्यातील कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरी आंदोनलनकर्ते गेले. त्यांनी त्यांना कार्यालयात बोलावलं; मात्र हे आंदोलनकर्ते त्यांच्या घरासमोर बसून राहिले. त्यांनी घोषणाबाजी केली. एकानं त्यांच्या गॅलरीत बाटली फेकली. मेधा कुलकर्णी यांचा मुलगा सौरव यानं त्याचा जाब विचारला. त्यातून बाचाबाची झाली आणि पुढं मेधा कुलकर्णी यांनाच धारेवर धरण्यात आलं. त्यांना ‘जातीवादी’ ठरवून समाजमाध्यमावर त्यांच्यावर वाटेल तशी चिखलफेक झाली. अत्यंत अश्‍लाघ्य आणि अश्‍लिल भाषेत त्यांच्यावर टीका झाली. आमदार मेधा कुलकर्णी चूक की बरोबर हा चर्चेचा विषय होऊ शकतो मात्र त्यांच्यावर, त्यांच्या जातीवर आणि स्त्रीत्वावर वाटेल तशी शेरेबाजी करणारे ‘मराठे’ असू शकत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजीमहाराजांनी प्रत्येक स्त्रीचा आईसमान आदर केला त्याच महाराजांचे नाव घेत एखाद्या स्त्रीवर अशी अश्‍लाघ्य भाषा वापरत टीका केली जात असेल तर हे आंदोलन भरकटलेय हे ठामपणे सांगायलाच हवे. मेधा कुलकर्णी यांचा मुलगा चुकला असेल तर त्याविरूद्धचे पुरावे द्यावेत. झुंडशाहीचे प्रदर्शन करतानाचे आणि तिथे दादागिरी, दडपपशाही करतानाच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर फिरत आहेत; पण कुलकर्णी यांचा मुलगा सौरव काही चुकीचे बोलतोय याची एकही चित्रफित उपलब्ध असू नये यातच सर्वकाही आले. 

यापूर्वी प्रा. मेधा कुलकर्णी या मराठा आंदोलनात सहभागी होत्या. मराठी बांधवांच्या न्याय हक्कासाठी त्या कायम तत्पर आहेत. याबाबत निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार त्यांना नाहीत. त्यामुळं एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जे करता येईल ते त्या करतच आहेत. असं असताना त्या वारंवार कार्यालयात येऊन चर्चेचं निमंत्रण देत असताना त्यांच्या घरच्यांना डांबून ठेवणं, त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना वेठीस धरणं, मुलाला जीवे मारण्याची धमकी देणं यात कसला पराक्रम आलाय? अशा मार्गानं आरक्षण मिळणार आहे का? बरं, यातही संभाजी ब्रिगेडचेच लोक सहभागी होते. म्हणजे केवळ संभाजी ब्रिगेडसारख्या संस्थेचे चार पदाधिकारी म्हणजे सकल मराठा समाज झाला का? एखाद्या स्त्रीविषशी अशी टीकाटिपन्नी करणं मराठा बांधवांना तरी मान्य आहे का? मग पुरूषोत्तम खेडेकर यांच्या विचारात आणि या झुंडशाहीत काय फरक राहिला? आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी एखाद्या समाजाला, एखाद्या लोकप्रतिनिधीला, त्यांच्या कुटुंबियांना वेठीस धरणं कितपत योग्य आहे?

आपल्याकडं पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी गेली अनेक काळ सुरू आहे. आर्थिक निकषानुसार आरक्षण, ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवणं यासाठीही अनेकांनी पुढाकार घेतला आहे. हे करताना दलित बांधवांचे हक्कही नाकारता येणार नाहीत. सर्वांना खूश ठेवणं राज्यकर्त्यांनाही शक्य नाही. धनगर, मराठा यांच्या आरक्षणाचे निर्णय त्यामुळंच सत्ताकारणाचा एक भाग बनतात. हे प्रश्न सुटावेत अशी प्रामाणिक इच्छाशक्ती राजकारण्यात दिसत नाही. त्यामुळं समाजात संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं. एकीकडं जातिअंताची भाषा करताना आपण कट्टर जातीवादी बनलोय. इतर जातींचा उपमर्द करणं, त्यांना कमी लेखणं, आपल्या जातीचा अभिमान बाळगताना इतरांवर तुटून पडणं ही बाब सध्या वाढीस लागलीय. ज्यांना जातीअंत हवाय ते सर्वच आपापल्या जातीचं घोडं पुढं दामटत आहेत. म्हणूनच नवी पिढी या सगळ्या जाळ्यात अलगद अडकतेय. 

वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी हे व असे अनेक गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. आरोग्य, शिक्षण, मुलभूत सेवा-सुविधा याची वाणवा असताना आपण जातीपातीचं राजकारण करतोय. जातीमुळे अनेकांवर अन्याय होतोय हे तर खरंच! पण तो अन्याय निवारण करण्यासाठी इतर जाती समूहांना जबाबदार धरून त्यांच्यावर आघात करणं हेही योग्य नाही. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी अशा आंदोलनाची धग वाढत जाते आणि निवडणुका संपल्या की पुन्हा सर्व शांत होते हा आजवरचा अनेकवेळचा अनुभव आहे. त्यामुळं आपण आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा. कायदेशीर मार्गानं जे काही करता येईल ते करायला हवं. मात्र आंदोलनाचा भाग म्हणून स्वतःचा जीव देणं, इतरांना वेठीस धरणं, सामान्य माणसाची गैरसोय करणं हे अस्सल मराठ्यांनाही रूजणारं नाही. खरा मराठा असे पळपुटे मार्ग कधी निवडणारही नाही. त्यामुळं वेळीच सावध होऊन निश्चित दिशा ठरवली नाही तर यातून साध्य तर काही होणारच नाही पण येत्या निवडणुकीनंतर हे केवळ एक ‘भरकटलेलं आंदोलन’ इतकीच त्याची नोंद इतिहासात घेतली जाईल हे कटूसत्य आहे.
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092
* या लेखातील आमदार मेधा कुलकर्णी यांच्याशी संबंधित मजकूर वगळून दैनिक 'पुण्य नगरी'ने आज माझ्या 'दखलपात्र' या स्तंभात हा लेख प्रकाशित केला आहे.