Saturday, October 28, 2017

वाचेल तो टिकेल!

मुद्रित माध्यमाच्या भवितव्याविषयी सध्या सातत्याने चर्चा होते. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय,’ ‘आणखी काही वर्षांनी वृत्तपत्रे बंद पडणार’, ‘सध्याचा जमाना ऑनलाईन असल्याने कोणी फारसे वाचत नाही’ ही व अशी वाक्ये सतत ऐकायला मिळतात. या सर्व प्रकारच्या चर्चा म्हणजे निव्वळ थोतांड आहे हे मी स्वानुभवाने सांगतो.

पूर्वी महानगरातला वाचक सकाळी घरी किंवा प्रवासात वृत्तपत्र वाचायचा. हे चित्र जाऊन सध्या बहुतेकांच्या हातात मोबाईल दिसतो हे खरे आहे. फेसबुक, व्हाटस ऍपसारख्या माध्यमांमुळे ‘वाचणे ही सुंदर सवय’ अशी वाक्ये माग पडत चालल्याचे सांगितले जाते. मात्र हे पूर्ण सत्य नाही. 

मुळात समाजमाध्यमे, दृकश्राव्य माध्यमे आणि मुद्रित माध्यमे यात प्रचंड तफावत आहे हे आपण समजून घ्यायला हवे. समाजमाध्यमात किंवा दृकश्राव्य माध्यमात अभ्यास नसलेली माणसे खपून जातात. मुद्रित माध्यमात मात्र अभ्यासू माणसे लागतात. कारण सर्वाधिक विश्वासार्हता मुद्रित माध्यमांचीच आहे. रात्री क्रिकेटचा सामना वृत्तवाहिनीवर बघितला तरी सकाळी वृत्तपत्रात ती बातमी वाचण्याची मजा काही औरच असते. ‘विराटचे विराट शतक’ ही बातमी वाचताना जितकी मजा येते तो आनंद अनेकदा तो सामना पाहतानाही येत नाही.
 
वृत्तपत्रात संपादकीय लेख असतात. त्यासाठी संबंधित संपादकाला चालू घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. वर्तमानाचे आणि भूतकाळाचे संदर्भ त्याला माहीत असावे लागतात. भविष्यात काय परिणाम साधले जातील याचा अभ्यास असावा लागतो. त्याउलट वृत्तवाहिन्यांवर ज्या चर्चा होतात त्यात बहुतेकदा वादावादीच असते. इथे निवेदकाचा संबंधित विषयाचा अभ्यास असावाच लागतो असा दंडक नाही. त्यामुळे चर्चेतले लोक मुख्य विषय सोडून काहीही बोलत असतात. एकमेकांना उचकावत असतात. कार्यक्रमाची सुरूवातच गोंधळाने करायची असा त्यांचा खाक्या असतो. म्हणूनच या चर्चा कुणी फार गंभीरपणे घेत नाही. ‘या वृत्तपत्राने अमक्या तमक्याला अग्रलेखातून चांगलाच चोपला’ अशी चर्चा होते. तशी गंभीर चर्चा वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमाबाबत होताना दिसत नाही. कारण वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम टिकून आहे.

सध्याचा जमाना धावपळीचा आहे. त्यामुळे ‘गतिमान आयुष्य नको’ असे वाटणारा एक मोठा वर्ग तयार होतोय. त्यांना आक्रस्थाळेपणा नकोय. निवांतपणा हवाय, शांतता हवीय. ही शांतता दृकश्राव्य माध्यमे देऊ शकत नाहीत. वृत्तपत्रातील महिलांविषयक, आरोग्यविषयक, पुस्तकविषयक, क्रीडाविषयक, चित्रपटविषयक मजकूरावर चर्चा होते. बोधकथेपासून विनोदापर्यंत आणि व्यंग्यचित्रापासून प्रासंगिक लेखापर्यंत हवा तो मजकूर वृत्तपत्रात वाचता येतो. शब्दकोड्यासारखी ज्ञानवर्धक आणि रंजक साधने दृकश्राव्य माध्यमे देऊ शकत नाहीत.

न्यूज आणि व्ह्यूज दोन्ही हवे असेल तर वृत्तपत्रांशिवाय पर्याय नाही. एखादी महत्त्वाची बातमी वृत्तवाहिन्यांनी चालवली तर प्रेक्षक चॅनेल बदलतात आणि ती बातमी खरी आहे का याची खात्री करून घेतात. वृत्तपत्रांबाबत सहसा असे होत नाही. छापील बातमीवर लोकांचा अजूनही विश्वास आहे. वृत्तपत्रातील भाषा लोकांना सोपी आणि सरळ वाटते.
एखादी बातमी वृत्तवाहिन्यांनी चालवली तर ती अचानकच गायब होते. त्याउलट एखाद्या वृत्तपत्राने काही महत्त्वाचा विषय हाताळला तर तो तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी, संपादकांनी लेखनासाठी मोठी किंमत मोजली. सरकारविरोधी रोष व्यक्त केला म्हणून लोकमान्य टिळकांना तुरूंगवास भोगावा लागला. त्याउलट सहकारी बाईवर बलात्कार केला म्हणून तरूण तेजपालसारख्या संपादकाला तुरूंगाची हवा खावी लागली. काही अपवाद वगळता माध्यमात काम करणार्‍या लोकांच्या गुणवत्तेतला हा फरक आहे. अर्थात, दृकश्राव्य माध्यमात काम करणार्‍या सगळ्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा माझा मानस नाही; परंतु वृत्तपत्रातील लोकांविषयी अजूनही व्यापक विश्वासार्हता आहे हे मान्य करावेच लागेल.

स्थानिक घडामोडींची प्रभावी दखल अजूनही वृत्तपत्रांद्वारेच घेतली जाते. रस्त्यावर पडलेले खड्डे असोत किंवा गावातील अखंड हरीनाम सप्ताह... या बातम्या वृत्तवाहिन्यांवर येणे तितकेसे सोपे नसते. स्थानिक समस्या वृत्तपत्रांतून मांडल्यानंतर प्रशासनही त्याची योग्य ती दखल घेते. वृत्तपत्रांत काम करणार्‍या लोकांचा संबंध भाषेशी येतो. त्यामुळे ते सरस्वतीचे भक्त असतात. विविध सदरे, प्रासंगिक लेख, बातम्या हे तर सोडाच पण ‘स्वयंपाकी हवा’, ‘घरकामाला बाई पाहिजे’, ‘पेस्ट कंट्रोलवाला हवा’, ‘विविध कामासाठी गरजू लोक हवेत’ अशा लोकोपयोगी छोट्या जाहिराती सुद्धा केवळ आणि केवळ वृत्तपत्रांतच वाचावयास मिळतील. सामान्य माणसाला मदत होणे आणि त्याच्या दैनंदिन समस्या सोडविण्यास हातभार लावणे हेच वृत्तपत्रांचे ध्येय असते. गावातील लोकांच्या ‘निधन वार्ता’सुद्धा देऊन वृत्तपत्रे वाचकांची सहवेदना अनुभवतात. त्यामुळे वृत्तपत्रांचे वाचकांशी अनोखे बंध निर्माण होतात. कामगार दिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी अशा जेमतेम चार सुट्ट्या घेतल्या आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी वृत्तपत्र आले नाही तरी अनेकांना चुकल्याचुकल्या सारखे होते. हेच तर मुद्रित माध्यमांचे मोठे यश आहे.

एक अखबार हूँ, अवकात ही क्या है मेरी
लेकिन पुरे शहर आग लगाने काफी हूँ 

असे वृत्तपत्रांबाबत म्हटले जाते ते उगीच नाही. कोणताही विषय ठामपणे मांडणे ही त्यांची खासियत असते. तरीही सध्या अनेक छोटी आणि विशेषतः जिल्हा दैनिके अडचणीत आहेत. सरकार दरबारी त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत नाहीत. ग्रामीण आणि निमशहरी भागातील वार्ताहर तुटपुंज्या मानधनावर काम करतात, पण त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा सोडला नाही. बातम्यांसाठी ते कठोर परिश्रम घेतात. मिळेल त्या साधनांद्वारे प्रवास करतात. लोकांशी बोलतात. खरेखोटे पडताळून पाहतात. आपल्या लेखनातून कुणावर अन्याय होऊ नये याची कटाक्षाने काळजी घेतात. त्याउलट ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावावर अनेक वाहिन्या वाटेल तशा बातम्या चालवतात. बहुतेकांना फक्त ‘टीआरपी’शी देणेघेणे असते.

सध्या दुर्दैवाने काही वाङमयीन नियतकालिके बंद पडत आहेत. नव्या काळाची आव्हाने स्वीकारण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यवस्थापनात नाही. असे असले तरी राज्यभरातील दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके यांची जनमत घडवण्यातली ताकत मोठी आहे. त्यांची सर कुणालाच येणार नाही. म्हणूनच वाचनसंस्कृती कमी होतेय, भाषा संपत चाललीय असे नकारात्मक सूर लावण्यात अर्थ नाही. केवळ आणि केवळ विश्वासार्हतेच्या बळावर मुद्रित माध्यमे चिरकाल तग धरून राहतील याबाबत माझ्या मनात कसलाही किंतु नाही. मुद्रित माध्यमांच्या भवितव्याची चिंता करणार्‍यांना सांगावेसे वाटते,

ना तोफ से, ना बंदुक से
जो होता नही तलवार से
होता है अखबार से!
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092

Saturday, October 21, 2017

अजूनी चालतोची वाट....!



ही गोष्ट आहे 2001 सालातली. माझे वय होते सतरा! मी मराठवाड्यातल्या एका छोट्याशा खेड्यातून येऊन पुण्यासारख्या महानगरात दाखल झालो होतो. ध्येय होते पत्रकारिता करण्याचे. त्यापूर्वी वृत्तपत्रविक्रेता, ग्रामीण वार्ताहर म्हणून बरीच उलथापालथ केलेली. अर्थात, त्याच्या परिणामांची चिंता नव्हती! ती मी का करावी? ज्यांना माझे लेखन झोंबायचे आणि ज्यांचा पोटशूळ उठायचा ते त्या परिणामांची मीमांसा करत असायचे. मी आपला उडाणटप्पू! 

पुण्यात आल्यावर सर्व प्रस्थापित वृत्तपत्रांचे उंबरठे झिजवले. ‘वय कमी’ आणि ‘पत्रकारितेची पदवी नाही’ म्हणून सर्वांनी झिडकारले. काहींनी, ‘बेटा आधी शिक्षण पूर्ण कर, पदवी घे आणि मग आमच्याकडे ये...’ असेही सांगितले. मात्र तितका धीर कोण धरणार? काहीही करून या क्षेत्रात नशीब आजमावयाचेच हा निर्धार पक्का होता. परतीचे दोर कापून टाकलेत असे वाटत होते. म्हणूनच जंग जंग पछाडले.

त्याचवेळी दै. ‘संध्या’चा अंक हाती पडला. हे पुणे जिल्ह्यातलं पहिलं सायंदैनिक. त्यात जाहिरात होती, ‘वृत्तसंपादक, उपसंपादक, बातमीदार, अंक विक्रेते नेमणे आहेत.’ म्हटलं बघावं प्रयत्न करून! पत्ता होता टिळक रस्त्यावरच्या ‘व्हाईट हाऊस’चा. तेव्हा माझा मुक्काम होता सारसबागेच्या फूटपाथवर. तिथून हे ठिकाण हाकेच्या अंतरावर. 

मग गाठले ‘संध्या’चे कार्यालय. सगळेजण आपापल्या कामात व्यग्र. कुणाशी बोलावे काहीच सुचेना. घाबरतच एकाला सांगितले, ‘‘संपादकांना भेटायचे आहे...’’ त्यांनी समोरची केबिन दाखवली. थेट आत गेलो. त्यांनी बघितले आणि विचारले, ‘‘काय रे बाळा? काय काम काढलंस?’’ त्यांना वाटलं, कुणीतरी विद्यार्थी दिसतोय. कसलीशी मदत हवी असणार!

मी नमस्कार केला आणि बसलो त्यांच्या समोरच्या खुर्चिवर! त्यांना म्हणालो, ‘‘मी पत्रकार व्हायला आलोय. तुम्ही काही सहकार्य करू शकाल का? तुमची आजच्या अंकातली जाहिरात बघितली म्हणून इथवर आलोय.’’

ते हसायला लागले. म्हणाले, ‘‘हे इतकं सोपं नसतं. शिक्षण काय तुझं? पुढं काय करायचं ठरवलंय?’’

त्यांना म्हणालो, ‘‘मी गेल्या चार वर्षापासून लिहितोय. ही मी लिहिलेल्या लेखांची आणि बातम्यांची फाईल. बहुतेक लेखन नावासह प्रकाशित झालेले आहे. तुम्ही खात्री करून घेऊ शकता. सांस्कृतिक क्षेत्रात पुण्याचा लौकिक मोठा आहे. माझ्या खेडेगावात फारशा संधी नाहीत. तिथल्या सामान्य माणसाची, शेतकर्‍यांची दुःख मोठ्या प्रवाहात मांडली जात नाहीत. त्यामुळं मला संपादक व्हायचंय. तुम्ही पत्रकारितेची संधी दिलीत तर एक यशस्वी संपादक व्हायची जबाबदारी माझी...’’

ते असे काही बघू लागले की, जणू आफ्रिकेच्या जंगलातला एखादा अजस्त्र प्राणी त्यांच्या दालनात दाखल झालाय.

मग त्यांनी विचारलं, ‘‘इथं काय करू शकशील?’’

त्यांना म्हणालो, ‘‘अंक विक्रीपासून ते जाहिराती मिळवण्यापर्यंत आणि बातमी लिहिण्यापासून ते अग्रलेख लिहिण्यापर्यंत तुम्ही जे सांगाल ते...’’

त्यांनी माझ्या हातातली लेखांची फाईल घेतली. त्यावर नजर टाकत म्हणाले, ‘‘हा घनश्याम पाटील तूच कशावरून? हे लेखन प्रौढ माणसाचे वाटतेय...’’

त्यांना म्हणालो, ‘‘मी खूप सामान्य आहे... पण आज इथे संत ज्ञानेश्वर आले तरी तुम्ही म्हणाल, तू तर खूप लहान दिसतोस. हे तुझे उमेदवारीचे वय नाही. शिक्षण घे, पदवी घे... शिवाय हे तूच लिहिलंय हे सिद्ध कर...’’

मग ते हसायला लागले. त्यांच्यासमोरचा पॅड त्यांनी माझ्यासमोर ढकलला आणि म्हणाले, ‘‘तुला सद्य स्थितीतील ज्या विषयावर लिहावे वाटते ते लिही.’’

त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही विषय सांगा. लिहिण्याचा प्रयत्न नक्की करीन!’’

त्यांनी सांगितले, ‘‘आण्विक अस्त्रांविषयी लिही.’’

मी कागद घेतला आणि लिहित सुटलो.

‘देशाला आण्विक अस्त्रांची गरज...’ 
त्यात अटलजींविषयी, त्यांच्या धोरणाविषयी आणि आण्विक अस्त्रांच्या आवश्यकतेविषयी जे वाटेल ते खरडले. त्यांनी त्यावर नजर टाकली. हातातल्या लाल पेनने दोन-चार ठिकाणी व्याकरणाच्या दुरूस्त्या केल्या आणि सांगितले, ‘‘तू लाग कामाला.’’

त्या दिवशी जग जिंकल्याचा आनंद झाला. 
माझी दै. ‘संध्या’मधली बातमीदारी सुरू झाली.

नंतर मला कळले, मी ज्यांच्याशी बोलत होतो ते दै. ‘संध्या’चे संस्थापक, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे भीष्माचार्य वसंतराव काणे होते. त्यांना सर्वजण ‘तात्या’ म्हणायचे. काही दिवसातच मी त्यांच्या खास मर्जीतला पत्रकार झालो. त्यांनी मला आश्चर्यकारक जबाबदार्‍या दिल्या.

‘संध्या’ला लागल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच मला अग्रलेख लिहायची संधी मिळाली. पान एकसाठीच्या बातम्या निवडू लागलो. विविध विषयांवरील पुरवण्यांचे नियोजन करून त्या साकारू लागलो. महानगपालिकेचे वार्तांकनही त्यांनी माझ्यावर सोपवले. माझे आयुष्य झपाट्याने बदलले. लेखनस्वातंत्र्य आणि योग्य मार्गदर्शन यामुळे माझा वारू सुसाट सुटला. 

त्यांचं सांगणं असायचं, ‘‘बातम्यांची शीर्षकं मसालेदार असावीत. त्यात रंजकता असावी. हे करताना वस्तुनिष्ठपणे सत्य मांडले पाहिले. वाचकांची विश्वासार्हता कोणत्याही परिस्थितीत गमावता कामा नये.’’

मग मी अनेकांना ठोकत रहायचो. नंतर ते हळूवारपणे संबंधितांना त्याची चूक लक्षात आणून द्यायचे.

महादेव बाबर नावाचे एक स्थानिक नेते शिवसेनेचे उपमहापौर होते. त्यांचा कोंढवा हा मतदारसंघ बर्‍यापैकी मुस्लिमबहुल. त्यामुळं त्यांची आणि पक्षाची धोरणंही अनेकदा विसंगत असायची. त्यांच्यावर मी एक लेख लिहून शिवसैनिकांनाच वाटणारी असुरक्षितता, त्यांची नाराजी व्यक्त केली. त्याचे शीर्षक होते, ‘शिवसेनेचे उपमहापौर महादेव आहेत की बाबर?’ तो विषय खुपच चर्चेला आला. बाबर आम्हाला भेटायला ‘संध्या’च्या कार्यालयात आले. ‘एवढासा पोर’ पाहून त्यांचा राग निवळला. त्यांनीच मोठ्या कौतुकानं चहा पाजला.

आणखी एका महापौरांनी त्यावेळी त्यांच्या गाडीच्या चालकाच्या खानाखाली वाजवली. 'महापौरांची कर्मचार्‍यांना मारहाण' म्हणून माध्यमांनी त्यांच्यावर टीकेचे प्रहार केले होते. त्यावेळी मी एक विनोदी लेख लिहिला होता. त्याची सुरूवात दोन कर्मचार्‍यांच्या संवादातून होती.
पहिला कर्मचारी मार बसल्यामुळं रडत असतो. दुसरा त्याला समजावणीच्या सुरात म्हणतो, ‘‘जाऊ दे यार. ही मोठी लोकं. आपण परिस्थितीनं गरीब. सहन केलं पाहिजे. आपल्या पोटाचा प्रश्न आहे. त्यांचं आपण काही वाकडं करू शकत नाही.’’

त्यावर पहिला उसळून म्हणतो, ‘‘काय म्हणून सहन करायचे? एक टेंपररी माणूस एका परमनंट माणसाला मारतो म्हणजे काय?’’

त्यावेळी हा लेख चांगलाच चर्चेत आला होता.

अशीच गंमत ज्येष्ठ नेते मोहन धारिया यांच्याविषयी केली होती. 
मोहन धारिया प्रसिद्धीबाबत फार जागरूक होते. कितीही छोटा कार्यक्रम असला तरी ती बातमी फोटोसह यावी यासाठी त्यांचा आग्रह असायचा. एकेदिवशी मी त्यांच्यावर लिहिले,

‘पत्रकार या नात्यानं एखाद्या बड्या नेत्याची मुलाखत घ्यावी असा विचार मनात आला आणि मी मोहन धारियांचा बंगला गाठला. बंगल्याचे फाटक ढकलूत आत गेलो. घरात प्रवेश केला आणि समोरचे दृश्य पाहून अचंबितच झालो. आदरणीय मोहन धारिया एका स्टुलावर उभे होते. त्यांच्या हातात मोठा दोर होता. ते गळफास लावून घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीराम गोमरकर त्यांना परोपरीनं समजावून सांगत होते. ‘अण्णा, तुम्हाला कसला त्रास होतोय का? कोणी काही बोलले का? नैराश्य आलंय का? साने गुरूजींप्रमाणं समाजातील अरिष्ट बघवत नाही का? तुम्ही असा अविचार का करताय? आम्हाला तुमची गरज आहे. असं आम्हाला पोरकं करण्याचा अधिकार तुम्हाला नाही...’

तेवढ्यात मोहन धारियांनी गोमरकरांना आमच्या डोळ्यादेखत बाजूला ढकललं आणि ओरडले, ‘‘मला मरू दे श्री... अरे आज पुण्यातल्या एकाही वृत्तपत्रात माझ्यावर चार ओळीही छापून आल्या नाहीत तर जगून करू काय?’’

त्यावर खूप चर्चा झाली. अण्णांनी ‘संध्या’च्या ऑफिसमध्ये फोन करून मला झापझाप झापडलं. पुढे भेटायलाही बोलावलं. मी गेलो. त्यांच्यासमोर बसून ओळख दिली आणि सांगितलं, ‘‘छोट्या छोट्या बातम्यांसाठी तुमच्या कार्यालयाकडून चार चार फोन येतात त्यामुळं केली थोडीशी गंमत. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. खोड्या लहानांनी नाही तर तुमच्यासारख्या मोठ्यांनी काढाव्यात काय?’’

ते हसू लागले. त्यांनी संध्याच्या संपादकांना फोन करून सांगितलं, ‘‘आता तुमचा पेपर जोरात पुढे येणार. तुमच्या खपाची चिंता मिटली.’’

पुढं धारियांनी माझ्यावर विलक्षण प्रेम केलं.

अशा अनेक छोट्या मोठ्या घटनांतून, लेखनातून घडत होतो. काहीवेळा अडखळत होतो. मात्र लहान मुलाचं रांगणं पाहूनही मोठ्यांना कौतुकच वाटावं तशा माझ्या चुका झाकल्या जात होत्या. एक छोटासा मुलगा कुणाचीही भीड न बाळगता, मुलाहिजा न राखता बिनधास्त लिहितोय याचंच अनेकांना कौतुक वाटायचं.

असं सगळं सुरू असतानाच ‘संध्या’चं व्यवस्थापन बदललं. नव्या व्यवस्थापनाशी जुळवून घेणं मला कठीण गेलं आणि पडलो बाहेर. आता पुढं काय हा विचार त्याक्षणी तरी आला नव्हता.

‘संध्या’मध्ये भावनिकदृष्ट्या खूप गुंतलो होतो. त्यामुळं चांगलाच त्रास झाला. एखादा जवळचा नातेवाईक जावा, त्याप्रमाणं रडून घेतलं. आठ-दहा दिवस बेचैनित गेले. मग ठरवलं, आता नोकरी करायची नाही. जे काही करायचे ते स्वतः करायचे. नोकरी सोडल्याचे दुःख होणार नाही. स्वतःचा प्रयत्न फसला तर वाईट वाटणार नाही कारण तो आपला नाकर्तेपणा असेल. त्यात यश-किंवा अपयश जे काही येईल ते स्वतःचे असेल.

दरम्यान, पुण्याच्या पत्रकारिता वर्तुळात चांगली ओळख निर्माण केली होती. त्यामुळं मी ‘संध्या’तून बाहेर पडलोय हे कळताच अनेकांच्या ‘ऑफर’ आल्या. सुरूवातीला ज्यांनी झिडकारले होते तेही आग्रह करत होते. मात्र माझा निर्धार पक्का होता.

अलका टॉकिज चौकात त्यावेळी ‘दरबार’ नावाचं हॉटेल होतं. तो आमच्या सर्वांचाच अड्डा! मी, माझ्या ज्येष्ठ सहकारी शुभांगी गिरमे, महेश कोरडे, महेश मते आम्ही सर्वजण तिथं बसलो होतो. कोरडे यांनीही माझ्या आधी काही दिवस ‘संध्या’ सोडला होता. काहीकाळ आम्ही शुक्रवार पेठेतल्या एका खोलीत ‘कॉट बेसीस’वर एकत्र राहत होतो. माझी फरफट होऊ नये असे त्यांना वाटत होते. त्यामुळं मी ‘संध्या’ सोडू नये, पुन्हा तिथंच जावं यासाठी ते आग्रह करत होते.

त्यांना निश्चयानं सांगितलं, ‘‘आता जे काही करायचं, ते स्वतंत्रपणे करायचं. मी स्वतःच दैनिक सुरू करणार. तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या! मी तुमचं कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही...’’

माझं वय आणि परिस्थिती पाहता सर्वांनाच हे ‘अति’ वाटत होतं. त्यातला फोलपणा दिसत होता. शेवटी कोरडेंनी विचारलं, ‘‘त्यासाठी मोठं भांडवल लागतं. तुझ्याजवळ किती पैसे आहेत?’’

खिशात हात घातला आणि एकशे अडतीस रूपये मी टेबलवर ठेवले. सगळेजण हसू लागले.

कोरडेंना म्हणालो, ‘‘आपल्याला दैनिक सुरू करायला किती भांडवल लागेल? तुम्ही जेवढा आकडा सांगाल त्यापेक्षा एक लक्ष रूपये मी जास्त गोळा करतो. ते आल्यावर तरी तुम्ही साथ द्याल का?’’

शुभांगी गिरमे यांनी सांगितलं, ‘‘मी इथंही पैशासाठी काम करत नाही. माझे चार तास मजेत जातात. तुझ्या ठिकाणी माझा भाऊ असता तर मी नक्कीच त्याच्या पाठिशी राहिले असते. तू कर धाडस. पुढे जे काही हाईल ते होईल.’’

झालं! ठरलं! मला एक भक्कम सहकारी मिळाला. आता माघार नाही! 

नेमकी दिवाळी तोंडावर आलेली. जर दिवाळी अंकापासून सुरूवात केली तर चांगल्या जाहिराती मिळण्याची शक्यता होती. आम्ही एखाद्या अर्थपूर्ण नावाचा विचार सुरू केला. त्याची तयारीही चालवली. मात्र आम्हाला कळलं की ही किमान दीड-दोन महिन्यांची प्रक्रिया आहे. तितका वेळ तर हातात नव्हता. काय करावे काहीच सुचत नव्हते...

आमची तगमग पाहून महेश कोरडेंनी एक पर्याय सुचवला. आमचे आणखी एक रूममेट म्हणजे शिवाजी शिंदे. ते एका वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करायचे. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. शिंदे आणि कोरडे दोघे मिळून फलटणहून ‘चपराक’ नावाचा दिवाळी अंक काढत होते. तो चालवणे त्यांना शक्य नव्हते. तो मी विकत घ्यावा, असा पर्याय त्यांनी दिला. 

‘चपराक’ हे नाव थोडे वेगळे होते. माझ्या लेखनवृत्तीशी मिळतेजुळतेही होते. 

आम्ही व्यवहार पूर्ण केला. शिवाजी शिंदे यांनी एका शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेरवर लिहून दिले की, ‘मी पूर्ण शुद्धीत आणि स्वमर्जीने लिहून देतोय की, यापुढे चपराकचे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक या नात्याने सर्व अधिकार श्री. घनश्याम पाटील यांच्याकडे असतील. माझा त्यावर कसलाही अधिकार नाही. चपराकचे संपादन, वितरण, जाहिरात अन्य मालकी हे सर्व घनश्याम पाटील यांच्याकडेच असेल.’ त्यावर कोरडे, ननावरे अशा आमच्या रूममेटसनी ‘साक्षीदार’ म्हणून सह्या केल्या.

(आमच्या मूर्खपणाचा तो पुरावा अजूनही मी जपून ठेवलाय.)

पुढे मग मी खूप पळालो. शुभांगी गिरमे यांची त्यांच्या वेळेनुसार साथ होतीच. मुख्य म्हणजे भावनिक आधार होता.

पहिल्या अंकासाठी मी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची मुलाखत घेतली. सदानंद भणगे यांच्यापासून अनेक दिग्गज लेखकांचे साहित्य मागवले. सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. जाहिरातीही दणकून मिळाल्या.

ठरल्याप्रमाणे निळूभाऊंच्या हस्ते प्रकाशन झाले. ते सहा तास ‘चपराक’च्या कार्यालयात येणार्‍या जाणार्‍यांशी गप्पा मारत बसले. 

वृत्तपत्रांनी दिवाळी अंकाची जोरदार दखल घेतली.

सुरूवात तर धडाक्यात झाली. त्यावेळी हे फक्त ‘वार्षिका’चे रजिस्ट्रेशन होते. त्यामुळे त्याचे मासिकात रूपांतर करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. त्यांना अंक दिला. शिवाजी शिंदे यांनी लिहून दिलेला स्टॅॅम्प पेपर दाखवला.

ते पाहून ते हसू लागले. त्यांनी सांगितले, असे लिहून देऊन मालकी मिळत नसते. ही प्रक्रिया दिल्लीहून होते. वृत्तपत्रांचा विभाग केंद्र सरकारशी संबधित येतो.

मग त्यांनी आमचे ‘टायटल’ बघितले. खरा धक्का तर आता आम्हाला बसला. हे टायटल अनियमिततेमुळे 1997 लाच रद्द झाले होते.

म्हणजे ही पूर्णपणे फसवणूक होती. रोज एका ताटात जेवत असताना त्यांनी असे का केले? म्हणून मी महेश कोरडेंना खूप बोललो! पण यात कुणाचीच चूक नव्हती. शिंदे-कोरडे यांनाही याबाबतची वस्तुस्थिती माहीत नव्हती. जे झाले ते झाले म्हणून आम्ही नव्यानं सुरूवात करायची ठरवली. 

हा धक्का कसाबसा पचवल्यानंतर दुसरे नाव घेऊन पुन्हा सुरूवात करायची असा प्रस्ताव पुढे आला. मात्र ‘चपराक’शी पुन्हा भावनिक नाते निर्माण झाले होते. एकदा मूल दत्तक घेतल्यावर त्याचीही नाळ तोडता येत नाही. 

मग आम्ही ‘चपराक’ या नावाचाच आग्रह धरला. त्यासाठी थेट दिल्लीला गेलो. अनेकांची मदत घेतली. हे नाव आधीच रद्द झालेले असल्याने त्यासाठी फार काही अडचण आली नाही. ‘संस्थापक, संपादक’ या नात्याने ‘चपराक’ हे नाव आम्हाला मिळाले. त्याचा आनंद आम्ही धडाक्यात साजरा केला.

त्यानंतर सर्व क्षेत्रातली असंख्य माणसं जोडत गेलो. पुणे शहराचं एक वैशिष्ट्य आहे, इथं चांगल्याला चांगलं म्हणणारी लोकं आहेत. त्यांना स्पष्टपणा आवडतो. इथं टिकायचं तर सातत्यानं चुकीच्या गोष्टींवर टीका करावी लागते. ‘टीका करतो तो टिकतो’ हे या शहराचं सूत्र आहे; मात्र हे करताना सद्गुणांची पूजा बांधायचा संकल्पही केला. जे जे चांगले वाटेल त्याला शब्दशः डोक्यावर घेऊन नाचलो. जिवाला डागण्या देणार्‍या अंनत अडचणी आल्या. एकेक रूपया बैलगाडीच्या चाकासारखा वाटत होता. ज्येष्ठ पत्रकार कै. गोपाळराव बुधकर यांच्यासारख्या माणसांनी खूप जीव लावला. सत्य लिहिण्यासाठी, त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार केले. 

आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, नीलकंठ खाडीलकर,  गोपाळराव बुधकर, वसंतराव काणे आणि मुरलीधर शिंगोटे हे माझे या क्षेत्रातले आदर्श आहेत. 

पुढे सर्व विचारधारांचा अभ्यास सुरू केला. तो आयुष्यभर पुरा होईल असे वाटत नाही. मात्र विद्यार्थी असण्याचे सुख त्यामुळे सातत्याने अनुभवता येते. ‘चांगलं ते स्वीकारायचं आणि वाईट ते अव्हेरायचं’ हा आमचा मूलमंत्र. त्याच्याशी प्रामाणिक राहत चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष या ‘चपराक’च्या आद्याक्षरांप्रमाणं आमची वाटचाल सुरू आहे.

सध्या एक अत्यंत प्रभावी साप्ताहिक, परिणूर्ण मासिक आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था अशा तीन आघाड्यावर आमचं काम चालतं. अनेक वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या सातत्यानं ‘चपराक’चे संदर्भ देत आमच्या लेखनावर बातम्या देतात, कार्यक्रम प्रसारित करतात. ‘चपराक’चे अग्रलेख आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवतात. आणखी काय हवं?

‘चपराक’ने सहा राज्यातील वाचक जोडले आहेत. लेखक तयार केले आहेत. नव्यानं लिहिणार्‍यांची फळीच त्यामुळे निर्माण झालीय. विक्रीचे उच्चांक केलेत. अनेक दिवाळी अंकांचे दिवाळं निघत असताना आम्ही पाचशेहून अधिक पानांचा दिवाळी महाविशेषांक प्रकाशित करतो.

‘मराठवाडा आणि भीती’ ही विसंगती आहे. त्यामुळं या मातीच्या मुशीतून आलेला बेडरपणाच माझी निर्भयता जपून ठेवतो. 

‘चपराक’च्या झाडाला अनेक फळं लगडली असली तरी हा बहर ओसरणार आहे आणि पुन्हा पुन्हा पालवीही फुटणार आहे याचा विश्वास आहे. तो विश्वासच मला कार्यरत ठेवतो. 

- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092
(पूर्वप्रसिद्धी - 'दिलासा' दिवाळी अंक २०१७)

Friday, October 20, 2017

स्वतःच्या बायकोला ओळख देणं ही देशभक्ती!



सध्या आपण विचित्र स्थित्यंतरातून जात आहोत. सर्व माध्यमातून देश पुढं जात असल्याचं दाखवलं जात असताना आपण किती मागं आलोय हे अनेकांना माहीत नाही. या पार्श्वभूमीवर देशभक्तीची व्याख्या ठरवणं हे म्हणूनच कठीण काम आहे. कवितेसारख्या सर्वोच्च साहित्यप्रकाराची व्याख्या करणं तुलनेनं खूप सोपं आहे पण देशभक्तीची व्याख्या करण्यासाठी कोणते तराजू जवळ बाळगावेत?

आपल्या जाज्ज्वल्य इतिहासाचा थोडासा धांडोळा घेतला तर ही व्याख्या ठरवणं थोडसं सुसह्य होईल. आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवलं; तेव्हा एकानं त्यांना प्रश्न विचारला, ‘‘तुमचं ध्येय साध्य झालं. आता यापुढं तुम्ही काय करणार?’’ त्यावर क्षणाचाही विलंब न करता चाणक्य म्हणाले, ‘‘मी मूळचा शिक्षक आहे. पुन्हा विद्यादानाचं काम करणार.’’ याला देशभक्ती म्हणतात.

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी अमानुष गोळीबार झाला. त्यावेळी ‘मुस्लिम पळून गेले’ असा आक्षेप घेतला गेला. खान अब्दुल गफार खां यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी धारातीर्थी पडलेल्या मुस्लिमांची तपासणी करण्याची मागणी केली. त्यावरून 76 मुस्लिमांचे मृतदेह तपासले गेले. अर्थातच त्यांना गोळ्या लागलेल्या होत्या. याला देशभक्ती म्हणतात.

सावरकर त्यावेळी म्हणाले होते, ‘‘इंग्लंडची राणी मेली तर मी तिच्या श्रद्धांजली सभेला जाणार नाही...’’ या बाणेदार उत्तराला देशभक्ती म्हणतात.

सावरकरांनी माफी मागितली, ते पळून आले असे काहीजण सांगतात. या इतक्या मोठ्या देशभक्तावर शंका घेणारे मात्र दुर्दैवानं आज देशभक्त ठरतात. राष्ट्रासाठी त्यांनी केलेला त्याग, समर्पण समजून न घेता आपण जात, धर्म, प्रांत, विचारधारा अशा फूटपट्ट्या लावून ‘देशभक्त कोण?’ ते ठरवतो.

1666 ला शत्रूच्या ताब्यातून सुटून आल्यानंतर पुढची चार वर्षे छत्रपती शिवाजीमहाराज गप्प होते. त्यांनी अनेक तह केले. वेळप्रसंगी माघार घेतली. त्यांचा आदर्श सांगणारे काहीजण मात्र सावरकरांना सहजपणे ‘माफीवीर’ ठरवतात.

‘वंदे मातरम्’ न म्हणणार्‍यांना आपल्याकडे राष्ट्रद्रोही ठरवलं जातंय. इथला सच्चा मुसलमान रोज पाच वेळा नमाज पढतो. तो नमाज पढताना ज्या ज्या वेळी जमिनीवर डोकं टेकवतो ते त्याचं ‘वंदे मातरम्’च असतं, हे आम्ही समजून घेत नाही. समाजवाद्यांनी, हिंदुत्त्ववाद्यांनी किंवा आणखी कोणी घालून दिलेले नियम पुढं रेटणं हीच अनेकांना देशभक्ती वाटतेय. 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडे तीन मागण्या करण्यात आल्या होत्या. ‘फितुरांची नावे दे, तुझे सगळे किल्ले दे आणि तुझ्या वडिलांचा म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा सर्व खजिना दे...’ त्यावेळी त्यांनी शत्रूंना धुडकावून लावलं. ‘माझ्या वडिलांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य हे माझं नाही तर ते रयतेचं आहे’ हे ठणकावलं. अत्यंत निश्चयानं, धैर्यानं हा राजा मृत्युला सामोरा गेला. याला म्हणतात देशभक्ती! राष्ट्रभक्तीच्या सर्वोच्च त्यागाचं हे जिवंत उदाहरण आम्ही सोयीस्कर विसरतो.

निजामानं पुणं जाळलं. त्यावेळी मल्हारराव रास्ते यांनी त्यांना काही धनाढ्यांची घरं दाखवली. ते वाडे लुटले गेले, जाळले गेले. माधवराव पेशवे यांनी त्यांना शिक्षा दिली. सामान्य माणसाचं हे नुकसान भरून देण्याचे आदेश दिले. स्वतःच्या मामाला त्यांनी माफ केलं नाही. माधवरावांच्या आईनं त्यांना विरोध केला. स्वतःच्या भावासाठी शनिवारवाडा सोडण्याचीही धमकी दिली. पुढं त्यांची आई शनिवारवाडा सोडून गेली सुद्धा! पण माधवराव पेशवे त्यांच्या न्याय आणि विवेकापासून दूर गेले नाहीत. असं स्वतःच्या मतापासून न ढळणं म्हणजेच देशभक्ती! 

रामशास्त्री प्रभुणे यांचा न्यायनिवाडा आपणास माहीत आहेच. असं ‘देहान्त प्रायश्चित’ देण्याची शिक्षा आजकाल कोणती न्यायव्यवस्था देईल काय? तकलादू लोकांच्या हातात व्यवस्था गेलीय. लोकशाहीचे चारही स्तंभ भुसभुशीत झालेत. म्हणूनच देशभक्तीची व्याख्या ठरवण्यासाठी आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेवा दल, भाजप किंवा एमआयएमची मदत घ्यावी लागते.

अशावेळी पुन्हा आचार्य चाणक्य आठवतात. त्यांना एकानं विचारलं, ‘‘तुम्ही सिंहासन बदलवू शकता. मग तुुम्ही स्वतःच राजे का होत नाही? तुम्ही उत्तम राज्य प्रशासन देऊ शकाल.’’

त्यावेळी चाणक्यांनी सांगितलं, ‘‘राज्यकारभार करण्यासाठी लग्न करावं लागतं. कुटुंबवत्सल असावं लागतं. त्याला सामान्य माणसाची, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातली सुखदुःखं कळावी लागतात. ती मला कळत नाहीत म्हणून मी राज्यकारभार करू शकत नाही.’’

देशातली आजची परिस्थिती पाहता असंच वाटतं. आपल्या राजाला सामान्य माणसाची सुखदुःखं कळतात का? जसोदाबेन यांना ते बायको म्हणूनही ओळख देत नाहीत. स्वतःच्या बायकोला ओळख देणं ही सुद्धा देशभक्तीच ठरावी! 

ग्यानी झैलसिंग असोत व्यंकटरमण असोत किंवा आपल्या मराठमोळ्या प्रतिभाताई पाटील! या सर्वांनी त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपला की तिथून ट्रक भरभरून सामान आणलं. प्रतिभा पाटील यांच्याकडं तर राष्ट्रपती भवनातून त्यांच्या काही सामानाची परत मागणी करण्यात आली होती. निवृत्तीनंतर त्यांनी पुण्यात सैन्यदलाची जागाही ढापली. तो विषयही चर्चेत आला. असं सारं असताना एपीजे अब्दुल कलाम नावाचा एक फकीर शास्त्रज्ञ राष्ट्रपती भवनातून केवळ दोन सुटकेस हातात घेऊन बाहेर पडला. रामेश्वरला एकेकाळी हिंदू बांधवांचे पर्यटन घडविणारा, त्यांना गाईड करणारा हा मुलगा राष्ट्रपती झाला आणि त्यानं त्याच्या साधेपणानं जगाला देशभक्ती दाखवून दिली. ती आम्हाला दिसत नाही..

1965 च्या आणि 1971 च्या युद्धात संपूर्ण समुदाय एकत्रितपणं उभा राहिला होता. अडचणीच्यावेळी सर्वांनी असं एकत्रं येणं आणि आपली सामुहिक शक्ती दाखवून देणं ही सुद्धा देशभक्तीच आहे. त्यासाठी जागतिक योग दिन साजरा करणं आणि शक्तीप्रदर्शन घडविणं गरजेचं नाही.

आपल्याकडं आपण नैतिक शिक्षण आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार नवीन पिढीला देण्यात कमी पडलोय. प्रत्येक गोष्टीचं राजकारणच सुरू आहे. पंडित नेहरू यांच्याबाबत अनेकांची मतमतांतरे असू शकतात; मात्र त्यांच्या मंत्रीमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे पाच बिगर कॉंग्रेसी मंत्री होते. पूर्ण बहुमत असताना संयुक्त राष्ट्रसंघात आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी इंदिरा गांधींनी तेव्हाच्या विरोधी पक्षनेता असलेल्या अटलबिहारी वाजपेयींना पाठवलं होतं. इंदिराजींनी असा निर्णय घेणं आणि अटलजींनी त्यांचा मान राखणं ही देशभक्ती होती. पक्षीय राजकारण बाजूला सारून सध्या असं काही होताना दिसतं का बरं!

देशभक्तीची व्याख्या करणं तसं खरचं खूप अवघड झालंय. समाजमाध्यमावर सरकारविरोधी लेखन केलं म्हणून सध्या अनेकांना नोटीसा येत आहेत. पोलिसांकडून त्यांची चौकशी होतेय. अशी जबरदस्ती करणार्‍यांकडून आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍यांकडून आपण राष्ट्रभक्ती शिकावी का? 

इंग्रज लोक सांगतात की, ‘एकवेळ आम्ही आमचं साम्राज्य देऊन टाकू, पण आमचं क्रिकेट आणि आमचा शेक्सपिअर आम्ही कुणालाही देणार नाही...’ स्वतःच्या खेळाविषयी, साहित्याविषयी असं प्रेम असणं याला राष्ट्रभक्ती म्हणतात. त्याउलट आम्ही क्रिकेटसारख्या खेळावर कोट्यवधी रूपयांचा सट्टा लावतो. भारत-पाकिस्थान मॅच झाल्यावर उन्माद दाखवतो, खेळाडूंची आई-बहिण काढतो. याला देशभक्ती म्हणतात?

माता आणि माती यात केवळ एका वेलांटीचा फरक असतो. या दोन्हीविषयी आपण केवळ ‘दिखाऊ’ प्रेम दाखवतो. आपल्याच शासनानं आपल्यासाठीच केलेले साधेसाधे नियमही आपण पाळत नाही. रोज सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडणारे, मान्यता नसलेल्या विद्यापीठातून पदव्या घेणारे, स्वतःच्या मुला-मुलीचे परीक्षेतले गुण वाढवणारे, शेतकर्‍यांच्या नावावर बनावट कागदपत्रं देऊन कर्ज काढणारे आणि ते पैसे निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरणारे आज आपल्याला मोठ्या जोशात देशभक्तीची प्रवचनं देतात.

आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, सर्व नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करणं हे सर्व दूरच राहिलं! किमान रोज शालेय वर्गात जी प्रार्थना म्हणत आलोय तिचं पालन केलं तरी खूप काही बदल दिसून येऊ शकतील.

इथला राजकारणी असेल, कलाकार असेल, साहित्यिक असेल, कामगार असेल किंवा देहविक्रय करणारी एखादी अबला असू शकेल... प्रत्येकाच्या मनात कारूण्याचे भाव प्रगट होणं म्हणजेच देशभक्ती! त्यापुढं जाऊन सांगायचं झालं, तर आपण करत असलेलं काम प्रामाणिकपणे करणं हेच देशभक्तीचं द्योतक आहे. देशभक्तीची व्याख्या ठरवण्यात वेळ घालवणं म्हणूनच सध्याच्या काळात अवघड झालंय. विविध धर्मिय बांधवांच्या सण-उत्सव, परंपरांविषयी आदर बाळगून सांगावसं वाटतं, की तुमच्या धार्मिक भावनांचं प्रगटीकरण करताना जो अतिरेकी उत्साह दाखवला जातो आणि त्यामुळं सामान्य माणसाची जी दैना होते ती थांबवणं ही सुद्धा मोठी देशभक्तीच आहे.

स्वतःच्या कल्पनाशक्तीशी द्रोह न करता आपल्याला आपलं काम करता आलं पाहिजे. हे ज्याला जमेल आणि त्यासाठी जो स्वतःशी प्रामाणिक राहील तोच खरा देशभक्त, तीच खरी देशभक्ती! 
- घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक प्रकाशन’, पुणे
7057292092
(पूर्वप्रसिद्धी : दैनिक 'पुढारी' दिवाळी अंक २०१७)

Sunday, October 15, 2017

इवलासा वेलू... गेला गगनावरी!


सध्याचे दिवस वाचनसंस्कृतीसाठी अत्यंत पोषक आहेत. तरूण पिढी त्यादृष्टिनं सजग आहे. मराठी साहित्यात कधी नव्हे इतका वाचक तयार होतोय आणि हे केवळ नव्यानं लिहिणार्‍यांमुळं शक्य होतंय. दीपस्तंभ ठरावी अशी एक पिढी बाजूला पडून आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणारे लेखक तयार होत आहेत आणि मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेच्या दृष्टिनं हे चित्र अत्यंत सकारात्मक असं आहे. काही जुने लेखक आणि प्रकाशक ‘वाचतं कोण?’ असा अप्रस्तुत प्रश्न सातत्यानं उभा करत असतानाच मराठीतील सशक्त साहित्य जोमात पुढं येत आहे. हा बदल लक्षात न आल्यानं ‘अंतर्नाद’सारखी काही दर्जेदार नियतकालिकं उचक्या घेत आहेत. काहींनी केव्हाच माना टाकल्यात. वाचकांची ही बदलती अभिरूची लक्षात घेणारे, स्वतःचा नवा वाचक तयार करणारे, बदलत्या तंत्रज्ञानाची आव्हानं स्वीकारणारे मात्र यशस्वी घोडदौड करत आहेत. सर्व नकारात्मकता बाजूला सारून ‘मासिक’ या संकल्पनेलाच ऊर्जितावस्था देण्यात ‘चपराक’नंही खारीचा वाटा उचलला आहे.

एक दर्जेदार वृत्तसाप्ताहिक, परिपूर्ण मासिक आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील उत्तमोत्तम पुस्तकं प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून ‘चपराक’ सर्वदूर पोहोचला आहे. त्यात ‘चपराक‘चा दिवाळी महाविशेषांक म्हणजे तर शिरोमणीच असतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील सर्व प्रमुख शहरात आणि इतर काही देशातही ‘चपराक’चे वाचक आहेत. मायमराठीची ही पताका डौलात फडकत असताना वाचनसंस्कृतीची कोणीही चिंता करण्याचं कारण नाही. 

मराठी साहित्याला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण नवं नाही. प्रस्थापितांची उदासीनता कायम मारकच ठरत आलीय. त्यामुळं कुणालाही न जुमानता स्वतःची जागा स्वतः तयार करणं हाच आजच्या साहित्यिकांपुढील पर्याय आहे. समाजमाध्यमांचा वाढता आवाका ध्यानात घेता हे मुळीच अवघड नाही. तरूणांचे लाखोंनी वाचले जाणारे ब्लॉग याची साक्ष पटवून देतात. शिवाय ‘चपराक’सारखी नियतकालिकं नवोदित लेखकांच्या पाठिशी भक्कमपणं उभी आहेत. सध्या भूमिका घेणारी वृत्तपत्रं, मासिकं, साहित्यिक, साहित्यसंस्था दुर्मीळ होत चालल्यानं मराठी साहित्याचं मोठं नुकसान होत आहे.

विषय कोणताही असो, सर्वत्र गुडीगुडीचा मामला. ‘तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो’ असं चित्र! मराठीत ‘समीक्षा’ नावाचा प्रकार अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती. ज्या दगडांना शेंदूर फासून ठेवलाय त्यांचंच सातत्यानं महात्म्य, त्यांचीच पूजा! नव्यांसाठी मात्र कायमस्वरूपी ‘प्रवेश बंद’चा अलिखित फलक! वर उमलते अंकुर फुलत नाहीत, नवोदितांचं दर्जेदार लेखन पुढे येत नाही, वाचक कमी होत चाललेत अशी नेहमीची रड आहेच. या बजबजपुरीत अनेकजण आपापल्यापरीनं धडपडत आहेत, स्वतःचं विश्व निर्माण करत आहेत ही म्हणूनच सुखावह बाब आहे.

उत्तुंगतेचा ध्यास घेताना जुन्यांचा आदर्श  ठेवला पाहिजे. त्यांनी जे ‘मनोरे’ उभारलेत त्याविषयी कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. मात्र ही कृतार्थता जपताना आपल्याला आणखी पुढं जाता आलं पाहिजे. आपण त्यातच अडकून पडतो. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, मंगेश पाडगांवकर अशांच्या कर्तृत्वाविषयी मनात श्रद्धाभाव जरूर असू द्या; त्यांचा आदर्श ठेवा पण ‘त्यांच्यापेक्षा भारी कोणी होणारच नाही’ हा न्यूनगंड काढून टाका. जे जे अचाट आहे ते ते मराठी माणूस करतो. साहस त्याच्या रक्तातच आहे. त्याला कसल्याच सीमा नाहीत. त्याला कोणी रोखू शकत नाही. मूठभर मावळे हाताशी घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवराय ज्या मातीत होऊन गेलेत ती माती पराक्रमाची परंपरा कधीही खंडित होऊ देणार नाही. आपण फक्त भक्कमपणं उभं राहणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवे मानदंड रचण्यासाठी तरूणाईनं सज्ज झालं पाहिजे. आजच्या काळाची आव्हानं लक्षात घेऊन मार्गक्रमणा केल्यास आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही. प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसानं इतकं अफाट योगदान दिलं पाहिजे की त्याचा जगालाही हेवा वाटावा. हा विश्वास जागविण्यासाठीच ‘चपराक’ कार्यरत आहे.

आपल्याकडची राजकीय अस्थिरता कधीही संपली नाही, संपणार नाही. लोकशाही व्यवस्थेत ती संपेल असं गृहितही धरता येणार नाही. आपल्यावर सातत्यानं निसर्ग कोपतोय. काही ठिकाणी मानवनिर्मित दुष्काळही पडतोय. सरकारची उदासीनता याला खतपाणीच घालते. ‘देश आगे बढ रहा है’, ‘सब का साथ, सब का विकास’ असं म्हणत आपण किती मागे जातोय याचा पत्ताही नाही. बरं, तूर्तास तरी याला काही पर्यायही दिसत नाही. कॉंग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळलेल्या लोकांनी परिवर्तन घडवलं. हे परिवर्तन मात्र ‘आगीतून उठून फुफाट्यात’ यापेक्षा फारसं वेगळं नाही. 
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सध्याच्या विरोधकांची सर्वात मोठी कर्तबगारी कोणती? तर त्यांनी आपल्या जातीय अस्मिता कमालीच्या टोकदार केल्या. कालपर्यंत सत्तेत असणारे आज सामान्य माणसाचा, त्याच्या जगण्याचा विचार करत असल्याचं भासवू लागले. ज्यांनी कोमात ढकललं तेच ‘बघा बघा माय, कसा मरणाला टेकलाय...’ म्हणून गळे काढू लागले. वेश्येनं पतिव्रता धर्म शिकवणं म्हणतात ते यालाच! सामान्य माणूस म्हणून आपलं दुर्दैव इतकंच की, ही परिस्थिती बदलावी म्हणून आपण ज्या विश्वासानं नव्या राज्यासाठी नवे गडी निवडले तेही याच माळेचे मणी निघाले. त्यांचा शिरोमणी त्यातल्या त्यात बराय एवढंच! 

मोदी सरकारनं मागच्या वर्षी नोटाबंदी केली. सामान्य माणसाला त्याचा मोठा फटका बसला. त्यानं तो कसलीही कुरबूर न करता सहन केला कारण त्यामागं पंतप्रधानांनी दाखवलेली स्वप्नं होती. काळा पैसा बाहेर येईल, भ्रष्टाचाराला चाप बसेल या भावनेनं कुणीही त्याचा बागुलबुवा केला नाही. स्वकमाईच्या छोट्या छोट्या रकमा हातात येणं ही देशभक्ती वाटू लागली. त्यातून पुढं काय साध्य झालं या फक्त चर्चेच्याच गोष्टी ठरल्या.

नंतर जीएसटीनं कंबरडं मोडलं. त्यातूल ‘आर्थिक शिस्त’ लागेल असं सांगितलं जातंय. प्रत्यक्षात मात्र अनेकजण कोलमडून पडलेत. छोट्या उद्योजकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागलीय. केवळ ‘चपराक’बाबत बोलायचं झालं तर गेल्या वर्षी झालेल्या नोटबंदीमुळं दिवाळी अंक विक्रीवर वाईट परिणाम झाला. जाहिराती रोडावल्या. नंतर डोंबिवलीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. आजवरच्या इतिहासात प्रथमच असं झालं की संमेलनात प्रकाशकांचा वाहतूक खर्चही निघाला नाही. त्यात ‘संमेलनात पुस्तक ‘प्रदर्शन’ असतं. प्रदर्शनात फक्त पुस्तकांच्या एक-दोन प्रती आणून त्या दाखवायच्या असतात’ असं विधान करून अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी प्रकाशकांच्या जखमेवर मीठ चोळलं. ‘संमेलनात ग्रंथप्रदर्शन आणि ‘विक्री’ असते’ याचा त्यांना सोयीस्कर विसर पडला. म्हणूनच सामान्य वाचकांकडून, रसिकांकडून दहा-दहा रूपयांची मदत वारंवार मागूनही साहित्य महामंडळाला मराठी माणसानं ठेंगा दाखवलाय.

ग्रंथव्यवहाराच्या दृष्टिनं नोटाबंदी, साहित्य संमेलन यानंतर पुढचं अरिष्ट आलं ते जीएसटीचं. या काळात पुस्तकांची विक्री मंदावलीय. कागदाचे, शाईचे दर वाढलेत. अनेक दिवाळी अंक त्यामुळं नेहमीपेक्षा कमी पानांचे झालेत. काहींना किंमती वाढवाव्या लागल्यात. आर्थिक गणितं जुळवणं भल्याभल्यांना कठीण गेलंय.

असं सारं चित्र असताना ‘चपराक’ला मात्र वाचकाश्रय मिळालाय. या काळात ‘चपराक’ तगून राहिला तो वाचकांच्या निर्व्याज प्रेमामुळं. अंकाच्या वर्गण्या येण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलंय. जाहिरातदारांनीही नेहमीप्रमाणं विश्वास दाखवलाय. पुस्तकांच्या दुकानातून अत्यल्प विक्री होत असली तरी थेट ‘चपराक’च्या कार्यालयातून, ऑनलाईन विक्री मात्र वाढलीय. शालेय जीवनानंतर ज्यांचा वाचनाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता त्यांच्या डोक्यात आम्ही नवनवे विषय घातले. त्यांना लिहितं केलं, बोलतं केलं. त्यांची अभिरूची जागृत करून संबंधित पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्या अनुषंगानं त्यांनी इतर पुस्तकांचंही वाचन सुरू केलं. ‘चपराक’नं असा स्वतःचा वाचक निर्माण केलाय. ज्यांना ‘मासिक’ म्हणजे काय? हे कधी माहीतच नव्हतं किंवा ज्यांनी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांशिवाय एकाही ललित, वाङमयीन पुस्तकाला कधीच हात लावला नव्हता त्यांच्याकडं आज ‘चपराक’चे सर्व अंक आहेत. आपल्या पुस्तकांचा संच त्यांच्या घरी त्यांनी अभिमानानं ठेवलाय. ती पुस्तकं त्यांनी वाचलीत आणि त्यावर ते वेळोवेळी चर्चाही करतात. ही आमची खरी उपलब्धी! सहा राज्यातील अशा नव्या मराठी वाचक आणि लेखकांपर्यंत ‘चपराक’चा विस्तार झालाय. यंदाच्या या दिवाळी महाविशेषांकाचीही विक्रमी स्वरूपात पूर्वनोंदणी झालीय. इवलासा वेलू गगनावर गेलाय. चित्रकार संतोष घोंगडे यांनी साकारलेलं या अंकाचं मुखमृष्ठ हेच तर सुचवतं.

समाजानं साहित्याभिमुख झालं पाहिजे असं म्हणताना साहित्यिकांनीही समाजाभिमुख होणं गरजेचं आहे. सामान्य माणसाच्या व्यथा, वेदना कागदावर उतरल्या तरच तो तुम्हाला स्वीकारेल. हातात लेखणी किंवा एखाद्या वाहिनीचा बूम आहे म्हणून कुणाचे तरी लांगुलचालन केलेच पाहिजे, त्यांची तळी उचललीच पाहिजे असा काही नियम नसतो. सत्याची चाड असणारे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजणारे अनेक पत्रकार आपल्याकडं होऊन गेलेत. त्यांच्याच पुण्याईमुळं आपली थोडीफार विश्वासार्हता टिकून आहे. अन्यथा लोकांनी आजच्या पत्रकारांना धोबीपछाड केलं असतं.

‘मराठीतला सगळ्यात विक्रमी दिवाळी महाविशेषांक’ अशी गेल्या काही काळात ‘चपराक‘ची ओळख झालीय. नव्या-जुन्या लेखकांचा संगम साधत आम्ही सर्वोत्तम ते दिलेय. या अंकात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक अकिलन, डॉ. द. ता. भोसले, सदानंद भणगे, विद्या बयास, अमर कुसाळकर, अविनाश हळबे, चंद्रलेखा बेलसरे, सरिता कमळापूरकर यांच्या कथा दिल्यात. प्रा. बी. एन. चौधरींची अहिराणी कथा दिलीय. दुर्दैवी योगायोग म्हणजे ‘चपराक’ परिवाराचे लेखक ह. मो. मराठे यांची ‘श्रद्धांजली’ ही व्यंग्यकथा. त्यांची ही शेवटची कथा ठरावी आणि त्यांनाच ‘श्रद्धांजली’ वहावी लागावी ही फार वेदनादायी बाब आहे. ‘चपराक’ परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

रमेश वाकनीस यांची संपूर्ण कादंबरी या अंकात दिलीय. ती आपणास निश्चितच आवडेल. व्यक्तिचित्रण विभाग सशक्त आणि प्रेरणादायी झालाय. डॉ. माधव पोतदार, डॉ. चित्रलेखा पुरंदरे, सुनिताराजे पवार, लक्ष्मीकांत देशमुख, शुभांगी गिरमे, अर्चना डावरे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सदाशिव शिवदे, सुरेखा शहा आदींनी त्यासाठी हातभार लावलाय. शंभरहून अधिक कविता दिल्यात. प्रस्थापितांबरोबर नवोदितांनाही हक्काचं व्यासपीठ दिलंय. भाऊ आणि स्वाती तोरसेकर, डॉ. न. म. जोशी, प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर, प्रा. मिलिंद जोशी, संजय सोनवणी, उषा मंगेशकर, उमेश सणस, श्रीराम पचिंद्रे, उद्धव कानडे, प्रिया धारूरकर, संजय क्षीरसागर, संजय वाघ, अनिरूद्ध जोशी, श्रीपाद ब्रह्मे अशा सर्वच मान्यवरांचे लेख आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करतील. किमान पंधरा पुस्तकांचा खाऊ या एकाच दिवाळी महाविशेषांकात दिलाय. त्यामुळं तो आपल्या पसंतीस उतरेल याची संपादक म्हणून खात्री आहे. 

आपणा सर्वांना या प्रकाशोत्सवाच्या शुभेच्छा देतो, सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आगामी काळातही ‘चपराक’ कायम विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांवर तुटून पडेल, चांगले ते स्वीकारेल आणि वाईट ते अव्हेरेल याची ग्वाही देतो आणि थांबतो.
- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२