Sunday, August 20, 2017

सत्य कधीही पराभूत होत नाही!


छोट्या वृत्तपत्रांना ‘लंगोटी वृत्तपत्र’ म्हणून कायम हिणवण्यात येते. मात्र याच ‘छोट्या’ वृत्तपत्रांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीची लाज राखण्याचे मोठे काम वेळोवेळी केले आहे. सत्य सांगण्याचे काम छोटी वृत्तपत्रेच धाडसाने करतात. भलेही मोठी वृत्तपत्र डोनाल्ड ट्रम्पपासून ते नवाज शरीफपर्यंत आणि नरेंद्र मोदींपासून ते मदर तेरेसापर्यंत सातत्याने लिहित असतील; मात्र आज लिहिलेला अग्रलेख दुसर्‍या दिवशी माघार घेण्याची अशी नामुष्की केवळ त्यांच्यावरच येते. महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सभापती, अगदी गावचा सरपंच यांच्या कारभाराविषयी पोटतिडिकेने सत्य मांडण्याचे काम अशी गावोगावची छोटी वृत्तपत्रेच करतात आणि त्यामुळेच विकासाच्या प्रक्रियेत या वृत्तपत्रांचा वाटा मोठा आहे.

हे सारे मांडण्याचे कारण म्हणजे संगमनेरातील एक घटना. देशभर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच संगमनेर शहरात मात्र एका स्थानिक दैनिकाच्या संपादकावर चक्क खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या दैनिकाचे संपादक असलेले राजा वराट हे गेल्या दोन दशकाहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. या परिसरातील अनेक प्रश्न धाडसाने मांडण्याचे आणि ते तडीस नेण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. संगमनेरातील कत्तलखान्याचा विषय त्यांनी आक्रमकपणे मांडल्यानंतर महाराष्ट्रातील पाच आमदारांना हा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा लागला. त्यावेळी वराट यांच्या घरावर संबंधितांकडून दगडफेकही झाली होती. कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यातील वृक्षतोड, वन्यजीव प्राण्यांचे प्रश्न, या परिसरातील आदिवासी बांधवांना भेडसावणार्‍या अडचणी, पर्यावरणाचे प्रश्न, आश्रमशाळांचे पप्रश्न, संगमनेरातील सहकारी संस्थांमुळे पर्यावरणाचा झालेला र्‍हास अशा विषयावर ते कायम भूमिका घेऊन लढत असतात.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केल्यानंतर मदतीचे असंख्य हात पुढे आले. त्यावेळी संगमनेर-अकोले परिसरातील पत्रकारांनी आपल्या खिशात हात घालून नामला मदतनिधी दिला होता. हे पैसे त्यांनी कुणाकडून ‘खंडणी’ म्हणून घेतले नव्हते तर आपल्या तुटपूंज्या मानधनातून त्यांनी हा निधी जमवला होता. ही संकल्पना अर्थातच राजा वराट यांची होती आणि स्थानिक पत्रकारांनी सर्व गटतट विसरून त्यांच्या या सकारात्मक विचाराला प्रतिसाद दिला होता. त्यासाठी राजा वराट यांनी केलेली धडपड मी स्वतः बघितली आहे कारण हा निधी त्यांनी माझ्याच हस्ते संबंधितांना दिला होता. सामान्य माणसाविषयी कळवळा असलेल्या या हरहुन्नरी पत्रकाराविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होणे म्हणूनच दुर्दैवी आहे.

राजा वराट हे फक्त पत्रकार नाहीत तर सामाजिक जाण असणारे एक प्रगल्भ कार्यकर्ते आहेत. या भागातील आदिवासी शाळा, तेथील विद्यार्थी यांना त्यांनी वेळोवेळी पदरमोड करून सहाय्य केले आहे. संगमनेर-नगर परिसर म्हणजे विखे पाटील आणि थोरात पाटलांची  राजकीय मक्तेदारी! मात्र कसल्याही आमीषाला बळी न पडता खिळखिळ्या झालेल्या दुचाकीवरून फिरत राजा वराट यांनी आपला प्रामाणिकपणा जपला आहे. 

मागची वीस-बावीस वर्षे ते ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या ‘सामना’चे संगमनेर वार्ताहर आहेत. सात-आठ महिन्यापूर्वी त्यांनी ‘नायक’ हे सायंदैनिक सुरू केले. त्यासाठी पाच पत्रकार मित्र एकत्र आले आणि ‘पंचम प्रकाशन’ची स्थापना केली. या अंतर्गत हे दैनिक चालवण्यात येते. सुरूवातीपासूनच स्थानिक विषय प्राधान्याने मांडल्याने अनेकांना पोटशूळ उठणे स्वाभाविक होते. त्यामुळे अमर कतारी या शिवसेनेच्या शहरप्रमुखाने राजा वराट आणि अंकुश बुब या दोन पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील अंकुश बुब याचा ‘नायक’शी काहीही संबंध नाही. तो त्यातील प्रमुख आरोपी आहे. संबंधितांनी राजा वराट यांचेही नाव त्यात गोवले आहे.

शिवसेनेच्या शहरप्रमुखाने ‘सामना’च्या वार्ताहरावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे. याबाबत फिर्यादी अमर कतारी सांगतात की, ‘‘राजा वराट यांनी यापूर्वी येथील एका उद्योजकाला धमकावून ‘सामना’साठी दीड लाख रूपयांची जाहिरात घेतली. आता ते स्वतःचे दैनिक चालवतात. त्यासाठी त्यांनी माझ्याकडे वीस हजार रूपयांची खंडणी मागितली. त्यातले दहा हजार रूपये मी दिले, मात्र त्यांचा तगादा सुरूच असल्याने मला खंडणीचा गुन्हा दाखल करावा लागला. राजा वराट यांना सात-आठ महिन्यापूर्वीच सामनातून काढून टाकण्यात आले आहे.’’

याबाबत ‘सामना’ कार्यालयात चौकशी केली असता ते सांगतात की, ‘‘राजा वराट हे आमचे बातमीदार आहेत. गेली अनेक वर्षे ते निष्ठेने कार्यरत आहेत. त्यांच्यावर शंका घेताच येणार नाही. आजही ते सामनात सक्रिय असून त्यांच्यावर हे आरोप सूडभावनेने केले गेले असण्याची शक्यता आहे. फिर्यादी हा शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने त्याने काही चुकीचे वाटल्यास पक्षाकडे किंवा आमच्याकडे तक्रार द्यायला हवी होती. मात्र तो ज्या पद्धतीने बिनबुडाचे आरोप करतोय ते पाहता त्याच्यामागे नक्की कोण आहे हेही तपासून बघितले पाहिजे.’’

या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

महत्त्वाचे म्हणजे छोट्या वृत्तपत्रांचे भवितव्य! कोणीही उठतेय आणि जिल्हा दैनिकांवर, साप्ताहिकांवर वाटेल ते आरोप करतंय. ते आरोप सिद्ध करण्याची मात्र यांची कुवत नसते. म्हणजे उद्या एखाद्या वृत्तपत्राचा प्रतिनिधी कुणाकडे जाहिरातीचे दरपत्रक घेऊन गेला तर तो खंडणीखोरच ठरवला जाईल. अमर कतारी याच्याकडे जर खंडणी मागितली गेली असेल तर त्यांनी ते पुरावे तपास यंत्रणेकडे आणि प्रसिद्धी माध्यमांकडे अवश्य द्यावेत. ऊठसूठ वाटेल ते आरोप करायचे आणि एखाद्याचे चारित्र्यहनन करायचे ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. यात जर राजा वराट किंवा त्यांच्या सहकार्‍यापैकी कोणीही किंवा अन्य जर दोषी असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई व्हावी. मात्र अशा ज्येष्ठ पत्रकारांवर असे गुन्हे दाखल करून त्यांचे खच्चीकरण केले जात असेल तर सर्वांनी त्यांच्या पाठिशी समर्थपणे उभे रहायला हवे. अशी वेळ कोणत्याही पत्रकारावर आणि कधीही येऊ शकते याचे भान ठेवणे ही काळाजी गरज आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेली जी पिढी आहे त्याचे प्रतिनिधित्व राजा वराट करतात. सामना आणि मार्मिक मधील त्यांचे अनेक विषय राज्यभर चर्चेला आले आहेत. तथाकथित शिवसैनिकाकडून पत्रकारावर आणि त्यातही सामनाच्याच वार्ताहरावर खंडणीचा गुन्हा दाखल होणे हे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम आहे. एकतर पत्रकारिता त्या थराला गेली असावी किंवा स्वार्थाचा भरणा झालेले लोक सेनेत सक्रिय झाले असावेत. जर पत्रकारिता बिघडली असेल तर ती अतिशय चिंतेची बाब आहे. या प्रकरणात तसे काही झाल्याचे दिसत नाही. राजा वराट यांची आजवरची निर्भिड, निरपेक्ष पत्रकारिता पाहता त्यांच्यावरील आरोपामागचे तथ्य कुणाच्याही लक्षात येईल. अमर कतारी हा शिवसेनेचा शहरप्रमुख आहे. येथील शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, इतकेच काय इतर पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याशी बोलले असता ते राजा वराट यांच्याविषयी गौरवानेच बोलतात.

एका दैनिकाच्या संपादकावर खंडणीचा गुन्हा दाखल होवूनही अनेक मान्यवर पत्रकार संघटना अजून गप्पच आहेत. कदाचित हा विषय त्यांच्यापर्यंत गेला नसावा किंवा त्यांना तो तितकासा महत्त्वाचा वाटला नसावा. संगमनेरातील पत्रकार मात्र राजा वराट यांच्या पाठिशी असून त्यांनी एकत्र येऊन पोलीस उपाधिक्षकांची भेट घेतली आहे. या प्रकरणाचा तपास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय ते अधिकारीही फिर्यादीच्या पाठिशी असल्याचे कळते. येथील अवैध प्रवासी वाहतूक, गांजाची तस्करी, गोवंश हत्या, अन्य बेकायदेशीर धंदे यांच्याविषयी वराट यांनी सातत्याने वृत्तमाला चालविल्याने पोलिसांचे हप्ते कमी झाले होते. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्याच्या माध्यमातून तेही त्यांचा राग काढत असतील तर याचा वरिष्ठ पातळीवरून तपास झाला पाहिजे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, गृहखाते आपल्याकडेच आहे. तुमच्या राज्यात पत्रकारांवर अशी वेळ येत असेल आणि पत्रकार दडपणात, दहशतीत जगत असतील तर हे आपले मोठे अपयश आहे. एखाद्यावर पूर्ववैमनस्यातून खंडणीचा गुन्हा दाखल करणे आणि त्याचे भवितव्य धोक्यात आणणे हाच गंभीर गुन्हा आहे. राजा वराट जर दोषी असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी मात्र यात जर तथ्य आढळले नाही तर संबंधित सर्वांचे काय करायचे? न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारे राजा वराट यापुढे आणखी धाडसाने कार्यरत राहतील याबाबत आमच्या मनात मुळीच शंका नाही. पण प्रामाणिक पत्रकारितेची अशी गळचेपी होऊ नये.

निखिल वागळेसारख्या बड्या पत्रकारांनी दहा नोकर्‍या बदलल्या किंवा त्यांना काढून टाकले तरी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. त्यांच्यापासून लाभ मिळणारे सर्वजण त्यांच्या पाठिशी उभे राहतात. मात्र दुसरीकडे राजा वराट यांच्यासारखे ग्रामीण वार्ताहर आपली आयुष्यभराची तपश्चर्या पणाला लावून अन्याय-असत्याविरूद्ध लढत असतात तेव्हा त्यांच्यावर अशी दुर्दैवी वेळ येते. हाच आपल्या पत्रकारितेतील फरक आहे. हेच वर्ण आहेत, याच जाती आहेत... ज्याच्याकडून काही लाभ होतील त्याच्यासाठीच रस्त्यावर उतरणे हा काहींचा धंदा झालाय. त्यात राजा वराट यांच्यासारखे कितीतरी पत्रकार हकनाक भरडले जात असतील. 

खाकी आणि खादी हीच देशाची ओळख झालीय. त्यामुळे सूर्य दिसत असूनही सर्वत्र काळोखच मातलाय. हे ग्रहण वेळीच सुटायला हवे. त्यासाठी सत्प्रवृत्तीच्या लोकांनी संघटित होणे, एकत्र येऊन चुकीच्या प्रवृत्तीविरूद्ध लढणे गरजेचे आहे. राजा वराट, तुम्ही एकटे नाही. आपापल्या कुवतीनुसार त्या त्या परिसरात नेटाने कार्यरत असलेले, समाजापुढे सत्य मांडण्याचे काम धाडसाने करणारे आमच्यासारखे असंख्य पत्रकार आपल्यासोबत आहेत. 

सत्य कधीही पराभूत होत नाही, इतके सगळ्यांनीच लक्षात ठेवावे म्हणजे झाले.

- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

25 comments:

  1. सर, ग्रामीण क्षेत्रातील आजच्या पत्रकारांची दशा आणि दिशा यावर नेमके वास्तव नेमक्या शब्दात आपण मांडलेत.

    ReplyDelete
  2. सध्या पत्रकारांना अडचणीत आणण्यासाठी काही प्रवृत्ती टपूनच असतात. आपण रास्त विचार मांडलेत. राजा वराट एक चळवळ आहे. त्यांना रोखण्याचा प्रयत्न होतोय, हे निषेधार्ह आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणूनच आपण सत्याच्या बाजूने उभे राहूया.

      Delete
  3. पञकार राजा वराट यांच्या निर्भिड पञकारितेला सलाम .शहरि भागातील पञकारितेपेक्षा ग्रामीण भागातील पञकारिता एक मोठे धाडसाचेच काम आहे .पञकार राजा वराट यांच्या मागे फक्त पञकार बंधूनीच नव्हे तर जनतेनेही ऊभे राहून अशा प्रवृत्तीचा निषेध आणि विरोध दाखवायला हवा .

    ReplyDelete
  4. अभ्यासपूर्ण वास्तव मांडले आहे.

    ReplyDelete
  5. आदरणीय पाटिल सर
    तुम्ही आग्रलेखात एकच बाजू मांडली दूसरी बाजू का मांडली नाही कारण राजा वराट हां तुमचा मित्र आहे
    पण अंकुश बूब या विषयी काहीच भाष्य केले नाही
    कारण मी ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलि
    त्यांच्यावर संगमनेर शहर पोलिस स्टेशनला आधीच खुप गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर 354 महिला विनय भंगाचा गुन्हा दाखल आहे 323 504 506 427 384 34 2 एनसी एक खंडणी प्रकरणी अर्ज असे अनेक गुन्हे दाखल असलेला व्यक्ति चांगला की वाइट हे सांगा
    दुसरा विषय सामना तर आमचा जिव की प्राण त्याबद्दल आम्ही बोलुच शकत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. हे गुन्हे राजा वराट यांच्यावर नाहीत. त्यांनी तुम्हाला पैसे मागितल्याचे काही पुरावे असतील तर जरुर द्या.
      राहिली गोष्ट 'सामना'ची! तर 'सामनाची सामुहिक होळी करू' अशी धमकी तुम्हीच दिली होती ना?

      Delete
    2. सर जस तुम्ही माझ्याकडे पुरावे मागताय ते पुरावे मी पोलिस स्टेशनला जमा केले
      पण सामनाच्या होळी बद्दल मी बोल्लो याचे काही पुरावे असतील तर ते जग जाहिरकरावे
      आपल्या सारख्या जेष्ठ लेखकाने एकच बाजू प्रकाशित करने अपेक्षित नव्हते
      नुसतीच्

      Delete
    3. सर जस तुम्ही माझ्याकडे पुरावे मागताय ते पुरावे मी पोलिस स्टेशनला जमा केले
      पण सामनाच्या होळी बद्दल मी बोल्लो याचे काही पुरावे असतील तर ते जग जाहिरकरावे
      आपल्या सारख्या जेष्ठ लेखकाने एकच बाजू प्रकाशित करने अपेक्षित नव्हते
      नुसतीच्

      Delete
  6. अशावेळी मोठ्या वृत्तपत्र आणि माध्यमाचे पत्रकार या घटनेकडे दुर्लक्ष करतील. मात्र महाराष्ट्रातील सर्व छोटया वृत्तपत्रांनी राजा वराट यांच्या पाठीशी राहिले पाहिजे. ही वेळ कोणावरही येऊ शकते. घनश्यामच्या मताशी पुर्ण सहमत. लेख लिहून या घटनेला वाचा फोडली त्याबद्दल कौतुक वाटते. पण हा लेख वाचून छोटी वृत्तपत्रं गप्प राहिली तर धमक्या देणाऱ्या प्रवृत्तीला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. निषेध असा करावा की दखल सर्व वृत्तपत्र घेतील.

    ReplyDelete
    Replies
    1. सामान्य वाचकाने या सर्वाचा विचार केला पाहिजे.

      Delete
  7. सामान्य पत्रकारावर होणार्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल ......तसेच ज्याची कोणी दखल घेतली नाही त्याला तुम्ही दखलपात्र ठरवल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  8. घनश्याम सर, आपण पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात केलेले लिखाण परखड आणि तेवढेच विचार करायला लावणारे आहे. मात्र आपल्या या लेखातील मतांशी मी पुर्णत: सहमत नाही. मीदेखील गेल्या वीस वर्षापासून संगमनेरमध्ये याच क्षेत्रात काम करत आहे. पत्रकारांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल होणे हे पत्रकारांसाठी निश्चितच शोभणीय नाही, मात्र पत्रकारांवर अशी वेळ का आली याचेदेखील आत्मपरिक्षण आवश्यक आहे. आपण केलेली याबाबतची चिकित्सा मला त्यामुळेच एककल्ली वाटतेय. राजा वराट या आमच्या पत्रकार मित्राला माझ्यासह कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पत्रकार म्हणुन निश्चितच संगमनेरातील सर्व पत्रकारांनी अशावेळी एकत्र असायला हवे. मात्र याआधी घडलेल्या काही घटनात आमचे सर्वच पत्रकार मित्र कोठे होते. संगमनेरातील अनेक संघटनांचा उदय आणि अस्त हा देखील संशोधनाचा विषय आहे, या संघटनांच्या नुकसानीला मारक कोण याची चिकित्सा करण्याची ही वेळ नसली तरी पत्रकारांचे संघटन या शहरात का होऊ शकले नाही याचीदेखील कारणे तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराने शोधली पाहिजेत. नव्हे अशा वेळी मार्गदर्शनदेखील करायला हवे. पत्रकारांचे असंघटन, आणि पत्रकारितेत आलेल्या अपप्रवृत्ती, अशा अपप्रवृत्तीचा चुकीच्या कामासाठी होत असलेला वापर यामुळेच पत्रकारांवर वाईट वेळ आली आहे. आज या शहरात पत्रकार आहोत हे सांगण्याची लाज वाटते. ज्याला पत्रकारीता म्हणजे काय हे माहिती नाही असे लोकदेखील पत्रकारांवर थेट आरोप करु लागलेत. पत्रकारांना शिव्या घालु लागलेत, याच शहरातील अधिकारीदेखील पत्रकारांना जुमानत नाहीत, त्यांना सहकार्य करत नाही, येथील पत्रकारितेची भिती नाहीशी झाली. याची अनेक कारणे आहेत. मात्र राजाभाऊ वरांटाप्रमाणेच हा वसा चालविणारेदेखील पत्रकार या शहरात आहेत.
    शिवसेना शहरप्रमुखांनी थेट पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा का दाखल करावा. त्यांच्यावर ही वेळ का आली. त्यांनी गुन्हा दाखल केलेल्या एका पत्रकारावर अनेक गु्न्हे दाखल आहेत. यावर आपण काहीच भाष्य केले नाही. त्याला नेमके कोण पाठबळ देत होते. त्याच्या आडुन नेमके कोणाचे हित साधले जात होते यावरदेखील भाष्य व्हायला हवे होते. मात्र तसे झाल्याचे दिसत नाही. या प्रकारानंतर पत्रकारांमधील अनेक विषय आता चर्चिले जाऊ लागलेत. आपण ज्येष्ठत्वाच्या नात्याने संगमनेर आणि येथील पत्रकार यांचा एकदा खोलवर अभ्यास करायलाच हवा, आणि चुकीचे वागणाऱ्यांचे कान टोचायलाच हवे त्यासाठी आपण पुढाकार घ्याल असा आशावाद वाटतो.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे पांगरकर जी

      Delete
    2. बरोबर आहे पांगरकर जी

      Delete
    3. पांगरकर सर, माझा एकच प्रश्न आहे, राजा वराट दोषी आहेत का? असतील तर काही पुरावे आहेत का?

      Delete
  9. हे अर्ध सत्य मांडले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. ओके. पूर्ण सत्य सांगा दादा.

      Delete
  10. सर आपण संगमनेरमध्ये येऊन सगळी इथली परिस्थिती पहायला हवे. खरे तर पत्रकारांवर असे गुन्हे दाखल होणे म्हणजे शरमेची गोष्ट आहे. कारण एकामुळे संपूर्ण पत्रकार वर्गाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आणि हा दृष्टिकोन दिवसेंदिवस का वाईट होत चालला आहे? यावर आपल्या सारख्या जेष्ठ आणि अभ्यासू पत्रकार व्यक्तिमत्वाने नक्कीच परखड लिखाण केले पाहिजे. जेणे करून लोकांची पत्रकारितेवरील व पत्रकारांवरील विश्वासार्हता टिकून राहील.आणि माझ्यासारख्या नवख्या पत्रकाराची हे सगळे पाहून चाललेली घुसमट ही थांबेल. पण आपण दुसऱ्या बाजूचा अभ्यास करून मांडायला पाहिजे होते सर.

    ReplyDelete
    Replies
    1. मीच यायला हवे आणि मीच लिहायला हवे हे कशाला? तुम्ही स्थानिक पत्रकार आहात आणि सत्य तुम्हाला माहीत आहे तर जरुर लिहा. वाचायला आवडेल.

      Delete
    2. नक्कीच सरजी. योग्य वेळी अचूक भाष्य करू.. पण तुम्ही मांडलंय तुमच्या लिखाणातून म्हणून बोलले....

      Delete
  11. वर्तमान परिस्थिती मांडली ..

    ReplyDelete