Monday, August 29, 2016

आईपणाच्या कविता!

पूर्वीच्या काळी एखादी निपुत्रिक दायी अनेक बाळंतपणं  यशस्वीरित्या पार पाडायची. तिच्याकडे जी कला असायची तो झाला तिचा अनुभव आणि ज्या बायका आई व्हायच्या ती झाली त्यांची अनुभूती!
माणसाकडे अनेक कला असतात. त्या कलांचा ते आपापल्या पद्धतीने उपयोगही करतात; मात्र अनुभूतीतून पुढे आलेले वास्तव म्हणजे साधनेचा सर्वोत्कृष्ठ आविष्कार! त्यातूनच आयुष्य समृद्ध होत जातं. सौ. चंद्रलेखाताई बेलसरे यांनी तब्बल 21 वर्षांपूर्वी मातृत्वाचा सोहळा अनुभवला. त्यावेळचे अनुभव, सोबतच येणारी अनुभूती शब्दबद्ध केली आणि या रचनांचा जन्म झाला.
असे म्हणतात, ‘जन्म से पहले और भाग्यसे जादा कभी किसीको कुछ नही मिलता!’ मात्र हे विधान या कविता वाचल्यानंतर खोटे वाटू लागते. बाळाच्या जन्मापूर्वी नऊ महिने नऊ दिवस आईचे पोट त्याला लाभते! म्हणजे ‘जन्म से’ पहले त्याला खूप काही मिळते; आणि आईने दिलेला जन्म हेच खूप मोठे भाग्य आहे. त्यामुळे संपूर्ण आयुष्य म्हणजे ‘भाग्यसे जादा’ असेच म्हणावे लागेल.
कवयित्री आपल्या पहिल्याच रचनेत लिहितात,
गर्भसंस्काराच्या वेळी
मी ऐकवल्या गर्भाला
थोर जिजाऊंच्या अन्
महाराजा शिवछत्रपतींच्या गोष्टी
कारण मला हव्या होत्या
आऊसाहेब
परत एका
शिवाजीच्या जन्मासाठी!

वाढलेल्या अराजकतेच्या काळात छत्रपती शिवरायांच्या पुनर्आगमनाची वाट पाहणारी ही माऊली खरेच धन्य होय! बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर मनातील हुरहूर, बाळाविषयी पाहिलेली स्वप्ने, कुटुंबियांची मिळणारी समर्थ साथ, रूग्णालयातील दिवस, प्रत्यक्ष बाळाचा जन्म, डॉक्टरांच्या आश्‍वासक सूचना, बाळाची घेतलेली काळजी हे सर्व काही नेमकेपणाने आणि प्रत्येक आईच्या हृदयातील हुंकार त्यांनी प्रभावीरित्या शब्दबद्ध केलेत. ‘नऊ महिन्यांचे गर्भारपण पेलताना, नऊ युगे व्यतीत झाल्यासारखी वाटली’ असे सांगणार्‍या कवयित्री आशावादाचा नवा अर्थही सृजनाच्या याच प्रक्रियेतून कळल्याचे आवर्जून नमूद करतात. ‘पेढा की बर्फी?’ या रूढीला त्यांनी कधीच मूठमाती दिली. आपल्या हाडामांसाची निर्मिती त्यांना विस्मयकारक वाटते.
बाळाच्या आत्याचे पोटावर कान ठेऊन हालचालींचा कानोसा घेणे हे किती लोभसवाणे असते याचे वर्णन त्यांनी या संग्रहात केले आहे.
एका गरीब बाईने
सात महिने डोहाळे पुरविले
आणि काय आश्‍चर्य?
तेच पदार्थ बाळही
चवीने खाऊ लागले!

अशा शब्दात त्यांनी गर्भसंस्काराचे महत्त्व विशद केले आहे. बाळ पोटात असताना आईचे खाणे-पिणे, मनात येणारे विचार, घरातील वातावरण, त्या काळात केलेले वाचन अशा सर्व गोष्टींचा परिणाम बाळावर होतो, हे अध्यात्माने आणि विज्ञानानेही सिद्ध केले आहे. निर्मिती प्रक्रियेचे हे सारे अनुभव काव्यबद्ध करताना उंचबळून आलेले आईचे वात्सल्य या संग्रहातील शब्दाशब्दांतून दिसून येते.
ऑपरेशन थिएटरमध्ये शिरताना एकटेपणाची भीती वाटू लागली. तेवढ्यात बाळाने आतून ‘ठुशी’ मारली आणि कवयित्री निर्धास्त झाल्या. जणू काही बाळ आयुष्यभर ‘मी तुझ्या सुखात, दुःखात सोबतीला आहे’ असेच सांगत असल्यासारखे त्यांना वाटते.
प्रसुतीपूर्वीच्या रात्रीही देवीला विनवणी करताना कवयित्री दैत्याच्या निःपातासाठी आणखी एका महिषासुरमर्दिनीची मागणी करतात. एकवीस वर्षापूर्वीच्या काळात मुलाऐवजी मुलगी व्हावी आणि ती लढावू, संघर्षशील, अन्याय-असत्यावर तुटून पडणारी असावी अशी अपेक्षा बाळगणारी आई हे खरे आपल्या सांस्कृतिक फलिताचे संचित आहे. परमेश्‍वराकडे ‘धनाची पेटी’ मागणार्‍या (आणि एकाच ‘बेटी’वर थांबणार्‍या) कवयित्री एकेठिकाणी मात्र लिहितात,
हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी
क्षणभर उगाचंच वाटले
येऊच नये बाळाने बाहेर
राहावं त्यानं असंच माझ्या कुशीत
माझ्याशी एकरूप होऊन!

बाळाशी एकरूप होणारी आई आणि पुढे त्याच्या कल्याणासाठीच स्वतःला झिजवणारी, त्याच्यात आपले प्रतिरूप शोधणारी, त्याला योग्य संस्कार देणारी आई हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. परमेश्‍वराने निर्मितीचे कार्य फक्त स्त्रीकडेच सोपविलेले असते. याचा अभिमान बाळगून, त्याच्या जडणघडणीसाठी कार्यरत असणार्‍या कवयित्री आपल्या ‘बेटी’ला आपणास राजमातेचे राज्ञीपद बहाल केल्याचे सांगतात.
बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलमध्ये शुभेच्छा देणार्‍या मित्र, नातेवाईक आणि हितचिंतकांच्या शुभाशीर्वादाची दखलही त्यांनी घेतली आहे.
तू येण्यापूर्वी
जीवन अपूर्ण होते
आज परिपूर्ण मी आई
बाळा कशी होऊ रे?
तुझ्या ऋणातून उतराई!

असे सांगत बाळाने आपणास आईपणाचा सर्वोंच्च किताब दिल्याची भावना त्या अभिमानाने मिरवतात. कन्यारत्नाचे दान पदरात पडल्यानंतर बाळाच्या वडिलांचा भांबावलेला चेहराही त्यांनी मिष्किलपणे टिपलाय. बाळ कुशीत आल्यावर सहस्त्र हत्तींचे बळ अंगात आल्याचे सांगून ‘माझ्या चिमुकल्या विश्‍वातील मी जगज्जेती झाले’ असे त्यांना वाटते. बाळाच्या काळजीने त्यांचे मन विचारमग्न होते आणि ‘आईचीच दृष्ट बाळाला लागेल’ म्हणून थोडी धास्तावतेही! बाळाला कवेत घेताना त्याच्या डोळ्यात जन्मोजन्मीची ओळख असल्याचे भाव दिसतात; कारण नऊ महिने गर्भात राहिल्याने हे बंध इतके घट्ट झालेत अशी त्यांची श्रद्धा आहे.
या संग्रहात फक्त भावभावनांचे आणि शब्दांचे खेळ नाहीत. हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बाळाची काळजी घेणार्‍या नर्स त्यांना मदर तेरेसांचा अवतार वाटतात. सेवा करणार्‍यांची आणि श्रमिकांची ‘डोळसपणे’ घेतलेली ही दखल सौ. चंद्रलेखाताई बेलसरे यांच्या विशाल अंतःकरणाची साक्ष पटवून देते.
बाळाचे बोबडे बोबडे बोलणे, बाळाने चवीने पहिला घास खाणे, त्याच्या येण्याने बापाच्या हृदयाचे सूर झंकारणे, बाळाचे माऊच्या गोजिरवाण्या पिलासोबत खेळणे, टी. व्ही. पाहण्यात दंग होणे अशी सर्व रूपे पहाताना, अनुभवताना त्यांच्यातील मातृत्वाच्या भावना सार्वत्रिक, वैश्‍विक आणि म्हणूनच ‘शाश्‍वत’ही वाटतात!
मराठी साहित्यात आजवर आईवर विपुल लेखन झाले आहे. आईवर कविता न करणारा कवी अभावानेच सापडेल; मात्र आपल्या कन्येच्यावेळी आईपणाची अनुभूती घेताना मांडलेल्या भावना या मराठी साहित्यात कदाचित प्रथमच आलेल्या असाव्यात! या कविता फक्त बेलसरे कुटुंबियांच्या नाहीत. आई होणार्‍या, झालेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनोवृत्तीचे दर्शन या संग्रहातून घडते. चंद्रलेखाताई बेलसरे यांच्या ‘आईपणाच्या’ या कविता वाचल्यानंतर प्रत्येक संवेदनशील मनास या वैश्‍विक सत्याची निश्‍चितपणे खात्री पटेल!

पाने ६४, मूल्य ६०
चपराक प्रकाशन, पुणे (०२०-२४४६०९०९)

Sunday, August 28, 2016

मुख्यमंत्री महोदय, ढेरीबरोबर गुन्हेगारी कमी करा!

पंढरपूर हे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. विठूरायाच्या या नगरीत काही महिन्यांपूर्वी एक अजब प्रकार घडला होता. पंढरपूर जवळील एका ढाब्यावर येथील पोलीस रोज रात्री ढाबा मालकाशी दमदाटी करून फुकटात जेवायचे. दारूच्या नशेत अधिकारी जेवणावर ताव मारत असतानाच तेथील पोलीस शिपाई एक महत्त्वाचा निरोप घेऊन आपल्या वरिष्ठांकडे आला. त्यावेळी त्याने बघितले की, दोन तीन माणसे एका गाढवाला घेऊन ढाब्याच्या मागच्या बाजूला जात आहेत. पंढरपुरात गाढवे हरवल्याच्या अनेक तक्रारी आल्याने त्या शिपायाने ही वार्ता वरिष्ठांना दिली ते सगळेजण ढाब्याच्या मागच्या बाजूला गेले तर तिथे त्यांना अनेक गाढवांचे सापळे आढळून आले. फुकटात जेवणारे पोलीस रोज गाढवाचे मांस खात होते. ढाबा मालकावर त्यांनी गुन्हे दाखल करून चांगलेच उट्टे काढले. अशी गाढवे खाऊन पंढरपूर पोलिसांच्या बुद्धीला कदाचित गंज चढला असावा. त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही या गाढवाच्या मनोवृत्तीची लागण झाली असावी. खरेतर गाढव हे त्याचे काम अत्यंत इमानेइतबारे करते. मालकाने पाठीवर टाकलेले ओझे इच्छित स्थळी ते विनातक्रार पोहचवते; मात्र पंढरपूर पोलीस सरकारी पगार घेऊन आणखी कुण्या खासगी मालकाच्या मुठीत आहेत की काय, अशी शंका घ्यावी असे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरपुरातील एका मुलीचा सातत्याने विनयभंग केला जातो, रस्त्यात गाठून अश्‍लील चाळे केले जातात, तिच्या लग्नाची पत्रिका छापून तिची बदनामीही केली जाते. त्या मुलीचे नातेवाईक तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे गेल्यानंतर त्यांना हाकलून दिले जाते. कायदा आणि न्यायव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगण्याचे काम अशा पोलिसांकडून सुरू आहे. एकीकडे पोलिसांवरील असणारा असाह्य ताण, त्यांची जागेची असलेली कमतरता हे सर्व पाहता पोलिसांची कीव केली जाते आणि दुसरीकडे पोलीस त्यांच्या खाकीचा माज दाखवत सामान्य माणसांशी मग्रुरीने वागतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या विश्‍वासू सहकार्‍यांना बाजूला ठेवत गृहखाते स्वत:च्या हातात ठेवतात. सत्तेचे विकेंद्रीकरण न करता सर्व जबाबदार्‍या आपल्याकडेच ठेवायच्या या भिकार मानसिकतेतून मुख्यमंत्री बाहेर पडत नसल्याने राज्यातील असे काही पोलीस बोकाळले आहेत. कायद्याचे रक्षण करणारेच जर सामान्यांचे भक्षण करत असतील तर न्याय कोणाला मागणार? एकवेळ इंग्रजी राजवट परवडली पण असे जुलमी पोलीस नको असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्रात आणि दुर्दैवाने त्यातही पंढरपुरसारख्या अध्यात्मनगरीत आली आहे.
काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड येथील एका हॉटेल मालकाने एका बारबालेसोबत विवाह केला. काही दिवस मजेत गेल्यानंतर त्या दोघात विसंवाद निर्माण झाले. त्यातून त्याने पुणे शहरात त्या बारबालेचे म्हणजे स्वत:च्याच बायकोचे फोटो असलेले पोस्टर छापून ते सर्वत्र लावले. ‘या बाईला एड्स झालेला असून तिच्याशी संबंध ठेवताना सर्वांनी विचार करावा’ अशा आशयाचा मजकूर त्या फोटोवर होता. भांडारकर रस्त्यापासून ते थेट विधी महाविद्यालय, सेनापती बापट रस्ता, गोखलेनगर या परिसरात असे पोस्टर झळकत होते. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई केली. पंढरपुरातील या घटनेत मुलीच्या मनाविरूद्ध तिचे नाव टाकून विक्रांत कासेगावकर, अमोल पंडित, आनंद कासेगावकर या आरोपींनी तिची खोटी लग्नपत्रिका छापली. मुलीसाठी स्थळे आल्यानंतर त्या पाहुण्यांना ते ही पत्रिका दाखवतात आणि तिचे लग्न आपल्यासोबत ठरल्याचे ठासून सांगतात. या अपप्रवृत्तीविरूद्ध दाद मागितल्यानंतर पोलीसही निर्ढावलेपणा दाखवतात. शेवटी एका आमदाराच्या फोनवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो. हे सारेच लांच्छनास्पद आहे. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा सवाल एकेकाळी विचारणार्‍या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी हा प्रकार गांभीर्याने घ्यावा. या मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची मानसिकता प्रचंड उद्विग्न असून त्यांना संरक्षण देणे, तिची काळजी घेणे, तिच्यावरील अन्याय दूर करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पंढरपुरातील मस्तवाल पोलीस अधिकार्‍यांचे कान मुख्यमंत्र्यांनी वेळीच उपटले नाहीत, तर त्यांच्या नाकर्तेपणाचे खापर स्वाभाविकपणे फडणवीसांच्या डोक्यावर फोडले जाईल.
दुसरी प्रचंड क्रौर्याची घटनाही सोलापूर जवळच्याच व्हनसळ या गावातील आहे. येथील सेवालालनगर परिसरातील एका तेवीस वर्षाच्या युवतीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळल्याची तक्रार तिच्या अशिक्षित पालकांनी दिली आहे. या मुलीच्या अर्धवट जळालेल्या प्रेताचे लचके चक्क कुत्रे तोडत होते. अत्यंत अमानवीय, क्रौर्याची परिसीमा असलेली ही घटना घडून चार महिने उलटले. यातील संशयीत आरोपींची नावे मुलीच्या आईने पोलिसांकडे दिली. सुदर्शन बंडा गायकवाड, महावीर गायकवाड, सुहास गायकवाड तसेच बंडा विश्‍वनाथ गायकवाड आणि संगिता बंडा गायकवाड अशी या आरोपींची नावे आहेत; मात्र पोलीस तक्रारीत त्यांची नावे घ्यायला तयार नाहीत. मुलीचे आई आणि वडील अतिशय हतबल होऊन या प्रकाराने आपण लवकरच आत्महत्या करणार, असा इशारा देत आहेत; मात्र तरीही पोलिसांना त्याचे गांभीर्य नाही. संतप्त जनता सर्व मर्यादा, कायदा बाजूला ठेऊन अशा पोलिसांच्या ढुंगणाखाली हिरव्या मिरच्यांची धुरी देईल. मुर्दाड मानसिकतेच्या अधिकार्‍यांनी थोडीशी संवेदनशीलता दाखवून या प्रकरणांचा छडा लावायला हवा. एकीकडे स्त्री शक्तिचा जयघोष करणारे सरकार अशा मस्तवाल अधिकार्‍यांना का पोसते? याचा जाब लोकांना देण्याची वेळ आली आहे.
आजूबाजूला इतक्या दुर्दैवी घटना घडत असताना समाजही त्याकडे तटस्थपणे पाहतोय. अशा चालत्या बोलत्या प्रेतांचा सुळसुळाट वाढल्याने भविष्यात आपल्याला आणखी काय पहावे लागेल याचा नेम नाही. पोलीस अधिकारी, सरकारी यंत्रणा आणि समाज यांनी आतातरी जागे होणे ही काळाची गरज आहे. सोलापूर जिल्ह्यातील या हृदयद्रावक घटना बघून अजून कोणत्याही सामाजिक संस्था, स्त्रीमुक्तीसाठी लढणार्‍या संघटना, मानवी हक्क आयोगवाले, प्रसार माध्यमे यापैकी कोणीही पुढे आले नाही. प्रत्येक गोष्टीचे सोयीस्कर राजकारण आणि प्रसंगी अर्थकारण पाहणार्‍या धेंडांची संख्या कमी व्हायला हवी. माणुसकीला काळीमा फासणार्‍या आणि चांगुलपण संपुष्टात आणणार्‍या अशा घटना आपल्यासाठी चिंतनीय आहेत. महासत्तेच्या गप्पा मारणार्‍यांनी अशा घटनांचा विचार करून संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल याकडे लक्ष द्यावे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या पोटाचा सुटलेला घेर प्रयत्नपूर्वक तुम्ही कमी केलाय; मात्र गृहखाते सांभाळताना तुमच्या मस्तवाल पोलिसांवर तुमचे नियंत्रण राहिले नाही हेच यातून दिसून येते. गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी तुम्ही तातडीने काही केले नाही, तर तुम्ही अखंड महाराष्ट्राचे शेवटचे मुख्यमंत्री ठराल हे आमचे भाकीत दुर्दैवाने खरे ठरेल.
- घनश्याम पाटील
प्रकाशक, संपादक ‘चपराक’, पुणे
संपर्क : 7057292092

सोलापूर पोलिसांची खाबुगिरी
तरूणीला जाळूनही आरोपी मोकाटच

‘चपराक विशेष वृत्त’
* सागर सुरवसे : 9769179823

सोलापूर : एकीकडे राज्यात महिला छेडछाड, लैंगिक अत्याचाराच्या घटनांविरोधात मोठमोठ्या घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस प्रशासन मात्र चांगलंच सुस्तावलंय. अतिशय संताप आणणार्‍या घटना आणि त्याचे भांडवल करत पोलिसांची होणारी चंगळ यामुळे जिल्ह्यातील नागरिक हतबल झाला आहेत. एखादी बलात्काराची घटना घडल्यानंतर समाजातील सर्व घटक जागे होतात; मात्र डोळ्यादेखत गुन्हा घडत असताना पंढरपूर पोलीस स्टेशन आणि सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासन मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याचं पहायला मिळतंय.
हे सर्व गार्‍हाणं मांडण्याचं कारण म्हणजे एका युवतीला आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणारा एक युवक आणि येथील पोलीस यंत्रणा. जणू त्या युवतीने मरणाच्या दरीत टप्प्याटप्प्याने प्रवेश करावा अशीच ही ग्रामीण पोलीस यंत्रणा काम करतेय. इथे फक्त खाबुगिरीलाच जागा उरलीय. तुम्ही गुन्हा करा, आम्ही तुम्हाला पकडतो. तुम्ही पैसे खाऊ घाला, आम्ही तुम्हाला सोडतो, अगदी अशाच पद्धतीचा कारभार जिल्ह्यासह पंढरपुरातील शहर पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे.

अत्याचार क्रमांक 1 -
एका युवतीला विक्रांत बाळासाहेब कासेगावकर या युवकाच्या वेड्या हट्टापायी आपली नोकरी सोडावी लागली. आपल्या दैनंदिन जीवनाचा क्रमही बदलावा लागला. चार महिने आपले गावही सोडावे लागले. एवढंच नव्हे तर चक्क आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला. तरीही गेंड्याच्या कातडीचे पोलीस हातावर हात धरून मख्खपणे पाहत राहिले. खाकी वर्दीविषयी अतिशय संताप आणणारी ही घटना विठूरायाच्या पंढरपुरात घडली.    
पंढरपुरातील एका युवतीने आणि तिच्या कुुटुंबियांनी 1 मे 2016 रोजी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये विक्रांत बाळासाहेब कासेगावकर हा लग्नपत्रिका आणि भविष्य पाहणारा युवक छेडछाड आणि मानसिक छळ करीत असल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला दिली. मात्र त्यावर पोलिसांनी तातडीने कोणतीही कारवाई केली नाही. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचा फोन गेल्यानंतर 5 मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी पोलीस निरीक्षक म्हणून किशोर नावंदे हे तेथे कार्यरत होते. तर तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे काम पाहत होते.
 त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपी विक्रांत कासेगावकरसह त्याचे दोन साथीदार अमोल पंडीत आणि आनंद विश्‍वंभर कासेगावकर यांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांना लगेच जामीनही मंजूर झाला. या घटनेमुळे आरोपीचे मनोबल वाढले. आपण पैशाच्या जीवावर कसंही वागू शकतो, ही भावना त्याच्या मनात दृढ झाली.
कालांतराने 23 जून रोजी आरोपी विक्रांत बाळासाहेब कासेगावकरने पुन्हा एकदा त्या युवतीकडे लग्नासाठी तगादा सुरू केला. तिला पोस्टाद्वारे मेमरी कार्डमध्ये दोघांच्या नावाच्या लग्नपत्रिकेचा फोटो पाठवला. तसेच ही पत्रिका पाहुण्यांना पाठवेन असा दमही भरला. त्या युवतीला दोनवेळा जीवे मारण्याचा प्रयत्नही केला गेला. एकदा अंंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न केला तर दुसर्‍यावेळी दुचाकीवर तोंडाला काळे मास्क लावून तिला पाडण्याचा प्रयत्न केला. ही सर्व आपबीती पीडितेने पोलिसांना सांगितली तरीही पोलीस शांत राहिले. आम्हाला काय तेवढीच कामे आहेत का? अशी उर्मट उत्तरेही पोलिसांनी युवतीच्या कुटुंबियांना दिली. पोलीस प्रशासनाच्या या सर्व अनास्थेमुळे आरोपी आणखी मोकाट सुटला. पुढे त्याची हिंमत इतकी वाढली की, त्याने तिला जीवे मारण्याची धमकी द्यायला सुरूवात केली. पुढे तिला अश्‍लील पत्रे, मेमरीकार्डमध्ये अश्‍लील व्हिडीओही पाठवले.
आरोपीची मजल इतकी वाढली की, मुलीच्या पाहुण्यांना, आमच्या दोघांचे लग्न जमले असून अमूक अमूक या दिवशी लग्नाला येण्याची लग्नपत्रिकाही पाठवली. पाहुण्यांचे फोन सुरू झाले. त्यामुळे ती युवती आणखी खचली. त्यानंतर तिने अन्नग्रहण करणे सोडले, एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. सुदैवाने त्यातून ती बचावली.
पंढरपूर पोलीस स्टेशनमधील पोलीस काहीही कृती करत नसल्याने या घटनेनंतर भांबावलेल्या कुटुंबियांनी 4 जुलै रोजी सोलापूर पोलीस अधिक्षक कार्यालयात येऊन उपअधिक्षक मनीषा दुबुले यांच्याकडेही गार्‍हाणे गायले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नावंदे यांनी तात्पुरती कारवाई करत मुख्य आरोपी वगळता त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आणि दुसर्‍या दिवशी सोडून दिले.
या प्रकारानंतर हे कुटुंबीय पोलीस स्टेशनला जाऊन जाऊन हताश झाले; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पुढे 5 ऑगस्ट रोजी कुटुंबियांनी पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांची भेट घेतली, मात्र परिस्थिती जैसे थे. आता तिचे कुटुंबीय हतबल झालेत. त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे; मात्र अद्यापही आरोपी विक्रांत बाळासाहेब कासेगावकर मोकाटच फिरत आहे. तू माझ्याशिवाय इतर कोणाशी विवाह केला तर त्याला उभा चिरून टाकेन, असा दमही त्याने युवतीला दिलाय. त्यामुळे पोलीस यंत्रणा जिवंतपणी या युवतीला व तिच्या कुटुंबाला न्याय देतील का? की या युवतीचा देखील हकनाक बळी जाणार?
गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी जे गुन्हे घडतायत त्याबाबत मात्र ते कोणतीच दक्षता घेत नाहीत. सर्रासपणे राज्यातील अनेक भागात पोलीस कसल्याही प्रकारची तक्रार नोंदवून घेत नाहीत. घेतली तरी ती फारशी तडीस नेत नाहीत. अनेकदा जे आरोपी नाहीत त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जातेय. त्यामुळे मूळ आरोपी बाजूला राहत आहेत. याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री अशी दोन मंत्रीपदे मिरवणारे देवेंद्र फडणवीस तरी या युवतीला न्याय देणार की नाही?

अत्याचार क्रमांक - 2
साधारणपणे चार महिन्यापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील व्हनसळ या गावी एका युवतीच्या मृतदेहाचे अर्धवट जळालेले तुकडे व्हनसळ-सेवालाल नगर शिवारात मिळून आले. तो मृतदेह ज्योती खेडकर या युवतीचा होता. ही घटना पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून कुटुंबियांचे जबाब घेतले. त्या जबाबात कुटुंबियांनी संशयित आरोपी सुदर्शन बंडा गायकवाड, महावीर गायकवाड, सुहास गायकवाड तसेच बंडा विश्‍वनाथ गायकवाड आणि संगिता बंडा गायकवाड यांची नावे पोलिसांना सांगितली; मात्र निर्लज्जपणाचा कळस गाठत तत्कालीन पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍याने संशयित आरोपींची नावेच पंचनाम्यात नोंदविली नाहीत.
खेडकर कुटुंबीय हे अशिक्षित असल्याने त्यांना या सर्व प्रकाराचा गंधही आला नाही. ते वारंवार पोलिसांकडे खेटे मारत राहिले. न्याय मागत राहिले मात्र गेल्या चार महिन्यात त्यांना न्याय सोडाच पण किमान एकाही संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. सुदर्शन गायकवाड आणि ज्योती खेडकर यांच्यात प्रेमसंबंध होते; मात्र सुदर्शन लग्नाला टाळाटाळ करू लागल्याने तिने स्वतःला पेटवून घेतले. त्यातून तिच्या कुटुंबियांनी तिला जीवाचे रान करून वाचवले. ज्योतीने पेटवून घेतले हे कळताच आपल्याला जेलची हवा खावी लागेल अशी भीती निर्माण झाल्याने सुदर्शनने ज्योतीशी लग्न करतो असे आश्‍वासन देऊन प्रकरण मिटविले; मात्र कालांतराने तिला टाळू लागला. अखेरीस एकेदिवशी ज्योती अचानक गायब झाली. भरपूर ठिकाणी तिचा शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. दोन-तीन दिवसांनी तिचा मृतदेह खेडकर यांच्या शेतात अर्धवट जळालेला आणि तुकडे तुकडे पडलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेला साधारण चार महिने लोटले मात्र अद्यापही खेडकर कुटुंबियांना न्याय मिळेल या आशेचा किरणही दिसलेला नाही. खेडकर कुटुंबियांनी अनेकवेळा पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले, पोलीस अधिक्षकांची भेट घेतली तरीही परिस्थिती जैसे थेच.
सोलापूर जिल्ह्यातील या दोन घटना हृदय पिळवटून टाकणार्‍या तर आहेतच शिवाय पैशासाठी चटावलेल्या या खाकी वर्दीतील धेंडांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणार्‍या आहेत. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षक या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पीडित युवतींना न्याय देणार का? हाच खरा प्रश्‍न आहे.

साप्ताहिक ‘चपराक’, पुणे

Monday, August 22, 2016

‘नाते मनाशी मनाचे’


‘नाते मनाशी मनाचे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना डावीकडून आनंद सराफ, मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, योगगुरू दत्तात्रय कोहिनकर पाटील, निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, प्रकाशक घनश्याम पाटील आणि कवी रमेश जाधव. 
'चपराक प्रकाशन', पुणे
कवितेत व्याकरणाइतकंच अंत:करण महत्त्वाचं असतं. पुण्याच्या येरवडा परिसरातील कवी रमेश जाधव यांचा हा काव्यसंग्रह म्हणजे त्यांच्या अंत:करणातील भावभावनांचे प्रगटीकरणच. आयुष्यातील सुख-दु:खांचे प्रसंग डोळसपणे टिपणारे जाधव सामाजिक जाणीव कवितेच्या माध्यमातून व्यक्त करताना आशयाला महत्त्व देतात. आशयसंपन्नता, प्रासादिकता हे कोणत्याही श्रेष्ठ कवितेचे प्रतीक असते. जाधवांची कविता याबाबत अव्वल ठरते.
त्यांच्या अनेक कवितांत जगण्यातील अनुभव उतरले आहेत. आईच्या मृत्युनंतरची भावना शब्दबद्ध करताना ते हळवे होतात. ‘जपून ठेवल्यात तुझ्या अस्तित्वाच्या खुणा, आठवण येते तुझी पुन्हा पुन्हा’ असे ते सांगतात. जीवनाचे वास्तव टिपताना ‘उद्याचा सूर्य उगवेल की पुन्हा फितवेल’ अशी साशंकता त्यांच्या मनात आहे.
पोटात एक ओठावर एक
असे कधी वागलोच नाही
त्यामुळे
जवळचे कधी लांब गेले
कळलेच नाही

अशी आप्तस्वकियांबाबतची खंत ते व्यक्त करतात. ‘नाते मनाशी मनाचे’ या त्यांच्या कवितासंग्रहाच्या शीर्षकातूनच त्यांच्या कवितांचा ढाचा रसिकांच्या लक्षात येतो. कोणत्याही संस्कृतीत आदर्शांचे, मूल्यांचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे असते. संस्काराचा धागा बळकट करणारे साहित्यच मानवी मनात आशावाद पेरते. अशी अनेक चिंतनसूत्रे रमेश जाधवांच्या कवितांत आहेत. वाणगीदाखल त्यांची ‘आशा’ ही कविता पहा-
किती आली वादळे आणि संकटे
वादळात झेपावणार्‍या हातांमुळे
वाटले नाही एकटे
वाहणार्‍या मनास थांबवलं
संस्काराचं बीज रूजवलं...

हे संस्काराचं बीजच उद्याच्या पिढीच्या नीतिमत्तेचा वृक्ष डौलदार करतात. या संग्रहातील अनेक कविता मनाची दारं सताडपणे उघडणार्‍या आहेत. मनाचा गुंता सोडवणं अनेकांना शक्य नसतं. म्हणून कवी मनाचं दार बंद केल्यानंतर डोळे असून अंध असणार्‍यांना कुणालाही वेदनेचा गंध नसतो, हे काव्यात्म शैलीत वाचकांपुढे मांडतात.
रमेश जाधव यांच्या कविता फेसबुकसारख्या समाजमाध्यमातही वाचकप्रिय ठरल्या आहेत. यातून त्यांनी असंख्य माणसं जोडलीत. या माध्यमातूनच त्यांना अनेक ‘व्हर्च्युअल’ मित्र ‘ऍक्चुअली’ मिळालेत. ‘आभासी जग’ या कवितेतून ते समाज माध्यमाविषयी भाष्य करतात.
मृत्युसारखे चिरंतन सत्य स्वीकारणे भल्याभल्यांना जमत नाही. मृत्युच्या विचारानेही  अनेकांच्या मनाचा आणि शरीराचा थरकाप उडतो; मात्र जाधव यांनी ‘माझी अंत्ययात्रा’ या कवितेद्वारे त्यांचे मृत्युविषयीचे चिंतनही धाडसाने प्रगट केले आहे. ही कविता वाचताना अनेकांना कविवर्य वसंत बापटांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
नका जमवू लोकांची जत्रा
नका काढू माझी अंत्ययात्रा
खांदा देऊन सोसू नका माझा भार
नको ते गळ्यात हार
लाकडे जाळून करू नका
निसर्गाची हानी
जाळण्यासाठी आहे ना
विद्युदाहिनी
नको ती रक्षा सावडणे
तेव्हा गरज असेल कुटुंबाला सावरणे
नको ते दहावा-तेराव्याचे विधी
त्यापेक्षा अनाथआश्रमात द्या निधी

इतक्या स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांत त्यांनी या भावना मांडल्या आहेत. कोणत्याही कर्मकांडांना भाव न देणारी, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली, तरीही श्रद्धायुक्त अंत:करणाने संस्काराची बीजे पेरणारी, सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणारी, सामान्य माणसांच्या सुख-दु:खाचा वेध घेणारी, स्त्रियांचा सन्मान करणारी, जीवनाचे वास्तव अधोरेखित करणारी, शिक्षणाच्या बाजारावर प्रहार करणारी, वास्तवतेचे भान ठेवणारी आणि तरीही स्वप्नातच अडकून राहिलेली त्यांची कविता आहे. बळीराजापासून एकत्र कुटुंब पद्धतीपर्यंत आणि नारीशक्तीपासून ‘लोक काय म्हणतील?’ या खुळचट सवालांचा वेध घेण्यापर्यंतचे वैविध्य त्यांच्या कवितेत आहे.
मनाशी मनाचं जडलेलं हे नातं अत्यंत दृढ आहे. यातील कविता मुक्तछंदातील आहेत. या कवितांना कोणी कवितेचे तंत्र किंवा कवितेच्या व्याकरणाचे नियम लावले तर त्याची फसगत होईल. हृदयाच्या गाभार्‍यातून आलेल्या भावना त्यांनी त्यांच्या कवितेत व्यक्त केल्या आहेत आणि हेच त्यांचे सामर्थ्य आहे. प्रत्येक वाचकाला, रसिकाला या कविता त्यांच्याच मनातील सूर व्यक्त करताहेत असे वाटेल. यापेक्षा कवीचे आणि कवितेचे मोठे यश ते कोणते?
रमेश जाधव यांचा हा दुसरा काव्यसंग्रह. छंदबद्ध रचना, गीत, गझल अशा तंत्रशुद्ध कविता घेऊन ते पुन्हा वाचकांच्या भेटीस येतील याची मला खात्री आहे. त्यांच्या साहित्य प्रवासाला उदंड शुभेच्छा देतो आणि या क्षेत्रातील त्यांची कमान कायम चढती राहील, असा आशावाद व्यक्त करतो.

घनश्याम पाटील
संपादक-प्रकाशन
‘चपराक’ पुणे
मो. 7057292092


Saturday, August 20, 2016

आलेख ‘हसरी गॅलरी’चा!

मराठीत स्त्रियांची चरित्रं आत्तापर्यंत मोठ्या संख्येनं आली आहेत. मराठी वाचकांकडून त्यांचं नेहमीच जोरदार स्वागत झालं. सुप्रसिद्ध विनोदी लेखिका शकुन्तला फडणीस यांनी आता यात सकारात्मक भर घातली असून त्यांचे ‘मी आणि हसरी गॅलरी’ हे पुस्तक पुण्याच्या सुरेश एजन्सीकडून वाचकांच्या भेटीस येत आहे. या पुस्तकातून सुप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस आणि शकुन्तलाबाईंचा जीवनपट सशक्तपणे उलगडला जाणार आहे. 24 प्रकरणांद्वारे या पुस्तकात फडणीस दाम्पत्याचे विविध पैलू शकुन्तलाबाईंनी मांडले आहेत. शिदंच्या ‘हसरी गॅलरी’चे अनेक प्रयोग देशविदेशात झाले असून मराठी वाचकांनी, रसिक प्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिली आहे. या पुस्तकात शिदंच्या चित्रप्रदर्शनाविषयी, त्यांच्या आयुष्याविषयी सविस्तरपणे वाचायला मिळेल.
शि. द. फडणीस यांचे मराठी करमणूक विश्‍वावर अनंत उपकार आहेत. मोठ्या प्रयत्नाने त्यांनी व्यावसायिक करमणूक कर माफ करून घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेल्यानंतरही शिदंनी चित्रकलेची वाट धरली. त्यासाठी हट्टाने ते मुंबईला गेले. हास्यचित्रकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1944 साली सुट्टीत सहज म्हणून त्यांनी एक आर्टवर्क केले. त्याकाळी त्यांना त्या कामाचे दहा रूपये मिळाले. हे दहा रूपये घेऊन त्यांनी मुंबई गाठली आणि अत्यंत परिश्रमपूर्वक या क्षेत्रात त्यांनी स्वतःला सिद्ध केले.
शिदंचं बालपण, मुंबईतले जे.जे.तले दिवस, शिदंच्या आई, खुद्द शिदंच्या स्वभावाचे सहचर म्हणून शकुन्तलाबाईंना भावलेले पैलू, त्यांची नादिष्ट चित्रे, शकुन्तलाबाईंचं बालपण, त्यांच्या लीना आणि रूपा या दोन्हीही लेकी, शिदंचा चित्रप्रवास आणि फडणीस गॅलरी या सगळ्यांविषयी या पुस्तकात वाचायला मिळेल. शकुन्तला फडणीस या मोजकंच पण सकस लिहिणार्‍या लेखिका! त्यामुळं ओघवत्या शैलीत त्यांनी हे पुस्तक साकारलं आहे. या पुस्तकातील अनेक प्रकरणं विविध नियतकालिकांत, दिवाळी अंकात लेख स्वरूपात प्रकाशित झाली असल्याने पुस्तकातही अनेक ठिकाणी काही विषयांची पुनरूक्ती झाली आहे. ती टाळली असती तर पुस्तकाच्या सौंदर्यात आणखी भर पडली असती. असे जरी असले तरी यातील कोणतेही प्रकरण वाचताना कुठेही कंटाळवाणं होत नाही. एक विनोदी लेखिका आणि हास्य चित्रकार यांचं चरित्र जाणून घेताना अशा किरकोळ गोष्टी निश्‍चितपणे गौण ठरतात.
हास्यचित्रांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असणारे आणि हास्यचित्रांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे शि. द. फडणीस हे मराठी बांधवांचे वैभव आहेत. या दाम्पत्याने आपले आयुष्य या क्षेत्रासाठी पणाला लावले. दोघांचे काम परस्परपूरक असले तरीही क्षेत्र मात्र भिन्न आहेत. अगदी लग्नाच्या आधीपासून ‘केसरी-सह्याद्री’ संस्थेत कार्यरत असल्याने शकुन्तलाबाई शिदंच्या चित्राच्या समीक्षक आहेत. शिदंच्या चित्राविषयी त्या आधीही लिहायच्या आणि लग्नानंतर तर पोळ्या लाटणे सोडून त्या चित्राविषयी चर्चा करायच्या. शकुन्तलाबाईंच्या विनोदी कथा वाचून शि. द. त्या कथांना शीर्षक सुचवायचे. या दोघांच्या सहजीवनातील अनेक प्रसंग शकुन्तलाबाईंनी खुमासदार पद्धतीने मांडले आहेत.
‘एकमेकांविषयी आलटून-पालटून’ हे प्रकरण तर या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग लख्खपणे दाखवून देतं. शिदंचं आणि शकुन्तलाबाईंचं लग्न झालं 1955 साली. त्याआधी शकुन्तलाबाईंची शिदंशी एकतर्फी ओळख होती. म्हणजे शिदंची चित्रं त्या बघत होत्या, बघून हसत होत्या, हसून त्यावर चर्चा करत होत्या. ‘केसरी’साठी त्यावर अभिप्रायही लिहित होत्या. पुढं ते कायमस्वरूपी बंधनात अडकले. चित्र आणि संसारात बेमालूमपणे मिसळून गेलेल्या फडणीस दाम्पत्याची माहिती त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहे. शि. द. मोजक्या शब्दात, नेमकेपणे व्यक्त होणारे. त्याउलट शकुन्तलाबाई कविता, कथा, कादंबर्‍यांमध्ये रमणार्‍या. त्यांच्या एका साहित्यिक मित्राने त्यांना सांगितलं, ‘‘तुम्ही घर-प्रपंचात जास्त गुरफटता हे बरोबर नाही. तुमच्या लेखणाकडे तुम्ही अधिक लक्ष द्यायला पाहिजे.’’ त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर हे त्यांच्या जीवनाचं सार आहे. त्या म्हणतात, ‘‘घरप्रपंचात नाही पण नवर्‍यात मात्र जरा जास्त अडकते. खरं सांगू? माझ्या इतपत लेखिका पुष्कळ असतील; पण शिदंसारखा चित्रकार एखादाच असेल. कलावंत म्हणून त्यांची ‘तब्येत’ सांभाळणं यात मला जास्त आनंद वाटतो.’’
शिदंना शकुन्तलाबाईंच्या लंब्या, घन्या केसांविषयी फारच प्रेम. त्यांनी शकुन्तलाबाईंना सांगितलं, ‘‘तुझे केस पाहिले अन् नुसता फिदा झालो बघ.’’ पुढे त्या लिहितात, ‘‘आता एवढं ज्या केसाबद्दल प्रेम, त्या केसात माळण्यासाठी कधी गजरा आणायचीसुद्धा त्यांना आठवण नसते. गजरा, आईस्क्रीम, भेळ, शहाळं अन् कधीतरी चांगलसं नाटक इतपतच माझ्या चैनीच्या संकल्पना होत्या. त्यामुळे नवर्‍याकडून साड्या किंवा दागिणे न मिळाल्याचं दुःख कधी उद्भवलंच नाही.’’
तर त्या केसाबद्दल सांगत होत्या. घरात सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं. सगळी टेबलं, टीपॉय, खुर्च्या यावरही सामानाचे ढीग. शकुन्तलाबाई तिथं खाली बसून केस विंचरत होत्या. नेमका त्यावेळी शिदंना टेस्टर हवा होता. तो सापडत नव्हता. टेस्टर शोधता शोधता ते तिथं आले अन् चक्क त्यांच्या केसावर पाय देऊन पुढे गेले. त्या किंचाळल्या. त्यांनी त्यांच्याकडे धड पाहिलेसुद्धा नाही. ‘सॉरी’ असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत ते पुढं गेले. त्यावर शकुन्तलाबाई लिहितात, ‘‘त्यांच्या डोळ्यापुढे फक्त त्यांना तातडीने हवा असणारा टेस्टरच दिसत होता अन् मला त्यांच्या चेहर्‍यावर द्रोणाचार्यांची टेस्ट देणारा अर्जुनच साक्षात दिसत होता.’’
‘हसरी गॅलरी’चे उलट-सुलट अनुभवही मजेशीर आहेत. हजारोंच्या संख्येत त्यांना येणारी पत्रं, चित्रांविषयीच्या प्रतिक्रिया सगळंच मुळातून वाचण्यासारखं आहे. चित्रांविषयी असलेली असाक्षरता आणि त्यातून घडलेले विनोद याचेही अनुभव या पुस्तकात आलेत. विनोदी चित्र काढताना कराव्या लागणार्‍या कसरती, खुद्द त्यांनाही अपेक्षित नसलेले आणि प्रेक्षकांनी काढलेले अर्थ, कोणत्याही चित्रातील अर्थ आणि आशय यापुढे जाऊन ती कलाकृती परिपूर्ण असावी यासाठीचा त्यांचा आग्रह हे सारं शकुन्तलाबाईंनी शैलीदारपणे लिहिलं आहे. ’या कल्पना तुम्हाला सुचतात कशा?’ यावर फडणीस सांगतात, ‘आपल्या सभोवतीच्या दुनियेत इतक्या विसंगती आणि इतक्या चमत्कृती आहेत की यापैकी काही थोड्यानांच ते चित्ररूप देऊ शकतात.’
‘पडद्यामागे’ या प्रकरणात त्यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयातील एक अनुभव दिला आहे. या प्रदर्शनाला स. प. महाविद्यालयाच्या हॉलपासून मधलं पटांगण ओलांडून पार टिळक रस्त्यापर्यंत प्रेक्षकांच्या रांगा लागायच्या. तेथील अभिप्रायासाठी त्यांनी एक टपालपेटी ठेवली होती. त्यात रोज शे-दीडशे खुशीपत्रं जमायची. एकदा त्यात एक निनावी पत्र आलं, ‘प्रदर्शनातला तो बुद्धांचा पुतळा हलवा. तो आमच्या भावना दुखवणारा आहे.’ फडणसीनांनी त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं; मात्र पुन्हा चार दिवसांनी पत्र आलं, ‘मागचं पत्र मिळालं ना? पुतळा अजूनही हलविलेला नाही. ताबडतोब हलवा. नाहीतर गंभीर परिणामाला तयार रहा.’
कसला होता तो पुतळा? एका रेडिओ सेटवर ठेवलेला गौतम बुद्धांचा पुतळा! मात्र त्या पुतळ्याने कानात बोटं घातली आहेत. कपाळाला आठ्या आहेत. चेहराही त्रासिक आहे. शिदंनीच हा पुतळा तयार केलेला. 1956 साली मोहिनी दिवाळी अंकावर प्रकाशित झालेलं हे चित्र. त्यावर्षी गौतम बुद्धांच्या महानिर्वाणाला 2500 वर्षे झाली होती. तो रेडिओचा जमाना होता. अनेकांनी घरातल्या रेडिओवर बुद्धांचा पुतळा हौसेनं मांडला होता आणि इकडं आकाशवाणीवर बुद्धांवरील कार्यक्रमांचा अतिरेक चालला होता. तो ऐकून लोकांना कंटाळा तर आलाच; पण अगदी गौतम बुद्धांच्या पुतळ्यानंसुद्धा वैतागून कानात बोटं घातली अशी ती विनोदी कल्पना होती. त्यावर आक्षेप घेत धमकीसत्र सुरू होतं. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रेक्षकांना त्रास नको म्हणून तो पुतळा काढला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी मांडताना शकुन्तलाबाई लिहितात, ‘शांतीदूत भगवान बुद्धांच्या भक्तांचा हा संतप्त पवित्रा बघून आम्ही मात्र हतबुद्ध झालो.’
गणिताच्या पुस्तकात शिदंच्या चित्राचा झालेला समावेश, गॅलरीतून डोकावताना, काही चित्रांच्या जन्मकथा आणि मुख्य म्हणजे पुस्तकात जागोजागी वापरलेली शिदंची हास्यचित्रे यामुळे हे पुस्तक वाचनीय आणि प्रेक्षणीय झाले आहे. सुरेश एजन्सीच्या शैलेंद्र कारले यांनी फडणीस कुटुंबीय आणि शिदंच्या काही रंगीत हास्यचित्रांचाही पुस्तकात समावेश केलाय. एकंदरीत एका महान मराठी कलाकाराचे चरित्र या पुस्तकामुळे वाचकांसमोर आले आहे. साधी-सोपी भाषा हेही शकुन्तलाबाईंच्या लेखणीचे सामर्थ्य आहे. वाचकांकडून या पुस्तकाचे जोरदार स्वागत होईल याबाबत शंकाच नाही.

पाने - 160, मूल्य - 190
प्रकाशक - सुरेश एजन्सी, पुणे (020-24470790)


* घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२ 

Sunday, August 14, 2016

चेतना पेटवणारी धर्मशाळा


काव्य जीवनात आहे
जरा जवळून बघा
वाफ पाण्यामध्ये आहे
पाणी उकळून बघा

असं सांगणार्‍या लोककवी म. भा. चव्हाण यांच्या ‘धर्मशाळे’चे संपादन दस्तुरखुद्द व. पु. काळे यांनी केले आहे. वपुंचा आणि मभांचा याराना अनेकांना सुपरिचित आहे. व. पु. प्रतिभावंत लेखक म्हणून सर्वांना ठाऊक आहेत; मात्र ते उत्तम कवीही होते हे थोडक्या लोकांना माहीत असावे. त्यांचा ‘नको जन्म देऊस आई’ हा छोटेखानी काव्यसंग्रह मभांनीच त्यांच्या ‘पृथ्वीराज प्रकाशन’तर्फे प्रकाशित केला आहे. लोककवी मनमोहन नातू आणि रॉय किणीकर यांच्यात जे आणि जसं नातं होतं तसंच या जोडगोळीचं. या कलंदर कलाकारांचे माय मराठीवर ऋण आहेत.
तर मभांच्या या ‘धर्मशाळे’चे 336 प्रवासी आहेत, जीवनाचे सारे रंग त्यात आलेत. प्रत्येक कविता चार ओळींची. म्हटलं तर स्वतंत्र; म्हटलं तर अखंड. सगळ्या रचना अष्टाक्षरी. जीवनावर भाष्य करणार्‍या, नाना पैलू उलघडून दाखविणार्‍या, भविष्य वर्तविणार्‍या ओळी. या ‘धर्मशाळे’त जो कोणी विसावेल तो तिथलाच प्रवासी बनेल. नेकीने जगणार्‍या, जगू पाहणार्‍या प्रत्येकाला वाटेल की, आपल्या आयुष्याचा अर्कच मभांनी या पुस्तकात काढून दिलाय.
कधीतरी जन्मा आलो
कुण्या गावात वाढलो...?
माझ्या जीवनाची गाथा
मीच लिहाया बैसलो...!

अशी ‘धर्मशाळे’ची दमदार सुरूवात मभांनी केली आहे. मात्र लगेचच ते म्हणतात,
 तसे सांगण्यासारखे
आहे कुठे माझ्यापाशी?
माझ्या स्वत:च्या गावात
मीच आहे वनवासी!

‘हे विश्‍वची माझे घर’ अशी भावना बाळगणार्‍या मभांनी ‘धर्मशाळे’तून लाखमोलाची शिकवण दिली आहे. त्यांचे अनुभवविश्‍व समृद्ध असल्याने या सर्व ओळी त्यांच्या ह्रदयातून आल्यात. म्हणूनच वाचणार्‍याला त्या आपल्याशा वाटतात. महाकवीची उपेक्षा हा युगानुयुगे चालत आलेला विषय! मग म. भा. तरी त्याला अपवाद कसे ठरतील? या महाकवीच्या जीवनाचा आलेख बघितला तर पुन्हा लोककवी मनमोहन आठवतात. ते म्हणायचे, ‘उद्याचा कालीदास जर अनवाणी पायाने चालत असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते.’ मभांच्या बाबतीतही तसेच आहे. कविता जगणार्‍या या कवीला मात्र त्याची फिकिर नाही.
 माझी स्वत:ची बायको
मला नवरा मानेना
तरी वडाच्या झाडाला
फेर्‍या घालणे सोडेना...

अशी आजूबाजूची विसंगती म. भा. नेमकेपणे मांडतात.
माझ्या सग्यासोयर्‍यांची
काय सांगू नवलाई
माझ्या आजारपणाची
त्यांनी वाटली मिठाई

असे सांगून म. भा. लिहितात,
माझ्या सग्यासोयर्‍यांनी
काही कमी नाही केले
माझ्या दहाव्याआधीच
गाव जेवण घातले!

अशा सोयर्‍यांविषयीच्या या ओळी पहा-
माझ्या कातड्याचे जोडे
त्यांच्या पायी मी घातले
तरी बोलतात साले
‘नाही कातडे चांगले...!’

‘धर्मशाळे’तल्या कोणत्याही चार ओळी घेतल्या तरी त्या आपल्याला आपल्या आयुष्याची गाथाच वाटतील. प्रेमापेक्षा श्रमाला किंमत मिळावी असा आग्रह धरणार्‍या मभांना भुकेची जाणीव आहे. त्यांच्या कष्टमय आयुष्याचा ते कधी बागुलबुवा करीत नाहीत; मात्र ‘धर्मशाळे’तून जणू मभांचे चरित्रच वाचकांसमोर आले आहे.
पोटामध्ये भूक माझ्या
मात्र ओठात कविता
पाण्याशिवाय वाहते
माझी जीवन सरिता

असे ते म्हणतात. भुकेचे भयंकर वास्तव त्यांच्या लेखणीतून साकारले आहे. पुढच्या ओळी त्याची साक्ष पटवून देतील.
भूक तुलाही छळते
भूक मलाही छळते
भूक विश्‍वमित्रालाही
कुत्रे खायला घालते
 
भूक माय ममतेचे
पाश तोडून टाकते
भूक पोटच्या पोरीला
बाजारात बसवते

भूक लहानथोरांना
देशोधडीला लावते
गरिबाच्या घरातला
भूक दिवा विझवते

आजूबाजूचे वास्तव मभांनी इतक्या नेमकेपणे टिपलेय की त्याला तोड नाही. मुख्य म्हणजे यात त्यांनी भाषेचे कसलेही अवडंबर माजविले नाही.
त्याची आणि तिची सुद्धा
नाही ओळख पटली
जरी दोघांनी जिंदगी
एका घरात काढली

या ओळीतून त्यांनी ‘घरघरची कहाणी’ मांडली ती शंभर पानांच्या पुस्तकातून तरी मांडणे शक्य आहे का?
मभांच्या कविता तरूणाईत कायम आकर्षणाच्या केंद्रबिंदू आहेत. विविध महाविद्यालयातून होणारे त्यांचे कविता वाचनाचे कार्यक्रम अफाट तरूणाईप्रिय आहेत. 

ज्यांना कुणीच नाहीत
मुलेबाळेही नाहीत
त्यांनी त्यांच्या वंशासाठी
फक्त झाडे लावावीत

स्त्रियांचा सन्मान हे तर मभांच्या जीवनाचे मूलतत्त्वच आहे.
आई कुणाचीही असो
तिचा सन्मान करावा
तिने टाकलेला शब्द
फुलासारखा झेलावा

‘धर्मशाळा’ वाचणार्‍याला फक्त मभांच्या कवितांची भुरळच पडत नाही तर ते कवितांवर प्रेम करू लागतात. कवितेला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा हा लोककवी आहे.
कुणाच्याही संसारात
कुणी आणू नये बाधा
कुणाची जाऊ नये
कुण्या कृष्णाकडे राधा

अशी रास्त अपेक्षा त्यांची कविता व्यक्त करते. अनेकांना बागेतल्या फुलाचे महत्त्व कळतच नाही. प्रत्येक व्यक्तित, प्रत्येक कामात दोषच दिसतात. अशांना मभांनी चपराक दिलीय. ते म्हणतात,
काही लोक असतात
चालताना भुंकणारे
बागेतल्या फुलांवरी
जाताजाता थुंकणारे

एकीकडे ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करताना दुसरीकडे खुद्द भगवंतालाच त्यांनी सवाल केलाय,
जेव्हा रावणाने तुझी
होती पळविली सीता
का रे नाही भगवंता
तेव्हा सांगितली गीता

एकंदरीत म. भा. चव्हाण हे आजच्या पिढीचे नेतृत्व करणारे, वंचित उपेक्षितांच्या वेदना प्रभावी शैलीत मांडणारे लोककवी आहेत. त्यांनी पेटवलेला कवितेचा दिवा भविष्यात समाजातील अंधार दूर करीत राहील हे मात्र नक्की!
प्रकाशक - पृथ्वीराज प्रकाशन, पुणे (9922172976)
पाने - 112, किंमत - 60

-घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२ 

Saturday, August 6, 2016

लघुकथांचे लखलखते बेट

सध्याच्या काळात कथा हा साहित्यप्रकार नामशेष होत आहे, अशी अफवा पसरविणार्‍यांना प्रत्यक्ष आपल्या साहित्य कृतीतून सणसणीत चपराक देण्याचे काम समीर नेर्लेकर या ताकतीच्या कथाकाराने केले आहे. अगदी सुरूवातीच्या काळापासून कुणीही आणि कुणालाही ‘तुला एक गोष्ट सांगतो’ असे म्हटले की समोरचा माणूस गांभीर्याने कान टवकारतो. सांस्कृतिक मूल्य असणार्‍या कथा बालमने घडवतात. मोठ्यांना उभारी देतात. काहीवेळा हसवतात, काहीवेळा रडवतात! माणसांच्या जिवंतपणाचे रहस्यच जणू या दडलेल्या कथाबीजांमधून उलगडते. विविध आशयाच्या, विविध विषयाच्या अशा कथा समीर नेर्लेकर या प्रतिभावंत लेखकाच्या लेखणीतून साकारल्या आहेत. ‘एमरल्ड ग्रीन आणि इतर कथा’ हा त्यांचा कथासंग्रह मराठी वाचकांची सांस्कृतिक भूक पूर्णपणे भागविण्याइतका सक्षम आहे, हे मला आनंद आणि अभिमानपूर्वक सांगावेसे वाटते.
समीर नेर्लेकर हे एक कलंदर व्यक्तिमत्त्व आहे. कसलाही डांगोरा न पिटता, शेखी न मिरवता अनेक क्षेत्रात त्यांनी यशस्वी मुशाफिरी केली आहे. त्यांचे जीवनानुभव समृद्ध आहेत आणि सातत्याने ते त्यांच्या लेखणीतून उतरलेही आहे. कवी, चित्रकार, कथाकार, पत्रकार, तंत्रज्ञ अशा विविध भूमिकातून कार्यरत असताना त्यांनी कधीही त्यांची नेकदिल वृत्ती सोडली नाही. ‘काय चांगले आणि काय वाईट’ यातील फरक सामान्य माणसाला निश्‍चितपणे कळतो; मात्र त्याची अभिव्यक्ती त्याला जमत नाही. अशा परिस्थितीत समाजातील विसंगतीवर नेर्लेकर नेमकेपणाने बोट ठेवतात. नेर्लेकरांच्या कथा वाचल्यानंतर कथा या साहित्य प्रकाराला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झालीय, हे सांगण्यासाठी कुण्या ठोकळेबाज विचारसरणीच्या समीक्षकाची गरज नाही.
‘एमरल्ड ग्रीन’ या शीर्षककथेतील रहस्य मानवी वृत्तीच्या पैलूंवर प्रकाश टाकते. समाजात जे काही अनिष्ट चाललेले आहे ते संयमित शब्दांत अधोरेखित करताना लेखक एका अतिउत्साही सामान्य माणसाच्या आयुष्याची झालेली जीवघेणी फरफट मांडतात. कथांचा रहस्यमय, गूढ आणि अनपेक्षित शेवट करण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय आहे. नेर्लेकरांची एक स्वतंत्र शैली आहे आणि त्यामुळे वाचकांना खिळवून ठेवण्यात ते वाकबगार आहेत. त्यांच्या कथा सोप्या आणि संवादी भाषेेत असल्याने कुणालाही कंटाळवाण्या वाटत नाहीत. प्रत्येक कथेतून एक सामाजिक संदेश देतानाच ते पोटतिडकिने सामान्य माणसाची वकिली करतात, त्यांचे दुःख समर्थपणे मांडतात. ‘व्यवहार’, ‘निरोप’, ‘परपुरूष‘, ‘लंगडा घोडा’, ‘कॉकटेल पार्टी,’ ‘रेड कार्पेट‘, ‘म्हातारीची फणी‘, ‘डोह’ अशा सर्वच कथा त्यादृष्टिने बोलक्या ठरतील.
कॉकटेल पार्टीचे निमंत्रण मिळूनही ‘पेशल कटिंग’ने तृप्त होणारा शरद नगरकर, मालकशाहीच्या फसवणुकीला बळी पडलेला कामगार, विशिष्ट आजारामुळे मुलांकडूनच्या निरोपाची वाट पाहणारी आणि न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारी वाढत्या वयातील मुलगी, आपल्या प्रेमाची प्रतारणा करून ‘नवरा’ नावाच्या एका परपुरूषाबरोबर जाणारी स्त्री, अंगी असलेल्या प्रामाणिकपणामुळे स्त्रीचा गैरफायदा न घेणारा अ‘व्यवहारी’ पुरूष, माणूस होण्याची इच्छा बाळगून रात्र संपली की क्षितिजावर परतणारा आणि पहाट होण्याची वाट पाहणारा सूर्य या सार्‍यातून मानवी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समीर नेर्लेकर यांनी प्रभावीपणे मांडले आहेत.
एकेकाळी सुप्रसिद्ध कथाकार ह. मो. मराठे यांनी अनेक ‘कामगार कथा‘ लिहिल्या होत्या. सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ‘कंपनी कामगार‘ नाममात्र राहिला आहे. कामगार संघटना, बंद, संप असे काही फारसे जोमात दिसत नाही. मालक आणि कामगार संघटनांच्या पुढार्‍यांचे संबंध बर्‍यापैकी सुधारल्याने कामगारांच्या अडचणी मांडणार्‍या कथाही खूप कमी झाल्या आहेत. अशा काळात समीर नेर्लेकर यांनी ‘लंगडा घोडा‘ या कथेद्वारे कामगारांचे होणारे शोषण, त्यांचा घेतला जाणारा गैरफायदा नेमकेपणाने मांडलाय.
‘रेड कार्पेट‘ आणि ‘उपसंपादक पाहिजे‘ या दोन कथांमधून सध्याच्या साहित्य, संस्कृती व्यवहाराचे आणि पत्रकारितेचे त्यांनी अक्षरशः वाभाडे काढले आहेत. कवी मोहन भारद्वाज याची होणारी घुसमट आणि त्याने महानगराचा घेतलेला अनुभव त्याच्या आत्मस्वरूपी भाषेत नेर्लेकरांनी शब्दबद्ध केलाय. तो वाचताना कोणत्याही सच्च्या साहित्यप्रेमीच्या डोळ्याच्या कडा ओलावतील. ‘आपली स्वतःची ओळख गुणवत्तेच्या जोरावर निर्माण करावी‘ असे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका संवेदनशील कवीचे आत्मकथन त्यांनी मोठ्या खुबीने या कथेद्वारे मांडले आहे. स्वतःच्याच नावाने विद्यापीठ काढून ‘सबकुछ‘ भूमिका पार पाडणारे ठक असतील किंवा गटातटाचे राजकारण करणारी काव्यमंडळे, ‘कविता कसल्या करताय, कवितेनं पोट भरतं का?‘ असा खुळचट सवाल करणारे प्रकाशक, थेट ‘बिझनेस‘चीच विचारणा करणारे प्रकाशक, नवोदितांनी कविताच करू नयेत, असे म्हणून त्यांचे खच्चीकरण करणारे महाभाग या सर्वांचा समाचार ‘रेड कार्पेट’ या कथेद्वारे घेऊन नेर्लेकरांनी साहित्य क्षेत्र ढवळून काढले आहे. ‘या रेड कार्पेटखाली साचलेली धूळ मात्र कॅमेर्‍यातून दिसत नाही’ या वाक्याने कथेचा शेवट करताना या क्षेत्रात काहीतरी करून दाखविण्याच्या ऊर्मीने धडपडणार्‍यांचा आक्रोश व्यवस्थेवर घाव घालतो.
‘उपसंपादक पाहिजे‘ ही या संग्रहातील एक धमाल कथा. जिल्हा आणि तालुका स्तरावरील अनेक वृत्तपत्रात दिसणारे चित्र त्यांनी ज्या ढंगाने मांडले आहे ते खरोखरी लाजवाब आहे. अनेक वर्षे पत्रकारितेत काढल्याने अगदी बारीक सारीक गोष्टींचे निरीक्षणही समीर नेर्लेकर यांच्यातील लेखकाच्या नजरेतून सुटत नाही. रद्दीच्या दुकानापासून प्रगती करत, जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या दै. गडगडाट या वृत्तपत्राचे  मालक बनलेल्या सुभानरावांच्या रूपाने त्यांनी मराठी पत्रकारितेचा  खरा चेहरा दाखवून दिला आहे. आचार्य अत्रे यांनी सांगितले होते की, ‘‘वृत्तपत्र हा धंदा आहे आणि पत्रकारिता हा धर्म! एकवेळ धंद्याचा धर्म करा; पण धर्माचा धंदा होऊ देऊ नकात!’’ नेमके आज तालुका पातळीवर आणि अनेक ठिकाणी जिल्हा स्तरावरही छोट्या वृत्तपत्रांनी पत्रकारिता धर्माचा जो धंदा करून ठेवलाय ते त्यांनी उद्वेगी वृत्तीने आणि विनोदी शैलीने मांडले आहे. या क्षेत्रातील अनेक हौशी पत्रकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम समीर नेर्लेकर यांनी केले आहे. माध्यमातील प्रतिनिधी, पत्रकारितेचे विद्यार्थी आणि सामान्य वाचकांनाही ही कथा वाचताना हास्यरसाचा आनंद घेता येईल.
‘प्लँचेट’च्या माध्यमातून मृतात्म्याशी संवाद साधू पाहणार्‍यांचा खुळचटपणाही त्यांनी अशाच विनोदी शैलीने हाणून पाडलाय. एखादी कल्पना डोक्यात घुसल्यानंतर माणूस कसा अस्वस्थ आणि हतबल होतो हे त्यांनी मार्मिकपणे या कथेतून मांडले आहे.
‘म्हातारीची फणी’ ही कथाही आपल्याला जीवनाचे सार सांगून जाते. गीता, कुराण, बायबल असे धर्मग्रंथ वाचून जे तत्त्वज्ञान सहजासहजी मिळणार नाही ते या कथेतून मिळते. ‘स्वरूप शोधा, विश्‍वरूप आपोआप गवसेल’ हे आचार्य विनोबाजींचे तत्त्वज्ञान इतक्या सहजपणे कथेच्या
माध्यमातून मांडणारे समीर नेर्लेकर मराठी कथाविश्‍वाच्या प्रवासातील एक लखलखते शिखर ठरतील.
प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे (७०५७२९२०९२)
पाने : ७२, मूल्य : ७५ 
घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे