Sunday, December 20, 2015

शोकात्मतेची भव्य कहाणी!

संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी या चित्रपटाची निर्मिती केली आणि पुण्यात विरोधाचे वावटळ उठले. हा चित्रपट पाहण्यापूर्वीच पुण्यातील भारतीय जनता पक्ष आणि पतित पावन या संघटनांनी चित्रपटाला विरोध केला आहे. कोथरूडच्या भाजपच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली. सेन्सॉर मंडळाने मान्यता दिल्यानंतर लोकशाही व्यवस्थेनुसार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सामान्य माणसाला वेठीस धरण्याचा खुळेपणा आमदार कुलकर्णी आणि त्यांचे काही कार्यकर्ते करत आहेत.
चित्रपटाला विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांना बाजीराव पेशवे यांच्या संदर्भात काहीच माहिती नाही हे प्रसारमाध्यमांच्या समोर सिद्ध झाले आहे. ‘विरोधासाठी विरोध’ म्हणून ‘अंध’भक्त या चित्रपटाविरूद्ध रस्त्यावर उतरले आहेत. ‘विचाराची लढाई विचाराने केली पाहिजे’ असे सांगत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा तावातावात मारणार्‍यांचे हे हिडीस रूप आहे. महापराक्रमी योद्धे बाजीराव पेशवे यांच्यावर प्रेम असल्याचा आव आणणार्‍यांनी आजवर त्यांच्यावर काहीही लेखन केले नाही. बाजीरावांचा पराक्रम मराठी माणसाला कळावा म्हणून त्यांच्यावर कुणी कादंबर्‍या लिहिल्या नाहीत, कविता केल्या नाहीत, पोवाडे रचले नाहीत, त्यांच्या पराक्रमाबद्दल आणि छंदाबद्दल कुणी अभ्यासपूर्वक मांडणी केली नाही. ना. स. ईनामदारांची ‘राऊ’ ही कादंबरी आणि कुसुमाग्रजांचे ‘दुसरा पेशवा’ हे नाटक सोडले तर थोरल्या बाजीरावांवर कुणी फारसे लिहिले नाही.
संजय लीला भन्साळी यांनी हे धाडस केले आहे. सलग तेरा वर्षे या विषयावर काम करून त्यांनी एका भव्य चित्रपटाची निर्मिती केल्याने श्रीमंत बाजीराव पेशवे जगभर पोहोचले आहेत. भन्साळी यांच्या कारकिर्दीतील हा चित्रपट सर्वोच्च असावा. चित्रपटाच्या सुरूवातीलाच त्यांनी या चित्रपटाचा आणि इतिहासाचा फारसा संबंध नाही हे स्पष्ट केले आहे. चित्रपटरूप देताना मूळ कथेत काही बदल अपरिहार्य असतात. भन्साळी यांनी हे स्वातंत्र्य वापरले आहे. त्यामुळे चित्रपटातील काही ऐतिहासिक त्रुटींकडे दुर्लक्ष केले तर ही एक भव्य निर्मिती झाली आहे. यशवंतराव चव्हाण किंवा लोकमान्य टिळक अशी ‘डॉक्युमेंटरी’ चित्रपट म्हणून काहींनी खपवली तेव्हा असा विरोध झाला नाही. मात्र मराठीला जे स्वप्नवत वाटावे ते भन्साळी यांनी करून दाखविल्याने अनेकांची पोटदुखी सुरू आहे. लोकरंजन आणि व्यवसाय याचा समन्वय साधणार्‍या भन्साळी यांच्याकडून आपणास खूप काही शिकता येईल.
भारताच्या राजकीय रंगभूमीवरची सर्वात मोठी शोकात्म प्रेमकथा म्हणजे बाजीराव-मस्तानी! काशीबाईंच्या बाळाजी, रघुनाथराव आणि जनार्दन या तीनही मुलांच्या मुंजी करायला तेव्हाच्या ब्राह्मणांनी नकार दिला. मस्तानीशी संबंध ठेवले म्हणून ब्रह्मवृंदांनी शनिवारवाड्यात भिक्षुकीस येण्यास नकार दिला. ‘राऊंनी मस्तान कलावंत अंगाशी घेतली’ असे म्हणत तेव्हाच्या ब्राह्मणांनी बाजीरावांचे खच्चीकरण केले. त्याउलट बाजीरावांनी मात्र आपला पराक्रम, प्रेमावरील अतुलनीय निष्ठा सिद्ध केली. त्या काळात एका राजपूत राजाच्या मुस्लिम राजकुमारीसोबत प्रेमसंबंध ठेवले आणि तिला शनिवारवाड्यावर आणले. त्याला विरोध झाल्यानंतर ब्राह्मणांना ‘चालते व्हा साल्यांनो’ असे ठणकावण्याचे धाडस या अद्वितीय योद्ध्याने केले. कोणत्याही युद्धात कधीही पराभूत न झालेल्या बाजीरावांना घरच्यांकडून, आपल्याच माणसांकडून तेव्हा प्रचंड त्रास झाला. बाजीरावांच्या मृत्युनंतर इतक्या वर्षांनी आजही त्यांच्या घरच्यांकडूनच त्रास होत असल्याबद्दल संजय भन्साळी यांनी खंत व्यक्त केली आहे. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी समुद्र सफर केली, बिस्किटे खाल्ली म्हणून त्यांना दोष लावणारी आणि त्यांचे शुद्धीकरण करणारी जातीयवादी व्यवस्था आजही मेलेली दिसत नाही.
बाजीरावांची ‘डायनॅमिक पर्सनॅलिटी’ होती. मस्तानीपासून बाजीरावांना झालेल्या मुलाचे नाव ठेवण्यासही तेव्हाच्या ब्राह्मणांनी विरोध केला. शेवटी बाजीरावांनीच त्याचे ‘कृष्णा’ऐवजी ‘समशेरबहाद्दर’ असे नामकरण केले. इतर धर्मियांना डावलण्याचा उद्योग काही हरामखोरांनी तेव्हापासूनच चालवला आणि आज ‘घरवापसी’च्या नावाने बोंब ठोकत आहेत. पानिपतच्या युद्धातील पराभवाची जी कारणे होती त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ब्राह्मण, मराठे, धनगरांच्या वेगवेगळ्या चुली! असा प्रकार मुस्लिमांमध्ये नव्हता. बाजीराव पेशवे यांच्याकडेही नव्हता. मल्हारराव होळकर यांच्या पंक्तीस बसणारे, मस्तानीच्या हातचे खाणारे बाजीराव खर्‍याअर्थी समतेचे पाईक होते. सर्वधर्मसमभाव आणि पुरोगामीत्वाचा आदर्श म्हणजे बाजीरावांचे चरित्र आणि चारित्र्य! अनेक सरदार, अनेक घराणी तयार करण्याचे श्रेय बाजीरावांकडे जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना जे धोरण अवलंबले त्याचाच आदर्श बाजीरावांनी ठेवला. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी असल्या गोष्टींचा विचार केला नव्हता. धर्माचे संरक्षण करायचे तर समुद्रातही किल्ले बांधायला हवेत हे त्यांनी ताडले होते. अनेक मुस्लिम सरदार स्वराज्यासाठी अहोरात्र झुंजत होते. शिवरायांच्या सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत वावरत होते. असे असताना बाजीरावांनी मुस्लिम मुलीसोबत अधिकृतपणे विवाह केला म्हणून त्यांना कमी लेखणे, त्यांच्या प्रेमाचा अवमान करणे योग्य नाही.
‘‘रणांगणावर अतुलनीय शौर्य गाजवणार्‍या बाजीरावालाच मस्तानीच्या अद्वितीय सौंदर्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे’’ अशा आशयाचे विधान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले होते. सावरकरांचेच भक्त असलेल्या पु. भा. भावे यांनीही सांगितले होते की, ‘‘अंगठ्याएवढ्या अवयवावरून महापुरूषांचे मुल्यमापन करू नकात. महापुरूष पहायचेच असतील तर ते ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्यातील त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचे शौर्य पडताळून पहा.’’ श्रीमंत बाजीराव याबाबत मात्र दुर्दैवी ठरले. त्यांच्या पराक्रमाऐवजी प्रेमप्रकरणाचीच चर्चा अधिक झाली. या जिगरबाज योद्ध्याने नर्मदा मुक्त करायची, दिल्ली सोडवायची आणि इतरांनी त्यांच्याच नावे बोंब ठोकायची हे काही खरे नव्हे!
आज ऐतिहासिक विषयावर लेखन करायचे झाले तर भल्याभल्यांच्या पोटात गोळा येतोय. सत्य लक्षात न घेता कलाकृती ठेचून काढण्याचा प्रयत्न केला जातो. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र लिहिले म्हणून निषेध कसला करता? तुम्हाला शिवरायांचे गुरू जे कोणी आहेत आणि त्यांचे शिष्य कोण कोण होते असे वाटते ते पुराव्यासह मांडून लोकांसमोर आणा. त्यावर पुस्तके लिहा, चित्रपट काढा, नाटके चालवा आणि बाबासाहेबांनी काय चुकीचे लिहिले ते खोडून काढा. ज्यांना बाबासाहेब पुरंदरे चुकीचे वाटतात त्यांनी ‘जाणता राजा’हून मोठे महानाट्य निर्माण करावे आणि लोकांपर्यंत पोहोचवावे. जे सत्य वाटते, जे सत्य आहे ते लोक स्वीकारतील.
ज्याप्रमाणे बाजीरावांना या चित्रपटात ‘नाचवले’ तसे महाराजांना नाचवतील का? असा खुळचट सवाल काही मंदबुद्धीचे लोक करीत आहेत. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे स्वयंभू राजे होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना त्यांनी कुणाचे मांडलिकत्व पत्करले नव्हते. या युगपुरूष राजाच्या उलट बाजीरावांचे! बाजीराव एक नोकर होते. तरीही त्यांनी आपला पराक्रम सिद्ध केला. घरच्या आघाडीवर मात्र ते कायम अपयशी ठरले. मराठ्यांच्या इतिहासातील या पराक्रमी योद्ध्याला कलंकीत करण्याचे काम तेव्हाच्या ब्राह्मणांनीच केले. ‘मी जातीने ब्राह्मण असलो तरी वृत्तीने क्षत्रिय आहे’ हे त्यांचे सांगणे कुणी ध्यानातच घेतले नाही. इतक्या वर्षांनी बाजीराव पेशवे यांच्या चरित्रावर चित्रपट काढून संजय लीला भन्साळी यांनी ‘प्रेमवीरांना कोणताच धर्म नसतो तर प्रेम हाच त्यांच्यासाठी एक धर्म असतो’ हे प्रभावीपणे मांडले आहे.
प्रियंका चोप्रा या गुणी कलावंतीने प्रथमच इतका लाजवाब अभिनय केलाय. या चित्रपटातील तिचे बोलके डोळे खूप काही सांगून जातात. मस्तानीचे प्रेम आणि तिचा पराक्रम सिद्ध करताना दिपीका पादुकोनही काकणभर पुढेच आहे. दुर्दम्य शौर्याची गाथा, घरच्यांकडून होणारा त्रास, नंतरची मन:स्थिती आणि बाजीरावांचा शेवटचा काळ जिवंत करताना अभिनेता रणवीर सिंह याचे कसब पणाला लागले आहे. भव्य सेट्स ही तर संजय लीला भन्साळी या दिग्दर्शकाची खासीयतच. या चित्रपटातही तो खरा ठरला आहे. या निमित्ताने श्रीमंत बाजीराव पेशवे, मस्तानीबाईसाहेब, काशीबाईसाहेब यांची चर्चा जगभर सुरू झाली आहे. बाजीरावांच्या जीवनावरील पुस्तकांची चौकशी होवू लागली आहे. ‘हेही नसे थोडके’ असेच म्हणावे लागेल. सुरूवातीला या चित्रपटाला विरोध करणार्‍या पेशव्यांच्या वंशजांचा रागही निवळला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींनीही हा चित्रपट आवडल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे पुण्यातल्या चमकोगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या आमदार मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या चमच्यांनी शांत राहिलेलेच बरे!
भन्साळी यांना विरोध करताना त्यांची तुलना जेम्स लेन याच्याशी करण्याचा केविलवाणा प्रयत्न काही ‘भक्त’ मंडळी करत आहेत. जेम्सने शिवरायांसंदर्भात विकृत लिखाण केले होते आणि तो भारतीय नव्हता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. संजय लीला भन्साळी हे आपल्याच मातीतील दिग्दर्शक आहेत. कथेची गरज म्हणून त्यांनी यात काही बदल केलेत आणि चित्रपटाच्या प्रारंभीच तसे नमूद केले आहे. यात कुठेही बाजीरावांचे अवमूल्यन झालेले नाही. मनोरंजन म्हणून त्यांनी हा भव्य चित्रपट साकारला असला तरी बाजीरावांसारख्या परमप्रतापी योद्ध्याची गाथा जगभर पोहोचली आहे. मराठीचा पताका फडकवत ठेवल्याबद्दल संजय लीला भन्साळी यांचे मन:पुर्वक अभिनंदन!

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२


14 comments:

  1. एकदम झणझणीत 'चपराक'

    ReplyDelete
  2. केवळ अप्रतिम....

    ReplyDelete
  3. केवळ अप्रतिम....

    ReplyDelete
  4. जे मराठी लेखक,कवि,राजकारणी ह्यांना बाप जन्मात जमले नाही ते ह्यांनी मांडले अन् मराठी सत्तेचे वैभव अधोरेखित केले ।
    ह्याविषयी आपण मांडलेले मत अतिशय योग्य आणि परखड आहे ।
    अशी मते कमी मांडली जातील पण हे अनेकांच्या मनातले आहे...
    ग्रेट किप ईट अप दादा ।।।।

    ReplyDelete
  5. जे मराठी लेखक,कवि,राजकारणी ह्यांना बाप जन्मात जमले नाही ते ह्यांनी मांडले अन् मराठी सत्तेचे वैभव अधोरेखित केले ।
    ह्याविषयी आपण मांडलेले मत अतिशय योग्य आणि परखड आहे ।
    अशी मते कमी मांडली जातील पण हे अनेकांच्या मनातले आहे...
    ग्रेट किप ईट अप दादा ।।।।

    ReplyDelete
  6. लोकशाहीचा खरा अर्थ आणि वाचाळवीरांना सणसणीत चपराक.

    ReplyDelete
  7. लेख केवळ अप्रतिम. इतकी सुंदर मीमांसा खुप दिवसात वाचनात आली नव्हती. शिवाजी महाराजांनंतर बाजीरावानेच खऱ्या अर्थाने मराठा सामरज्याचा विस्तार केला. बाजीरावाने ॲनेक मोठे मोठे सरदार तयार केले जसेकी मल्हारराव होळकर,राणोजी शिंदे,उदाजी पवार ज्यानि मराठी सामराज्य वाढविले. मराठी माणसाला मराठी माणूसच त्रास देतो ही उक्ती मराठी माणसाने कायम खरी केलेली आहें. त्यातुन शिवाजी महाराज व बाजीरावास सुटले नाहीत. संशोधन करून इतिहास लिहिणे ज्या लोकान्ना जमत नाही ते फक्त तोडफोड करु करतात.

    ReplyDelete
  8. अप्रतिम आणि कडक,सणसणीत आणि तिखट एकंदरीत झणझणीत

    ReplyDelete
  9. कोण आणी कुठले आहेत हे सबनीस? साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील गलिच्छ राजकारण किळसवाणे वाटते.अशानां योग्य जागा दाखवणे गरजेचे आहे. आपण योग्य काम करीत आहात त्याबाबत आपले अभिनंदन ! प्राचार्य डॉ. जगताप

    ReplyDelete
  10. कोण आणी कुठले आहेत हे सबनीस? साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील गलिच्छ राजकारण किळसवाणे वाटते.अशानां योग्य जागा दाखवणे गरजेचे आहे. आपण योग्य काम करीत आहात त्याबाबत आपले अभिनंदन ! प्राचार्य डॉ. जगताप

    ReplyDelete
  11. आज पहिल्यांदाच आपला ब्लॉग पहिला... आणि बाजीराव-मस्तानी चित्रपटावर माझ्या मनातील मते अजून कुणी दुसरा व्यक्त करत आहे हे वाचून पण आनंद झाला. काही दिवसांपूर्वी माझ्या ब्लॉग वर मी अशाच अर्थाचं काही लिहिलं होतं (आणि नंतर त्या बदल्यात बऱ्याच जणांकडून काही-काही ऐकून घ्यावं लागलं - तुम्ही वर लिहिलेले मुद्दे पण त्यात आहेत). माझा लेख येथे शेअर करत आहे ... http://www.sandeeppatil.co.in/paryutsuk/bajirao_first_laktare_ani_torane/

    ReplyDelete