Saturday, October 31, 2015

साहित्य धर्म वाढवावा!

सध्या महाराष्ट्राचा बराचसा भाग दुष्काळाच्या झळांनी होरपळतोय. शेतकर्‍यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्यात. त्यांची जगण्याची उमेद नाहीशी होतेय. अशा हलाखीच्या काळात दुष्काळग्रस्तांच्या आयुष्यात थोडीशी झुळूक यावी यासाठी काहींनी पुढाकार घेतलाय. तो स्तुत्य आहे. धान्याअभावी, पाण्याअभावी जिथे जिथे दुष्काळ पडेल तिथे मदतीचा हात देऊन त्यांना बाहेर आणता येते; मात्र विचारांचा दुष्काळ पडला तर माणुसकीचा खून पडतो. त्यामुळे ज्यांना निसर्गाने तडाखे दिलेत त्यांच्यासाठी सहकार्याचा हात पुढे करतानाच ‘चपराक’ने वैचारिक दुष्काळ संपुष्टात यावा यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘चपराक’चे विविध उपक्रम आणि प्रस्तुत दिवाळी विशेषांक हे त्याचेच प्रतीक आहे. अनावश्यक राजकारणाला फाटा देऊन साहित्य धर्म वाढीस लागला तरच पुन्हा एकदा वैचारिक क्रांती घडेल आणि आपण अक्षरदिवाळी उत्साहात साजरी करू शकू असे आम्हास वाटते.
साहित्य क्षेत्र सध्या अनेक अपप्रपृत्तींनी बरबटलेय. साहित्यिक वातावरण कलुषित झालेय. साहित्य रसिकांवर सांस्कृृतिक बलात्कार होतोय. मात्र प्रत्येकजण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय. विचारांच्या लढाईची भाषा करणारे सदैव आपल्याच धुंदीत असतात आणि साहित्यबाह्य विषयांवरून खल करत चमकोगिरी करतात. ज्यांचा साहित्याशी कसलाही संबंध नाही ते लोक साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होतात, साहित्य संमेलने गाजवतात आणि वर आपणच साहित्यक्षेत्राचे कसे तारणहार आहोत याचे ढोलही पिटतात. हे सारेच क्लेषकारक आहे. प्रकाशाचा सण साजरा करत असताना अंधार आपसूकच दूर होतो. यंदाच्या दिवाळीत तरी साहित्य आणि प्रकाशन विश्‍वातील तिमीर संपावा आणि साहित्यिकांत नवचैतन्य निर्माण व्हावे ही अपेक्षा व्यक्त करतो.
साहित्यातही मूठभर लोकांची मक्तेदारी निर्माण झाल्याने सामान्य माणूस साहित्यापासून दूर जातोय. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ अशी खोटी आवई उठवत वर हे लोक सर्वांना वेठीस धरतात. नगद रक्कम मोजून पुस्तके विकत घेणार्‍या वाचकांशी प्रतारणा करतात. संकुचित वृत्तीच्या या समदुःखी लोकांनी ग्रंथ व्यवहाराचे वाटोळे करण्याचा विडा उचलला आहे. विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना चपराक देताना आम्ही यांचे ढोंगही सातत्याने चव्हाट्यावर आणले आहे. सत्याला डावलण्याची हिंसा करण्याचे पाप जे कोणी करतात त्यांच्यासाठी आमच्या हातात सदैव हंटर आहे. लेखणीच्या माध्यमातून त्याचे फटके देताना आम्ही कधीही कचरणार नाही. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची आमची तयारी आहे. तत्त्व, तळमळ, आणि तिडिक या त्रिसुत्रीच्या जोरावर संवाद आणि संघर्ष या भूमिकेतून आम्ही कार्यरत आहोत; पुढेही राहू! वाचकांशी इमान राखताना साहित्य धर्म वाढावा यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न असतील.
‘चपराक’ हे विविध प्रश्‍नांवरून वेळोवेळी ठाम भूमिका आणि सत्याचा कैवार घेणारे नियतकालिक आहे. आमची नाळ वाचकांशी जोडली गेलीय. मराठीत एक प्रभावी मासिक देताना आम्ही सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके समारंभपूर्वक प्रकाशित केली आहेत. मागच्या वर्षभरातील प्रमुख कार्यक्रम आणि ‘चपराक’ची परखड भूमिका पाहता त्यातील सत्य वाचकांच्या लक्षात येईल. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘चपराक दिवाळी विशेषांक 2014’चे प्रकाशन झाले. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘चपराक’च्या दुसर्‍या साहित्य महोत्सवात विविध साहित्य प्रकारातील आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लेखकांची तब्बल बारा पुस्तके आम्ही एकाचवेळी प्रकाशित केली. मराठीतील सर्व आघाडीच्या वृत्तपत्रांनी आमच्या या उपक्रमाची गौरवाने दखल घेतली.
भाऊ तोरसेकर हे मराठी पत्रकारितेतील एक अव्वल नाव. आचार्य अत्रे यांच्याच ‘मराठा‘तून त्यांच्या पत्रकारितेचा प्रारंभ झाला. विविध प्रश्‍नांवर तुटून पडताना भाऊंची लेखणी तळपत असते. सुहास पळशीकर आणि राजेंद्र व्होरा या पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांनी ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ नावाचे, पानापानावर धादांत खोटी माहिती देणारे पुस्तक लिहिले. ‘ग्रंथाली’या प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले. या पुस्तकातून लेखकांनी शरद पवार यांच्यासारख्या बड्या नेत्यापुढे लाळघोटेपणा करताना स्वतःला जे वाटते ते सत्य म्हणून कसे घुसडले आहे याची चिकित्सा केली. लेखक आणि प्रकाशकांनी भाऊंना लेखी पत्र लिहून दिलगीरी व्यक्त केली आणि नव्या आवृत्तीत त्याची दुरूस्ती करू असे सांगितले. मात्र त्याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित होऊनही काहीच घडले नाही. सर्व प्रकारचा लाभ घेत, समाजात उजळ माथ्याने मिरवत, रग्गड पैसा कमवत लेखक आणि प्रकाशक वाचकांची दिशाभूल करत होते. हा खोटेपणा असह्य झाल्याने  भाऊंनी ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक लिहिले आणि ‘चपराक‘ने आपल्या वृत्तीप्रमाणे ते प्राधान्याने प्रकाशित केले. वाचकांनी या पुस्तकाचे जोरदार स्वागत केले आणि सुहास पळशीकरांसारख्यांचे बुरखे टरटरा फाटले. विशेष म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. निकम हे फक्त वकील नाहीत, तर ते न्यायासाठी लढणारे देशभक्त वकील आहेत. त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणे ही निश्‍चितच आनंदाची गोष्ट होती.
‘चपराक’चा हा चौदावा दिवाळी विशेषांक. वाढत्या चंद्रकलेप्रमाणे उत्तमोत्तम आणि वाचनीय दिवाळी विशेषांक प्रकाशित करणे ही आता आमची स्वभाववृत्तीच झाली आहे. एखादा अंक पूर्ण करताना किती परिश्रम करावे लागतात हे स्व-अनुभवातून आम्ही जाणू शकतो. त्यामुळेच सर्वोत्तम दिवाळी विशेषांकाचा गौरव करण्याची परंपरा आम्ही याच वर्षापासून सुरू केली आहे. ‘चपराक’ची राज्यस्तरीय दिवाळी विशेषांक स्पर्धा पूर्णपणे यशस्वी झाली. राज्यातून आणि राज्याबाहेरूनही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नांदेड येथील दै. ‘उद्याचा मराठवाडा’, सोलापूर येथील दै. ‘संचार’, मुंबईचा साप्ताहिक ‘विवेक’, पुण्यातील ‘आपले छंद‘, आणि ‘ग्राहकहित’ या दिवाळी विशेषांकांचा गौरव ‘चपराक‘ने केला. खास अंधासाठी मुंबईतून ब्रेल लिपीत प्रकाशित होणार्‍या ‘स्पर्शज्ञान‘ या अंकालाही विशेष पुरस्कार दिला. आपल्याच क्षेत्रातील चांगले काम करणार्‍यांचे कौतुक करणे यापेक्षा मोठा आनंद कोणता बरे असू शकेल?
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे वाहू लागले. यंदाचे संमेलन संत नामदेव महाराज यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पंजाब येथील घुमान या गावात घ्यायचे ठरले. संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. सदानंद मोरे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली. अमराठी भागात संमेलन होणार असल्याने पुस्तक विक्री होणार नाही, असा ग्रह काही प्रकाशकांनी करून घेतला आणि या संमेलनावर बहिष्कार टाकला. ‘एकही मराठी प्रकाशक या संमेलनाला जाणार नाही‘ अशी आडमुठी भूमिका त्यांनी घेतली. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी साहित्य महामंडळ आणि प्रकाशकांतील ही कोंडी फोडणे गरजेचे होते. ‘धंद्यापेक्षा धर्म महत्त्वाचा’ हे आचार्य अत्रे यांचे सूत्र आचरणात आणत आम्ही पुढाकार घेतला आणि ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तरी आम्ही तिथे नक्की जाऊ’ अशी भूमिका घेतली.
आमच्या या सकारात्मक भूमिकेची दखल सर्व वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी घेतली. प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली; मात्र मराठीतील एका संस्मरणीय संमेलनासाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते. संमेलन ‘अखिल भारतीय’ असल्याने कधीतरी राज्याबाहेर झाले तर असा काय फरक पडणार? पण धर्माचा धंदा करणार्‍यांना त्याचे काही सोयरसुतक नसते. आम्ही हा धर्म जपत आवाज उठवला. घुमानचे संमेलन यशस्वी करण्यात हातभार लावला. ‘चपराक’च्या सर्व पुस्तकांची तडाखेबंद विक्री घुमानला झाली. त्यातून अनेक लेखक मिळाले, नवे मित्र मिळाले. इतकेच काय नंतर पुण्यात वसंत व्याख्यानमालेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी ‘चपराक’ने घुमानबाबत घेतलेल्या भूमिकेचे जाहीर कौतुक केले.
याच वर्षात आम्ही शांताराम डफळ यांचा ‘अस्तित्व’, सरिता कमळापूरकर यांचा ‘माझी कविता’, प्रल्हाद दुधाळ यांचा ‘सजवलेले क्षण’ हे काव्यसंग्रहही धडाक्यात प्रकाशित केले. कवितासंग्रह कोणीही प्रकाशित करायला धजावत नाही, असे सांगितले जात असताना या वर्षात ‘चपराक‘ने जवळपास दहा कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत.
‘चपराक’चा तिसरा साहित्य महोत्सव 8 ऑगस्ट 2015 रोजी नारायण पेठेतील केसरी वाड्यात संपन्न झाला. यात पुस्तकांची संख्या होती पंधरा! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे या संमेलनाला उपस्थित होते. पंधरा-पंधरा पुस्तके एकावेळी प्रकाशित करूनही जर कोणी ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ असा कांगावा करत असेल तर वाचकांनीच आता त्यांना झोडपून काढले पाहिजे. उत्तमोत्तम विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी लेखक आणि प्रकाशक काय परिश्रम घेतात हे पाहणे गरजेचे आहे. वाचक कमी होताहेत असे म्हणण्यापेक्षा ते वाढावेत यासाठी काय प्रयत्न होतात हे बघितले पाहिजे.
‘चपराक’च्या चमुने या वर्षात पंजाब येथील घुमान, मराठवाड्यातील लातूर, उदगीर, देगलूर, नांदेड, कळमनुरी, हिंगोली, परभणी, त्यानंतर  नाशिक, बेळगाव, नगर, संगमननेर असे दौरे करून वाचकांचा कौल जाणून घेतला. नवनवे लेखक शोधले. रमेश पडवळ यांच्या ‘तपोभूमी नाशिक’ या पुस्तकाचे लोकार्पण नाशिकला झाले. त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, नाशिकातील प्रसिद्ध उद्योजक आणि व्याख्याते गिरीश टकले असे मान्यवर उपस्थित होते. गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या ‘चौथा स्तंभ’ या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन बेळगावला झाले. जिथे जिथे मराठी वाचक आहे तिथे तिथे पोहोचण्याचा आणि त्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्याचा, त्यांचे साहित्य वाचकांपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मराठी वाचकांना जास्तीत जास्त दर्जेदार मजकूर द्यायचा आणि शक्य तितक्या लेखकांना लिहिते करायचे या उद्देशाने यंदा दिवाळीचा महाविशेषांक करायचे ठरले. संपादकीय बैठक घेऊन सर्वानुमते आम्ही तो निर्णय जाहीर केला आणि सुरू झाली या अंकाची तयारी. पुस्तक प्रकाशनाचा व्याप, सततचा प्रवास, साप्ताहिक आणि मासिकाचे नियमित अंक हे सारे सांभाळून दिवाळी अंकाचे काम करायचे होते. त्यातही एखादा विषय घेऊन अंक केला तर त्या विषयात ज्यांना अभिरूची नाही ते तिकडे ढुंकूनही पाहत नाहीत. विषय घेऊन अंक केल्यानंतर व्यवसाय होतो पण त्यात सर्वसमावेशकता येत नाही. त्यामुळे  मराठीतील नव्या जुन्या लेखकांना एकत्र आणत त्यांच्याकडून जे सर्वोत्तम आहे ते लिहून घ्यायचे ठरले.
आम्ही काम सुरू केले आणि बघता बघता हा डोंगर कधी उभारला ते लक्षातच आले नाही. भाऊ तोरसेकर, ह. मो. मराठे, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर, प्रा. मिलिंद जोशी, संजय सोनवणी, सुधीर गाडगीळ, पराग करंदीकर, श्रीराम पचिंद्रे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, सदानंद भणगे, डॉ. भास्कर बडे, अंजली कुलकर्णी, प्रा. द. ता. भोसले, वासुदेव कुलकर्णी, श्रीपाद ब्रह्मे, प्रा. बी. एन. चौधरी, डॉ. सुनीलकुमार लवटे, अरूण खोरे, शेखर जोशी, स्वप्निल पोरे, प्रशांत चव्हाण, सुभाष धुमे, स्वाती तोरसेकर, सरिता कमळापूरकर अशा मान्यवरांचे साहित्य धडाधड आले. सागर कळसाईत, व्यंकटेश कल्याणकर, डॉ. मुग्धा जोर्वेकर, हणमंत कुराडे, सतीश देशपांडे, अर्चना डावरे, पवन घटकांबळे या तरूणांनीही खिंड लढवली. नवोदित आणि प्रस्थापित यांच्यातील भेद दूर व्हावा इतके ताकतीचे ही मंडळी लिहित आहेत.
‘चपराक’च्या सदस्य सौ. चंद्रलेखा बेलसरे, माधव गिर, महेश मांगले, समीर नेर्लेकर, विनोद श्रा. पंचभाई, मच्छिंद्र कामंत यांनीही आपल्या सशक्त लेखणीची झलक दाखवून दिली आहे. यंदाचा आपला महादिवाळी विशेषांक प्रकाशित होणार हे कळताच देशभरातून प्रचंड साहित्य आले. वेळेअभावी आणि जागेअभावी अनेकांच्या साहित्याला न्याय देता आला नाही याची खंत आहे. मात्र त्याला पर्याय नाही. काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात. त्यामुळे ज्यांच्या साहित्याचा अंकात समावेश करता आला नाही त्यांनी नाराज न होता सातत्याने लिहित रहावे. पुढच्या अंकातून ते साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करू!
या महाविशेषांकातील अंकाचे वैविध्य तरी पहा! फक्त अंक चाळायचे म्हटले तरी निदान तासभर सहज जाईल. भाऊ तोरसेकर यांनी देशाचे राजकारण उलगडून दाखवले आहे. सध्या प्रकाशकही  अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत उतरले असल्याने प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘रद्दीवाले आणि बारवालेही’ या निवडणुकीत उतरले तर काय होईल याविषयी खुसशुशीत शैलीत लिहिले आहे. साहित्यातील या समकालीन वास्तवावरील त्यांचे भाष्य जरूर विचारात घेण्यासारखे आहे. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ हे महिनाभराच्या अमेरिका दौर्‍यावरून नुकतेच पुण्यात परतले. त्यांना त्यांच्या अमेरिकेतील मराठी मित्रांविषयी लिहिण्याचा प्रेमळ आग्रह आम्ही केला आणि कसलेही आढेवेढे न घेता त्यांनी रात्रभर जागून ‘माझे अमेरिकेतील मित्र’ हा लेख पूर्ण करून दिला. वासुदेव कुलकर्णी याचा सातार्‍यावरील लेख, ज्योती कदम यांनी मराठवाड्याच्या तर श्रीराम पचिंद्रे यांनी गोव्याच्या खाद्यसंस्कृतीची करून दिलेली ओळख, विद्या देवधर यांनी हैद्राबादच्या मराठी माणसांविषयी लिहिलेला लेख, थेट दुबईहून प्रदीप मार्कंडेय यांनी रक्तदानाचा पाठवलेला एक अनुभव, ‘चपराक साहित्य महोत्सवा’तील बाबासाहेबांच्या भाषणाचा संक्षिप्त भाग, मराठी चित्रपटाविषयी उमेश सणस आणि चित्रपट निर्माते विकास पाटील यांचे लेख, स्वाती तोरसेकर यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरचा लेख, आसावरी इंगळे यांनी लिव इन रिलेशनशिप सारख्या विषयावर, बी. एन. चौधरी यांनी लैंगिक शिक्षणावर तर पवन घटकांबळेसारख्या तरूणाने महिलांच्या मासिक पाळीवर लिहिलेले लेख विचारप्रवर्तक आहेत. या विषयावर अजूनही मोकळेपणाने चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे.
अंकातील कथा, कविता आणि व्यंग्यचित्रांनीही वाचनीयता वाढवली आहे. प्रा. बापू घावरे, अरविंद गाडेकर यांची व्यंग्यचित्रे नवा विचार देणारी आहेत. सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि चित्रकार समीर नेर्लेकर यांनी सर्व लेखांच्या शीर्षकांचे सुलेखन केले आहे. आतील चित्रे आणि साजेसे मुखपृष्ठ त्यांनीच साकारले आहे. व्यंकटेश कल्याणकर यांनी अल्पावधीत उत्कृष्ट मांडणी केली. ‘चपराक’च्या ‘सुप्रिमो’ शुभांगी गिरमे, ‘छोटा भीम’ तुषार उथळे पाटील, माधव गिर, महेश मांगले, मोरेश्‍वर ब्रह्मे, बजरंग लिंभोरे यांनी अंकासाठी शब्दशः दिवसरात्र एक केला. ‘चपराक’वर नितांत प्रेम करणारे ज्ञानेश्‍वरभाऊ तापकीर, उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक मच्छिंद्र कामंत यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि काही जाहिराती मिळवून दिल्या. त्यामुळेच एक छोटासा बिंदू बघता बघता अथांग सिंधूसारखा कधी झाला ते कळलेच नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील लेखकांचे साहित्य तर या अंकात आहेच; पण महाराष्ट्राबाहेरील प्रतिभावंतांनीही लेखन सहभाग घेतला आहे. त्यात प्रामुख्याने हैदराबादच्या डॉ. विद्या देवधर, बेळगावचे सुधीर जोगळेकर, सुरतच्या मनिषा वाणी, अहमदाबादच्या आसावरी इंगळे, इंदूरचे विश्‍वनाथ शिरढोणकर, गोव्याचे श्रीराम पचिंद्रे, दुबईचे प्रदीप मार्कंडेय आदींचा समावेश आहे. वाचक कमी होत आहेत, लेखनसंस्कृती नष्ट होतेय असे म्हणणार्‍यांना ही चपराक आहे.
पत्रकारांचा समाजातील सर्व क्षेत्रातल्या लोकांशी नियमित संबंध येतो. त्यांचे अनुभवविश्‍व दांडगे असते. त्यामुळे त्यांनी सातत्याने नवनव्या विषयावर लिहावे असा आमचा आग्रह असतो. आलेल्या प्रेसनोटवरून बातमी करण्याच्या काळातही अनेक पत्रकार उत्तमोत्तम लिखाण करतात. ‘पत्रकारांच्या लेखणीत शाई नाही तर घाई असते’ असे म्हणतात. त्यामुळे प्रतिभा असूनही अनेक पत्रकार इतर विषयांवरील लेखनाकडे दुर्लक्ष करतात. मात्र ‘चपराक’ने पत्रकारांना कायम लिहिते केले आहे. विविध वृत्तपत्रातील अनेक पत्रकारांचे या अंकातील साहित्य बघितल्यावर वाचकांना त्याची खात्री पटेल. कोणतीही संस्था, संघटना, राजकीय पक्ष, विचारधारा यांच्या दावणीला बांधले न जाता जे चांगले अकाहे ते ‘चपराक’ने स्वीकारले आहे आणि जे चुकीचे आहे ते अव्हेरले आहे. भविष्यातही आमची हीच भूमिका कायम असेल.
मराठी मासिकांचा आवाज वाढावा यासाठी प्रत्येकाने किमान दोन मासिके आपल्या घरी सुरू करायला हवीत. त्यातही कोणतीही विचारधारा न लादणार्‍या, सत्य धाडसाने मांडणार्‍या आणि साहित्य आणि संस्कृतीचे जतन करणार्‍या मासिकांना प्राधान्य द्यायला हवे. ‘चपराक’च्या माध्यमातून आम्ही नेकीने हे काम करतोय आणि वाचकांचाही त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. प्रस्थापितांचे शब्दधन आणि नवोदितांचे मोकळे मन यांचा सुंदर मिलाफ साधल्याने ‘चपराक’चा वाचकवर्ग सर्वदूर निर्माण झाला आहे. अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्यापासून ते राज्याच्या जबाबदार मंत्र्यापर्यंत सर्वांच्या हातात सध्या ‘चपराक’ दिसतोय. साहित्याच्या क्षेत्रात ‘चपराक’ची भूमिका महत्त्वाची ठरतेय. कारण चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भूमिकेतून आमची वाटचाल सुरू आहे. यात आमचे सर्व लेखक, वाचक, जाहिरातदार, विक्रेते आणि हितचिंतक यांचा सहभाग आहे. आपणा सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनामुळेच ‘चपराक’चा इवलासा वेलू गगनावरी जात आहे.
भविष्यात ‘चपराक’ चे आणखी नवे उच्चांक आणि नवनवे मापदंड तयार होतील. जे उत्तम लिहितात पण ज्यांना व्यासपीठ मिळत नाही त्यांनी ‘चपराक’शी संपर्क साधावा. तुमच्या साहित्यात गुणात्मक दर्जा असेल तर ते वाचकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आमची. रामदास स्वामींनी ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ असे सांगितले आहे; मात्र त्यांना ‘दिसामाजी काहीतरी ‘चांगले’ लिहावे’ असे अपेक्षित होते. सध्या ‘काहीतरीच’ लिहिणार्‍यांचे प्रमाण वाढल्याने आणि साहित्य क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा उंचावल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत. पैसे घेऊन वाटेल तसे रद्दड साहित्य प्रकाशित करणार्‍या प्रकाशकांनी, त्यामुळे प्रसिद्धीची हौस भागवणार्‍या लेखकांनी, लेखकांचा कस सुधारावा यासाठी कसलेच प्रयत्न न करणार्‍या साहित्य संस्थानींच मराठीचे वाटोळे केलेय. हे चित्र बदलायचे असेल तर अभ्यासू आणि लिहिण्याची क्षमता असणार्‍यांनी पुढे यायला हवे. आम्ही अशा लेखकांच्या शोधात आहोत.
लिहिणं हा आपला धर्म आहे. त्याअर्थी आपण समानधर्मी आहोत. फक्त आता या धर्मात काही सुधारणा करायला हव्यात. पुरस्कार मिळवण्यासाठी आणि ते पुन्हा परत करण्यासाठी या क्षेत्रात यायची गरज नाही. अनेक क्षेत्रांना कीड लागली असल्याने ती साहित्य क्षेत्राकडेही आलीय. हा संसर्ग थांबला पाहिजे. लेखकांनी सत्यासाठी, न्यायासाठी, सामाजिक प्रबोधनासाठी लिहायला हवे. साहित्याचा आजवरचा फार मोठा वारसा आहे. फार मोठी परंपरा आहे. अनेक चमत्कार घडविण्याची ताकत फक्त आणि फक्त शब्दांत आहे. कित्येकांचे आयुष्य बदलणार्‍या, त्यांना दिशा दाखवणार्‍या, त्यांच्यात चैतन्य निर्माण करणार्‍या, माणुसकीची शिकवण देणार्‍या चिरंतन साहित्याशिवाय दुसरे काहीच शाश्‍वत नाही. आपले ‘लिहिणे‘ समाजाच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलते हे कायम लक्षात ठेवायला हवे. मोठमोठ्या साहित्यिकांचे हे भान सुटल्यानेच ते कुणापुढे तरी मिंधे होतात आणि राजकारणाचा घटक बनून स्वतःचे अस्तित्व संपवतात.
त्यामुळे लिहिते व्हा! अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करा! जे उदात्त, व्यापक, मंगल आहे अशा सद्गुणांची पूजा बांधा. अन्याय-असत्यावर प्रहार करा. विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना चपराक देताना मुळीच कचरू नका. निर्भयता हा लेखकाचा सर्वात मोठा गुण असतो. निर्भयपणे निर्मळ विचार मांडा. हा साहित्यधर्म वाढला तरच संस्कृती आणि संस्कार जपता येतील. नवनवे महापुरूष त्यातूनच जन्माला येतील. त्यासाठी तुम्हाला खंडीभर शुभेच्छा!
तसेच, ही दिवाळी आपणास सुखसमृद्धीची, आनंद, ऐश्‍वर्यदायी, आरोग्यदायी जावो याही अंतःकरणापासून शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील 

संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Monday, October 5, 2015

परिषदेत बदल घडवा!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच साहित्य परिषदेच्या निवडणुकीचेही संकेत मिळाले आहेत. इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून त्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेत परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी त्यांची कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याकडून कशी कुचंबणा होत आहे हे परखडपणे सांगितले आहे. प्रा. द. मा. मिरासदार हे सुद्धा वैद्य बाईंच्या राजकारणाला कंटाळूनच परिषदेतून बाहेर पडल्याचे त्यांनी कबूल केले आहे. मिरासदारांनी राजीनामा दिल्यानंतर ‘चपराक’ने हे वास्तव वाचकांसमोर आणले होते. मात्र त्यावेळी द. मा. स्वतःच शांत राहिल्याने त्या विषयांवर फारशी चर्चा झाली नव्हती. शेजवलकरांनी ही कोंडी फोडल्यानंतर मिरासदारांनीही ते मान्य केले आहे.
माधवी वैद्य या कशा भ्रष्टाचाराच्या डबक्यात रूतत गेल्या आहेत, त्यांनी कसे सूडाचे राजकारण केले, त्यामुळे साहित्याची आणि साहित्य परिषदेची कशी हानी झाली हे ‘चपराक’ने सातत्याने वाचकांसमोर मांडले आहे. आता दस्तुरखुद्द अध्यक्षांनीच सर्वसाधारण सभेत तशी स्पष्ट भूमिका घेऊन ‘चपराक’च्या विश्‍वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी फक्त घुसमट व्यक्त केली नसून या परिस्थितीतून कशाप्रकारे मार्ग काढता येईल हेही ठामपणे मांडले आहे. ‘महाराष्ट्रातील सुविख्यात व्यवस्थापन तज्ज्ञ’ अशी ओळख असलेल्या शेजवलकरांच्या बोलण्यातील तथ्य लक्षात घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
मुळात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि साहित्याचा तसा फारसा संबंध राहिला नाही. नवोदितांच्या प्रतिभेला वाव मिळेल असे तिथे किंवा त्यामाध्यमातून काही घडत नाही. एकमेकांच्या कुचाळक्या करणे, मिरवण्याची हौस भागवून घेणे, मिळालेल्या निधीवर डल्ला मारणे, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची तुंबडी भरणे हे व अशा प्रकारचे उद्योग तिथे खुलेआमपणे चालू असतात. तीन पानांची संहिता लिहिण्यासाठी तीस हजार रूपये, अनावश्यक विमानप्रवास, परिसंवादात जावयाची वर्णी, बालगोपाळांसाठी काढलेल्या दिवाळी अंकात स्वतःच्याच नातवंडांचे फोटो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराला प्रचारासाठी मदत, स्तुतीपाठक आणि भाटांचे हीत जोपासताना अस्सल प्रतिभावंतांची केलेली उपेक्षा या व अशा अनेक कारनाम्यातून डॉ. माधवी वैद्य यांनी त्यांचे गुण-अवगुण दाखवून दिले आहेत.
घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही या बाईंनी संमेलनाध्यक्षांची अशीच उपेक्षा केली होती. व्यासपीठावर त्यांनी डॉ. सदानंद मोरे यांना चक्क मागे ढकलले आणि त्यांच्या पुढे येऊन  राजकारण्यांच्या बाजूला थांबल्या. तेव्हा संमेलनात ‘महामंडळाच्या अध्यक्षांची नथ दिसली पण त्यामागचे नाक दिसले नाही’ या शब्दात आम्ही संमेलनाध्यक्षांची केविलवाणी अवस्था सांगितली होती. मात्र आपले लोकही निलाजरे आहेत. पद आणि प्रतिष्ठेसाठी कितीही अवमान सहन करतील. निवडून येण्यासाठी राजकारण्यांची चमचेगिरी करणारे, लाळघोटेपणा करणारे आणि निवडून आल्यानंतरही स्वाभिमान गहाण ठेवणारे असे अध्यक्ष मिळाल्यानेच मराठी भाषेची वाताहत झाली आहे.
श्रीपाल सबनीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साहित्य परिषदेत एक पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी डॉ. सदानंद मोरेही तिथे आले होते. मागच्या वर्षी सबनीसांनी त्यांना पाठिंबा दिला असल्याने मोरेंनी यावेळी त्याची परतफेड केली हे उघड होते. ‘तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो’ अशातला हा मामला होता. मात्र या परिषदेत पत्रकारांनी सबनीसांना विचारले की, ‘‘राजकीय मदत घेणार का?’’ त्यावर त्यांनी ‘‘साहित्यात कोणीही वर्ज्य नसते, मात्र मी माझे अवमूल्यन करून घेणार नाही. राजकारणी व्यासपीठावर असले तर फरक पडणार नाही मात्र माझी खुर्ची कुणी ढकलत ढकलत मागे नेली तर ते मला चालणार नाही’’, अशा शब्दात सदानंद मोरे यांना टोलवले होते.
यावर्षीच्या साहित्य संमेलन निवडणुकीत पहिल्या फळीतील एकही साहित्यिक नाही. त्यामुळे संमेलनाध्यक्ष कोणीही झाले तरी मराठी भाषेला तसा काहीच फरक पडणार नाही. अर्थात, मोठा आणि कार्यक्षम लेखक संमेलनाध्यक्ष झाल्याने मराठीत आजवर काही मोठे परिवर्तन घडलेय असेही नाही. मात्र आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर असे प्रतिभावंत ज्या खुर्चीवर बसले होते तो वारसा फारच भुक्कड लोकांकडे येऊन ठेपला आहे. नाहीतर फ. मुं. शिंदे सारखे किरकोळ प्रतिभेचे अनेक हौसी नकलाकार संमेलनाध्यक्ष झालेच नसते. या पदाची प्रतिष्ठा कधीच लयास गेली आहे. आता केवळ एक सोपस्कार उरलाय. ‘नेमेचि येतो पावसाळा’ याप्रमाणे संमेलने पार पडत आहेत. त्यापासून मराठी भाषेला, मराठी माणसाला नक्की काय मिळते याचा विचार करण्याची वेळ आली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा लेखक ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग’ असे विधान करतो. त्याला साहित्यातील अशा प्रवृत्ती कारणीभूत आहेत.
असो! असे म्हणतात की, माणसाने हजार चुका कराव्यात; मात्र एकच चूक हजारवेळा करू नये! माधवी वैद्य यांच्या राजकारणाचे बळी ठरलेल्या प्रा. मिलिंद जोशी यांच्याविषयी डॉ. शेजवलकरांनी गौरवोद्गार काढले आहेत. जोशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत, अशी अपेक्षाही शेजवलकरांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. मिलिंद जोशी परिषदेतून बाहेर पडल्यानंतर परिषदेचे वाटोळे झाले हेही त्यांनी सूचित केले आहे. प्रशासनावर पकड असलेला, स्वतः साहित्यिक आणि फर्डा वक्ता असलेला जोशी यांच्यासारखा नेता परिषदेला मिळाला तरच काहीतरी आशादायक चित्र दिसू शकेल. येणार्‍या निवडणुकीत मिलिंद जोशी यांनी पुन्हा सक्रिय व्हावे आणि परिषदेला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी भूमिका डॉ. शेजवलकर यांच्यासारख्या अभ्यासू, व्यवस्थापन क्षेत्रात मानदंड ठरणार्‍या आणि स्वच्छ प्रतिमेच्या सद्गृहस्थाने घेतली आहे. त्याचे समर्थन करायलाच हवे.
माधवी वैद्य, सुनील महाजन यांनी परिषदेची, महामंडळाची आणि एकूणच साहित्य क्षेत्राची केली तेवढी शोभा पुरे झाली. आता यात परिवर्तन घडावे आणि साहित्य क्षेत्रात मराठीचा विजयध्वज सर्वत्र डौलात फडकावा, एवढीच यानिमित्ताने माफक अपेक्षा! 

- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२