Monday, September 28, 2015

नाना, महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे…

त्यानं काही दिवसांपूर्वी सिंहगडाजवळ शेत घेतलं अन् मग एकदा त्याला एकानं विचारलं की, ‘‘तू शेतावर काय लावतोयस रे?’’ हा म्हणाला, ‘‘लाकडं. माझी मी उगवतोय. हो! नाहीतर हे सगळे दोस्त लोक ओल्या लाकडावर जाळायचे. धूर डोळ्यात गेल्यावर यांच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि जळताना भला वाटायचं की माझ्यासाठी रडतायत. असले नालायक आहेत. त्यामुळं मी माझ्यासाठी सुकी लाकडं आणणार. धूर कमी. त्यामुळं मला जळताना कळेल की खरा कोण आणि खोटा कोण? काय सांगावं, तिथेसुद्धा कदाचित मी उठेन मुस्काटीत मारायला.’’ त्याचं हे उत्तर फटकळ आहे; मात्र खूप काही सांगणारं. माणूस येताना काही घेऊन येत नाही, जाताना काही घेऊन जात नाही. त्याला या गोष्टीचं पक्कं भान आहे. त्याला पक्कं माहिती आहे, माणसाच्या गरजा किती असतात, किती असाव्यात! त्याच्याकडे तरी काय होतं एकेकाळी? नववीत होता तो त्यावेळी. वय तेरा वर्षे. त्या वयात पोटासाठी नोकरी केली त्यानं. मुंबईत दादरच्या समर्थ विद्यालयात शिकायचा. दुपारी घरी यायचा माहिमला. असेल ते खायचा व नोकरीसाठी आठ किलोमीटर चालत जायचा. पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचा. हातात कला होती. पेंटींग छान करायचा. नोकरी पेंटींगचीच. सिनेमाची पोस्टर्स करायचा. वय होतं का त्याचं ते नोकरी करण्याचं? मात्र पर्यायच नव्हता. वडिलांना कोणीतरी फसवलं म्हणून त्यात त्यांचं सगळंच गेलं. त्याआधी दोन वेळची भ्रांत नव्हती; मात्र आता एका वेळेचीही भ्रांत निर्माण झाली. कोवळं वय. आईवडिलांकडे हट्ट करण्याचं. खेळण्याबागडण्याचं; मात्र संकट आलं तेव्हा तो कोवळ्या वयातही डगमगला नाही. लढला सरळ! परिस्थितीशी दोन हात केले. मुख्य म्हणजे मन कटू करून घेतलं नाही स्वत:चं. त्याच्याच शब्दात सांगायचं तर जी लढण्याची ताकत मिळाली ती त्याच दिवसातून मिळाली. पुढं काय घडलं मग? हिंदी चित्रपटसृष्टीतला ‘बाप माणूस’ झाला तो पुढं वीस एक वर्षानंतर! भलेभले त्याच्या अभिनयाला सलाम करू लागले. आत्मविश्‍वास थक्क करणारा होता त्याचा! एका टप्प्यावर तर अमिताभ बच्चनपेक्षा जास्त मानधन घेत होता म्हणे तो! चिकार लोकप्रिय झाला; मात्र एक गोष्ट कधीही विसरला नाही तो. महिना पस्तीस रूपये पगार व एक वेळचं जेवण यावर केलेली नोकरी. प्रसंगी मुंबईच्या फुटपाथवर झोपून काढलेले दिवस! त्याच्या वाईट दिवसात अनेकांनी त्याला आधार दिला. विजया मेहता, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, मंगेश कुळकर्णी, मोहन तोंडवळकर, दिलीप कोल्हटकर ते अगदी अशोक सराफपर्यंत. या कुणालाही तो विसरला नाही. ‘पाहिजे जातीचे’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘महासागर’ ही त्याची सुरूवातीची नाटकं. मग आलं त्याचं ‘पुरूष’ हे नाटक. ‘पुरूष’ तर त्याच्यावरच बेतलेलं. खलनायकी भूमिका होती ती; मात्र आख्खं नाटक त्यानंच उचलून धरलेलं. कितीतरी चर्चेत राहिलेलं ते नाटक; मात्र त्यावेळी त्यातून तरी त्याला काय मिळत होतं? पन्नास रूपये मिळायचे एका प्रयोगाचे. त्याची बायको निलकांती. ती तेव्हा बँकेत अधिकारी होती. तिला याच्यापेक्षा जास्त पैसे मिळायचे; मात्र तिनं याची उमेद खचू दिली नाही. मुळात नाटकात तो टिकून राहिला तो तिच्याच प्रोत्साहनामुळं. हा या सगळ्यांचे ऋण मानतो. ऋणानुबंध तो विसरत नाही. आईवडिलांचे ऋणही तो विसरला नाही. वडील माळकरी. अत्यंत सज्जन! वडिलांनी एकच सांगितलं होतं, ‘नाना, कधीही कोणाकडून पैसे घेऊ नकोस आणि कुणाला दिलेस तर लक्षात ठेऊ नकोस.’ वडिलांचे हे शब्द. ते त्यानं आयुष्यात प्रमाण मानले. आपण समाजाला जे काही देऊ ते योग्य ठिकाणी गेलं पाहिजे. फूल असो वा फुलाची पाकळी, सत्पात्री गेली पाहिजे. त्याचे ढोल वाजवायचे नाहीत. आव आणायचा नाही. कसलाही दांभिकपणा टाळायचा. या गोष्टी त्यानं लक्षात ठेवल्या. त्यानं देवाकडे दोन वेळची भाकरी मागितली होती. त्याच्या करोडो पटीनं देवानं त्याला सर्व काही दिलं ही त्याची भावना. ‘‘माझी ओंजळ तेवढीच आहे. ती मोठी नाहीच झाली. ती भरलेलीच आहे’’ तो म्हणतो. पैशांचा त्याला तिटकारा नाही; मात्र पैसा हे त्याच्यासाठी सर्वस्व कधीच नव्हतं. म्हणूनच पैशानं विकत मिळणारी सुखं. ती विकत घेण्याच्या भानगडीतच तो कधी पडला नाही. ‘‘मला गाडी-घोड्यांची किंवा मोठ्या घराची हौस नव्हती. तू माझा मित्र आहेस. मी तुझी किंमत लावायची म्हटलं तर लावता येईल का?’’ तो मित्रांना सरळ विचारतो. त्याच्या या विचारण्यात मोल माणसांचं आहे. पैशाचं नाही.
तो रमला माणसांमध्ये. त्याला माणसं प्रिय! तो बाबा आमट्यांकडे खेचला गेला तसा बाळासाहेब ठाकर्‍यांकडेही. त्यात त्याला काही विरोधाभास वाटत नाही. त्याच्या मते ही दोन्ही माणसं खूप मोठी होती. खूप निखळ होती. तो कुठल्याच जातिधर्मात अडकून पडलेला नाही. ‘मुरूड-जंजिरा’ हे त्याचं गाव. सहावीपर्यंत तो तिथं शिकला. रात्री बेरात्री उठून तो समुद्रावर जाऊन बसत असे. त्या समुद्रानं त्याला भेद शिकवला नाही. ‘‘मुरूडला समोर नेहमीच समुद्र असायचा. त्यामुळं जे काही पहायचं ते भव्यच पहायचं अशी सवयच लागली’’ तो सांगतो. त्याच्या मते समुद्र हा उदात्त असतो. खळखळता असतो. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या मनाचा कोतेपणा गळून पडतो. 1968 साली तो ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये होता मुंबईच्या. त्याचं चित्रकार असणं हा केवळ योगायोग नाही. त्याच्या कॅनव्हासवर त्यानं एका चांगल्या राज्याचं चित्र रेखाटलं आहे. एक नागरिक म्हणून त्याला एक बर्‍यापैकी ‘सिस्टिम’ हवी आहे. माणसांचं जगणं निदान सुसह्य करेल अशी सिस्टिम. दुसरीकडे आपणही या राज्याचे, या देशाचे नागरिक आहोत व आपलीही काही जबाबदारी आहे हे तो मानतो. जात, धर्म नंतर. ‘‘मला ‘कुराण’मधली खूप आयतं बोलता येतात. माझ्या गळ्यात ताईत आहे व कृष्णसुद्धा’’ तो सांगतो.
नाना पाटेकर! काही माणसं घरातलीच वाटतात. तसा हा माणूस. आता पुन्हा चर्चेत आलाय तो. शेतकर्‍यांच्या आत्महत्या! हा विषय त्यानं उचलून धरल्यामुळं. विदर्भ, मराठवाड्यात परिस्थिती भिषण! तिथं हा फिरतोय. त्याला शक्य ते सर्वकाही करतोय. मकरंद अनासपुरेही मराठवाड्यातला. त्यालाही माहीत आहे, दुष्काळ ही काय चीज असते ते! मात्र नानाची आर्थिक मदत किती जणांना पुरणार? किती काळ पुरणार? तरीही त्याचं महत्त्व मोठं आहे. माणसांची उमेद मारून टाकतो दुष्काळ. नानाच्या प्रयत्नांमुळे ही उमेद टिकून राहिल माणसांची. होणार्‍या आत्महत्या टळू शकतात त्याच्या या कामामुळं. ‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या’ हा व्यवस्थेपुढचाच प्रश्‍न नाही फक्त. तो तुम्हा आम्हा नागरिकांपुढचा देखील प्रश्‍न आहे.
नानाचं वेगळेपण एवढंच, त्यानं हा प्रश्‍न आपला मानला. प्रश्‍न आपलेच आहेत सगळे अवतीभवती निर्माण झालेले. आपणच ते प्रत्येकवेळी राजकारण्यांवर ढकलतो का? ती एक सोय आहे का? पळवाट आहे का? आपली जबाबदारी टाळण्याची? ‘राजकारणातली विश्‍वासार्हता संपली’ हे म्हणायला ठीक आहे; मात्र आपल्या विश्‍वासार्हतेचं काय? हा लेख लिहिताना रात्रीचे आठ वाजतायत. नारायण पेठेतल्या ऑफिसमध्ये बसून हे लिहितो आहे. दुसर्‍या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसच्या भिंती व खिडक्यांच्या काचा. थरथरतायत त्या. का? खाली गणपती विसर्जनाची मिरवणूक चालू आहे. सहज खिडकी उघडली. खाली नजर टाकली तर विशी-तिशी-चाळीशीतली जमात नाचण्यात धुंद आहे! त्यात मुलीही आहेत. एक मुलगी. अंगात आल्यासारखं नाचतेय ती! काय सिद्ध करायचं असतं या सगळ्यातून समजत नाही. हायकोर्टाचे सगळे निर्णय धाब्यावर बसवून चाललेला हा उन्माद! भयानक आहे तो! आपल्याच राज्यातल्या एका भागाला ‘मराठवाडा’ म्हणतात. एका भागाला ‘विदर्भ’ म्हणतात. तिथं मागच्या काही वर्षात तीस एक हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजूनही आत्महत्या चालू आहेत हे या नर्तक व नृत्यांगनांच्या गावी आहे की नाही माहीत नाही.
तर वातावरण हे असं आहे. कुणाला कुणाचं पडलेलं नाही फारसं. मग नानाचं वेगळेपण का जाणवणार नाही? शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर त्यानं काम सुरू केलं. त्याची स्वत:ची विश्‍वासार्हताच मुळात मोठी! आज माणसं मुख्यमंत्री निधीला पैसे देत नाहीत तर नाना व मकरंदकडे मदतीचे पैसे देताहेत. नानाला यातून प्रसिद्धी नकोय. त्याच्या सहकार्‍यांनाही ती नकोय. हा अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रापुढचा प्रश्‍न आहे. प्रत्येकानं तो आपला प्रश्‍न मानला पाहिजे. निदान तशी जाणीव तरी आपण ठेऊ शकतो. या क्षणी इतकंच म्हणता येईल, ‘नाना, तू माणूस विश्‍वासार्ह आहेस व महाराष्ट्र नेहमीच तुझ्या सोबत आहे.’
- महेश मांगले

९८२२०७०७८५
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
२८ सप्टेंबर २०१५

Saturday, September 26, 2015

‘सत्तांतर’ उलगडणारा ग्रंथ

'चपराक'ने प्रकाशित केलेल्या 'कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट' या सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर लिखित पुस्तकाचे परीक्षण आजच्या दैनिक 'संचार'ने 'इंद्रधनू' पुरवणीतून करून दिले आहे. संचार आणि श्री. प्रशांत जोशी यांना मन:पूर्वक धन्यवाद! हे पुस्तक आपण आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळावरून विकत घेवू शकाल.

‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेले पुस्तक अतिशय मोलाचे वाटते. यातील विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत आलेच पाहिजेत.
राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन विद्वान प्राध्यापकांनी महाराष्ट्रातील सत्तांतरावर पुस्तक लिहून शब्दाशब्दाला चुकीचे संदर्भ देऊन वाचकांची दिशाभूल केली. ‘ग्रंथाली’सारख्या मान्यवर संस्थेने व्यावसायिक दृष्टिकोनातून या पुस्तकाचा धंदाही उत्तम केला. सुप्रसिद्ध पत्रकार आणि विचारवंत भाऊ तोरसेकर यांनी मुद्देसूद, पुराव्यासह या पुस्तकाची आणि वैचारिक भ्रष्टतेची केलेली परखड चिकित्सा म्हणजे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ आहे.
हेनरिख हायने नावाचा जर्मन कवी, विचारवंत म्हणतो, ‘‘आपल्यालाच सत्य गवसते आहे असा ज्यांना भ्रम होतो, असे लोक तेच सत्य सिद्ध करण्यासाठी बेधडक खोटेपणाचा मार्ग चोखाळू शकतात.’’
‘सत्तांतर’ हा ग्रंथ केवळ वाचकांची दिशाभूल करणारा नाही तर, तो एक फ्रॉड आहे, कारण केवळ पैसा मिळवणे एवढेच त्या लेखकांचे उद्दिष्ट नव्हते तर अभ्यासू विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्फत नव्या पिढीला संपूर्णत: चुकीची माहिती शिकवूण समाजाला भरकटायला लावणारे आहे. हे भरकटणे म्हणजे फार मोठा पुरोगामीपणा, आधुनिकता, वैचारिक दृष्टेपणा आहे अशी समजूत दृढ करायला लावण्याचा अत्यंत दूषित वैचारिक भ्रष्टतेचा कळस करणारा प्रकार आहे.
‘तपशील चुकीचा असेल तरी आमचा थिसिस खरा आहे’, असा युक्तीवाद करून या लेखकद्वयांनी विद्यापीठीय शिक्षणात असेच शिक्षण दिले जाते की काय अशी शंका निर्माण करण्याइतपत वैचारिक दारिद्र्य प्रगट केले आहे. ‘ग्रंथाली’ या प्रतिष्ठित संस्थेने असा विकृतीपूर्ण ग्रंथ भाबड्या, बेसावध, निरागस ग्रंथप्रेमी वाचकांच्या गळ्यात मारून धंदा केलाच, परंतु वर आपण फार मोठे सत्कर्म करीत आहोत अशी शेखी मिरविण्याचे औचित्य दाखविले आहे. ग्रंथालीने केलेला हा फ्रॉड आहे. त्यांनी कोंबडं कितीही झाकले तरी या म्हातारीची गोष्ट लोकांना सांगितलीच पाहिजे, या कळकळीने हे पुस्तक नव्हे ही चिरफाड ‘चपराक’ने मांडली आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन!
हे लेखक आणि प्रतिष्ठित प्रकाशक विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या मेंदूशी खेळ करीत असल्याने शिक्षणमंत्री, कुलगुरू यांनीसुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीच पाहिजे.
इतिहासाची मांडणी अलिप्तपणे न करता आपल्याला जो दृष्टिकोन, जीवनध्येय किंवा जीवन तत्त्वज्ञान लोकाच्या गळी उतरवायचे आहे, त्या दृष्टिकोनातून खर्‍याचे खोटे करून किंवा काल्पनिक घटना घडवून त्याचा इतिहास लिहिला जात आहे. अलीकडे हा एक धंदा पुरोगामी चळवळीच्या नावावर सुरू आहे. प्रतिष्ठा व त्यातून मिळणारी समाजमान्यता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरिबांचा, लोककल्याणाचा कळवळा घेणारी दांभिक सत्ताकेंद्रही त्याला पाठिंबा देण्यात मग्न झालेली आहेत. त्यामुळे असे प्रयत्न करणारे इतिहासकार, लेखक समाजात उजळ माथ्याने प्रतिष्ठित म्हणून मिरवले जात आहेत. ही तर भयानक गुन्हेगारी स्वरूपाची गोष्ट आहे आणि याचा केवळ निषेध नव्हे तर न्यायालयीन चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
विकृत स्वरूपाचे इतिहास लेखन आणि त्याचे दूरगामी परिणाम हे कमी अधिक प्रमाणात समाजालाच भोगावे लागतात. सामान्य चूक भीषण अपघात घडवू शकते म्हणून त्या चुकीचे परिणाम किती गंभीर होतील याचा विचार करणे महत्त्वाचे असते. शरद पवार कॉंग्रेस पक्षात नामोहरम झाले म्हणून महाराष्ट्रातील निरंकुश सत्ता गमवावी लागली तसेच महाराष्ट्रातील राजकारण हे जाती-जमाती यांच्या हितसंबंधातून पुढे सरकत असते हे त्यांचे सिद्धांत आहेत.
‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकाचे दोन लेखक, प्रकाशक यांनी खरं तर या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल केलेला गुन्हा मान्य करून ताबडतोड जनतेची विशेषत: वाचकांची व विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. हे पुस्तक मागे घेतले पाहिजे. या पुस्तकाच्या प्रती नष्ट करायला पाहिजेत. तसेच विद्यापीठाच्या पातळीवर एखादी तज्ज्ञांची समिती नेमून याची गंभीर चौकशी केली पाहिजे. तरच अशा प्रकारच्या कृत्यांना, फसवणूक करणार्‍यांना जरब बसेल.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून 1985 पर्यंत व पुढे 1995 पर्यंत महाराष्ट्रातील जनता सातत्याने कॉंग्रेस विरोधात राहूनही आणि तसे सावध संकेत सातत्याने मिळूनही कॉंग्रेस सत्तेत राहिली आणि विरोधी पक्ष सत्तेपर्यंत पोहचू शकले नाहीत याचे उत्तम पुरावे दिलेले आणि अखिल भारतीय राजकारणाचा संदर्भ देऊन केलेेले मुद्देसुद विवेचन श्री. तोरसेकरांनी पुस्तकात मांडून ऐतिहासिक सत्य अलिप्त पत्रकाराच्या भूमिकेतून या पुस्तकात मांडले आहे. ते मुळातूनच वाचायला हवे.
कॉंग्रेस पक्षाची चौकट यशवंतरावांनी कशी बांधली व नेतृत्व मराठा समाजाच्या हाती कसे राखले याची माहिती देऊन श्री. तोरसेकर लिहितात, ‘तीन दशकात कॉंग्रेस कधीही सदृढ वा सशक्त राजकीय संघटन म्हणून निवडणूक जिंकू शकला नाही. दुबळा विरोधी पक्ष आणि पांगळे विरोधी राजकारण हेच कॉंग्रेसचे बळ राहिले.’
‘धोरण, कार्यक्रम, योजना, विचार अथवा जातीय हितसंबंधांच्या कारणास्तव कॉंग्रेसकडे कुठलाही कार्यकर्ता आकर्षित होऊ शकला नव्हता. तर सत्तेकडे जाण्याचा सोपा मार्ग, स्वार्थ साधायची संधी म्हणून कार्यकर्ते व नेते कॉंग्रेसकडे येत राहिले. पक्ष व संघटना न राहता सत्तालंपट स्वार्थसाधू  हावरटांची टोळी बनत गेली.
त्यात समस्त मराठा-कुणबी जातीलाही स्थान नव्हते. तर घराणेशाही स्थापन झालेली होती. बारामतीचे पवार, सांगलीचे वसंतदादा, पुसदचे नाईक, नाशिकचे िंहरे, नांदेडचे चव्हाण, माळशिरसचे माहिते-पाटील, लातूरचे देशमुख... यांच्या पलीकडे कुण्या मराठ्याला या रचनेत, सत्तावर्तुळात स्थान नव्हते.’ हळूहळू साखर कारखानदारीच्या माध्यमातून अशी नवी घराणी तयार झालेली होती. पण पळशीकर-व्होरांच्या अभ्यासात या कशाचीही दखल घेतलेली नाही.
वस्तुस्थितीचे अत्यंत सुस्पष्ट विश्‍लेषण श्री. तोरसेकरांनी मांडलेले आहे. ते लिहितात, ‘समाजवादी, कम्युनिष्ट, शेकाप आदी डावे पक्ष पुस्तकी, निष्क्रिय तोंडाळ असे कागदावरले पक्ष उरले आहेत. लोकामध्ये पुरोगामी-प्रतिगामी या गुळगुळीत शब्दांना महत्त्व उरलेले नाही. फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ही वस्तुस्थिती नव्हे तर बहुजनांना भुलविण्यासाठी वापरले जाणारे खोटी नावे बनली आहते. (पृष्ठ क्र. 33)
तोरसेकरांनी प्रकरणश: या लेखकद्वयांनी मांडलेले लेखन उद्ध्वस्त करून त्याचा खोटेपणा, चुकीची विधाने यांचा सोदाहरण परामर्श घेतला आहे.
शिवसेना कधी स्थापन झाली, कसकशी आपले वर्चस्व वाढवत गेली याचा थांगपत्ता नसावा किंवा शिवसेनाच ठाऊक नसावी असे म्हणणे भाग आहे. स्थापनेपासूनच शिवसेनेने मुंबईवर आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केलेले आहे (पृष्ठ क्र. 55) हे तोरसेकरांनी ठणकावून सांगितले आहे.
समजूत आणि समज यावर आधारित मते नेहमीच फसवी कशी असतात याचे सोदाहरण विश्‍लेषण, ‘आत्याबाईला मिशा असत्या तर’ या प्रकरणात वाचायला मिळते. लेखकांची पाहणी, तर्कट, अनेक निष्कर्ष हे कसे फसवे आहेत हे वाचणे हा ज्ञानाबरोबरच करमणुकीचा विषय या लेखकांच्या लिखाणामुळे कसा बनला हे मुळातून वाचकांनी वाचलेच पाहिजे.
भाऊ तोरसेकरांनी ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ याची चिरफाड करून आपले काम थांबवले नाही तर नंतरच्या पानांमध्ये त्यांनी अतिशय सविस्तर महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्तांतराचं विश्‍लेषण करून केवळ शवविच्छेदन करून न थांबता वाचकांना मोलाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे झाकणार्‍या म्हातारीला उघडं केल्यानंतर कोंबडं नक्की काय आहे हे वाचकांना समजते.
शेवटच्या 8-10 पानात तोरसेकरांनी त्यांचा या संबंधितांशी झालेला पत्रव्यवहार दिलेला आहे आणि ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकातील चुकांची पान क्रमांकासहित यादी दिलेली आहे.
11 ऑगस्ट 1997 साली दिनकर गांगल यांनी तोरसेकरांना लिहलेल्या मोहक पत्रात ‘तुमच्या अनुभवाचे पुस्तक होते का ते पाहू या का?’ असे लिहिले आहे.
तसे ते पुस्तक झालेले दिसत नाही. असो तोरसेकरांच्या या पुस्तकाने एक महत्त्वाची ऐतिहासिक कामगिरी केली आहे म्हणून त्याचे मूल्य फार आहे. विशेषत: राजकारणात ज्यांना रस आहे, जे विद्यार्थी आहेत, पत्रकार आहेत त्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे असे संदर्भ मुल्यही या पुस्तकास आहे.
कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
प्रकाशक - चपराक प्रकाशन, पुणे (7057292092)
पृष्ठ - 148, मूल्य - 150
-सुधाकर द. जोशी.
9860777440



Monday, September 21, 2015

संगमनेरच्या पत्रकारांचा आदर्श

पत्रकार संघाच्या उपहारगृहात काही पत्रकार गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात एका सद्गृहस्थाने त्यातील एका पत्रकाराला विचारले, ‘‘हजार रूपयांचे सुट्टे आहेत का हो?’’ पत्रकाराने ताबडतोब सांगितले, ‘‘माझ्याकडे पैसे तर नाहीत पण मला हा प्रश्‍न विचारून माझा गौरव केल्याबद्दल धन्यवाद!’’
यातील विनोदाचा भाग सोडला तरी पत्रकारांची अवस्था थोड्याफार फरकाने अशीच आहे. विशेषत: तालुका व गाव पातळीवर काम करणारे पत्रकार याला अपवाद नाहीत. अर्थार्जनाला कधीही महत्त्व न देता सतत कार्यरत राहणारे पत्रकार निष्ठेने सामाजिक बांधिलकी मात्र पार पाडतात. तुटपुंजे मानधन मिळत असूनही दुष्काळाविषयी संवेदनशीलता दाखवत संगमनेर येथील पत्रकारांनी मदतीसाठी खारीचा वाटा उचलला आहे. पत्रकार राजाभाऊ वराट, नंदकुमार सुर्वे, श्याम तिवारी, वसंत बंदावणे, रियाज सय्यद, प्रकाश टाकळकर, प्रकाश आरोटे, शेखर पानसरे, विजय भिडे, निलिमा घाडगे, नितीन ओझा आदींनी पुढाकार घेऊन नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ला हातभार लावण्याचा विचार केला. त्यासाठी पत्रकारितेचा गैरवापर करत इतरांकडून पैसे उकळून ते मदत म्हणून देण्याऐवजी संगमनेरातील पत्रकारांनी प्रत्येकी हजार रूपये काढले. किमान अकरा हजार रूपये देण्याचा त्यांचा मानस होता.
महाराष्ट्रात अनेक पत्रकार दुष्काळाविषयी तळमळीने लिहित असतात. प्रशासकीय यंत्रणेकडे आणि राज्यकर्त्यांपुढे समस्या मांडत असतात; मात्र संगमनेर पत्रकार मंचचे सदस्य पुढे आले आणि महाराष्ट्रातील पत्रकारांपुढे त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला. पत्रकारितेसाठी ही गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने विचारमंथन करण्यासाठी ‘दुष्काळाच्या झळा आणि पत्रकारिता’ या विषयावर संगमनेर पत्रकार मंचाने आमचे व्याख्यान ठेवले. ‘चपराक’च्या  सदस्यांसह आम्ही कार्यक्रमास गेलो. पत्रकारांच्या या स्तुत्य आणि विधायक उपक्रमाचे कौतुक केले. प्रतिकात्मक स्वरूपात खारीचा वाटा म्हणून ‘चपराक’तर्फे पाच हजार रूपये त्यांच्याकडे सुपूर्त केले आणि मदतीचा हा आकडा 36 हजारावर गेला. संगमनेरातील पत्रकारांच्या वतीने 21 हजार, पेटीटचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब मुरादे यांच्याकडून पाच हजार, आधार फाउंडेशनकडून पाच हजार आणि ‘चपराक’चे पाच हजार असे एकूण छत्तीस हजार रूपये ‘नाम फाउंडेशन’साठी जमल्यानंतर अनेकांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत दुष्काळग्रस्तांसाठी हातभार लावण्याचा संकल्प केला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून संवेदनशीलता जपत उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
आपला एखादा भाऊ अडचणीत असेल तर त्याला मदत करणे आपले कर्तव्यच ठरते. मराठवाडा, विदर्भ दुष्काळामुळे होरपळतोय. जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, कर्जामुळे त्रस्त झालेला शेतकरी नैराश्यातून, वैफल्यातून आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग अवलंबतोय त्याला शक्य तितकी मदत करणे, त्याचे मनोबल उंचावणे हे आपले कर्तव्यच आहे. राजकीय यंत्रणा ढिम्म असली तरी सध्या थोडेफार आशादायी चित्रदेखील आहे. जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे शेतकर्‍यांचा आशावाद वाढलाय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सव्वाशे कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करतात आणि दुसरीकडे मराठवाड्यातील बांधवांकडे मात्र साफ दुर्लक्ष करतात, ही शोकांतिका आहे. अशावेळी फक्त वाचाळवीरतेचे दर्शन घडविण्याऐवजी, बोरूबहाद्दर कारकुनी करण्याऐवजी स्वत: पुढाकार घेणे गरजेचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, ‘लाख बोलक्याहूनि थोर, एकचि माझा कर्तबगार’. त्यामुळे प्रत्येकाने दुष्काळग्रस्तांसाठी शक्य तितकी मदत करायला हवी. तुम्ही तुमच्यावर ताण येईल असे काही करू नकात; मात्र शक्य तेवढी मदत नक्की करा. अनावश्यक खर्च टाळा. हजार, पाचशे, दोनशे, शंभर ज्याला जेवढे शक्य होईल त्याने तेवढी मदत अवश्य करावी. मदत कितीची असते यापेक्षा त्यामागच्या भावना या सर्वश्रेष्ठ आणि मानसिक समाधान देणार्‍या असतात.
मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. अजिंक्य रहाणे सारख्या खेळाडूने पाच लाख रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे दिले आहेत. अक्षयकुमारसारख्या खिलाडूवृत्तीच्या कलाकाराने तब्बल नव्वद लाख रूपये दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केले आहेत. हिंदी माध्यमातील रजत शर्मा यांच्यासारखे पत्रकार ‘शेखावत फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी काहीतरी भरीव कार्य उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत.
यासगळ्यात अनेक सेलिब्रिटीज मागे पडतात. आजपर्यंत समाजाने ज्यांना भरभरून दिले आहे असे कलाकार पुढे यायला हवेत. ‘खाना’वळीने (आमीर, शाहरूख, सलमान, सैफ अली आदी) पुढाकार घेतला तर आणखी मोठी रक्कम उभी राहू शकेल. अजित पवार यांच्यासारख्या नेत्यावर सत्तर हजार करोड रूपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. छगन भुजबळ यांनी सत्तावीसशे करोड रूपये हडप केल्याची चर्चा आहे. ‘जेल भरो आंदोलन’ पुकारून लोकांची टाळकी भडकविणार्‍या थोरल्या साहेबांच्या संपत्तीचा अंदाज आम्हाला नाही. तो आकडा कदाचित आम्हाला लिहिता तर येणार नाहीच पण कॅलक्युलेटरवर मावेल याचीही शक्यता नाही. अशा बड्या आसामींनी गेंड्याची कातडी बाजूला सारून शेतकर्‍यांसाठी काहीतरी करायला हवे. निरर्थक आंदोलने आणि त्याची अमाप जाहिरातबाजी यात ही मंडळी जेवढा पैसा खर्च करतात तेवढ्यात किमान चार गावे दत्तक घेणे सहज शक्य आहे.
शेतकर्‍यांना रोख स्वरूपात केलेली मदत ही तात्पुरती मलमपट्टी ठरेल असे अनेकजण सांगत आहेत. त्यात तथ्य असेलही! पण जखम भळभळत असताना ही मलमपट्टीही जीव वाचवण्यास पुरेशी ठरेल. शेतकर्‍यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यायला हवीत. वीज आणि पाणी याची त्यांना सोय करून द्यायला हवी. रोजगार हमीची कामे गरजूंना शेतीतच उपलब्ध करून द्यायला हवीत. ज्यांच्याकडे अवजारे आणि इतर साधने नाहीत त्यांना ती सहजी उपलब्ध करून द्यायला हवीत. बळीराजा वाचला तरच आपले अस्तित्व शिल्लक राहणार आहे.
ग्रामीण भागात रोजगार नसल्याने अनेक तरूण दिशाहीन होत आहेत. त्यांच्यापुढे कोणतेही ध्येय नसल्याने ते कट्टरतावादाकडे वळत  आहेत. राजकारणी लोक चुकीच्या कामासाठी त्यांचा उपयोग करून घेत आहेत. यातूनच भविष्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आणखी हवे’चा हव्यास सोडून अशा गरजूंना प्रामाणिकपणे मदत करायला हवी. उद्याच्या उज्ज्वल राष्ट्रासाठी हे गरजेचे आहे. संगमनेरातील पत्रकारांनी हा सुज्ञपणा दाखवला आहे. आपणही त्यासाठी पुढाकार घ्या, जमेल तेवढा हातभार लावा. आपला खारीचा वाटा सामाजिक आरोग्य टिकविण्यासाठी मोलाचा ठरणार आहे.

- घनश्याम पाटील
चपराक, पुणे 
७०५७२९२०९२ 


Monday, September 14, 2015

घागर में सागर... एमरल्ड ग्रीन व इतर कथा

'चपराक प्रकाशन' पुणे/ ७०५७२९२०९२
‘चपराक प्रकाशन’ने समीर नेर्लेकर लिखित ‘एमरल्ड ग्रीन व इतर कथा’ हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे.
कथालेखक हे कवी, चित्रकार, कथाकार, पत्रकार, तंत्रज्ञ अशा भूमिका निभावतात. त्यांच्या ह्या भूमिकांचा प्रभाव त्यांच्या विविध कथांमधून जाणवतो. अतिशय साधी-सोपी भाषा! पण उत्कंठा वाढविण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषेत आहे. इंग्रजीमध्ये ‘शॉर्ट बट स्वीट’ म्हटलं जातं. त्याचप्रमाणे ‘छोट्या पण नेटक्या’ अशा शब्दात नेर्लेकरांच्या कथांबद्दल म्हणता येईल.

विविध विषयांवरच्या... विविध आशय असलेल्या... मनाचा वेध घेणार्‍या, मानवी स्वभावाचे विविध कंगोरे दाखवणार्‍या तर काही कथा समाजातल्या अपप्रवृत्तींचा पर्दाफाश करणार्‍या आहेत. सामान्य मध्यमवर्गीय माणसाला कॉकटेल पार्टीचं आमंत्रण मिळालं तर त्याची वास्तवात आणि पार्टीत काय अवस्था होईल, याच मनोरंजनात्मक वर्णन आपल्याला ‘कॉकटेल पार्टी’त वाचायला मिळतं. कॉकटेल पार्टी त्यांनी डोळ्यासमोर उभी केली आहे. तसेच साहित्य प्रबोधन रंजन करत साहित्यिक नावारूपाला आल्यानंतर त्याचा मान-सन्मान केला जातो पण नवोदित साहित्यिकाच्या वाटेला उपेक्षा, अवहेलना येते. साहित्यिकांमध्ये कसे गट असतात यावर ‘रेड कार्पेट’मध्ये यथार्थ प्रकाश टाकला आहे. लेखक म्हणतात, ‘‘रेड कार्पेटखाली साचलेली धूळ मात्र कॅमेर्‍यातून दिसत नाही... एव्हढंच!’’
‘म्हातारीच्या फणी’मधून एक शाश्‍वत सत्य मजेशीर पद्धतीने समजावून सांगितले आहे. एक विद्वान म्हातारीला म्हणतो, ‘‘तुझी फणी घरात हरवली आहे, तर ती घरातच शोध. त्यासाठी बाहेर डोकावण्याची गरज नाही.’’ तेव्हा म्हातारी म्हणते, ‘‘हेच तुला का समजत नाही, ज्या सत्याचा तू बाहेर शोध घेतो आहेस ते बाहेर सापडणारच नाही कारण ते तुझ्या आतच आहे.’’
भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता आणि अपेक्षाभंग याचं छान चित्रण ‘प्लॅचेंट’मध्ये आहे. ‘परपुरूष’ ही अगदी छोटी कथा... यामध्ये पूर्वाश्रमाचे प्रियकर-प्रेयसी अचानक रस्त्यात समोरासमोर येतात. तेव्हा प्रेयसी म्हणते, ‘‘परपुरूषाशी संबंध ठेवणं सभ्य स्त्रियांना शोभत नाही...’’ त्यावेळी पूर्वीचा प्रियकर म्हणतो, ‘‘तुझ्या दृष्टिने परपुरूष कोण? मी की तुझा नवरा?’’
‘कोड’ मुलींच्या लग्नाआड येतं. असं लग्न न ठरलेल्या, दरवेळी मोडणार्‍या मुलीची व्यथा आणि समाज मानचं वास्तव उघड करणारी कथा!
सामाजिक प्रवृत्ती ,समाजरिती याबरोबरच रहस्यकथाही लिहिल्या आहेत. ‘एमरल्ड ग्रीन’ अशीच उत्कंठा वाढवणारी रहस्यकथा वाचायला मिळते.
स्वत:च्या फायद्यासाठी क्रौर्याचा कळस गाठणारे दुसर्‍यांचा कसा वापर करून घेतात हे सांगणारी ‘लंगडा घोडा’ ही अगदी थोड्या शब्दातील कथा अंतर्मु्ख करून जाते.
याचप्रमाणे ‘व्यवहार शून्य’, ‘सावली’ इत्यादी कथाही मानवी मनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतात.
काही काही लोक इतके व्यवहारी असतात की त्यांना व्यवहारापुढे नाती, प्रेम काहीच दिसत नाही. परंतु काही माणसे जीवनात प्रामाणिकपणाच महत्त्वाचा मानतात. त्यांनाही समाज ‘व्यवहार शून्य’ ठरवतेही. बाब व्यवहार शून्य मध्ये अतिशय रंजकपणे सांगितली आहे.
मनोविज्ञानावरची ‘डोह’ कथा अंतर्मनाचा वेध घेते. ‘उपसांपादक पाहिजे’मध्ये पत्रकारितेची दुसरी बाजू दाखवली आहे. सध्याचा समाजजीवनाच्या मानसिकतेचे यथार्थ दर्शन घडवले आहे.
अशा विविध आशय, विषय असलेल्या कथा वाचकांना नक्कीच भावतील, मनात घर करून राहतील.
-सुवर्णा अ. जाधव
9819626647

Sunday, September 13, 2015

कुमार अजूनही बाळच...

अंदमान येथे झालेल्या  चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देशातील विचारधारेच्या वर्तुळात चांगलीच वैचारिक घुसळण झाल्याचे पाहायला मिळाले. या निमित्ताने अनेक कुमार विचारवंतांना आपल्या सुमार बाळबुध्दीचे दर्शन घडविण्याची संधी शेषराव मोरे सरांनी उपलब्ध करून दिली. अर्थात अनेक वर्षे बिळात बसलेल्या, नव्हे नव्हे लोकांनी बसवलेल्या भूजंगांना आता परत फुत्कार सोडायची सुरूवात प्रा. मोरे सरांनी उपलब्ध करून दिली. तेही एक बरेच झाले. कारण ज्या तथाकथित ज्येष्ठांना लोक खूप मोठे विचारवंत मानत होते त्यांच्या बुध्दीची 'पातळी' (सुटत आहे) कळून येत आहे. कुमार सप्तर्षी सारख्यांची असलेली जुनी ओळख पुसून ‘सुमार सप्तर्षी’ अशी होत आहे.
 असं म्हणतात, एखादी व्यक्ती वा संघटना जेव्हा सर्वोच्च शिखरावर पोहोचते तेव्हाच त्याची घसरण सुरू झालेली असते. सप्तर्षींच्या बाबतीतही तिच गत आहे. अर्थात त्यांची घसरण होऊन बराच काळ लोटला. आजच्या पिढीला सप्तर्षी कोण हे माहितही नाही. मात्र त्यांच्या ’युक्रांदी’य कारकिर्दीविषयी थोडेफार माहिती असलेल्यांनाही त्यांच्या अपयशाचे गुपित एव्हाना कळले असेल.
विशेष म्हणजे हे कळण्याला त्यांचे प्रा. शेषराव मोरे यांच्याविरोधातील लेखच पुरेसे ठरलेत.
दै. सकाळ, लोकमत या वृत्तपत्रातून त्यांनी गेल्या आठवडाभरात शेषराव मोरे सरांवर बरेच विषारी नव्हे तर विखारी फुत्कार सोडलेत. मात्र त्यातून ते निश्चित अशा निष्कर्षाप्रत पोहोचू शकले नाहीत. ‘लोकमत’च्या ’मंथन’ पुरवणीतील लेखाच्या सुरूवातीलाच ते लिहितात की, सत्ताबदलाची चाहूल साहित्यिकांच्या लिखाणातून येते. रशियन क्रांतीची चाहूल टॉलस्टॉय, चेकॉव्ह वगैरेंच्या लेखनातून लागली होती. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन हुकुमशाही येण्याची शक्यता, मग ते कम्युनिस्ट असो वा धर्मांध असोत, जॉर्ज ऑरवेलच्या कादंबर्‍यामधून व्यक्त झालेली दिसते. सध्याचे केंद्र सरकार कोणत्या विचारधारेचे आहे व ते कोणत्या दिशेने प्रवास करीत हुकुमशाहीचा टप्पा गाठेल याची चाहूल अंदमान येथे झालेल्या तथाकथित विश्व साहित्य संमेलन आणि त्याचे अध्यक्ष शेषराव मोरे यांच्या वाणीला फुटलेल्या धुमार्‍यातून लागते. तसे पाहिले तर नांदेडवासी शेषराव मोरे यांना कुणी विचारवंत मानत नाहीत. तरीही हुकुमशाहीचा सूर्य उगवणार आहे, हे कोंबड्याप्रमाणे ते आरवले.
सप्तर्षी यांच्या वरील उतार्‍यातून त्यांच्या बुध्दिची कीव करावी तेवढी कमीच वाटते; कारण एकीकडे ते म्हणतात की, सत्ताबदलाची चाहूल साहित्यिकांच्या लिखाणातून येते, मात्र वास्तवात देशात सत्ताबदल होऊन वर्ष लोटले आहे. त्यामुळे मोरे यांना सत्ताधार्‍यांचे भाट ठरविण्याचा सप्तर्षी यांचा युक्तीवाद पहिल्याच वाक्यात फोल ठरतो. त्यावरून त्यांच्या लिखाणात किती विखार आहे हे स्पष्ट होते. वरील उतार्‍यात केंद्र सरकार कसे हुकुमशाहीकडे जाणार आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात आणि खाली तेच सांगतात की, मोरे कोंबड्याप्रमाणे आरवले. या दोन्ही आरोपातून त्यांच्या सुमार बुध्दीचे दर्शन घडते. वर कढी म्हणजे, मोरे यांना कोणी विचारवंत मानत नाही असे ते म्हणतात तर मग, सप्तर्षी यांनी हा लेखनप्रपंच का केला? याचे उत्तर त्यांनी द्यावे.
 पुढे ते लिहितात, मोरे हे कुरूंदकरांच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागले तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय आहे.  त्याचा दाखला देत सप्तर्षी कुरुंदकरांच्या बुध्दिचा अर्धा भाग दलित व मुस्लिम या जनसमूहाबद्दल प्रतिगामी होता असे सांगतात. मग जर का त्यांच्या बुध्दिचा भाग अर्धा प्रतिगामी होता तरीही सप्तर्षी हा मुद्दा सोडून त्यांना पुरोगामी मानत होते. त्यामुळे तुमच्या या मोरेंबद्दलच्या लेखाला वाचकांनी नक्की काय मानायचे? पुरोगामी की प्रतिगामी?
पुढे जाऊन या लेखात सप्तर्षी कुरुंदकरांबाबत म्हणतात, मराठवाड्यातील लोकांमध्ये मुस्लिमांइतकाच दलितद्वेषही ठासून भरलेला आहे. कारण दलित लोक रझाकारांना गावातील श्रीमंतांचे घर दाखवित. मग रझाकार त्यांचे घर लुटीत. रझाकारांनी अत्याचार केले ही गोष्ट खरीच होती. त्यामुळे कुरुंदकर ही गोष्ट विसरायला तयार नव्हते. ती गोष्ट सोडता कुरुंदकर पुरोगामी होते.
सप्तर्षी यांचा हा युक्तिवाद किती बालिशपणाचा आहे हे लक्षात येते. जर का कुरुंदकारांच्या बुध्दिचा एखादा भाग प्रतिगामी मानून सप्तर्षी त्यांना मानत असतील तर मग मोरे यांच्याबाबतीतच आकस का? सप्तर्षी त्यांच्याबाबतीतही आपला उदात्तपणा का दाखवत नाहीत? एकंदरीतच काय तर, कुरूंदकरांच्या नावावर आपल्या सोयीच्या विचारांचे अपहरण करून आपली दुकानदारी चालवायची आणि ज्यामुळे दुकानदारी धोक्यात येईल असे वाटते तिथे सोयीस्कर पळवाट शोधायची असाच प्रताप सप्तर्षी आपल्या लिखाणात धादांतपणे करतात! वर शेषराव मोरेंना शहाणपणा शिकवतात की, सत्यनिष्ठा बाळगायची नाही, ही भूमिका असते.
 पुढे ते शेषराव मोरेंच्या ग्रंथ संशोधन आणि लेखन कार्याकडे वळतात. एखाद्या सत्यनिष्ठ विचारवंताचा तेजोभंग कसा केला जातो याचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे. शेषरावांनी ’गांधीजींना देशाची फाळणी हवी होती’ असा निष्कर्ष आधी काढला. त्याला विक्री मूल्य होते. आपल्या निष्कर्षाच्या सन्मानार्थ त्यांनी 700 पानांचा ग्रंथ लिहिला. हिंदुत्त्ववाद्यांचे मार्केट असल्याने प्रकाशकाने तत्परतेने तो प्रकाशित केला. चांगली कमाई झाली. मी त्या ग्रंथातील प्रत्येक शब्द न शब्द वाचलेला आहे. कुठेही गांधींना फाळणी हवी होती असा निष्कर्ष काढता येत नाही. सर्व काही मोघम व अनुमान पध्दतीचे प्रतिपादन आहे. शिवाय भाषाशैली अत्यंत कंटाळवाणी आहे.
वरील उतार्‍यात सप्तर्षींचा मोरे यांच्याबद्दलचा आकस दिसून येतो, कारण यांना मोरेंचा पुस्तकातील तर्कवाद मान्य नाही. मग लेखाच्या सुरूवातीला हेच सप्तर्षी महाशय जॉर्ज ऑरवेलच्या कादंबर्‍यांतील दाखला देतात मग मोरेंच्या तर्कवादाबाबतचा त्यांचा आकस नक्की कितपत योग्य वा न्याय्य आहे? राहता राहिला प्रश्न ’कॉंग्रेस आणि गांधींनी अखंड भारत का नाकारला? ’ या पुस्तकाचा. तर सप्तर्षी यांचा दावा आहे की मोरेंनी हा ग्रंथ केवळ हिंदुत्त्ववाद्यांना पुरक असाच लिहिला आहे. वर ते म्हणतात मी या ग्रंथातील शब्द न शब्द वाचलाय. मात्र त्यांनी हा ग्रंथ खरच वाचला आहे का? याबाबत माझ्या मनात शंका आहे, कारण ज्या कोणी हा ग्रंथ वाचला असेल त्यांच्याही मनात हा लेख वाचून प्रश्नचिन्ह उभारले असेल की, खरंच सप्तर्षींनी हा ग्रंथ वाचलाय का? कारण हा ग्रंथ हिंदुत्त्ववाद्यांना पुरक असा मुळीच नाही. केवळ नावावरूनच त्यांनी ग्रंथाबाबत निष्कर्ष काढला असावा अशी दाट शंका माझ्या मनात आहे. वास्तविक पाहता शेषराव मोरे यांच्या इतपत, भारताच्या फाळणीबाबतचे सेक्युलर विश्लेषण करणारी भूमिका आजवर कुणी मांडली नसावी. ते ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा कट्टर समर्थक असूनही. त्यामुळे सप्तर्षींनी मोरे यांच्या लिखाणाबाबत शंका घेवूच नये. खरे तरे मोरे यांच्यासारखी माणसे तर्कवादी लेखन करून सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या लिखाणामुळे सप्तर्षींसारख्या वैचारिक दुकानदारांची दुकानदारी बंद पडू लागल्यानेच असा विरोध वा तेजोभंग करण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसत आहे.
 या उपरोक्त कुमार सप्तर्षी यांनी आपल्या लेखात बर्‍याच सुमार दर्जाचे युक्तिवाद मांडण्याचा वृथा प्रयत्न केला आहे. आपण कसे पुरोगामी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करताना ते किती जातीयवादी आहेत हे त्यांच्या लेखातून दिसून येते. प्रत्यक्ष जीवनातही ते पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरून थोडा स्पार्क असणार्‍या तरूणांना त्याची जात विचारतात आणि जर का त्याने सांगितली नाही तर ते त्याच्या कुटुंबीयांना गाठून त्याची जात काढून घेतात. त्यामुळे इतका जातीयवादी माणूस इतरांच्या पुरोगामीत्वावर शंका घेतो हेच मुळी हास्यास्पद आहे. सप्तर्षींच्या या लेखनप्रपंचावरून घनश्याम धेंडेंच्या गझलचा एक शेर आठवतो,
तो बहिर्‍यांची जमवून मैफिल दाद लाटतो आहे,
अंधांच्या वस्तीत आरसे व्यर्थ वाटतो आहे.

- सागर सुरवसे.
9769179823 

(साप्ताहिक 'चपराक' १४ सप्टेंबर २०१५)

Saturday, September 5, 2015

पुरोगामी गोंधळ


‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाची ओळख ख्यातनाम लेखक, वक्ते, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी बेळगाव ‘तरूण भारत’च्या ‘अक्षरयात्रा’ पुरवणीतील ‘टेहळणी’ या त्यांच्या वाकचप्रिय सदरातून करून दिली आहे. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी सुहास पळशीकर आणि राजेंद्र व्होरा या पुरोगामी प्राध्यापकांच्या वैचारिक भ्रष्टतेची चिकित्सा या पुस्तकात केली आहे. हा लेख आवर्जून वाचा.
या पुस्तकासाठी आणि ‘चपराक’च्या अन्य दर्जेदार पुस्तकासाठी संपर्क : 020 24460909/7057292092


इतिहासात जाणीवपूर्वक गोंधळ उडवून द्यायचा आणि कोणी पुराव्यानिशी ते मांडू लागला की त्याला अनुल्लेखाने मारायचे ही चाल आजवर पुरोगामी आणि समाजवादी खेळत आले आहेत. मिळेल तिथे अशांचे बुरखे फाडणे हे काम अभ्यासकांचे असते. य. दि. फडकेंना त्यांच्या गांधीबद्दलच्या आकलनासंबंधी ‘शोध महात्मा गांधींचा‘ या द्विखंडात्मक वैचारिक ग्रंथाचे लेखक अरूण सारथी यांनी काही प्रश्‍न विचारले होते. संपूर्ण गांधी साहित्य तुम्ही वाचले असेल तर जिथे म्हणाल तिथे आपण यावर चर्चा करू असे आव्हान त्यांनी दिले होते. त्यावेळी फडकेंचे ‘नथुरामायण’ नामक पुस्तक प्रकाशित झाले होते. त्याला प्रत्युत्तरात्मक पुस्तक सारथींनी लिहिले होते. अनेक पुरावे देऊन फडकेंचा पुरोगामी कावा त्यांनी ‘नथुरामायण की गांधी संमोहन’ या पुस्तकात उघड केला होता. अर्थात चर्चेचे आव्हान यदिफजींनी कधीच स्वीकारले नाही. तसे झाले असते तर मोठी अडचण निर्माण झाली असती ना...!
वृथा वृष्टिःसमुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम्।
वृथा दानम् समर्थस्य वृथा दीपो दिवाऽपिचा॥
(समुद्रात पडलेला पाऊस व्यर्थ, भूक नसलेल्याला जेवण देणे व्यर्थ असते. श्रीमंताला दिलेले दान व्यर्थ आणि दिवसा लावलेला दिवा व्यर्थ असतो.) तसेच पुरोगाम्यांना त्यांच्या चुका दाखवून देणे व्यर्थ असते. अगदी बाबासाहेबांच्या निमित्ताने अखेर न्यायालयाकडून फटकारल्यानंतर अनेकांचे मुखवटे टरटरा फाटले तरीही आमचा वैचारिक विरोध चालूच राहिल असे तुणतुणे वाजविणे चालू होते. मुळात बाबासाहेबांनी स्वतःला इतिहास संशोधक म्हणून मिरविले नसताना सुद्धा तसेच आरोप रेटत लोकांच्या डोेळ्यात धूळ फेकत राहण्याचा कार्यक्रम वेगवेगळ्या वाहिन्यांवर चालू होता. या माध्यमातून सामान्य माणसाची काही काळ दिशाभूल होणे शक्य असते; तथापि पुरोगामी म्हणविणार्‍या लोकांनी गेली सहा दशके भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण करून आपल्याला हवा तसा इतिहास सर्वत्र पसरविला त्याचे काय...? अगदी शाळा आणि महाविद्यालयातून सुद्धा तथाकथित पुरोगाम्यांनी लिहिलेला इतिहासच शिकवला जातो. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात जगातील अनेक तत्त्ववेत्ते त्यांना आठवतात पण श्रीकृष्ण, भीष्म, विदूर, युधिष्ठिर, चाणक्य असे एकाहून एक धुरंदर आठवत नाहीत. त्यामुळे आमची मुले पाश्‍चात्य तत्त्ववेत्ते शिकतात पण भारतात त्याहून हुशार आणि राजनीती, युद्धनीती, समाजनिती, धर्मनिती सांगणार्‍या महान विभूती होऊन गेल्या हे त्यांना कळत नाही. जगाने नाकारलेला आर्य-द्रविड सिद्धांत येथे शिकविला जातो. यातून केवळ विषच पेरले जाते हे या लोकांना कळत नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरावे. जनमानसात खोटे कसे रूजवावे याचे धडे या पुरोगाम्यांकडून घ्यायला हवेत. त्यांनी पुस्तके लिहायची आणि नंतर विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ म्हणून तीच अभ्यासाला लावायची. या मेथडमुळे ही शिकून बाहेर पडलेली मुले कोणत्या प्रकारचे शिक्षण घेऊन बाहेर पडणार ते वेगळे सांगायला नको. अशावेळी या विद्वान लेखकांचे बुरखे फाडणे हे काम जिकीरीचे ठरावे. कारण ते केल्यानंतर उपेक्षाच पदरी पडणार याचे भान असूनही ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी ते काम केले आहे.
वैचारिक भ्रष्टाचार हा फार भयानक असतो. त्यातून बुद्धी मारली जाते. त्यामुळे मुलांचे आणि पुढे पर्यायाने समाजाचे कायमचे नुकसान होऊ शकते. पुणे येथील राज्यशास्त्राचे सुहास पळशीकर आणि राजेंद्र व्होरा या दोन प्राध्यापकांनी ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या नावाचा ग्रंथ (?) लिहिला. भाजप आणि शिवसेना युतीने 1995 मध्ये कॉंग्रेसची सत्ता उलथवली. हा अनपेक्षित धक्का केवळ कॉंग्रेसला नव्हता तर या पुरोगामी विद्वानांनासुद्धा होता कारण त्यांनी आजवर ज्या शिवसेनेला मुंबईतील गुंडापुंडांचा पक्ष आणि भाजपला सतत भटजी-शेठजीचा पक्ष म्हणून हिणवले तेच सत्तेवर आले ना...! मग लगेच या दोन्ही प्राध्यापकांनी आपली बौद्धिक कसोटी लावून तातडीने संधोधन केले आणि लगेच ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या नावाचा एक ग्रंथ लिहिला. आता एवढे परिश्रम या दोघांनी घेतले म्हटल्यावर तो सर्व अभ्यास लोकांसमोर यायला हवा या उदात्त विचाराने लगेच ‘ग्रंथाली’सारखी मान्यवर प्रकाशन संस्था पुढे झाली. तिने समकालिन राजकारणावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण असलेला, अशी जाहिरात करून हा ग्रंथ भरपूर खपवला.
नेमका तो ‘अभ्यासपूर्ण’ ग्रंथ भाऊंच्या हाती पडला आणि घोटाळा झाला. वाचताना भाऊंना या ग्रंथात अभ्यासाचा, सत्याचा, संशोधनाचा आणि कोणत्याही कारणमिमांसेचा लवलेशही नसल्याचे आढळले. नसलेल्या घटनासुद्धा असल्याचा भास निर्माण करून ग्रंथात घुसविल्याचे दिसले. या सर्व कल्पनाविलास ‘थिसीस’ला ग्रंथालीसारखी मात्तबर प्रकाशन संस्था गाजावाजा करीत प्रकाशित करते म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार असे मानून चालणाराही एक वर्ग आहे. त्यामुळे भाऊंनी यावर लिहायचे ठरविले. तत्पूर्वी त्यांनी त्या लेखक महाशयांशी संपर्क साधला. ते भेटायलाही आले. त्यातील प्रा. व्होरा सहजपणे म्हणाले, तपशिलाला फारसा अर्थ नाही. महत्त्व नाही. सत्ता मराठ्यांकडून इतरांकडे गेली. ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे संक्रमित झाली हा आमचा थिसीस आहे. त्याबद्दल मतभेद असतील तर बोला... बाकी तपशील दुय्यम आहे. त्यात चुका, गफलती असतील तर काही बिघडत नाही.
गंमत पहा... तपशील चुकीचा असेल ता थिसीस उभा कसा राहतो, हा प्रश्‍न या लेखकांना पडलाच नाही; कारण मुळात त्यांना केवळ शरद पवारांना जाणता राजा ठरवून त्यांच्या राजकारणाला पुरोगामी वाटचाल असे सांगायचे आणि लोकांसमोर त्याचा प्रचार करायचे इतकेच करायचे होते. पण मग ग्रंथालीने असे पुस्तक प्रकाशित का करावे? फक्त व्यावसायिक उद्दिष्ठ ठेवूनच हे केले गेले यात शंकाच नाही. मग त्यांच्या ‘अभिनव वाचक चळवळ’ या बिरूदावलीचे काय? ती सोयरनुसार बदलली असेल. यामुळे व्यथित होऊन भाऊंनी प्रकाशकाला व लेखकांना पुस्तकातील तपशीलातील चुका दाखवून देणारे सविस्तर सहा पानी टिपण तयार करून पाठवून दिले. त्यावर प्रकाशकाने लेखकांशी बोलून पुढे काय ते कळवतो, असे सांगितले. तथापि पुढे काहीच झाले नाही. कहर म्हणजे आजही विद्यार्थ्यांना तेच फसव्या इतिहासाचे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून वापरावे लागते. या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत लेखकांनी बदल केले नाहीत. पुरोगाम्यांना चुका दाखवून देणे व्यर्थ असते असे आम्ही म्हणतो ते त्याचमुळे होय.
अखेर भाऊंनी अठरा वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकातून त्या ग्रंथाची जाहीर चिरफाड केली. आता पुन्हा सत्तांतर झाले आहे. तीच जुनी समीकरणे पुढे केली जात आहेत. अशावेळी भाऊंच्या त्या मतांचे पुस्तक येणे अत्यंत आवश्यक होते. ते धाडस पुण्याच्या ‘चपराक प्रकाशन’च्या घनश्याम पाटील (संपर्कः 020 24460909/7057292092) नामक युवकाने दाखवले याबद्दल त्याचे अभिनंदन करायला हवे. सहसा अशा प्रस्थापित पुरोगामी लोकांच्या आणि मोठ्या प्रकाशन संस्थेच्या वाट्याला जाण्याचे साहस कोणी करत नाही; पण सत्य आणि तथ्य सामान्य वाचकांपर्यंत पोचावे यासाठी ‘चपराक’ने आपले नाव सार्थ करीत भाऊंचे पुस्तक ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या शीर्षकाने प्रकाशित केले. आम्ही फार वर्षापूर्वी ग्रंथालीचा तो ग्रंथ वाचला होता आणि आता भाऊंनी केलेले पोस्टमार्टम वाचले. मूळ ग्रंथ वाचला नाही तरी चालेल पण हे पुस्तक मात्र वाचायला हवे. भाऊंनी पत्रकारितेमध्ये 46 वर्षे काढली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाचा एन्सायक्लोपीडिया म्हणजे भाऊ तोरसेकर होय. सर्व गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात. त्यांना सहसा संदर्भग्रंथांची आवश्यकता भासत नाही. अशा अधिकारी व्यक्तिने हे पुस्तके लिहिले आहे हे महत्त्वाचे आहे. आता रूढ अर्थाने भाऊ हे इतिहास संशोधक आहेत का, याच्यावर ज्यांना वाद घालायचा असेल त्यांनी तो जरूर घालावा; पण बाबासाहेबांच्या विरोधातील पत्रावर सह्या करणार्‍या एकाही पुरोगामी विद्वानाने भाऊंच्या पुस्तकावर मत व्यक्त केले नाही हे लक्षात ठेवावे. जे पुरोगामी खोट्या इतिहासाला उत्तर देऊ शकत नाहीत ते आता खर्‍या इतिहासाला आणि अभ्यासाला आव्हान देऊ पाहात आहेत हे मुजोरीपणाचे लक्षण नव्हे काय?
- डॉ. सच्चिदानंद शेवडे
80801 21704

(पूर्वप्रसिद्धी : बेळगाव ‘तरूण भारत’, अक्षरयात्रा पुरवणी 6 सप्टेंबर 2015)